वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ia अध्या. १३ पृ. १२४-१३३
  • तो स्वतःच्या चुकांमधून शिकला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तो स्वतःच्या चुकांमधून शिकला
  • त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • गालीलातून आलेला संदेष्टा
  • “ऊठ, . . . निनवे शहरास जा”
  • यहोवा आपल्या संदेष्ट्याचं ताडन करतो
  • योनाला दाखवण्यात आलेली दया आणि त्याची सुटका
  • तो स्वतःच्या चुकांतून धडा शिकला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • योनाला यहोवाची दया प्रत्ययास येते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • तो दया दाखवण्यास शिकला
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • तो दया दाखवण्यास शिकला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
ia अध्या. १३ पृ. १२४-१३३
संदेष्टा योना

अध्याय तेरा

तो स्वतःच्या चुकांमधून शिकला

१, २. (क) योनावर आणि जहाजावरील लोकांवर कोणता प्रसंग ओढवला होता? (ख) योनाच्या कथेतून आज आपण काय शिकतो?

चोहीकडून कानावर पडणारे ते कर्कश, भयानक आवाज योनाला अगदी नकोसे झाले होते. एकीकडे, त्या लाकडी जहाजावर आदळणाऱ्‍या आणि त्याला खिळखिळं करणाऱ्‍या डोंगराएवढ्या प्रचंड लाटांचा आवाज; तर दुसरीकडे, बेफाम वाऱ्‍यानं हेलकावणाऱ्‍या शिडांच्या दोरखंडांचा आवाज. पण या सगळ्यापेक्षा, जिवाच्या आकांतानं ओरडणाऱ्‍या खलाशांचे आणि कप्तानाचे आवाज योनाच्या काळजाला चिरून जात होते. कारण त्या बुडत्या जहाजाला वाचवण्यासाठी ते सगळे जीव तोडून प्रयत्न करत होते. पण तो खवळलेला समुद्र आता या सगळ्यांना गिळंकृत करणार आणि त्यासाठी आपणच जबाबदार असणार, याची योनाला जाणीव झाली होती.

२ हा भयंकर प्रसंग ओढवण्याचं कारण म्हणजे योनानं त्याचा देव, यहोवा याच्या दृष्टीनं एक गंभीर चूक केली होती. पण, नेमकं काय केलं होतं त्यानं? आणि ही चूक सुधारण्यासाठी आता फार उशीर झाला होता का? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला बरंच काही शिकवून जातात. उदाहरणार्थ, कधीकधी यहोवाचे विश्‍वासू सेवकसुद्धा भरकटू शकतात; पण, योग्य पावलं उचलल्यास त्यांना आपली चूक सुधारणं शक्य आहे.

गालीलातून आलेला संदेष्टा

३-५. (क) लोक योनाचा विचार करतात तेव्हा सगळ्यात आधी सहसा त्यांच्या मनात काय येतं? (ख) योनाच्या पार्श्‍वभूमीबद्दल काय म्हणता येईल? (तळटीपही पाहा.) (ग) संदेष्टा म्हणून सेवा करणं योनासाठी कठीण का होतं?

३ लोक योनाचा विचार करतात तेव्हा सहसा त्याचे नकारात्मक गुणच सगळ्यात आधी त्यांच्या मनात येतात. त्यानं कशी देवाची आज्ञा मोडली, तो किती हट्टी होता, याच गोष्टींचा ते विचार करतात. पण, योनाकडून शिकण्यासारख्या बऱ्‍याच चांगल्या गोष्टी आहेत. लक्षात घ्या, की संदेष्टा म्हणून कार्य करण्यासाठी यहोवा देवानं स्वतः त्याची निवड केली होती. इतकी मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी त्याची निवड करण्यात आली, त्याअर्थी तो नक्कीच खूप विश्‍वासू आणि नीतिमान पुरुष असावा.

नकारात्मक गुणांपेक्षाही योनाच्या व्यक्‍तिमत्त्वात अनेक चांगले गुण होते

४ बायबलमध्ये योनाच्या पार्श्‍वभूमीबद्दल फार कमी माहिती दिली आहे. (२ राजे १४:२५ वाचा.) नासरेथपासून अवघ्या ४ किलोमीटरवर असलेल्या गथ-हेफेर या ठिकाणी तो राहत होता; याच नासरेथ नगरात पुढं सुमारे ८०० वर्षांनंतर येशू लहानाचा मोठा झाला.a योनानं इस्राएलच्या दहा-वंशीय राज्याचा राजा, यराबाम दुसरा याच्या शासनकाळात संदेष्टा म्हणून कार्य केलं. एलीया संदेष्ट्याला जाऊन आतापर्यंत बराच काळ लोटला होता; तसंच, एलीयानंतर संदेष्टा म्हणून कार्य केलेल्या अलीशाचासुद्धा यराबामाच्या पित्याच्या काळात मृत्यू झाला होता. देशातून बआल उपासना नाहीशी करण्यासाठी यहोवानं या संदेष्ट्यांचा उपयोग केला होता. पण, इस्राएली लोक पुन्हा एकदा जाणूनबुजून या खोट्या उपासनेकडे वळले होते. मुळात ते, “परमेश्‍वराच्या दृष्टीने” वाईट करणाऱ्‍या त्यांच्या राजाचंच अनुकरण करत होते. (२ राजे १४:२४) साहजिकच, अशा लोकांमध्ये संदेष्टा म्हणून कार्य करणं योनाला कठीण गेलं असेल. पण, असं असूनही तो विश्‍वासूपणे आपलं कार्य करत राहिला.

५ मग, अचानक एक दिवशी योनाच्या जीवनात एक अतिशय महत्त्वाची घटना घडली. देवानं त्याच्यावर एक कामगिरी सोपवली. पण, योनाला ती फार कठीण वाटली. यहोवानं त्याला असं काय करायला सांगितलं होतं?

“ऊठ, . . . निनवे शहरास जा”

६. यहोवानं योनावर कोणती कामगिरी सोपवली होती, आणि योनाला ती कठीण का वाटली असेल?

६ यहोवानं योनाला म्हटलं: “ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्याविरुद्ध आरोळी कर; कारण त्याची दुष्टता मजपुढे आली आहे.” (योना १:२) योनाला हे काम अतिशय कठीण का वाटलं असेल याची बरीच कारणं आहेत. निनवे हे पूर्वेकडे सुमारे ८०० किलोमीटरवर असलेलं एक मोठं शहर होतं; आणि तिथं पोहचण्यासाठी जवळजवळ एक महिना पायी प्रवास करावा लागत असावा. पण या लांबच्या, खडतर प्रवासापेक्षाही जास्त योनाला आणखी एका चिंतेनं घेरलं होतं. त्याला निनवे शहरात जाऊन तिथल्या अश्‍शूरी लोकांना यहोवाच्या न्यायदंडाचा संदेश घोषित करायचा होता. शिवाय, अश्‍शूरी लोक हिंसक असून ते लोकांचा अतिशय क्रूरपणे छळ करतात, हे सर्वांना माहीत होतं. खरंतर, पुढं निनवे शहराला ‘रक्‍तपाती नगरी’ असं म्हणण्यात आलं. (नहू. ३:१, ७) अशा या शहरात यहोवाच्या या एकट्या सेवकाचा कसा निभाव लागणार होता? जर देवाच्या लोकांनीच योनाचं ऐकलं नव्हतं, तर या मूर्तिपूजक लोकांकडून तो काय अपेक्षा करू शकत होता?

७, ८. (क) देवानं दिलेल्या कामगिरीपासून पळून जाण्याचा योनाचा निश्‍चय किती ठाम होता? (ख) योना भित्रा होता असा निष्कर्ष आपण का काढू नये?

७ असे विचार योनाच्या मनातही आले असावेत का? नक्की सांगता येत नाही. पण एक मात्र खरं, देवानं त्याच्यावर सोपवलेल्या कामगिरीपासून तो दूर पळाला. यहोवानं त्याला पूर्वेकडे जायला सांगितलं होतं; पण, योना पश्‍चिमेकडे, आणि तेसुद्धा होताहोईल तितकं दूर जायला निघाला. याफो नावाच्या बंदर शहरात पोहचल्यावर त्याला तार्शिशला जाणारं एक जहाज मिळालं. काही विद्वानांच्या मते, तार्शिश हे सध्याच्या स्पेनमध्ये होतं. तसं जर असेल, तर योना निनवेपासून सुमारे ३,५०० किलोमीटर दूर जायला निघाला होता. महासागराच्या (भूमध्य सागराच्या) दुसऱ्‍या टोकापर्यंतच्या या प्रवासाला जवळजवळ एक वर्ष लागत असावं. इतका लांबचा प्रवास करायला योना तयार झाला, त्यावरून पळून जाण्याचा त्याचा निश्‍चय किती ठाम होता हे दिसून येतं.—योना १:३ वाचा.

८ पण, याचा अर्थ योना भित्रा होता असं म्हणता येईल का? असा निष्कर्ष काढण्याची घाई आपण करू नये. कारण योनाबद्दल आपण पुढं जे पाहणार आहोत, त्यावरून तो किती धाडसी होता हेच दिसून येतं. पण, आपल्या सर्वांप्रमाणेच योनासुद्धा अनेक कमतरता असलेला अपरिपूर्ण माणूस होता; या कमतरतांवर मात करण्यासाठी त्यालासुद्धा संघर्ष करावा लागत होता. (स्तो. ५१:५) आणि आपल्यापैकी असा कोण आहे ज्याला कधीच भीती वाटली नाही?

९. यहोवाकडून मिळालेल्या एखाद्या जबाबदारीबद्दल आपल्याला कसं वाटू शकतं, आणि कोणती गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे?

९ कधीकधी, यहोवा आपल्यावर एखादी जबाबदारी सोपवतो तेव्हा ती पूर्ण करणं फार कठीण किंवा अशक्य आहे, असं आपल्याला वाटू शकतं. राज्याची सुवार्ता सांगण्याची महत्त्वाची जबाबदारीसुद्धा कदाचित आपल्याला खूप अवघड वाटू शकते. (मत्त. २४:१४) पण, येशूनं म्हटलं होतं: “देवाला सर्व काही शक्य आहे.” (मार्क १०:२७) त्याचे हे शब्द किती अर्थपूर्ण आहेत हे कधीकधी आपण विसरून जातो. जर आपल्याला या गोष्टीचा विसर पडू शकतो, तर मग योनाची समस्या आपण नक्कीच समजू शकतो. पण, दिलेल्या कामगिरीपासून योना पळून गेल्यामुळं पुढं काय परिणाम झाले?

यहोवा आपल्या संदेष्ट्याचं ताडन करतो

१०, ११. (क) किनारा हळूहळू मागं पडला तेव्हा योनाला कसं वाटलं असावं? (ख) जहाजावर आणि त्यावरील लोकांवर कोणतं संकट ओढवलं होतं?

१० त्या फिनिशियन पद्धतीच्या मालवाहू जहाजात बसून, लांबच्या प्रवासाला निघालेल्या योनाची कल्पना करा. जहाज किनारा सोडण्याच्या तयारीत आहे. कप्तानाची आणि खलाश्‍यांची लगबग सुरू आहे. हळूहळू किनारा मागं पडून शेवटी दिसेनासा झाला तसा योनाचा जीव भांड्यात पडला असेल. त्याला ज्याची सगळ्यात जास्त भीती वाटत होती त्यापासून ‘शेवटी, सुटलो!’ असं कदाचित त्याला वाटलं असेल. पण काही वेळातच हवामानानं आपले रंग बदलले.

११ एकाएकी जोरदार वारा वाहू लागला आणि समुद्रानं भयानक रूप धारण केलं. आधुनिक काळातली मोठमोठी जहाजंसुद्धा खेळण्यातली वाटावीत इतक्या महाकाय लाटा समुद्रात उसळू लागल्या. मग, त्या खवळलेल्या समुद्रात त्या साध्याशा लाकडी जहाजाची काय अवस्था झाली असेल, याची आपण केवळ कल्पना करू शकतो! योनानं त्याच्या अहवालात नंतर असं लिहिलं: “परमेश्‍वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला.” पण, प्रत्यक्ष ते जहाज त्या वादळात सापडलेलं असताना योनाला या गोष्टीची कल्पना होती का? हे आपण नक्की सांगू शकत नाही. त्यानं पुढं म्हटलं, की “जहाज फुटण्याच्या लागास आले.” (योना १:४) तेव्हा सर्व खलाशी आपापल्या देवांचा धावा करू लागले. अर्थात, त्यांचे देव त्यांची काहीच मदत करू शकणार नाहीत हे योनाला माहीत होतं. (लेवी. १९:४) पण, ज्या देवाची आज्ञा मोडून योना पळ काढत होता, त्याला तो प्रार्थना करणार तरी कोणत्या तोंडानं?

१२. (क) जोरदार वादळ होत असताना योना गाढ झोपी गेला, याबद्दल आपण त्याला दोषी का ठरवू नये? (तळटीपही पाहा.) (ख) संकट कुणामुळं ओढवलं होतं हे यहोवानं कसं उघड केलं?

१२ खलाश्‍यांचा जीव वाचवण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही हे ओळखून योना जहाजाच्या तळाशी जाऊन झोपला. त्याला अगदी गाढ झोप लागली.b मग, जहाजाच्या कप्तानानं त्याच्याकडे येऊन त्याला उठवलं आणि इतरांप्रमाणेच त्यानंही आपल्या देवाचा धावा करावा असं सांगितलं. हे काही साधंसुधं वादळ नसून कुठल्या तरी अलौकिक शक्‍तीमुळं घडत आहे हे खलाश्‍यांनी ओळखलं. तेव्हा, नेमकं कुणामुळं आपल्यावर हे संकट ओढवलं आहे हे पाहण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकायचं ठरवलं. चिठ्ठ्या टाकल्यावर, जसजसा एकेक माणूस सुटत गेला तसतशी योनाची धडधड वाढू लागली. शेवटी काही क्षणांतच, सत्य समोर आलं. यहोवानं अशा काही प्रकारे गोष्टी घडवून आणल्या, की योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि संकट त्याच्यामुळंच ओढवलं होतं हे उघड झालं.—योना १:५-७ वाचा.

१३. (क) योनानं काय कबूल केलं? (ख) योनानं खलाश्‍यांना काय करायला सांगितलं, आणि का?

१३ आता योनानं खलाश्‍यांना सगळं काही खरंखरं सांगून टाकलं. आपण सर्वसमर्थ देवाचे, यहोवाचे उपासक आहोत आणि त्याच्या आज्ञेचं उल्लंघन करून आपण पळून जात असल्यामुळंच हे भयंकर संकट ओढवलं आहे, असं त्यानं म्हटलं. हे सगळं ऐकून खलाश्‍यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं; भेदरलेल्या डोळ्यांनी ते त्याच्याकडे पाहतच राहिले. जहाजाला आणि स्वतःला वाचवण्यासाठी काय करावं, असं त्यांनी योनाला विचारलं. मग, योनानं त्यांना काय करायला सांगितलं? खरंतर, त्या खवळलेल्या समुद्रात बुडण्याच्या नुसत्या विचारानंसुद्धा योनाच्या काळजाचा थरकाप उडाला असेल. पण, या सगळ्यांना वाचवणं आपल्या हातात असताना आपण त्यांना समुद्राच्या तळाशी कसं जाऊ देऊ शकतो, असा विचार नक्कीच त्याच्या मनात आला असेल. आणि म्हणून तो म्हणाला: “मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे.”—योना १:१२.

१४, १५. (क) आपण योनाच्या विश्‍वासाचं अनुकरण कसं करू शकतो? (ख) आपल्याला समुद्रात टाकून द्यावं असं योनानं म्हटलं तेव्हा खलाश्‍यांनी काय केलं?

१४ योना भित्रा असता तर तो कधी असं बोलला असता का? खरंतर त्या जीवघेण्या प्रसंगी, त्यानं धैर्य दाखवून इतरांच्या हिताचा विचार केला, हे पाहिल्यावर यहोवाला किती आनंद झाला असेल! यावरून योनाचा विश्‍वास किती मजबूत होता हेच दिसून येतं. आज आपणसुद्धा स्वतःपेक्षा इतरांच्या हिताचा विचार करून योनासारखा विश्‍वास दाखवू शकतो. (योहा. १३:३४, ३५) एखाद्या व्यक्‍तीला काही मदतीची गरज आहे, तिला भावनिक आधाराची किंवा आध्यात्मिक साहाय्याची गरज आहे, असं आपल्याला जाणवतं तेव्हा तिची मदत करण्यासाठी आपण लगेच पुढं येतो का? आपण असं करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होत असेल, यात शंका नाही.

१५ योनाचे ते शब्द कदाचित खलाश्‍यांच्याही मनाला भिडले असतील; कारण योनानं सांगितल्यानुसार त्याला समुद्रात टाकण्यास ते सुरुवातीला तयार झाले नाहीत. याउलट, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ते आपल्या परीनं प्रयत्न करत राहिले. पण याचा काहीच उपयोग झाला नाही. वादळाचा जोर वाढतच गेला. शेवटी, आपल्याजवळ काहीच पर्याय उरला नाही याची त्यांना जाणीव झाली. तेव्हा त्यांनी योनाचा देव, यहोवा याचा धावा केला आणि त्यानं आपल्याला दया दाखवावी अशी याचना करून योनाला समुद्रात फेकून दिलं.—योना १:१३-१५.

योनाला समुद्रात फेकून दिल्यावर महाकाय लाटा त्याच्यावर आदळतात

योनाच्या सांगण्यावरून खलाश्‍यांनी त्याला उचलून खवळलेल्या समुद्रात फेकून दिलं

योनाला दाखवण्यात आलेली दया आणि त्याची सुटका

१६, १७. योनाला समुद्रात टाकण्यात आलं तेव्हा काय झालं याचं वर्णन करा. (चित्रंसुद्धा पाहा.)

१६ योना त्या उसळत्या लाटांमध्ये पडला. सुरुवातीला कदाचित हातपाय मारून त्यानं पाण्याच्या वर राहण्याचा आटोकाट प्रयत्न केला असेल. त्या दुधाळ, फेसाळ लाटांवर पोहत राहण्याचा प्रयत्न करत असताना जहाज आपल्यापासून दूर जात असल्याचं त्यानं पाहिलं. पण, त्या महाकाय लाटांपुढं त्याचं काहीच चालेना. शेवटी, तो पाण्यात बुडाला. हळूहळू समुद्राच्या तळाशी जात असताना आपल्याला आता काहीच आशा नाही, असं त्याला जाणवलं.

१७ समुद्राच्या तळाशी जाताना योनाच्या मनात कोणकोणते विचार आले, याचं त्यानं नंतर वर्णन केलं. त्या काही क्षणांतच, त्याच्या आयुष्यातल्या कितीतरी गोष्टी त्याच्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या. देवाची आज्ञा मोडल्यामुळं आपण त्याची कृपा कायमची गमावून बसलो आहोत, या विचारानं त्याला अतिशय दुःख झालं. आपण समुद्राच्या अगदी खाली, पर्वतांच्या तळाशी चाललो आहोत याची त्याला जाणीव झाली. तिथं शेवाळानं त्याला घेरलं. आता इथंच आपली कबर असणार, असं योनाला वाटलं.—योना २:२-६ वाचा.

१८, १९. समुद्राच्या तळाशी गेल्यावर योनासोबत काय घडलं, त्याला कोणत्या प्रकारच्या माशानं गिळलं, आणि हे सर्व कोणी घडवून आणलं होतं? (तळटीपही पाहा.)

१८ पण तेवढ्यात, योनाला अगदी जवळ एक काळसर आकृती दिसली. तो एक प्रचंड मोठा मासा होता. तो योनाच्या दिशेनं येऊ लागला आणि काही कळण्याआधीच माशानं आपला प्रचंड जबडा उघडून योनाला गिळून टाकलं!

समुद्राच्या तळाशी गेल्यावर एक प्रचंड मोठा मासा त्याच्या जवळ येतो

योनाला गिळण्यासाठी यहोवानं एक मोठा मासा पाठवला

१९ योनाला वाटलं, ‘झालं, आता मात्र सगळंच संपलं!’ पण काय आश्‍चर्य, तो अजूनही जिवंत होता! माशाच्या पोटात जाऊनही त्याच्या शरीराला कसलीच इजा झाली नव्हती, किंवा तो गुदमरून मेला नव्हता. त्याचा श्‍वास अजूनही चालू होता. योनाला याची जाणीव झाली तेव्हा तो थक्क झाला. तो “प्रचंड मत्स्य” त्याच्या देवानं, यहोवानंच पाठवला होता,” यात काही शंका नाही.c—योना १:१७.

२०. माशाच्या पोटातून योनानं जी प्रार्थना केली, त्यावरून योनाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं?

२० तासांमागून तास सरत गेले तसा योना, यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या त्या गडद काळोखात, आपले विचार जुळवू लागला. मग, त्यानं हे विचार प्रार्थनेत यहोवापुढं मांडले. त्याची ही प्रार्थना आपण योनाच्या दुसऱ्‍या अध्यायात वाचू शकतो. आणि ती आपल्याला त्याच्याबद्दल बरंच काही सांगून जाते. प्रार्थनेत योनानं जे म्हटलं त्यावरून त्याला शास्त्राचं बरंच ज्ञान होतं, असं दिसतं. कारण, त्यानं स्तोत्रसंहितेमधील अनेक वचनांचा आपल्या प्रार्थनेत उल्लेख केला. तसंच, यावरून त्याचा एक अतिशय उल्लेखनीय गुण दिसून येतो—त्याची कृतज्ञता. शेवटी प्रार्थनेत योनानं म्हटलं: “मी तुला आभारप्रदर्शनाचे यज्ञ करीन; मी केलेले नवस फेडीन; तारण परमेश्‍वरापासून होते.”—योना २:९.

२१. तारणाच्या बाबतीत योना काय शिकला, आणि कोणती महत्त्वाची गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे?

२१ तिथं त्या माशाच्या पोटात, जिथं आशेचा कोणताही किरण नव्हता, अशा ठिकाणी योना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकला. ती म्हणजे, यहोवा कोणत्याही व्यक्‍तीला, कधीही आणि कुठंही मदत करण्यास म्हणजेच कठीण परिस्थितीतून तिचं तारण करण्यास समर्थ आहे. यहोवानं, माशाच्या पोटातून प्रार्थना करणाऱ्‍या योनाचं ऐकलं आणि संकटात सापडलेल्या आपल्या या सेवकाला वाचवलं. (योना १:१७) केवळ यहोवाच एका मोठ्या माशाच्या पोटात आणि तेही तीन दिवस आणि तीन रात्री एका व्यक्‍तीला जिवंत ठेवू शकतो. आपला “प्राण” यहोवाच्या “हाती” आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. (दानी. ५:२३) केवळ त्याच्या कृपेमुळंच आज आपण जिवंत आहोत. मग, याबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटते का? आपण ही कृतज्ञता त्याच्या आज्ञांचं पालन करण्याद्वारे दाखवू शकतो.

२२, २३. (क) लवकरच योनाच्या कृतज्ञतेची परीक्षा कशी झाली? (ख) आपल्या हातून चुका होतात तेव्हा, योनाचं उदाहरण आपल्याला कसं मदत करू शकतं?

२२ योनाबद्दल काय म्हणता येईल? या अनुभवातून, तो यहोवाच्या आज्ञांचं पालन करण्याद्वारे आपली कृतज्ञता व्यक्‍त करण्यास नक्कीच शिकला. यहोवानं योनाची कशी मदत केली त्याचा विचार करा! तीन दिवस आणि तीन रात्री उलटल्यानंतर, माशानं समुद्राच्या किनाऱ्‍याला येऊन “योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकले.” (योना २:१०) किनाऱ्‍यावर येण्यासाठी त्याला पोहावंसुद्धा लागलं नाही. अर्थात, तिथून पुढं त्याला स्वतःलाच त्याची वाट शोधावी लागली. पण, लवकरच त्याच्या कृतज्ञतेची परीक्षा झाली. योना ३:१, २ म्हणतं: “परमेश्‍वराचे वचन दुसऱ्‍यांदा योनाला प्राप्त झाले की, ऊठ; त्या मोठ्या निनवे शहरास जा व मी तुला सांगेन तो संदेश त्यास आरोळी करून सांग.” मग, योनानं काय केलं?

२३ त्यानं एका क्षणाचाही विलंब केला नाही. आपण वाचतो, “तेव्हा योना उठून परमेश्‍वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला.” (योना ३:३) या वेळी त्यानं यहोवाच्या आज्ञेचं पालन केलं. आता तो स्वतःच्या चुकांमधून शिकला होता. याबाबतीत आपण नक्कीच योनाचं अनुकरण करू शकतो. आपण सर्वच जण अनेकदा चुकतो, पाप करतो. (रोम. ३:२३) पण म्हणून आपण हार मानावी का? की स्वतःच्या चुकांमधून शिकून पुन्हा यहोवाकडे वळावं?

२४, २५. (क) योनाला त्याच्या जीवनकाळात कोणते आशीर्वाद मिळाले? (ख) भविष्यात योनाला कोणते आशीर्वाद मिळतील?

२४ यहोवाच्या आज्ञेचं पालन केल्याबद्दल योनाला प्रतिफळ मिळालं का? नक्कीच. पहिली गोष्ट म्हणजे, जहाजावरील खलाश्‍यांचा त्या भयंकर संकटातून जीव वाचला होता, असं कालांतरानं योनाला कळलं असावं असं दिसतं. योनानं दाखवलेल्या स्वार्थ-त्यागी मनोवृत्तीमुळं वादळ लगेच शांत झालं आणि त्या खलाश्‍यांनी “यहोवाचे फारच भय धरले.” आणि आपल्या खोट्या दैवतांऐवजी त्यांनी यहोवाला यज्ञ केला.—योना १:१५, १६, पं.र.भा.

२५ पण याहीपेक्षा मोठं प्रतिफळ योनाला नंतर मिळालं. ते म्हणजे, येशूनं स्वतःच्या मृत्युबद्दल सांगताना योनाचं उदाहरण दिलं. योना ज्याप्रमाणे तीन दिवस व तीन रात्री माशाच्या पोटात होता, त्याचप्रमाणे आपणसुद्धा तीन दिवस व तीन रात्री कबरेमध्ये राहू, असं येशूनं म्हटलं. (मत्तय १२:३८-४० वाचा.) विचार करा, जेव्हा योनाचं पुनरुत्थान होईल तेव्हा येशूनं आपल्या उदाहरणाचा उपयोग केला, हे जाणून त्याला किती आनंद होईल! (योहा. ५:२८, २९) यहोवा तुम्हालादेखील आशीर्वाद देण्यास उत्सुक आहे. तर मग, योनासारखंच तुम्हीदेखील स्वतःच्या चुकांमधून शिकून आज्ञाधारक व स्वार्थ-त्यागी मनोवृत्ती दाखवाल का?

a योना मुळात गालीलातल्या एका नगरातला होता, ही गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे; कारण येशूबद्दल बोलताना परूशी लोकांनी गर्विष्ठपणे असं म्हटलं होतं: “शोध करून पाहा, की गालीलातून कोणी संदेष्टा उद्‌भवत नाही.” (योहा. ७:५२) अनेक अनुवादकांचं आणि संशोधकांचं असं म्हणणं आहे, की गालीलासारख्या साध्याशा प्रांतातून यापूर्वी कोणी संदेष्टा आला नव्हता आणि पुढंही कधी येऊ शकणार नाही, असा परूशी लोक सरसकटपणे निष्कर्ष काढत होते. पण, असा निष्कर्ष काढण्याद्वारे खरंतर ते इतिहासाकडे आणि भविष्यवाणीकडे डोळेझाक करत होते.—यश. ९:१, २.

b योना किती गाढ झोपला होता हे दाखवण्यासाठी बायबलच्या एका भाषांतरात म्हटलं आहे, की तो अक्षरशः घोरत होता. पण, अशा जोरदार वादळात योना इतका गाढ झोपला यावरून त्याला स्वतःची किंवा इतरांच्या जिवाची काहीच पर्वा नव्हती, असं आपण म्हणू शकत नाही. जेव्हा एखादी व्यक्‍ती अतिशय निराश असते तेव्हा कधीकधी तिला झोप अनावर होऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गेथशेमाने बागेत येशू अतिशय व्याकूळ होऊन प्रार्थना करत होता तेव्हा पेत्र, याकोब आणि योहान हे “खिन्‍न झाल्यामुळे झोपी” गेले होते.—लूक २२:४५.

c जेव्हा बायबलचं भाषांतर इब्री भाषेतून ग्रीक भाषेत करण्यात आलं, तेव्हा “मत्स्य” या शब्दाचं भाषांतर, “भयंकर समुद्री प्राणी” किंवा “अतिशय मोठा मासा” असं करण्यात आलं. योनाला गिळणारा मासा नेमका कोणता होता, हे जरी आपण खात्रीनं सांगू शकत नसलो, तरी भूमध्य सागरात असे शार्क मासे आढळले आहेत, जे एका संपूर्ण माणसाला गिळू शकतात. इतर ठिकाणी यापेक्षाही कितीतरी पटीनं मोठे शार्क आढळतात; व्हेल शार्क तर ४५ फूट किंवा त्यापेक्षाही लांब असू शकतात.

यावर विचार करा. . .

  • यहोवाकडून मिळालेल्या जबाबदारीबद्दल योनाला जी भीती वाटली, ती तुम्ही समजू शकता का?

  • योनाला आज्ञाधारकता शिकवताना, यहोवानं धीर व दया कशी दाखवली?

  • स्वतःच्या चुकांमधून आपण शिकलो आहोत, हे योनानं कसं दाखवलं?

  • तुम्हाला कोणकोणत्या मार्गांनी योनाच्या विश्‍वासाचं अनुकरण करायला आवडेल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा