वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • kl अध्या. ६ पृ. ५३-६१
  • आपण वृद्ध होतो व मरतो ते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण वृद्ध होतो व मरतो ते का?
  • सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एक अनिष्टसूचक कट
  • कट कसा पूर्ण करण्यात आला
  • पाप व मरण कसे पसरले
  • सैतानाच्या युक्त्यांबद्दल सावधान असा!
  • सार्वकालिक जीवनाचा शत्रू
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • येशू तारण करतो—कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • पापाचा अंत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
kl अध्या. ६ पृ. ५३-६१

अध्याय ६

आपण वृद्ध होतो व मरतो ते का?

१. मानवी जीवनाच्या बाबतीत कोणते स्पष्टीकरण शास्त्रज्ञांना देता येणे शक्य झाले नाही?

मानव का वृद्ध होतात व मरतात ते शास्त्रज्ञांना ठाऊक नाही. आपल्या शरीरातील पेशींचे सतत नवीनीकरण होत राहावे आणि आपण सर्वदा जिवंत राहावे हे घडले पाहिजे. ह्‍योजून सोशिकीगॉकू (सजीव पेशींच्या घडणीचे सर्वसाधारण शास्त्र) हे पुस्तक म्हणते: “पेशींचे दुर्बल होत जाणे याचा एखाद्याचे वार्धक्य व मरण याच्याशी कसा संबंध आहे हे मोठे गूढ आहे.” पुष्कळ शास्त्रज्ञांना वाटते की, जीवनाला “निसर्गतः, स्वभावतः” मर्यादा आहेत. त्यांचे म्हणणे बरोबर आहे असे तुम्हाला वाटते का?

२. जीवन क्षणभंगुर असल्यामुळे काहींनी काय केले?

२ मानवाने नेहमीच दीर्घकाळ जगण्याची उत्कंठा बाळगली आणि अमरत्व मिळावे म्हणून प्रयत्न देखील केले. सा. यु. पूर्वीच्या चवथ्या शतकापासून चिनी उमरावांचे लक्ष अमरत्व मिळवून देऊ शकते असे समजल्या जाणाऱ्‍या एका औषधाकडे खेचले गेले. नंतरच्या काही चिनी सम्राटांनी ते द्रव—जीवनमर्यादेची वाढ करणारे पाऱ्‍यापासून बनवलेले तथाकथित द्रव—घेतले आणि ते मरण पावले. जगात सर्वत्र लोकांचा असा विश्‍वास आहे की, मरण हा काही त्यांच्या अस्तित्वाचा शेवट नव्हे. बौद्ध, हिंदू, मुस्लिम व इतरांनाही मरणानंतरच्या जीवनाबद्दल एक प्रज्वलित आशा आहे. ख्रिस्ती धर्मजगतात बहुतेकांना सद्य जीवनानंतरच्या स्वर्गीय परमसुखाची अपेक्षा वाटत राहते.

३. (अ) मानवाठायी चिरकाल जीवनाची उत्कंठा का आहे? (ब) मरणाबद्दल कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे मिळण्यास हवीत?

३ मरणानंतर सौख्य मिळवण्याचा विचार चिरकालिक जीवन मिळवण्याच्या इच्छेला प्रवर्तित करतो. देवाने आम्हामध्ये अनंतकाळाची जी कल्पना ठेवली आहे त्यावर बायबल, “त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे,” असे म्हणून अधिक भर देते. (उपदेशक ३:११) त्याने पहिल्या मानवांची, ते पृथ्वीवर सदासर्वदा जिवंत राहू शकतील या संभाव्यतेनेच निर्मिती केली होती. (उत्पत्ति २:१६, १७) तर मग, मानव का मरतो? या जगामध्ये मृत्यू कसा आला? या प्रश्‍नांवर, देव देत असलेले ज्ञान प्रकाश टाकते.—स्तोत्र ११९:१०५.

एक अनिष्टसूचक कट

४. मानवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या गुन्हेगाराची येशूने कशी ओळख दिली?

४ गुन्हेगार आपल्या पाऊलखुणा मिटवण्याचा प्रयत्न करतो. हीच गोष्ट करोडोंच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या गुन्ह्‌याला जबाबदार असणाऱ्‍याच्या बाबतीत खरी ठरली. मानवी मृत्यूला गूढ ठरवून बुरख्याखाली झाकण्यासाठी त्याने सर्व गोष्टींची यथास्थित योजना केली. येशू ख्रिस्ताने, त्याला ठार मारण्याचा यत्न करणाऱ्‍यांना या गुन्हेगाराची ओळख करून देताना म्हटले: “तुम्ही आपला बाप सैतान ह्‍यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही.”—योहान ८:३१, ४०, ४४.

५. (अ) जो दियाबल सैतान बनला त्याचा मूळारंभ कोणता आहे? (ब) “दियाबल” व “सैतान” या शब्दांचा काय अर्थ होतो?

५ होय, दियाबल हा आकसखोर “मनुष्यघातक” आहे. हा, कोणाच्या हृदयातील वाईट गुण नसून एक खरी व्यक्‍ती आहे असे बायबल प्रकट करते. (मत्तय ४:१-११) त्याची नीतीमान देवदूत म्हणून निर्मिती झाली होती तरी “तो सत्यात टिकला नाही.” यास्तव, त्याला दियाबल सैतान असे म्हणण्यात आले ते केवढे समर्पक आहे! (प्रकटीकरण १२:९) त्याने यहोवाचा विरोध व प्रतिकार केला म्हणून त्याला “सैतान” किंवा “विरोधक” म्हटले आहे. या गुन्हेगाराला “दियाबल” म्हणजे “निंदक” असेही म्हटलेले आहे, कारण त्याने देवाचे अत्यंत निंद्य मार्गाने चुकीचे प्रतिनिधीत्व केले आहे.

६. सैतानाने देवाविरुद्ध बंड का केले?

६ सैतानाला देवाविरुद्ध बंड करण्यात कशाने प्रवृत्त केले? लालसेने. यहोवा मानवाकडून जी भक्‍ती घेत होता त्याची याला लालसा वाटून ती आपल्याला मिळावी अशी त्याने अभिलाषा धरली. जी भक्‍ती केवळ निर्माणकर्त्याच्या योग्यतेची आहे ती स्वतःला मिळण्याचा विचार दियाबलाने काढून टाकला नाही. (पडताळा यहेज्केल २८:१२-१९.) याउलट, जो देवदूत सैतान बनला त्याने या लोभी आकांक्षेला, ती परिपक्व होऊन मरणाला जन्म देईपर्यंत घोळवत ठेवली.—याकोब १:१४, १५.

७. (अ) मानवी मृत्यू कशामुळे घडतो? (ब) पाप काय आहे?

७ ज्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे मानवाचे मरण घडवण्याकडे निरवले गेले त्या अपराध्याची ओळख आपल्याला झाली आहे. परंतु, मानवी मृत्यूचे विशिष्ट कारण कोणते आहे? बायबल म्हणते: “मरणाची नांगी पाप आहे.” (१ करिंथकर १५:५६) पण पाप काय आहे? या शब्दाचा अर्थ कळण्यासाठी त्या शब्दाने बायबलच्या मूळ भाषेत कोणता अर्थ दिला त्याचा आपण विचार करू. “पाप करणे” असे सर्वसाधारण भाषांतर करण्यात आलेल्या इब्री व ग्रीक क्रियापदांचा अर्थ “चुकणे,” म्हणजे एखादे लक्ष्य चुकणे किंवा एखादे ध्येय मिळू न शकणे असा होतो. आपण सगळेजण कोणते ध्येय चुकतो? देवाला परिपूर्ण आज्ञाधारकता दाखवण्याचे ध्येय. तरीपण, जगात पाप कसे आले?

कट कसा पूर्ण करण्यात आला

८. सैतानाने मानवाची भक्‍ती मिळवण्याचा कसा प्रयत्न केला?

८ सैतानाने काळजीपूर्वक असा कट रचला, ज्यामुळे त्याला वाटले की, तो सर्व लोकांवर आधिपत्य करू शकेल व त्यांची भक्‍ती त्याला मिळेल. त्याने पहिले मानवी दांपत्य आदाम व हव्वा यांना देवाविरुद्ध पाप करण्यासाठी चिथवण्याचे ठरवले. यहोवाने आपल्या पहिल्या पालकांना सार्वकालिक जीवनाकडे निरवू शकणारे ज्ञान दिले होते. देवाने त्यांना एदेनच्या सुंदर बागेत ठेवले होते त्यामुळे आपला निर्माणकर्ता चांगला आहे हे त्यांना ठाऊक होते. आदामाला तर त्याच्या स्वर्गीय पित्याचा चांगुलपणा, त्याला देवाकडून सुंदर व साहाय्यकारी पत्नी मिळाली तेव्हा खासपणे जाणवला होता. (उत्पत्ति १:२६, २९; २:७-९, १८-२३) यास्तव, पहिल्या मानवी दांपत्याच्या जीवनाची अखंडता देवाला आज्ञाधारक राहण्यावर अवलंबून होती.

९. देवाने पहिल्या मानवी दांपत्याला कोणती आज्ञा दिली होती, व ती समंजस स्वरूपाची का होती?

९ देवाने आदामाला आज्ञा दिली: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्‍यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ति २:१६, १७) निर्माणकर्ता असल्यामुळे यहोवा देवाला त्याच्या निर्मितीकरता नैतिक दर्जे देण्याचा आणि बरे काय व वाईट काय ते स्पष्टपणे नेमून देण्याचा हक्क होता. त्याची आज्ञा समंजस स्वरूपाची होती, कारण आदाम व हव्वा यांना बागेतील इतर सर्व झाडांची फळे खाण्याची मुभा होती. या कारणामुळे, गर्वाने स्वतःचे नैतिक दर्जे आचरण्याऐवजी देवाच्या ह्‍या नियमांचे पालन करून ते यहोवाच्या हक्काच्या आधिपत्याला आपली कदर दाखवू शकत होते.

१०. (अ) स्वतःच्या बाजूला ओढण्याकरता सैतान मानवाकडे कसा आला? (ब) सैतानाने यहोवावर कोणता ठपका ठेवला? (क) सैतानाने देवावर केलेल्या हल्ल्याबद्दल तुम्हाला कसे वाटते?

१० दियाबलाने पहिल्या मानवांना देवापासून दूर नेण्याची योजना आखली. त्यांना आमिष दाखवून आपल्याकडे खेचण्यासाठी सैतानाने लबाडी केली. कळसूत्री बाहुल्यांचा वापर करणाऱ्‍यांप्रमाणे एका सर्पाचा उपयोग करून सैतानाने हव्वेला विचारले: “तुम्ही बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” हव्वेने देवाचा नियम उद्धृत केला तेव्हा दियाबलाने जाहीर केले: “तुम्ही खरोखर मरणार नाही.” यानंतर, त्याने यहोवावर वाईट हेतूंचा ठपका देऊन म्हटले: “देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” (उत्पत्ति ३:१-५) अशाप्रकारे दियाबलाने हे मनात भरवले की, देव काहीतरी चांगले लपवून ठेवत होता. सत्यप्रिय, प्रेमळ स्वर्गीय पिता, यहोवा याजवर हा केवढा निंद्य हल्ला होता!

११. आदाम व हव्वा सैतानाचे साथीदार कसे बनले?

११ हव्वेने त्या झाडाकडे परत पाहिले; त्यावरील फळ तिला आता खूप मनोरम दिसू लागले. तेव्हा तिने ते फळ तोडले व खाल्ले. नंतर तिच्या पतीने, देवाची अवज्ञा करणाऱ्‍या या पापी कृत्यामध्ये अगदी स्वेच्छेने तिची बाजू घेतली. (उत्पत्ति ३:६) हव्वेला फसवण्यात आले होते तरी मानवी वंशावर आधिपत्य करण्याच्या सैतानाच्या योजनेला ती व आदाम या दोघांनी पुष्टी दिली. याप्रकारे ते त्याच्या गुन्ह्‌यामध्ये साथीदार बनले.—रोमकर ६:१६; १ तीमथ्य २:१४.

१२. देवाविरुद्ध करण्यात आलेल्या मानवी बंडाचा कोणता परिणाम घडला?

१२ आदाम व हव्वेला त्यांच्या कृतीच्या परिणामांना तोंड द्यावे लागले. ते खास ज्ञानासहित देवासारखे बनले नाहीत. उलट, त्यांना भारी लज्जा वाटली व ते लपले. यहोवाने आदामाला जबाबदार धरले व त्याला ही शिक्षा सुनावली: “तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील; कारण तिच्यातून तुझी उत्पत्ति आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ति ३:१९) आमच्या पालकांनी बऱ्‍या व वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ “ज्या दिवशी” खाल्ले त्याच दिवशी देवाने त्यांना शिक्षा दिली व ते त्याच्या दृष्टीने मरण पावले. त्यांना नंतर परादीसमधून हाकलून देण्यात आले व ते आपल्या शारीरिक मृत्यूकडे अधोगतीला लागले.

पाप व मरण कसे पसरले

१३. सर्व मानवी वंशात पाप कसे पसरले?

१३ सैतान मानवाकडून भक्‍ती मिळविण्याच्या त्याच्या योजनेत यशस्वी झाला आहे हे वरवर दिसले. तथापि, त्याला आपल्या भक्‍तांना जिवंत ठेवता आले नाही. पहिल्या मानवी दांपत्यामध्ये पापाचे वर्चस्व कार्य करू लागले तेव्हा त्यांना त्यांच्या मुलांना वारशाने परिपूर्णत्व देता आले नाही. शिळेवर करण्यात येणाऱ्‍या कोरीव कामाप्रमाणे पाप आमच्या पहिल्या पालकांच्या जनुकात खोलवर कोरले गेले. यामुळे ते केवळ अपूर्ण मुलांचीच निपज करू शकले. आदाम व हव्वेने पाप केल्यानंतर त्यांच्या सर्व मुलांचा जन्म घडल्यामुळे त्या मुलांना वारशाने पाप व मरण मिळाले.—स्तोत्र ५१:५; रोमकर ५:१२.

१४. (अ) जे स्वतःच्या पापाबद्दल नकार दर्शवतात अशांची तुलना आपण कोणाबरोबर करू शकतो? (ब) इस्राएल लोकांना त्यांच्या पापमय स्थितीची जाणीव कशी करून देण्यात आली?

१४ तथापि, आज पुष्कळांना, ते पापी आहेत असे वाटत नाही. जगाच्या काही भागात तर वारशाने मिळालेल्या पापाबद्दलचा विचार बहुधा माहीतच नाही. परंतु, हा काही पाप अस्तित्वात नाही याचा पुरावा नव्हे. घाणेरड्या चेहऱ्‍याचा मुलगा, स्वतःबद्दल स्वच्छ असल्याचे दाव्याने सांगेल, पण आरशात डोकावल्यावरच त्याला त्याची खात्री पटू शकेल. प्राचीन काळच्या इस्राएल लोकांना देवाचे नियमशास्त्र त्याचा संदेष्टा मोशेद्वारे मिळाले तेव्हा ते देखील अशाच मुलासारखे होते. पाप अस्तित्वात आहे हे त्या नियमशास्त्राने स्पष्ट केले. “पापाची ओळख मला नियमशास्त्रावाचून कशानेच झाली नसती,” असे पौल स्पष्टीकरण देतो. (रोमकर ७:७-१२) आरशात बघणाऱ्‍या त्या मुलाप्रमाणे स्वतःला नियमशास्त्राचा वापर करून पाहण्याद्वारे इस्राएली लोकांना, ते यहोवाच्या दृष्टीत केवढे गलिच्छ आहेत हे दिसू शकणार होते.

१५. देवाच्या वचनाच्या आरशात पाहिल्याने काय प्रकट होते?

१५ आपण देखील स्वतःला देवाच्या वचनाच्या आरशात बघून, त्याचे दर्जे लक्षात घेऊन स्वतः अपरिपूर्ण आहोत हे पाहू शकतो. (याकोब १:२३-२५) उदाहरणार्थ, मत्तय २२:३७-४० मध्ये लिहिल्याप्रमाणे, येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना देव व त्यांचे शेजारी यांजवर प्रीती करण्याच्या बाबतीत जे म्हटले त्याचा जरा विचार करा. या क्षेत्रात लोक कितीदा तरी उणे पडतात! देव किंवा त्यांच्या शेजाऱ्‍यांबद्दल प्रीती दाखवण्यात अपयशी ठरण्याच्या बाबतीत पुष्कळांना त्यांच्या विवेकाला तणिक देखील डागणी वाटत नाही.—लूक १०:२९-३७.

सैतानाच्या युक्त्यांबद्दल सावधान असा!

१६. सैतानाच्या युक्त्यांना बळी पडण्यापासून स्वतःला आवरण्यासाठी आपण काय करू शकतो, पण हे कठीण का आहे?

१६ आपण स्वेच्छेने पापाचरण करीत राहावे याच्या शोधात सैतान असतो. (१ योहान ३:८) त्याच्या युक्त्यांना बळी पडण्यापासून स्वतःला आवरण्याजोगा काही मार्ग आहे का? होय, पण याकरता आपण स्वेच्छेच्या पापाचरणाकडे जो कल वाटत असतो त्याविरुद्ध लढा देण्याची जरूरी आहे. हे सोपे नाही, कारण आमची पाप करण्याकडे जन्मतःच असलेली प्रवृत्ती खूपच जोरदार आहे. (इफिसकर २:३) पौलाला खरी लढत द्यावी लागली. पण का? कारण पापाने त्याच्यामध्ये वास्तव्य केले होते. तेव्हा, आपल्याला देवाची मर्जी मिळवण्याची इच्छा असल्यास आम्ही देखील आपणामध्ये असणाऱ्‍या पापी प्रवृत्त्यांविरुद्ध लढा दिला पाहिजे.—रोमकर ७:१४-२४; २ करिंथकर ५:१०.

१७. पापमय प्रवृत्त्यांविरुद्ध असणारी आमची लढत कशामुळे कठीण होते?

१७ आपण देवाचे नियम तोडावे म्हणून आमिष ठेवण्याची संधी शोधण्याचा सैतान नित्य प्रयत्न करीत असल्यामुळे आमची पापाविरुद्ध असणारी लढत साधीसोपी नाही. (१ पेत्र ५:८) इतर सहख्रिश्‍चनांबद्दल काळजी दाखवून पौलाने म्हटले: “जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्‍यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.” (२ करिंथकर ११:३) आजही सैतान तशाच युक्त्या वापरत आहे. यहोवाचे चांगुलपण व देवाच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारे मिळणारे लाभ याबद्दल संशयाचे बीजारोपण करण्याचा तो प्रयत्न करतो. आम्हामध्ये वास करीत असणाऱ्‍या पापमय प्रवृत्त्यांचा दियाबल लाभ घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो आपल्याला गर्व, लोभ, द्वेष आणि पूर्वग्रहदूषित मार्ग चोखाळण्यास लावतो.

१८. सैतान, पापाला चालना द्यावी म्हणून या जगाचा वापर कसा करतो?

१८ सैतान आम्हाविरुद्ध ज्या साधनांचा उपयोग करीत आहे त्यापैकी एक, त्याच्या वर्चस्वाखाली असणारे हे जग आहे. (१ योहान ५:१९) आपण दक्ष राहिलो नाही, तर या जगात आम्हा सभोवताली वावरणारे भ्रष्ट व लबाड लोक आम्हाला देवाच्या नैतिक दर्जांचे उल्लंघन करणाऱ्‍या पापी मार्गाला लावण्याचा आम्हावर दबाव आणतील. (१ पेत्र ४:३-५) बहुतेक जण देवाच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत; त्यांच्या विवेकाला लागणाऱ्‍या बोचणीकडे ते दुर्लक्ष करतात, ज्यामुळे ते त्या विवेकाला असंवेदनशील बनवतात. (रोमकर २:१४, १५; १ तीमथ्य ४:१, २) काही तर, जो मार्ग त्यांच्या अपूर्ण विवेकाने त्यांना आधी आचरण्यास अनुमती दिली नव्हती तो हळूवारपणे धरतात.—रोमकर १:२४-३२; इफिसकर ४:१७-१९.

१९. केवळ शुद्धाचरणी जीवन जगणे पुरेसे का नाही?

१९ शुद्धाचरणी जीवन जगणे ही या जगात एक साध्यता आहे. तथापि, आपल्या निर्मात्याला संतुष्ट करण्याकरता आणखी कशाची तरी गरज आहे. आपला देवावर विश्‍वास असला पाहिजे व त्याला जाब देण्याची जबाबदारी आपणास वाटायला हवी. (इब्रीयांस ११:६) “चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे,” असे शिष्य याकोबाने लिहिले. (याकोब ४:१७) होय, देव व त्याच्या आज्ञांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणे हे देखील एक प्रकारचे पापच आहे.

२०. सैतान जे योग्य ते करण्यापासून तुम्हाला परावृत्त करण्याचा कसा प्रयत्न करील, पण या दबावाचा प्रतिकार करण्यामध्ये काय तुम्हाला मदत करील?

२० तुम्ही बायबलच्या अभ्यासाद्वारे देवाविषयीचे ज्ञान मिळवण्याचा जो पाठलाग करीत आहात त्याला सैतान विरोध उभा करण्याची अधिक शक्यता आहे. असा दबाव योग्य त्याचे आचरण करीत राहण्यापासून तुम्हाला परावृत्त करणार नाही अशी प्रांजळपणे आशा केली जाते. (योहान १६:२) पुष्कळ अधिकाऱ्‍यांनी येशूवर त्याच्या सेवकपणात विश्‍वास ठेवला होता तरी स्वतःला त्यांच्या समाजातून वाळीत टाकले जाईल या भीतीपोटी त्यांनी येशूचा स्वीकार केला नाही. (योहान १२:४२, ४३) सैतान, जो कोणी देवाविषयीचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो अशांना घाबरून सोडण्याचा क्रूर प्रयत्न करतो. तरीपण, तुम्ही यहोवाने ज्या ज्या अद्‌भुत गोष्टी केल्या आहेत त्या नेहमी लक्षात आणाव्या व त्यांची कृतज्ञतेने कदर बाळगावी. हीच कदर विरोधकांमध्ये निर्माण करण्याची मदत तुम्हाला देता येईल.

२१. आपण जगाला व आमच्या स्वतःच्या पापमय प्रवृत्त्यांना कसे जिंकू शकतो?

२१ आपण अपरिपूर्ण आहोत तोपर्यंत आपल्याकडून पाप घडेल. (१ योहान १:८) तरीही, या लढतीमध्ये आम्हाला मदत उपलब्ध आहे. होय, तो दुष्ट, दियाबल सैतान याच्याविरुद्ध आपण देत असलेल्या लढतीमध्ये विजयी होऊ शकतो. (रोमकर ५:२१) येशूने पृथ्वीवरील त्याच्या सेवकपणाच्या शेवटी त्याच्या अनुयायांना या शब्दांनी उत्तेजन दिले: “जगात तुम्हाला क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे.” (योहान १६:३३) अपरिपूर्ण मानव देखील देवाच्या मदतीने जगावर विजय मिळवू शकतात. जे सैतानाचा विरोध करतात आणि ‘देवाच्या अधीन होतात’ अशांवर सैतान आपले प्रभुत्व राखू शकणार नाही. (याकोब ४:७; १ योहान ५:१८) आपण बघणारच आहोत त्याप्रमाणे देवाने पाप व मरणाच्या बंधनातून बाहेर पडण्याचा मार्ग दिला आहे.

तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा

दियाबल सैतान कोण आहे?

मानव का वृद्ध होतात व मरतात?

पाप काय आहे?

देवाविरुद्ध स्वेच्छेने पाप करावे म्हणून सैतान लोकांना कसे ओढतो?

[Full-page picture on page 54]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा