वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ७/१५ पृ. ४-७
  • पापाचा अंत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पापाचा अंत
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मानव—निर्मितीच्या वेळेस निष्पाप
  • पापाची सुरवात
  • विवेक ‘दोष लावतो’ किंवा ‘दोषमुक्‍त करतो’
  • पापापासून सुटका—कशी?
  • ख्रिस्ताच्या खंडणीचा आपल्याला कसा फायदा होतो
  • ख्रिस्ताची खंडणी तारण साधण्याचा देवाचा मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • येशू तारण करतो—कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • “मूल्यवान रक्‍ताने” सुटका होते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • खंडणी—देवाची सर्वात मौल्यवान भेट
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ७/१५ पृ. ४-७

पापाचा अंत

“आपण जन्मतःच पापी असतो का?” बायबलचा अभ्यास सुरू केल्यानंतर काही काळातच अमेरिकेतील एका पदवीधर विद्यार्थ्याला या प्रश्‍नाने बुचकळ्यात पाडले. त्याच्या हिंदू पार्श्‍वभूमीमुळे वारशाने मिळालेल्या पापाची कल्पना त्याच्यासाठी नवीन होती. पण त्याने तर्क केला की पाप खरोखरच वारशाने मिळत असल्यास, त्याच्या वास्तविकतेला नामंजूर करणे किंवा त्याकडे डोळेझाक करणे व्यर्थच ठरेल. या प्रश्‍नाचे उत्तर एखाद्याला कसे मिळू शकेल?

वारशाने मिळत असल्यास पापाला निश्‍चितच कोठेतरी एक सुरवात असावी. पहिल्या मानवाला निर्माण करण्यात आले तेव्हाच तो दुष्ट होता आणि त्यामुळे त्याने आपल्या संततीला वाईट गुणलक्षणे दिली, हे खरे आहे का? की मानवांतील दोष नंतर विकसित झाला? पाप नेमके केव्हा सुरू झाले? दुसरीकडे पाहता, पाप केवळ एक बाह्‍य, स्वतंत्र अस्तित्व असलेली वाईट गोष्ट किंवा तत्त्व असल्यास त्यातून कधीही मुक्‍तता मिळण्याची आपण अपेक्षा करू शकतो का?

हिंदू विश्‍वासानुसार, दुःख आणि वाईट हे उत्पत्तीला अनुषंगिक आहेत. एका हिंदू विद्वानानुसार, “दुःख [किंवा वाईट], हे वाताच्या जुन्या व्याधीसारखे केवळ जागा बदलते पण त्याचे समूळ उच्चाटन होणे मात्र शक्य नाही.” सबंध अभिलिखित मानवी इतिहासात वाईटाचे अस्तित्व निश्‍चितच राहिले आहे. ते मानवाच्या ऐतिहासिक अहवालांच्याही आधीचे असल्यास, त्याच्या सुरवातीसंबंधी विश्‍वास ठेवण्याजोगी उत्तरे अर्थातच मानवापेक्षा श्रेष्ठ अशा उगमाकडून आली पाहिजेत. ही उत्तरे देवाकडून आली पाहिजेत.—स्तोत्र ३६:९.

मानव—निर्मितीच्या वेळेस निष्पाप

हिंदू तत्त्ववेत्ते निखिलानंद मान्य करतात की वेदांमधील मानवाच्या निर्मितीचे वर्णन सांकेतिक भाषेत करण्यात आले आहे. तसेच, अधिकांश पौर्वात्य धर्मांतदेखील निर्मितीचे केवळ दंतकथांमध्ये विवरण करण्यात आले आहे. तथापि, पहिल्या मानवाच्या निर्मितीविषयी बायबलमधील वृत्तान्तावर विश्‍वास ठेवण्यासाठी तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध कारणे आहेत.a त्याच्या अगदी पहिल्याच अध्यायात असे म्हटलेले आहे: “देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.”—उत्पत्ति १:२७.

“देवाचे प्रतिरुप” असे निर्माण केल्या जाण्याचा काय अर्थ होतो? सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास: मानवाला देवाशी सदृश—न्याय, बुद्धी आणि प्रेम यांसारख्या ईश्‍वरी गुणांसह निर्माण करण्यात आले होते—जे त्याला प्राण्यांपासून वेगळे ठरवतात. (पडताळा कलस्सैकर ३:९, १०.) या गुणांमुळे त्याला चांगले करावे की वाईट याची निवड करण्याची क्षमता प्राप्त झाली, व परिणामी तो एक स्वतंत्र नैतिक प्राणी बनला. पहिल्या मानवाची निर्मिती करण्यात आली तेव्हा त्याच्याठायी पाप अजिबात नव्हते, त्याच्या जीवनात कोणत्याच वाईट गोष्टी किंवा दुःख नव्हते.

मानवाला अर्थात आदामाला यहोवा देवाने ही आज्ञा दिली: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करुन देणाऱ्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ति २:१६, १७) स्वेच्छेने आज्ञापालन करून आदाम आणि त्याची पत्नी हव्वा, आपल्या निर्मात्याला आदर आणि महिमा आणू शकत होते आणि पापापासूनही मुक्‍त राहू शकत होते. दुसरीकडे पाहता, आज्ञाभंगाच्या एका कृत्यातून ते देवाच्या परिपूर्ण आदर्शांचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्याचे सिद्ध झाले असते आणि त्याअर्थी ते अपरिपूर्ण—पापी बनले असते.

आदाम व हव्वा यांची दिव्य स्वरूपात निर्मिती करण्यात आलेली नव्हती. तरीसुद्धा त्यांच्यात विशिष्ट प्रमाणावर देवाचे गुण आणि नैतिक निर्णय घेण्याची क्षमता देखील होती. स्वतः देवाने त्यांना निर्माण केले असल्यामुळे ते निष्पाप, किंवा परिपूर्ण होते. (उत्पत्ति १:३१; अनुवाद ३२:४) त्यांना अस्तित्वात आणल्याने, तेव्हापर्यंत देव आणि विश्‍व यांमध्ये जी सुसंगतता युगानुयुगे अस्तित्वात होती ती कोणत्याही प्रकारे भंग पावली नाही. तर मग, पापाची सुरवात कशाप्रकारे झाली?

पापाची सुरवात

पाप हे पहिल्यांदा आत्मिक क्षेत्रात घडले. पृथ्वी आणि मानव यांची निर्मिती होण्याआधी, देवाने बुद्धिमान आत्मिक प्राण्यांची—अर्थात, देवदूतांची निर्मिती केली होती. (ईयोब १:६; २:१; ३८:४-७; कलस्सैकर १:१५-१७) या देवदूतांपैकी एकाला आपल्या सौंदर्याचा आणि बुद्धीचा अत्यंत गर्व होता. (पडताळा यहेज्केल २८:१३-१५.) आदाम व हव्वा यांना संतती उत्पन्‍न करण्याविषयी देवाने जे सांगितले त्यावरून या देवदूताने ताडले की आता लवकरच संपूर्ण पृथ्वी नीतिमान लोकांनी भरणार आणि ते सर्व देवाचीच उपासना करणार. (उत्पत्ति १:२७, २८) या आत्मिक प्राण्याला मात्र त्यांनी आपली उपासना करावी अशी मनोमन इच्छा झाली. (मत्तय ४:९, १०) ही इच्छा सतत मनात घोळत राहू दिल्यामुळे त्याने शेवटी एक अयोग्य मार्ग पत्करला.—याकोब १:१४, १५.

एका सर्पाच्या माध्यमाने हव्वेशी बोलताना हा विद्रोही देवदूत तिला म्हणाला की बऱ्‍यावाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्‍या झाडाचे फळ खाण्यास मनाई करून देव आवश्‍यक ज्ञानापासून तिला वंचित करीत होता. (उत्पत्ति ३:१-५) पण ही एक निंद्य लबाडी होती—एक पापी कृत्य. ही लबाडी केल्यामुळे तो देवदूत स्वतःहून पापी बनला. परिणामस्वरूप, त्याला दियाबल अर्थात एक लबाड आणि सैतान अर्थात देवाचा विरोधी म्हणण्यात येऊ लागले.—प्रकटीकरण १२:९.

सैतानाच्या मन वळविणाऱ्‍या युक्‍तिवादाचा हव्वेवर अनिष्टकारक परिणाम झाला. मोहात पाडणाऱ्‍याच्या शब्दांवर भरवसा ठेवून तिने स्वतःची भुलवणूक होऊ दिली आणि मना केलेल्या झाडाचे फळ खाण्याइतपत ती वाहवत गेली. तिचा पती आदाम, यानेही तिच्यासोबत ते फळ खाल्ले आणि परिणामस्वरूप ते दोघेही पापी बनले. (उत्पत्ति ३:६; १ तीमथ्य २:१४) स्पष्टच आहे, देवाची आज्ञा भंग करण्याचा मार्ग पत्करून आपले पहिले पालक त्यांच्या परिपूर्णतेला कमी पडले आणि त्यांनी स्वतःला पापी बनविले.

आदाम व हव्वा यांच्या संततीविषयी काय? बायबल स्पष्टीकरण देते: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) आनुवंशिकतेचे नियम आधीपासूनच कार्यरत होते. आदाम स्वतःजवळ नसलेले काही आपल्या मुलांना वारशाने देऊ शकत नव्हता. (ईयोब १४:४) परिपूर्णता गमवल्यामुळे, हे पहिले दांपत्य पापी बनले आणि त्यानंतरच हव्वेला गर्भधारणा झाली. परिणामस्वरूप, आपल्या सर्वांना वारशाने पाप मिळाले आहे—आणि कोणीही याला अपवाद नाही. (स्तोत्र ५१:५; रोमकर ३:२३) पर्यायाने, पापामुळे केवळ वाईटाची आणि दुःखाची निष्पत्ती झाली आहे. शिवाय, त्यामुळे आपण सर्व वयोवृद्ध होऊन मरतो, “कारण पापाचे वेतन मरण आहे.”—रोमकर ६:२३.

विवेक ‘दोष लावतो’ किंवा ‘दोषमुक्‍त करतो’

या पापाचा पहिल्या मानवी दांपत्याच्या वर्तनावर कसा परिणाम झाला ते पाहा. त्यांनी आपल्या शरीराचे काही भाग झाकले आणि ते देवापुढून लपण्याचा प्रयत्न करू लागले. (उत्पत्ति ३:७, ८) अशा तऱ्‍हेने, पापामुळे त्यांच्या मनात दोषभावना, भीती आणि लज्जेच्या भावना आल्या. आज मनुष्यजातीला या भावना अजिबातच नवीन नाहीत.

एखाद्या गरजू माणसाला दया दाखवता येत असून ती न दाखवल्यास किंवा बोलू नये असे काहीतरी बोलून गेल्यावर असा कोण आहे की ज्याला अस्वस्थ भावनांची टोचणी झालेली नाही? (याकोब ४:१७) आपण अशा भावनांनी का त्रस्त होतो? प्रेषित पौल स्पष्ट करतो की ‘नियमशास्त्र आपल्या अंतःकरणात लिहिलेले आहे.’ त्या नियमशास्त्राचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास त्यामुळे आंतरिक खळबळ माजते, अर्थात जर आपला विवेक कोडगा झाला असेल तर गोष्ट वेगळी. म्हणूनच असे म्हटले आहे की विवेक आपल्याला ‘दोष लावतो’ किंवा ‘दोषमुक्‍त करतो.’ (रोमकर २:१५; १ तीमथ्य ४:२; तीत १:१५) आपल्याला त्याची जाणीव असो वा नसो, पण आपल्यामध्ये अयोग्य कृतीचे किंवा पापाविषयीचे आंतरिक ज्ञान आहे!

पौलाला स्वतःच्या पापी प्रवृत्तींची पुरेपूर जाणीव होती. त्याने कबूल केले, “जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच.” “माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करितो; तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो.” म्हणून पौल प्रश्‍न विचारतो: “मला ह्‍या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?”—रोमकर ७:२१-२४.

पापापासून सुटका—कशी?

एका विद्वानाने म्हटल्यानुसार, “हिंदू परंपरेत मुक्‍ती म्हणजे, जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्‍ती.” उपाय म्हणून, बौद्ध धर्मही याच धर्तीवर निर्वाणाकडे—अर्थात बाह्‍य वास्तविकतेच्या पलीकडील अवस्थेकडे संकेत करतो. वारशाने मिळालेल्या संकल्पनेचे आकलन न झाल्यामुळे हिंदू धर्म केवळ अस्तित्वातून सुटकेची हमी देतो.

दुसरीकडे पाहता, बायबलमधील मुक्‍तीच्या माध्यमातून पापपूर्ण स्थिती अक्षरशः काढून टाकली जाते. पापापासून कशाप्रकारे सुटका मिळू शकेल हे विचारल्यानंतर प्रेषित पौल उत्तर देऊन पुढे म्हणतो: “आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो.” (रोमकर ७:२५) होय, येशू ख्रिस्ताद्वारे देवच सुटका देतो.

मत्तयाच्या शुभवर्तमानानुसार, “मनुष्याचा पुत्र” येशू ख्रिस्त हा “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास” आला. (मत्तय २०:२८) १ तीमथ्य २:६ (NW) येथे पौलाने लिहिलेले शब्द अभिलिखित आहेत, तो म्हणतो की येशूने “सर्वांसाठी समतुल्य खंडणी म्हणून स्वतःला दिले.” “खंडणी” या शब्दात बंदिवानांच्या सुटकेसाठी किंमत देण्याचा संकेत आढळतो. ही खंडणी समतुल्य असल्याची वस्तुस्थिती, न्यायाच्या पारड्यांना तुल्यबळ करण्यासाठी हे मोल समर्थ आहे या गोष्टीवर भर देते. तथापि, एका माणसाच्या मृत्यूला “सर्वांसाठी समतुल्य खंडणी” कसे समजावे?

आदामाने सबंध मानवजातीला, आपल्यालाही पाप आणि मृत्यू यांच्या हाती विकले. यासाठी दिलेली किंमत म्हणजे त्याचे परिपूर्ण मानवी जीवन. ती भागवण्याकरता, आणखी एक परिपूर्ण मानवी जीवन—एक समतुल्य खंडणी—देण्याची गरज होती. (निर्गम २१:२३; अनुवाद १९:२१; रोमकर ५:१८, १९) कोणताही अपरिपूर्ण मनुष्य ही खंडणी देण्यास समर्थ नसल्यामुळे देवाने आपल्या अगाध बुद्धीकरवी या पेचप्रसंगातून मार्ग काढला. (स्तोत्र ४९:६, ७) त्याने स्वर्गातून आपल्या एकुलत्या एका मुलाचे परिपूर्ण जीवन पृथ्वीवरील एका कुमारिकेच्या उदरात स्थानांतरित केले आणि एक परिपूर्ण मनुष्य म्हणून त्याचा जन्म घडवून आणला.—लूक १:३०-३८; योहान ३:१६-१८.

मानवजातीला सोडवण्याचे कार्य सिद्धीस नेण्याच्या उद्देशाने येशूला पृथ्वीवर तो होता त्या सबंध काळात निष्कलंक राहणे आवश्‍यक होते. आणि तो राहिलाही. मग त्याला एक बलिदानरूपी मृत्यू आला. अशा तऱ्‍हेने एक परिपूर्ण मानवी जीवनाचे मोल—म्हणजे त्याच्या स्वतःच्या जीवनाचे मोल मानवजातीला सोडवण्याकरता खंडणी म्हणून देण्यासाठी उपलब्ध व्हावे याची येशूने खात्री करून घेतली.—२ करिंथकर ५:१४; १ पेत्र १:१८, १९.

ख्रिस्ताच्या खंडणीचा आपल्याला कसा फायदा होतो

येशूचे खंडणी यज्ञार्पण आतासुद्धा आपल्याला फायदेकारक ठरू शकते. त्यावर विश्‍वास ठेवल्याने, आपण देवासमोर एका निष्कलंक स्थितीत येऊ शकतो आणि आपल्याला यहोवाचे प्रेमळ आणि ममतापूर्ण संरक्षण लाभते. (प्रेषितांची कृत्ये १०:४३; रोमकर ३:२१-२४) आपल्या हातून घडलेल्या पापांमुळे दोषभावनेने भाराक्रांत होण्याऐवजी आपण खंडणीच्या आधारावर देवाकडे निःसंकोचपणे क्षमायाचना करू शकतो.—यशया १:१८; इफिसकर १:७; १ योहान २:१, २.

येणाऱ्‍या दिवसांमध्ये, पापामुळे झालेली मानवाची रोगट अवस्था खंडणीच्या योगे पूर्णपणे बरी करणे शक्य होईल. बायबलचे शेवटले पुस्तक देवाच्या राजासनातून निघालेल्या ‘जीवनाच्या पाण्याच्या नदीचे’ वर्णन करते. या नदीच्या किनाऱ्‍यांवर ‘राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडणाऱ्‍या’ पानांची भरपूर फळझाडे आहेत. (प्रकटीकरण २२:१, २) सांकेतिक भाषेत, बायबल येथे मानवजातीला येशूच्या खंडणी यज्ञार्पणाच्या आधारावर पाप आणि मृत्यू यांपासून सर्वकाळाकरता मुक्‍त करण्यासाठी निर्माणकर्त्याने केलेल्या अद्‌भुत तरतुदीविषयी सांगत आहे.

प्रकटीकरण या पुस्तकातील भविष्यसूचक दृष्टान्त लवकरच पूर्ण होतील. (प्रकटीकरण २२:६, ७) त्यानंतर सर्व सत्‌हृदयी लोक “नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन” परिपूर्ण होतील. (रोमकर ८:२०, २१) हे जाणल्यामुळे यहोवा देव आणि खंडणी बनणारा त्याचा निष्ठावंत पुत्र येशू ख्रिस्त यांविषयी अधिक शिकून घेण्याची प्रेरणा होऊ नये का?—योहान १७:३.

[तळटीप]

a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित जीवन येथे कसे आले—उत्क्रांतीने अथवा निर्मितीने? (इंग्रजी) हे पुस्तक पाहा.

[६ पानांवरील चित्र]

आदामामुळे मानवजातीवर पाप आणि मृत्यू ओढवला

[७ पानांवरील चित्र]

येशूचे खंडणी यज्ञार्पण पाप आणि मृत्यू यांपासून सुटका करते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा