वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • kl अध्या. ७ पृ. ६२-६९
  • मानवजातीचे रक्षण करण्यासाठी देवाने काय केले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मानवजातीचे रक्षण करण्यासाठी देवाने काय केले
  • सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खास उद्देशाकरता निवडलेला
  • मशीहा का मरणार होता
  • खंडणी कशी चुकती करण्यात आली
  • ख्रिस्ताची खंडणी व तुम्ही
  • खंडणी—देवाची सर्वात अमूल्य भेट
    बायबल नेमके काय शिकवते?
  • खंडणी—देवाची सर्वात मौल्यवान भेट
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • ख्रिस्ताची खंडणी तारण साधण्याचा देवाचा मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • येशू ख्रिस्त—देवाने पाठवलेला?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
अधिक माहिती पाहा
सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
kl अध्या. ७ पृ. ६२-६९

अध्याय ७

मानवजातीचे रक्षण करण्यासाठी देवाने काय केले

१, २. (अ) देवाचा पुत्र कोण आहे याबद्दल एका रोमी शताधिपतीठायी कशी आवड बळावली होती? (ब) यहोवाने येशूला का मरू दिले?

सुमारे २,००० वर्षांआधी वसंत ऋतुतील एके दुपारी एका रोमी शताधिपतीने तिघांना यातना सहन करीत मरत असताना बघितले. त्या अधिकाऱ्‍याचे लक्ष खास एकाकडे—येशू ख्रिस्त—याकडे लागले होते. येशूला लाकडाच्या खांबावर खिळण्यात आले होते. त्याचा मृत्यू जवळ येत असता मध्यान्हाचे आकाश काळवंडले. तो वारला तेव्हा पृथ्वी जोराने हादरली आणि त्या अधिकाऱ्‍याने म्हटले: “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.”—मार्क १५:३९.

२ देवाचा पुत्र! त्या अधिकाऱ्‍याचे बरोबर होते. त्याने नुकतीच पृथ्वीवर सर्वकाळातील अत्यंत महत्त्वाची घटना पाहिली होती. आधीच्या प्रसंगी देवाने स्वतः येशूला त्याचा प्रिय पुत्र असे संबोधले होते. (मत्तय ३:१७; १७:५) यहोवाने स्वतःच्या पुत्राला का मरू दिले? कारण हेच तर, मानवजातीला पाप व मृत्यू यापासून रक्षण करण्याचे देवाचे साधन होते.

खास उद्देशाकरता निवडलेला

३. मानवजातीसंबंधाने एका खास उद्देशाकरता देवाच्या एकुलत्या एका पुत्राची निवड व्हावी हे का योग्य होते?

३ येशूला मानवीप्रकृतीपूर्वीचे अस्तित्व होते हे आपण या पुस्तकात आधी शिकलेले आहे. यहोवाने त्याची थेटपणे निर्मिती केली होती म्हणून त्याला देवाचा “एकुलता एक पुत्र” असे म्हणण्यात आले. यानंतर, इतर सर्व गोष्टींना अस्तित्वात आणण्यासाठी देवाने येशूचा उपयोग करून घेतला. (योहान ३:१८; कलस्सैकर १:१६) येशूला मानवजातीबद्दल विशेष आपुलकी होती. (नीतिसूत्रे ८:३०, ३१) या कारणामुळेच, मानवजात जेव्हा मृत्युदंडाखाली आली तेव्हा यहोवाने स्वतःच्या या एकुलत्या एका पुत्राला खास उद्देश पूर्ण करण्यासाठी निवडले यात काही नवलाईचे नाही!

४, ५. येशू पृथ्वीवर येण्याआधी, बायबलने मशीही संतानाबद्दल काय प्रकट केले होते?

४ एदेन बागेत आदाम, हव्वा व सैतान यांजवर न्यायदंडाची शिक्षा सुनावताना देवाने भावी रक्षणकर्त्याबद्दल, “संतति” अशी बोलणी केली. ही संतती किंवा संतान, “जुनाट साप,” दियाबल सैतान याने ज्या भयंकर वाईट गोष्टी घडवून आणल्या होत्या त्या सर्व नाहीशा करण्यासाठी येणार होते. खरे म्हणजे हे वचनदत्त संतान सैतान व त्याच्या सर्व अनुयायांना चिरडून टाकणार आहे.—उत्पत्ति ३:१५; १ योहान ३:८; प्रकटीकरण १२:९.

५ शतकांच्या कालावधीत देवाने या संतानाबद्दल म्हणजेच ज्याला मशीहा असे देखील म्हणतात त्याच्याबद्दल हळुवार माहिती प्रकट केली. पृष्ठ ३७ वरील तक्त्यात दाखवल्याप्रमाणे अनेक भविष्यवाण्यांनी पृथ्वीवरील त्याच्या जीवनाच्या पुष्कळ घटनांबद्दलची सविस्तर माहिती दिली. उदाहरणार्थ, देवाच्या संकल्पातील त्याची भूमिका पूर्ण करावी म्हणून त्याला भयंकर अपमानास्पद वागणूक सहन करायची होती.—यशया ५३:३-५.

मशीहा का मरणार होता

६. दानीएल ९:२४-२६ नुसार मशीहा काय साध्य करणार होता व कसे?

६ दानीएल ९:२४-२६ मध्ये लिहिण्यात आलेल्या भविष्यवाणीने मशीहा—देवाचा अभिषिक्‍त जन—मोठा उद्देश पूर्ण करील असे भाकीत केले. तो “आज्ञाभंगाची समाप्ति व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्‍चित्त करावे, सनातन धार्मिकता उदयास आणावी,” म्हणून या पृथ्वीवर येणार होता. मशीहा, विश्‍वासू मानवजातीमधून मृत्यूचा दंड काढून टाकणार होता. तो हे कसे करणार होता? त्याचा “वध” होईल किंवा ठार मारण्यात येईल असे भविष्यवाणी सांगते.

७. यहूद्यांनी प्राण्यांची यज्ञार्पणे का वाहिली व यांनी कशाची पडछाया दिली?

७ पापाबद्दल प्रायश्‍चित्त करणे या गोष्टीशी प्राचीन इस्राएल लोक परिचित होते. देवाने मोशेद्वारे दिलेल्या नियमशास्त्रानुसार ते जी भक्‍ती आचरीत होते त्यामध्ये ते नियमितपणे जनावरांचे यज्ञार्पण करीत असत. ही अर्पणे इस्राएल लोकांना याची जाणीव देत की, त्यांच्या पापांचे क्षालन व्हावे किंवा प्रायश्‍चित्त घडावे म्हणून लोकांनी काहीतरी दिलेच पाहिजे. या तत्त्वाचा सारांश प्रेषित पौलाने या प्रकाराने दिला: “रक्‍त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही.” (इब्रीयांस ९:२२) ख्रिस्ती लोक मोशेचे नियमशास्त्र व त्यातील बलिदानासारख्या गरजांच्या अधीन नाहीत. (रोमकर १०:४; कलस्सैकर २:१६, १७) त्यांना हेही ठाऊक आहे की, प्राण्यांची अर्पणे पापाची कायमस्वरूपी व संपूर्ण क्षमा प्रदान करू शकत नाहीत. त्याऐवजी, या यज्ञार्पित बलिदानांनी एका अधिक महत्त्वपूर्ण अर्पणाची—मशीहा किंवा ख्रिस्ताच्या बलिदानाची—पडछाया दिली हे ते मानतात. (इब्रीयांस १०:४, १०; पडताळा गलतीकर ३:२४.) तरीपण, तुम्ही विचाराल, ‘मशीहाने खरोखरच मरण्याची गरज होती का?’

८, ९. आदाम व हव्वा कोणती मोलवान गोष्ट गमावून बसले आणि त्यांच्या कृतीने त्यांच्या संतानांवर कसा परिणाम केला?

८ होय, मानवजातीच्या रक्षणार्थ मशीहाला मरणे भाग होते. त्याचे कारण समजण्यासाठी आपल्याला मागे एदेन बागेतील घटनांचा विचार केला पाहिजे. तेथे देवाविरुद्ध बंड करण्यामुळे आदाम व हव्वेने केवढी मोठी गोष्ट गमावली ते समजून घेतले पाहिजे. त्यांना चिरकालिक जीवन उपलब्ध करून देण्यात आले होते! देवाची मुले म्हणून ते त्याच्यासोबतच्या थेट नातेसंबंधाचा अनुभव घेत होते. पण त्यांनी यहोवाच्या आधिपत्याचा त्याग केला तेव्हा हे सर्व गमावले आणि मानवी वंशावर पाप व मृत्यू आणला.—रोमकर ५:१२.

९ हे जणूकाही आपल्या पहिल्या पालकांनी त्यांच्यापाशी असणाऱ्‍या धनसंपत्तीची उधळण करून स्वतःला मोठ्या कर्जाच्या खाइत ढकलले यासारखेच होते. आदाम व हव्वेने या कर्जाचा वारसा आपल्या संतानांना दिला. आपला जन्म परिपूर्ण व निष्पाप रितीने न घडल्यामुळे आपण प्रत्येक जण पापी व मर्त्य बनलो. आपण आजारी पडतो किंवा घातक असे काहीतरी बोलून जातो ज्याबद्दल आपल्याला वाटत असते की ते न बोललो असतो तर बरे झाले असते तेव्हा आपण आपल्यातील उपजत कर्जाचे—मानवी अपरिपूर्णतेचे—परिणाम जाणवत असतो. (रोमकर ७:२१-२५) त्यामुळे आदामाने जे गमावले त्याची प्राप्ती करण्यामध्येच आमची पुढील आशा गोवलेली आहे. परंतु, आपल्याला परिपूर्ण मानवी जीवन मिळवता येत नाही. वस्तुतः, सर्व अपरिपूर्ण मानव पाप करत असल्यामुळे आम्ही सर्व जीवन नव्हे तर मरणाला कमवत असतो.—रोमकर ६:२३.

१०. आदामाने जे गमावले ते परत मिळवता यावे म्हणून कशाची गरज होती?

१० तरीसुद्धा, आदामाने जे जीवन गमावले त्याच्या मोबदल्यात काही देता येऊ शकत होते का? देवाचा न्यायी दर्जा “जीवाबद्दल जीव” अशी समतोल मागणी करतो. (निर्गम २१:२३) या कारणास्तव, जे जीवन गमावण्यात आले त्याच्या किंमतीसाठी एक दुसरे जीवन देण्याची गरज होती. ते कोणत्याही मानवाचे जीवन चालणार नव्हते. अपरिपूर्ण मानवांबद्दल स्तोत्र ४९:७, ९ म्हणते: “कोणाहि मनुष्यास आपल्या भावाला मुक्‍त करिता येत नाही; किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही. . . . त्याच्या जिवाची खंडणी इतकी मोठी आहे की तिची भरपाई करण्याचे नेहमी अपुरेच राहणार.” तर मग, परिस्थिती अगदीच अशक्य कोटीतील आहे का? कदापि नाही.

११. (अ) “खंडणी” या शब्दाची इब्री भाषेत कोणती अर्थसूचकता आहे? (ब) मानवजातीची केवळ कोण मुक्‍तता करू शकत होता व का?

११ इब्री भाषेत “खंडणी” या शब्दाची अर्थसूचकता कोणा गुलामाची मुक्‍तता करण्यासाठी दिलेली रक्कम तसेच तिचे समतुल्य प्रमाण याला अनुलक्षून आहे. आदामाने जे काही गमावले त्याच्या तुलनेत केवळ परिपूर्ण मानवी जीवन असणारा मनुष्यच स्वतःला देऊ शकत होता. आदामानंतर या पृथ्वीवर जन्मलेला परिपूर्ण मनुष्य केवळ येशू ख्रिस्त हाच होता. या कारणास्तव, बायबल त्याला “शेवटला आदाम” म्हणते व याची खात्री देते की, ख्रिस्ताने “स्वतःला सर्वांसाठी जुळती खंडणी असे देऊ केले.” (१ करिंथकर १५:४५; १ तीमथ्य २:५, ६, NW) आदामाने आपल्या मुलांना वारशाने मृत्यू दिला तर येशू चिरकालिक जीवनाचा वारसा देतो. पहिले करिंथकर १५:२२ स्पष्टता देते: “जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील.” यास्तव, येशूला “सनातन पिता” असे योग्यपणे म्हटले आहे.—यशया ९:६, ७.

खंडणी कशी चुकती करण्यात आली

१२. येशू केव्हा मशीहा झाला आणि त्याने त्यानंतर कोणता जीवनक्रम सुरू केला?

१२ सा. यु. २९ च्या उत्तरार्धात येशू त्याचा नातेवाईक योहान याच्याकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी व त्याद्वारे त्याच्याबद्दल असणारी देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी गेला. त्या प्रसंगी यहोवाने येशूचा पवित्र आत्म्याने अभिषेक केला. अशाप्रकारे, येशू मशीहा किंवा ख्रिस्त, देवाकडून अभिषेक घडलेला असा झाला. (मत्तय ३:१६, १७) त्यानंतर, येशूने त्याच्या साडेतीन वर्षांच्या सेवकपणाला आरंभ केला. त्याने त्याच्या देशभर प्रवास करून देवाच्या राज्याचा प्रचार केला आणि विश्‍वासू अनुयायांना गोळा केले. तथापि, आधी भाकीत करण्यात आल्याप्रमाणे त्याला लवकरच एकामागून एक विरोध होऊ लागला.—स्तोत्र ११८:२२; प्रेषितांची कृत्ये ४:८-११.

१३. सचोटी रक्षक या अर्थाने येशूच्या मृत्यूपर्यंत कोणकोणत्या घटना घडल्या?

१३ येशूने धैर्याने धर्मपुढाऱ्‍यांचे ढोंग उघड केले व त्यांनी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याकरता त्यांनी विश्‍वासघात, बेकायदा अटक, बेकायदेशीर सुनावणी आणि राजद्रोहाचा खोटा आरोप असे एकंदर भयंकर कारस्थान रचले. येशूला चपराका बसल्या, त्याच्यावर थुंकण्यात आले, थट्टा केली गेली आणि शरीराचे मांस सोलून काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चाबकाने मारण्यात आले. त्यानंतर, रोमी सुभेदार पंतय पिलाताने येशूला वधस्तंभावरील मरणदंडाची शिक्षा दिली. एका लाकडी खांबावर त्याला खिळण्यात येऊन त्याला सरळ उभे टांगण्यात आले. त्याचा प्रत्येक श्‍वास त्याला अतियातनाकारक जाणवत होता; मरण येण्याकरता काही तास लागले. या सर्व परिस्थितीमध्ये येशूने देवाला पूर्ण रूपाची सचोटी राखली.

१४. देवाने स्वतःच्या पुत्राला यातना सहन करून का मरू दिले?

१४ अशाप्रकारे सा. यु. ३३ च्या निसान १४ तारखेला येशूने “पुष्कळांच्या मुक्‍तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण” केला. (मार्क १०:४५; १ तीमथ्य २:५, ६) स्वतःच्या प्रिय पुत्राला यातना होत आहेत व तो मरत आहे हे यहोवा स्वर्गातून बघत होता. पण मग, देवाने एवढी भयंकर गोष्ट होऊ देण्याची परवानगी का दिली? त्याची मानवजातीवर प्रीती होती त्यामुळेच त्याने हे होऊ दिले. येशूने म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) येशूचा मृत्यू, यहोवा न्यायाची पूर्ण मागणी करणारा देव आहे हे देखील सुचवतो. (अनुवाद ३२:४) देवाने जिवाबद्दल जीव हे त्याचे न्यायाचे तत्त्व बाजूला ठेवून आदामाच्या पापी मार्गासाठी आवश्‍यक असणारी किंमत नजरेआड का केली नाही याचे काहींना आश्‍चर्य वाटते. याचे कारण हेच की, यहोवा स्वतःला जरी जबर किंमत द्यावी लागली तरी नेहमी त्याच्या कायद्यानुरूप राहतो व त्यांना उंचावून धरतो.

१५. येशूचे अस्तित्व कायमचे नष्ट होण्याची परवानगी द्यावी हे अन्यायी झाले असते म्हणून यहोवाने काय केले?

१५ येशूच्या मृत्यूचा परिणाम आनंदात घडावा हेही देवाच्या न्यायाने अपेक्षिले. कारण, खरे पाहता स्वतःच्या विश्‍वासू पुत्राला मरणामध्ये अनंतकाळाकरता निद्रित होऊ द्यावे हा काय न्याय होता? निश्‍चितच नाही! इब्री शास्त्रवचनांनी असे भाकीत केले होते की, देवाचा निष्ठावंत भक्‍त थडग्यात कायम राहणार नव्हता. (स्तोत्र १६:१०; प्रेषितांची कृत्ये १३:३५) त्याने तीन दिवसाचा काही भाग मरणात विसावा घेतला व मग यहोवा देवाने त्याचे सामर्थ्यवान आत्मिक प्राणी या अर्थाने पुनरुत्थान केले.—१ पेत्र ३:१८.

१६. येशूने स्वर्गात परतल्यावर काय केले?

१६ येशूने मरणामध्ये त्याचे परिपूर्ण मानवी जीवन सर्वकाळाकरता देऊन टाकले. स्वर्गातील जीवनासाठी त्याचे पुनरुत्थान घडल्यावर तो जीवनदायी आत्मा बनला. याशिवाय, येशू विश्‍वातील अत्यंत पवित्र जागी गेल्यावर तेथे त्याचे त्याच्या प्रिय पित्याबरोबर मिलन घडले आणि तो स्वतःच्या परिपूर्ण मानवी जीवनाचे मोल देवाला औपचारिकपणे देऊ शकला. (इब्रीयांस ९:२३-२८) त्या बहुमोल जीवनाचे मूल्य नंतर आज्ञाधारक मानवजातीखातर वापरता येऊ शकत होते. याचा तुम्हासाठी काय अर्थ होतो?

ख्रिस्ताची खंडणी व तुम्ही

१७. ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर आधारित असणाऱ्‍या क्षमेचा लाभ आम्हाला कसा मिळवून घेता येऊ शकतो?

१७ ख्रिस्ताच्या खंडणीरूपी बलिदानाचा तुम्हाला सध्या देखील ज्या तीन मार्गांनी लाभ घडतो त्याचा विचार करा. प्रथमतः ते पापांची क्षमा करते. येशूच्या ओतलेल्या रक्‍तावर विश्‍वास ठेवण्यामुळे आपल्याला “खंडणी भरून मिळविलेली मुक्‍ति” याचा अर्थ “आपल्या अपराधांची क्षमा” ही मिळते. (इफिसकर १:७) तेव्हा, आपल्याकडून गंभीर पातक घडले असल्यास आपण देवाकडे येशूच्या नामाने क्षमा मागू शकतो. आपण खरोखर पश्‍चात्ताप दाखवल्यास यहोवा आम्हावर त्याच्या पुत्राच्या खंडणीच्या बलिदानाचे मोल लागू करतो. पाप करण्यामुळे आम्हावर जो मृत्युदंड येतो त्याची अंमलबजावणी न करता देव आम्हाला क्षमा करून चांगल्या विवेकाचा आशीर्वाद देतो.—प्रेषितांची कृत्ये ३:१९; १ पेत्र ३:२१.

१८. येशूचे बलिदान आपल्याला कशा रीतीने आशा देते?

१८ दुसरी गोष्ट म्हणजे, ख्रिस्ताचे खंडणी बलिदान आमच्या भविष्याच्या आशेचा आधार आम्हाला देते. एका दृष्टान्तात प्रेषित योहानाने “कोणाला मोजता आला नाही असा, . . . मोठा लोकसमुदाय” या व्यवस्थीकरणाच्या महाभयंकर समाप्तीमधून बचावणार असल्याचे पाहिले. पण, देव जर इतर सर्वांचा नाश करणार आहे तर यांचा का बचाव घडणार आहे? एका देवदूताने योहानाला म्हटले की, मोठ्या लोकसमुदायाने “आपले झगे कोकऱ्‍याच्या [येशू ख्रिस्त] रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत.” (प्रकटीकरण ७:९, १४) आपण येशूच्या ओतलेल्या रक्‍तावर विश्‍वास ठेवू आणि ईश्‍वरी गरजांप्रमाणे वागू तर आपण देवाच्या दृष्टीत शुद्ध ठरू आणि सार्वकालिक जीवनाची आशा आपल्याला मिळवता येईल.

१९. ख्रिस्ताचे बलिदान त्याची व त्याच्या पित्याची तुम्हावर प्रीती आहे हे कसे सिद्ध करते?

१९ तिसरी गोष्ट, खंडणी बलिदान हा सर्वतोपरि यहोवाच्या प्रेमाचा पुरावा आहे. ख्रिस्ताचा मृत्यू विश्‍वातील इतिहासात प्रीतीच्या दोन सर्वथोर कृतींचे मूर्त स्वरूप प्रकटवतो: (१) देवाने स्वतःच्या पुत्राला आम्हाखातर मरावे म्हणून पाठवण्यात त्याची असणारी प्रीती; (२) बलिदान म्हणून स्वतःला स्वेच्छेने देण्यात येशूने दाखवलेली प्रीती. (योहान १५:१३; रोमकर ५:८) आपण विश्‍वास ठेवल्यास या प्रेमाचा अवलंब आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत लागू केला जातो. प्रेषित पौलाने म्हटले: ‘देवाच्या पुत्राने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.’—गलतीकर २:२०; इब्रीयांस २:९; १ योहान ४:९, १०.

२०. आपण येशूच्या खंडणी बलिदानावर का विश्‍वास ठेवावा?

२० या कारणामुळे, आपण ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास बाळगून देव व ख्रिस्त यांनी प्रदर्शित केलेल्या प्रेमाला आपली कृतज्ञता दाखवू या. त्यामुळे आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेले जाईल. (योहान ३:३६) तरीपण, येशूचे पृथ्वीवरील जीवन व त्याचा मृत्यू घडण्याचे सर्वतोपरी कारण आमची मुक्‍ती व्हावी हे नाही. नव्हे, त्यामागील त्याची प्रमुख काळजी ही यापेक्षाही अधिक मोठ्या वादविषयाशी, सार्वत्रिक वादविषयाशी अनुलक्षून आहे. आपण पुढील अध्यायात पाहणारच आहोत त्याप्रमाणे तो वादविषय आम्हा सर्वांना लागू होणारा आहे, कारण देवाने या जगात इतक्या काळापर्यंत दुष्टाई व त्रास चालू राहण्याला का अनुमती दिली हे ते दाखवते.

तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा

मानवजातीचे रक्षण करण्याकरता येशूला मरणे का भाग होते?

खंडणी कशी देण्यात आली?

खंडणीपासून तुम्हाला कोणकोणत्या मार्गांनी लाभ घडतो?

[Full-page picture on page 67]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा