चेर्नोबिलला एक भेट
युक्रेनमधील सावध राहा! लेखकाकडून
पूर्वी कधीही घडली नव्हती अशी एक अनर्थकारी आण्विक दुर्घटना वीस वर्षांपूर्वी, चेर्नोबिल येथील अणूकेंद्रात घडली. २६ एप्रिल, १९८६ रोजी याठिकाणी असलेल्या चार अणुभट्ट्यांपैकी एका अणुभट्टीचा गाभा वितळ्यामुळे आजूबाजूच्या परिसरात किरणोत्सारी पदार्थ प्रसारित झाले. बहुतेक दुर्घटनानंतर, मग त्या मानवनिर्मित असोत अथवा नैसर्गिक, काही काळानंतर लोक त्यातून सावरतात आणि नव्याने जीवनाला सुरुवात करतात. पण या अपघातानंतर असे घडले नाही कारण आजूबाजूच्या वातावरणात पसरलेले व मुरलेले किरणोत्सारी पदार्थ काढून टाकणे अशक्य होते.
काही वर्षांपासून, दरवर्षी ९ मेला या परिसराच्या आसपासच्या गावांत जे लोक पूर्वी राहात होते, ते याठिकाणी येतात. एकेकाळी ते जेथे राहात होते व जी घरे त्यांना सोडून जावे लागले होते ती पाहण्यासाठी कधीकधी ते आपल्या मित्र व नातेवाईकांसोबत येथे येतात. तसेच बरेच शास्त्रज्ञ देखील, प्रारणाच्या परिणामांवर संशोधन करण्यासाठी येतात. पूर्वी येथे राहणारे लोक अधूनमधून अंत्यविधी व दफनविधी करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. शिवाय, युक्रेनियन पर्यटन कंपन्यांनी मागच्या काही वर्षांपासून या परिसरात एका दिवसाच्या सहली सुरू केल्या आहेत. या सहलींत माहिती देण्याकरता गाईडचीही व्यवस्था केली जाते.
जून २००५ मध्ये न्यू यॉर्क टाईम्स दैनिकाच्या पहिल्या पानावर प्रिपेट या शहराला भेट देऊ इच्छिणाऱ्यांसाठी अशा “मार्गदर्शित टुअर्सविषयी” माहिती दिली होती. या टुअर्समुळे “आरोग्याला कसलाही धोका नाही” असाही सदर लेखात उल्लेख केला होता.a १९७० च्या दशकात वसलेल्या प्रिपेट या शहराची लोकसंख्या ४५,००० इतकी होती आणि हे शहर अपघात झालेल्या अणुभट्ट्यांपासून जवळजवळ तीन किलोमिटर अंतरावर होते. पण अपघातानंतर इतर अनेक शहरांप्रमाणे प्रिपेट शहरही निर्मनुष्य झाले. वातावरणात किरणोत्सारी पदार्थ मिसळल्यामुळे ही शहरे व गावे मनुष्यवस्तीकरता धोकेदायक बनली. अपघात झाला त्यावेळी ॲना व व्हिक्टर रुडनिक आणि त्यांची मुले प्रिपेट येथे, साधारण एका वर्षापासून राहात होती.b
चेर्नोबिल (अणुकेंद्राचेही हेच नाव आहे) हे गाव त्यामानाने लहान असून अणुभट्ट्यांपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. काही वर्षांपासून पूर्वीच्या रहिवाशांना वर्षातून एकदा येथे येण्याची अनुमती देण्यात आली आहे. रुडनिक कुटुंबाचे मूळ गाव चेर्नोबिलच असल्यामुळे ते वेळोवेळी चेर्नोबिलला भेट देत असतात. काही वर्षांपूर्वी आम्ही दोघे नवराबायको त्यांच्यासोबत चेर्नोबिलला गेलो होतो. त्या अनुभवाचे वर्णन करावेसे वाटते.
उदासवाणा अनुभव
युक्रेनची राजधानी असलेल्या कियेफहून आम्ही दोन लेन्सच्या महामार्गावरून उत्तरेकडे निघालो. वाटेत बरीच गावे लागत होती. रस्त्यालगत असलेल्या घराभोवती सुंदर ट्युलिप फुलांनी सजवलेल्या बागा दिसत होत्या. परसांत लोकांनी भाजीपाला लावलेला दिसत होता आणि बरेचजण बागेत काम करतानाही दिसत होते. दोन गावांच्या मध्ये, नजर जाईल तिथपर्यंत मका, गहू व सूर्यफुलांची शेते दिसत होती.
पण नकळत कोठेतरी आम्ही जणू एक अदृश्य सरहद्द पार करून एका वेगळ्याच प्रदेशात प्रवेश केला. अर्थात, इथपासून एक नवीन प्रदेश सुरू होत आहे असे सांगणारा फलक कोठेही दिसला नाही, पण आम्हालाच फरक जाणवला. आता रस्त्यात जी गावे लागत होती, त्यांत एक विचित्र भयाण शांतता जाणवली. पडीक घरे दिसत होती, ज्यांत खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, आणि दारांच्या कड्या लावलेल्या दिसत होत्या. घरासमोरच्या अंगणात व बागांत जंगली झाडेझुडपे वाढली होती.
आम्ही निर्बंधित क्षेत्रात, म्हणजे अणुभट्ट्यांपासून ३० किलोमीटरच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. आनाने आम्हाला सांगितले, “या क्षेत्रातल्या गावांमध्ये प्रारणाची मात्रा बरीच जास्त आहे. येथून जवळपासच्या बऱ्याच गावांतून व खेड्यापाड्यांतून १,५०,००० पेक्षा जास्त लोकांना आपले घर सोडून पूर्वीच्या सोव्हियेत संघातल्या निरनिराळ्या ठिकाणी जाऊन नव्याने संसार मांडावा लागला.”
पुढे गेल्यावर आम्ही आणखी एका नव्या क्षेत्रात प्रवेश केला. उंच तारेच्या कुंपणाने हे क्षेत्र बाहेरच्या जगापासून वेगळे करण्यात आले आहे. प्रवेशद्वाराजवळ लाकडी फळ्यांनी बनवलेली लहानशी चौकी आहे, जेथे रक्षक शिपाई येणाऱ्या सगळ्या वाहनांची तपासणी करतात. एका शिपायाने आमचे पासपोर्ट तपासले, आमच्या गाडीचा नंबर लिहून घेतला आणि मग फाटक उघडले.
आता आम्ही निर्बंधित क्षेत्राच्या आत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांना नुकतीच पालवी फुटली होती. दोन्ही बाजूच्या झाडांच्या फांद्या झुकून जणू एक हिरवी कमान तयार झाली होती. जमिनीलगतही दाट झाडेझुडपे होती. मी अपेक्षा केली होती त्यापेक्षा हे चित्र अगदीच वेगळे होते. इथे जळून, सुकून गेलेली वृक्षे व झाडेझुडपे दिसतील असा माझा ग्रह होता. पुढे गेल्यावर चेर्नोबिल असे निळ्या अक्षरात लिहिलेला, पांढऱ्या रंगाच्या विटांचा फलक दिसला.
चेर्नोबिल गावात प्रवेश करताच एक औषधाचे दुकान दिसले. व्हिक्टरची आई एकेकाळी या दुकानात कामाला होती. धुळीने माखलेल्या खिडकीत, अस्पष्ट अक्षरांत दुकानाच्या वेळा दाखवणारा फलक अजूनही लटकलेला होता. गावाच्या मधोमध असलेल्या पार्कच्या शेजारी सांस्कृतिक भवन होते. आनाने सांगितले की सहसा काम संपल्यावर संध्याकाळी ती आणि इतर बरेच लोक विरंगुळ्यासाठी या सांस्कृतिक भवनात निरनिराळ्या कलाकारांचे कार्यक्रम बघायला यायचे. जवळच युक्रायना नावाचे चित्रपट गृह होते. बाहेरचा उकाडा टाळण्यासाठी, थंडगार वातावरणात आरामशीर बसून नवनवीन चित्रपट पाहण्याचे मुलांचे हे आवडते ठिकाण होते. एकेकाळी जेथे प्रेक्षकांचा हशा पिकायचा तेथे आता फक्त अंधार आणि भयाण शांतता आहे. आना आणि व्हिक्टरने आम्हाला तेथून जवळच असलेल्या त्यांच्या जुन्या घराजवळ नेले. जंगली झाडे झुडुपे इतकी वाढली होती की समोरच्या दारातून घरात प्रवेश करणे अशक्य होते. म्हणून आम्ही एकामागोमाग एक, झाडाझुडपांतून वाट काढत मागच्या दारापर्यंत आलो. दार कसले, भिंतीत लहानसे भोक तेवढे राहिले होते.
आतले दृश्य विषण्ण करणारे होते. गंजलेल्या पलंगावर जुनाट बुरसटलेली गादी पडली होती. भिंतींवरच्या वॉलपेपरची लक्तरं लटकत होती. खोलीभर पसरलेल्या केरकचऱ्यातून आनाने खाली वाकून एक जुना फोटो उचलला. “आम्ही जेव्हाही इथं येऊ तेव्हा आमचं घर जसं होतं तसंच दिसावं असं मला नेहमी वाटायचं,” आना खिन्नपणे म्हणाली. “पण घराचा असा कबाडखाना झालेला पाहून जीव तीळतीळ तुटतो; इतक्या वर्षांत आमच्या कितीतरी वस्तू चोरीला गेल्या आहेत!”
रुडनिक कुटंबाच्या घराबाहेर पडून आम्ही त्याच रस्त्याने पुढे चालत गेलो. रस्त्याच्या कडेला काही लोक मोठ्याने बोलताना दिसले. अर्धा किलोमीटर चालत गेल्यावर रस्ता संपला आणि एक उद्यान आले. हे उद्यान एका सपाट डोंगरमाथ्यावर होते आणि तेथून खाली पाहिल्यास शांत नदीचे पात्र दिसत होते. वाऱ्याबरोबर उडणारी चेस्टनटच्या झाडांची सुरेख पांढरी फुलं फुलपाखरांसारखी दिसत होती. उद्यानातून नदीच्या काठापर्यंत जायला पायऱ्या होत्या. याच पायऱ्यांवर १९८६ साली शेकडो लोक बोटीने सुरक्षित स्थानी जाण्याकरता वाट पाहात होते.
मागच्या वर्षी रुडनिक कुटुंबीय प्रिपेटच्या आपल्या घरी पहिल्यांदा गेले. १९ वर्षांपूर्वी आण्विक दुर्घटना घडली तेव्हा त्यांना हे शहर सोडून जावे लागले होते.
गतकाळातून बोध
२००६ च्या एप्रिल महिन्यात चेर्नोबिल अणुकेंद्रात झालेल्या अपघाताला २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या घटनेच्या स्मरणार्थ बरेच कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बऱ्याच लोकांना ही तिथी एका गंभीर वस्तुस्थितीची आठवण करून देईल. ती अशी की मनुष्याने कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तरी देवाच्या मार्गदर्शनाशिवाय तो या पृथ्वीचा कारभार यशस्वीपणे चालवण्यास असमर्थ आहे.—यिर्मया १०:२३.
काही वैज्ञानिकांनी चेर्नोबिलच्या दुर्घटनेचे पुनरावलोकन करून, मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये आपल्या संशोधनावर एक अहवाल जाहीर केला. संयुक्त राष्ट्रसंघाने नियुक्त केलेल्या या वैज्ञानिकांच्या अहवालानुसार, दुर्घटनेमुळे सुरुवातीला ५६ लोक मृत्यूमुखी पडले आणि त्यांच्या अंदाजानुसार प्रारणामुळे झालेल्या रोगांना बळी पडणाऱ्यांची संख्या ४,००० इतकीच असेल. पूर्वीच्या अंदाजांनुसार सहसा ही संख्या १५ ते ३० हजार सांगितली जात असे. सप्टेंबर ८, २००५ च्या न्यू यॉर्क टाईम्स दैनिकातल्या संपादकीय लेखात म्हणण्यात आले की संयुक्त राष्ट्रसंघाच्या या अहवालाची “बऱ्याच पर्यावरणवादी गटांनी कडाडून टीका केली आहे; त्यांच्या मते अणुशक्तीच्या संभाव्य धोक्यांविषयी लोकांना अंधारात ठेवण्याचा मुद्दामहून प्रयत्न केला जात आहे.”
व्हिक्टरला या अपघातानंतर मनुष्यजातीचा सृष्टीकर्ता यहोवा देव याच्याविषयी शिक्षण घेण्याची संधी मिळाली. तो म्हणतो: “आता आम्ही त्या घटनेची आठवण काढून दुःखी होत नाही, कारण आम्हाला माहीत आहे की देवाचे राज्य आल्यावर अशा भयानक दुर्घटना पुन्हा कधीही होणार नाहीत. चेर्नोबिलच्या आमच्या घराच्या आजूबाजूचा उजाड झालेला परिसर बदलून देवाच्या नव्या जगात, एक सुंदर बाग बनेल त्या दिवसाची आम्ही आतूरतेने वाट पाहात आहोत.”
देवाने सुरुवातीला पृथ्वीवर जी रम्य बाग निर्माण केली होती ती तो पुन्हा आणेल आणि सबंध पृथ्वीच एका सुंदर बागेसारखी बनेल असे आश्वासन बायबलमध्ये दिले आहे. चेर्नोबिलची दुर्घटना झाल्यानंतर आजपर्यंत लाखो लोकांना खात्री पटली आहे की हे आश्वासन निश्चित पूर्ण होणार आहे. (उत्पत्ति २:८, ९; प्रकटीकरण २१:३, ४) एकट्या युक्रेनमध्येच मागच्या २० वर्षांत १,००,००० पेक्षा जास्त लोकांनी ही आशा स्वीकारली आहे! देवाच्या उद्देशांविषयी शिकण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी त्याने जे उज्ज्वल भविष्य राखून ठेवले आहे, त्याविषयी माहिती घेण्याचे आम्ही तुम्हालाही प्रोत्साहन देऊ इच्छितो. (g ४/०६)
[तळटीपा]
a अशाप्रकारच्या अल्पकाळाच्या सहली धोकेदायक नसल्याचे बऱ्याच अधिकाऱ्यांनी जाहीर केले असले तरीसुद्धा सावध राहा! या क्षेत्रांत सहलींची शिफारस किंवा जाहिरात करत नाही.
b सावध राहाच्या! एप्रिल २२, १९९७ (इंग्रजी) अंकात पृष्ठे १२-१५ वर पाहावे.
[१६ पानांवरील चौकट/चित्र]
परिसमापकांच्या सन्मानार्थ स्मारक
चेर्नोबिल येथील अपघातानंतर ज्यांनी अपघाताच्या ठिकाणी जाऊन किरणोत्सारी पदार्थांचा फैलाव रोखण्यासाठी पावले उचलली त्यांच्या सन्मानार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या कामगारांनी वितळलेल्या अणुभट्टीला सीलबंद केले आणि किरणोत्सारी पदार्थांचा फैलाव रोखला. शेवटी, या कामगारांची संख्या लाखोंच्या घरात गेली. थेटपणे अपघातामुळे झालेल्या रोगांना बळी पडणाऱ्यांची संख्या अंदाजे ४,००० इतकी असेल असे सांगितले जाते आणि यांतले बहुतेकजण याच कामगारांपैकी असतील.
[१५ पानांवरील चित्रे]
चेर्नोबिल गावाचा फलक आणि चित्रपटगृह
[१५ पानांवरील चित्रे]
चेर्नोबिलच्या आपल्या वडिलोपार्जित घरासमोर रुडनिक कुटुंबीय
[१६ पानांवरील चित्रे]
रुडनिक कुटुंबाच्या प्रिपेटच्या घरापासून (आतले चित्र) अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या याच अणुभट्टीत अपघात झाला