वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ५/८ पृ. १८-२१
  • चेर्नोबिलच्या काळोखात तेजस्वी आशा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चेर्नोबिलच्या काळोखात तेजस्वी आशा
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अपघाताचा दिवस
  • अपघातानंतरची दुरावस्था
  • प्रारणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम
  • सिंहावलोकन
  • सर्वत्र पसरलेल्या भीतीच्या वातावरणातही आत्मविश्‍वास
  • चेर्नोबिलला एक भेट
    सावध राहा!—२००६
  • आण्विक धमकी सरतेशेवटी मिटली का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • किरणोत्सारी अवपात काळजीची बाब
    सावध राहा!—२००१
  • वृद्धावस्थेत देखील तिने यहोवाची सेवा केली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ५/८ पृ. १८-२१

चेर्नोबिलच्या काळोखात तेजस्वी आशा

युक्रेनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

एप्रिल २६, १९८६ रोजी, युक्रेनमधील चेर्नोबिल येथे अणुशक्‍ती केंद्राचा इतिहासातील सर्वात भयंकर अपघात घडला. त्या वर्षी नंतर, त्यावेळचे सोविएत राष्ट्रपती, मिखाईल गोर्बाचेव यांनी म्हटले की, “स्वतःच जन्माला घातलेल्या प्रचंड शक्‍तींवर मानवाने अद्यापही प्रभुत्व मिळवलेले नाहीय” याची या दुर्घटनेने पुन्हा एकदा निर्दयीपणे आठवण करून दिली.

आजचे मानसशास्त्र (इंग्रजी) याच्या जर्मन आवृत्तीच्या फेब्रुवारी १९८७ अंकात, चेर्नोबिलच्या शोचनीय अपघाताच्या भयंकर स्वरूपावर भर देऊन असे म्हणण्यात आले होते: “चेर्नोबिलच्या अणुभट्टी अपघाताने . . . आधुनिक संस्कृतीच्या इतिहासाला वेगळेच वळण दिले. आणि या संकटाचा आपल्यावर येणाऱ्‍या अनेक शतकांपर्यंत बऱ्‍याच प्रमाणावर परिणाम होणार आहे.” द न्यूयॉर्क टाइम्सने म्हटल्यानुसार, “या अपघातात किरणोत्सारी पदार्थांचे सबंध जगाच्या हवेत, जमिनीत आणि पाण्यात दीर्घकालापर्यंत जे [प्रारण झाले] त्याची तुलना आजवर झालेल्या सर्व अणू चाचण्यांतून आणि बाँबस्फोटांतूनही झालेल्या प्रारणाशी करता येईल.”

हानोफरशा आल्जमायना नावाच्या एका जर्मन वृत्तपत्राने भाकीत केले की, “सोविएत अणुभट्टीचा गाभा वितळल्यामुळे येत्या ५० वर्षांच्या काळात सबंध जगातील अंदाजे ६०,००० लोक कर्करोगाने मृत्यूमुखी पडतील . . . शिवाय ५,००० लोकांना गंभीर अनुवंशीय विकार होतील आणि जवळजवळ १,००० जणांना जन्मतःच आरोग्याचे विकार सहन करावे लागतील.”

चेर्नोबिलच्या शोचनीय दुर्घटनेमुळे लक्षावधी लोकांच्या जीवनावर भीती, काळजी आणि साशंकतेचे अंधकारमय सावट पसरले. असे असूनही, काहींना या भयाण काळोखात एक तेजस्वी आशा लाभली आहे. रुडनिक कुटुंबाचेच उदाहरण घ्या; या कुटुंबात विक्टर आणि आना हे दांपत्य व ईलना आणि आन्या या त्यांच्या दोन कन्या आहेत. एप्रिल १९८६ मध्ये रुडनिक कुटुंब चेर्नोबिल अणुभट्टीपासून तीन किलोमीटर अंतरावर प्रिपेट या ठिकाणी वास्तव्यास होते.

अपघाताचा दिवस

ही दुःखद घटना घडली त्या शनिवारच्या सकाळी बिघाड झालेल्या अणुभट्टीच्या ठिकाणी आग विझवणाऱ्‍यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे याहीपेक्षा भयंकर परिणाम टळला. काही तासांतच या आग विझवणाऱ्‍यांना प्रारणजन्य विकार [रेडियेशन सिक्नेस] झाला, आणि नंतर यांपैकी बरेच जण दगावले. १९७० च्या दशकात चेर्नोबिल येथे डेप्युटी चीफ इंजिनियर या पदावर कार्य केलेल्या ग्रिगॉरयई मेद्वेदेफ यांनी जळलेले आत्मे (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात असे वर्णन केले: “अणुभट्टीच्या क्षेत्रापासून गावाला वेगळे करणाऱ्‍या पाईन वृक्षांच्या उपवनाकडे या किरणोत्सारी पदार्थांचा ढग वाहवत गेला ज्यामुळे त्या लहानशा जंगलावर किरणोत्सारी राखेची वृष्टी झाली.” कितीतरी टनाचे किरणोत्सारी पदार्थ वातावरणात मिसळल्याचे वृत्त आहे!

गंमत म्हणजे, प्रिपेट या ४०,००० लोकसंख्येच्या शहरात त्या शनिवारी सर्वकाही रोजच्यासारखेच चालले होते. गल्लीबोळांत मुले बागडत होती आणि मे १ रोजी सोविएत सुटीचा दिवस असल्यामुळे सर्वांची त्याच्यासाठी तयारी चालली होती. अपघाताची घोषणा करण्यात आली नाही की धोक्याची सूचनाही देण्यात आली नाही. आना रुडनिक ईलना या आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत फिरायला गेलेली होती, तेव्हा त्यांची आनाच्या सावत्र वडिलांशी गाठ पडली. त्यांना अपघाताविषयी कळले होते. प्रारणामुळे धोका संभवेल या काळजीने त्यांनी त्या दोघींना मोटारीतून १६ किलोमीटरच्या अंतरावर स्वतःच्या घरी नेऊन पोहंचवले.

किरणोत्सारी ढग वातावरणात वर चढू लागला आणि शेकडो किलोमीटर दूरवर युक्रेन, बेलोरशिया (आता बेलोरूस), रशिया आणि पोलंड, तसेच जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड येथपर्यंत झपाट्याने पसरला. पुढच्या सोमवारी, स्वीडन आणि डेन्मार्क येथील वैज्ञानिक, किरणोत्साराच्या वाढलेल्या प्रमाणाच्या नोंदी पाहून काळजीत पडले.

अपघातानंतरची दुरावस्था

सोविएत सैनिक, अग्निशामक दलातील कर्मचारी, बांधकाम विशेषज्ज्ञ आणि इतर अनेकांना चेर्नोबिल येथे रवाना करण्यात आले. ६,००,००० लोकांनी बनलेल्या या समूहाचे—“परिसमापक” असे नाव पडले. त्यांनी अणुभट्टीवर स्टील आणि काँक्रीटने बनलेले दहा मजल्यांच्या उंचीचे आणि दोन मीटर जाडीचे थडगे बांधून अपघातग्रस्त अणुभट्टीला सीलबंद केले, ज्यामुळे युरोपवर आणखी भयंकर अनर्थ ओढवण्याचा धोका टळला.

काही दिवसांतच जवळपासच्या परिसराचे निर्वासन सुरू झाले. विक्टरने सांगितले, “आम्हाला आमचं घरदार सोडून जावं लागलं—कपडे, पैसे, कागदपत्र, अन्‍न—अक्षरशः आमच्याजवळ होतं नव्हतं ते सगळं टाकून जावं लागलं. काळजीमुळे आमची त्रेधा उडाली होती कारण आना गरोदर होती, ते आमचं दुसरं मूल होतं.”

अंदाजे १,३५,००० लोकांना तो परिसर सोडून जावे लागले—अणुभट्टीच्या जवळजवळ ३० किलोमीटर अंतरापर्यंतच्या सर्व वसाहती निर्मनुष्य झाल्या. रुडनिक कुटुंबीय आपल्या नातलगांकडे राहायला गेले. पण, त्यांच्याकडून आपल्यालाही किरणोत्साराची बाधा होईल अशी लवकरच या नातलगांनाही भीती वाटू लागली. आना सांगते, “ते अस्वस्थ झाले, आणि आम्ही जावं हे त्यांनी शेवटी बोलूनही दाखवलं.” इतर निर्वासितांनाही असेच दुःखद अनुभव आले. शेवटी, १९८६ च्या सप्टेंबर महिन्यात, रुडनिक कुंटुंब रशियातील मॉस्को शहराच्या नैर्ऋत्येकडे १७० किलोमीटर अंतरावर कालुगा येथे नव्याने स्थायिक झाले.

आना म्हणते, “तेव्हा कुठं आम्हाला पूर्ण जाणीव झाली, की आता घरी परतणं शक्य नव्हतं. जिथं आमचा जन्म झाला, आम्ही लहानाचे मोठे झालो ते आमचं प्रिय घर आमच्या हातून गेलं होतं. तिथला परिसर खूप सुंदर होता, नजर जाईल तेथपर्यंत फुलांचे आणि हिरवळीचे जणू गालिचे असायचे; लहानसा ओढा होता, त्यात कमळं होती. दाट हिरव्यागार जंगलांमध्ये फळांची, अळंब्यांची काहीच कमी नव्हती.”

युक्रेनच्या सौंदर्याचाच केवळ नाश झाला नाही तर सोविएत संघाचे भांडारघर या त्याच्या भूमिकेवरही परिणाम झाला. त्या खरीप हंगामात देशांतले बरेचसे पीक दूषित झाले होते. तसेच स्कॅन्डिनेवियामध्ये सुद्धा, ७० टक्के रेनडियरचे मांस खाण्यालायक नाही असे घोषित करण्यात आले कारण चरताना किरणोत्सार झालेले शेवाळ त्या प्राण्यांच्या पोटात गेले होते. जर्मनीच्या काही भागांत देखील, भाजीपाला दूषित असू शकेल या भीतीने तो शेतांमध्येच सडत राहिला.

प्रारणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम

अपघाताच्या पाच वर्षांनंतर देण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, ५,७६,००० लोकांवर प्रारणाच्या संपर्कात आले. या लोकांमध्ये कर्की आणि गैरकर्की रोगांचा उद्‌भव जास्त असल्याचे आढळले आहे. विशेषतः, तरुण लोकांवर याचा परिणाम झाला आहे. न्यू साइंटिस्ट मासिकाच्या डिसेंबर २, १९९५ अंकातील वृत्तानुसार युरोपच्या एका प्रतिष्ठित थायरॉइड तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, “एक वर्षापेक्षा कमी वय असताना, चेर्नोबिलच्या अवपातातील अत्युच्च प्रमाणावर किरणोत्सारी पदार्थांच्या संपर्कात आलेल्या मुलांपैकी जवळजवळ ४० टक्के मुलांना प्रौढावस्थेत थायरॉइडचा कर्करोग होण्याची शक्यता आहे.”

आना गरोदर असताना प्रारणाच्या संपर्कात आल्यामुळे तिने गर्भपात करवून घ्यावा असे डॉक्टरांचे ठाम मत होते. विक्टर आणि आना यांनी नकार दिला तेव्हा त्यांना एका प्रतिज्ञापत्रावर हस्ताक्षर करावे लागले ज्यानुसार मूल जन्मतः विकृत असले तरीही त्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांना स्वीकारायची होती. आन्या विकृत नसली तरीही तिला निकटदृष्टी, श्‍वसन विकार आणि कार्डियोव्हॅस्क्युलर रोग आहेत. शिवाय, रुडनिक कुटुंबातील इतर सदस्यांची प्रकृती या अपघातानंतर खालावली आहे. विक्टर आणि ईलना या दोघांनाही हृदयविकार जडले आणि चेर्नोबिल रोगी म्हणून नोंद झालेल्या पुष्कळांपैकी आना एक आहे.

अपघातग्रस्त अणुभट्टीला सीलबंद करणाऱ्‍या परिसमापकांवर प्रारणाचा अत्याधिक परिणाम झाला. सफाई कार्यात मदत केलेल्या हजारोंना अकाली मृत्यू आल्याचे सांगण्यात येते. बचावलेल्या अनेकांना मज्जातंत्रिय आणि मनोदैहिक व्याधी आहेत. अवसाद सर्वत्र फैलावलेला आहे आणि आत्महत्या असामान्य नाहीत.

बचावलेल्यांपैकी ज्यांना भयंकर शारीरिक विकार उद्‌भवू लागले त्यांपैकी अँजेला एक आहे. त्या भीषण अपघाताच्या वेळी ती चेर्नोबिल पासून ८० किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्‍या कीव या युक्रेनच्या राजधानीत राहात होती. पण नंतर, ती काही काळ अणुभट्टीच्या ठिकाणी परिसमापकांना आवश्‍यक वस्तू पोचत्या करीत होती. जिवंत बचावलेल्यांपैकी आणखी एक, स्वेत्लाना, कीवजवळ इर्पन येथे राहते; तिला कर्करोग झाला आणि तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

सिंहावलोकन

हा अनर्थ घडल्याच्या तब्बल दहा वर्षांनंतर, एप्रिल १९९६ मध्ये, मिखाईल गोर्बाचेव यांनी कबूल केले: “तो प्रसंग आम्हाला अत्यंत अनपेक्षित होता.” त्याच वेळी, राष्ट्रपती येल्तसन यांनी आपले मत मांडले, “ज्याचे भयंकर दुष्परिणाम नाहीसे करणे जवळजवळ अशक्यच आहे असा भयंकर अनर्थ मनुष्याने आजवर अनुभवला नाहीये.”

साइंटिफिक अमेरिकनच्या जर्मन आवृत्तीत चेर्नोबिल अपघाताची, एका मध्यम-प्रमाणावरील आण्विक युद्धाच्या संभाव्य परिणामांशी लक्षवेधक तुलना करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या काहींच्या अंदाजानुसार ३०,००० एवढी असावी.

गतवर्षीच्या एका बातमीवृत्तानुसार, या अपघाताच्या दहाव्या वर्धापनदिनापर्यंत या अणुकेंद्राच्या आसपासचा २९ किलोमीटरचा पट्टा मानवी जीवनासाठी अद्यापही अयोग्य होता. तथापि, या वृत्तात सांगण्यात आले आहे की, “६४७ निश्‍चयी रहिवाशांनी एकतर चोरटेपणाने, अधिकाऱ्‍यांना लाच देऊन किंवा उघडपणे या पट्ट्यात प्रवेश केला आहे.” त्यात पुढे असे म्हटले आहे: “अणुकेंद्राच्या १० किलोमीटर क्षेत्रात अजिबातच कोणी राहात नाही. त्याच्या भोवती असलेल्या २०-किलोमीटर पट्ट्यातच सुमारे तीनशे लोक परतले आहेत.”

सर्वत्र पसरलेल्या भीतीच्या वातावरणातही आत्मविश्‍वास

एकेकाळी चेर्नोबिलजवळ राहणाऱ्‍या हजारो लोकांना जीवन जगणे अतिशय कठीण गेले आहे आणि आजही तीच परिस्थिती आहे. निर्वासितांच्या एका अभ्यासातून दिसून आले आहे की ८० टक्के लोक आपल्या नवीन घरांत आनंदी नाहीत. ते दुःख, थकवा, अस्वस्थपणा, चिडचिड आणि एकटेपणाच्या भावनांनी ग्रासलेले आहेत. चेर्नोबिल हा निव्वळ एक आण्विक अपघात नव्हता—तो प्रचंड मात्रेत परिणाम करणारा सामाजिक आणि मानसशास्त्रीय संकटप्रसंग होता. यामुळेच, अनेकजण विशिष्ट घटनांचा, चेर्नोबिल-पूर्व आणि चेर्नोबिल-उपरांत असा उल्लेख करतात यात काही नवल नाही.

कित्येकांच्या तुलनेत, रुडनिक कुटुंबाने या प्रसंगाला मोठ्या कौतुकास्पद रितीने तोंड दिले आहे. त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास सुरू केला आणि परिणामी, नितीमत्तेच्या नव्या जगाविषयी बायबलमध्ये सापडणाऱ्‍या देवाच्या प्रतिज्ञांवर त्यांचा विश्‍वास बळावला. (यशया ६५:१७-२५; २ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४) नंतर १९९५ साली, विक्टर आणि आना यांनी देवाला आपल्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. पुढे ईलना या त्यांच्या मुलीचाही बाप्तिस्मा झाला.

विक्टर वर्णन करतो: “बायबलचा अभ्यास केल्यामुळे आम्हाला आमच्या निर्माणकर्त्याविषयी, अर्थात यहोवा देवाविषयी आणि पृथ्वीवरील मानवजातीविषयी त्याच्या उद्देशांविषयीही कळून आले. आता आम्ही हताश नाही कारण देवाचे राज्य आल्यावर असे भयंकर अपघात पुन्हा कधीच होणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे. चेर्नोबिलजवळ आमच्या प्रिय घराभोवतालच्या परिसराची विद्रूप स्थिती बदलून त्याचे देखील एक मनोरम परादीस बनेल, त्या दिवसाची आम्ही आतूरतेने वाट बघतोय.”

अँजेला आणि स्वेत्लाना यांना देखील नीतिमत्तेच्या नव्या जगाविषयी देवाच्या प्रतिज्ञांवर भरवसा आहे आणि प्रारणामुळे अनेक व्याधी जडल्या असल्या तरीसुद्धा त्या एक आनंदी मनोभाव बाळगून आहेत. अँजेला म्हणते, “निर्माणकर्ता आणि त्याच्या उद्देशांविषयी ज्ञान मिळाले नसते तर जगणे खरंच कठीण होते. पण, यहोवासोबत एक घनिष्ट नातं जोपासल्यामुळे मला आशावादी राहायला मदत मिळते. बायबलची पूर्णवेळेची प्रचारक होऊन त्याची अखंड सेवा करत राहण्याची माझी मनस्वी इच्छा आहे.” पुढे स्वेत्लाना म्हणाली, “माझे ख्रिस्ती भाऊबहिणी मला खूप साहाय्य करतात.”

बायबलचा अभ्यास केल्याने या लोकांना कळून आले आहे की, “समय व प्रसंग” यांमुळे अपघात घडतात आणि कशाही प्रकारचे लोक असले किंवा ते कोठेही राहात असले तरीसुद्धा त्यांच्यावर यांचा परिणाम होतोच. (उपदेशक ९:११, पं.र.भा.) पण बायबलचा अभ्यास करणाऱ्‍यांना हे देखील शिकायला मिळाले आहे की त्यांच्यावर येणारी संकटे कितीही भयंकर असली तरीसुद्धा यहोवा देवाला सुधारता येत नाही असा कोणताच बिघाड नाही, त्याला बरी करता येत नाही अशी कोणतीच जखम नाही आणि तो ज्याची भरपाई करू शकत नाही असे कोणतेच नुकसान नाही.

तुम्ही देखील देवाच्या प्रतिज्ञांवर आपला विश्‍वास वाढवून एक उज्ज्वल आशा कशाप्रकारे बाळगू शकता? बायबलमधील नीतिसूत्रे या पुस्तकाचा लेखक याचे उत्तर देतो: “परमेश्‍वरावर तुझा भाव असावा, म्हणून मी तुला ती वचने आज कळविली आहेत [ज्ञान दिले आहे].” (नीतिसूत्रे २२:१९) होय, तुम्ही देखील नियमित बायबल अभ्यासाच्या माध्यमाने ज्ञान घेतले पाहिजे. तुमच्या परिसरातील यहोवाचे साक्षीदार असे करण्यात तुम्हाला आनंदाने मदत करतील. तुमच्या सोयीच्या वेळी आणि ठिकाणी मोफत बायबल अभ्यास कार्यक्रमाचा ते तुमच्यासमोर प्रस्ताव ठेवतात.

[२० पानांवरील संक्षिप्त आशय]

“ज्याचे भयंकर दुष्परिणाम नाहीसे करणे जवळजवळ अशक्यच आहे असा भयंकर अनर्थ मनुष्याने आजवर अनुभवला नाहीय.” रशियाचे राष्ट्रपती येल्तसन

[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]

चेर्नोबिल हा निव्वळ एक आण्विक अपघात नव्हता—तो प्रचंड मात्रेत परिणाम करणारा सामाजिक आणि मानसशास्त्रीय संकटप्रसंग होता

[१८ पानांवरील चित्राचे श्रेय]

Tass/Sipa Press

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा