वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ११/८ पृ. २०-२३
  • अपघातांपासून आपल्या मुलांना सांभाळा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अपघातांपासून आपल्या मुलांना सांभाळा
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • घरामध्ये
  • घराबाहेर
  • वाहतुकीच्या रस्त्यावर
  • बालपणापासून मुलांना वळण लावणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • पालक म्हणून तुमची भूमिका
    सावध राहा!—२००५
  • तुमच्या मुलाला बालपणापासून शिक्षण द्या
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • प्रेमाने शिस्त लावण्याचे महत्त्व
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ११/८ पृ. २०-२३

अपघातांपासून आपल्या मुलांना सांभाळा

स्वीडनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

अवघ्या तीन वर्षांची असेल हॅना. तिचे आईबाबा बरगिटा आणि कार्ल-एरिक, नुकत्याच वारलेल्या आपल्या शेजारणीचं घर साफसूफ करत होते. हॅना देखील त्यांच्यासोबत होती. काही वेळानं हॅना एका खोलीतनं औषधाच्या गोळ्यांची एक बाटली घेऊन बाहेर आली. त्यातल्या काही गोळ्या तिनं खाल्ल्याही होत्या. गोळ्या कसल्या आहेत हे नीट पाहिल्यानंतर बरकिटाला धक्काच बसला. नुकत्याच वारलेल्या शेजारणीच्या हृदय रोगावरच्या त्या गोळ्या होत्या.

हॅनाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये धाडण्यात आलं. रात्रभर ती तातडीच्या विभागात होती. हॅनावर खरं तर जीवघेणा आरोग्य धोका ओढवला असता; पण, वास्तवात तसं काहीच घडलं नाही. का? कारण, गोळ्या खाण्याआधीच हॅनानं सिरियल खाल्लं होतं. त्यामुळे गोळ्यामधलं विष काही प्रमाणात शोषलं गेलं आणि हॅनाला ओकारी झाली तेव्हा अन्‍नपदार्थांसोबत ते शरीराबाहेर फेकलं गेलं.

पण, हॅनाची केस ही काही अभावाने आढळणारी केस नाही. जगभरात दररोज हजारो बालके कोणत्या ना कोणत्या अपघातांना बळी पडतात ज्यामुळे तातडीनं त्यांना डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. उदाहरणार्थ, दर वर्षी स्वीडनमध्ये अपघाताला बळी पडलेल्या प्रत्येक आठपैकी एका मुलावर वैद्यकीय उपचार करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला मुलबाळ असल्यास तुमची मुलं देखील अशा काही अपघातांचे बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुलांना सहसा घरातल्या घरात किंवा जवळपासच्या ओळखीच्या परिसरातच दुखापत होते. शिवाय, मुले जसजशी मोठी होत जातात तसतसा दुखापतीचा प्रकारही बदलत जातो. उदाहरणार्थ, बाळाचं डायपर बदलण्यासाठी त्याला नर्सिंग टेबलवर झोपवून दोन मिनिटांसाठी जरी कुठे गेलं तर बाळ सहज टेबलावरून खाली पडू शकतं; किंवा मग, अन्‍न अथवा एखाद्यी वस्तू घशात अडकून बाळाचा श्‍वास बंद होऊ शकतो. थोडी मोठी झाल्यानंतर मुलं कुठेतरी चढण्याच्या प्रयत्नात खाली पडतात, गरम वस्तूला हात लावल्यामुळे भाजले जातात किंवा सापडेल तो पदार्थ तोडांत घातल्यामुळे त्यांना विषबाधा होते; तर शाळेला जाऊ लागलेल्या मुलांना बरेचदा वाहन अपघातांत किंवा बाहेर कुठे खेळत असताना दुखापत होते.

पण, यापैकी बरेच अपघात टाळण्यासारखे आहेत. केवळ पुढचा थोडा विचार केल्याने आणि आपल्या मुलाची वाढ लक्षात घेतल्याने दुखापती किंवा मोठ्यातले मोठे अपघात देखील टाळता येतात. या गोष्टीची सत्यता, १९५४ सालापासून स्वीडनमध्ये राबवलेल्या संघटित बाल-सुरक्षा कार्यक्रमावरून पटते. या संघटनेची स्थापना होण्याआधी, स्वीडनमध्ये दर वर्षी ४५० मुलांचा अपघातांमध्ये जीव जायचा, तर आज ही संख्या ७० वर आली आहे.

घरामध्ये

बाल मनोवैज्ञानिक खेश्‍टिन बॅकस्ट्रोईम यांच्या मते, “धोके कसे टाळावेत हे एकदोन वर्षांच्या मुलाला शिकवणे शक्य नाही. आणि सांगितलेल्या सर्व गोष्टी मुलानं लक्षात ठेवाव्यात अशी अपेक्षाही करू शकत नाही.” तेव्हा, अपघातांपासून मुलांचे संरक्षण करणे ही मुळात पालकांची किंवा मूल जास्त वेळ ज्याच्यासोबत राहते त्या प्रौढ व्यक्‍तीची जबाबदारी आहे.

प्रथम आपल्या घराचे निरीक्षण करा. यासाठी बाजूला दिलेल्या चौकटीतले मुद्दे विचारात घ्या. काही सुरक्षा उपकरणे तुमच्या देशांत उपलब्ध नसतील किंवा उपलब्ध असली तरीही खिशाला परवडणारी नसतील. तरीसुद्धा, थोडीशी कल्पकबुद्धी आणि कल्पनाशक्‍ती वापरल्याने खासकरून तुमच्या घरामध्ये उपयोगी पडतील असे उपाय तुम्हाला सुचतील.

उदाहरणार्थ, तुमच्या किचनच्या ड्रॉवर्सला लूपसारखे हॅन्डल्स असल्यास त्यात एखादी काठी अडकवून तुम्ही ते बंद करू शकता. अव्हनच्या दरवाजालाही असेच करता येण्यासारखे आहे. आणि प्लास्टिकच्या बॅग्समध्ये काही ठेवलेले असल्यास बॅग्सना गाठ मारून ठेवल्याने त्यांच्यापासून फारसा धोका निर्माण होत नाही.

घरातील आणि जवळपासच्या परिसरातील अपघात टाळण्यासाठी अशा इतर साध्यासोप्या पद्धतींचा तुम्ही विचार करू शकता आणि ज्यांना मुलं आहेत अशा तुमच्या मित्रांना, परिचितांनाही तुम्ही या पद्धती सुचवू शकता.

घराबाहेर

मग, तुमची मुलं सहसा जिथं खेळतात त्या परिसराचा विचार करा. चार वर्षांहून मोठ्या मुलांना होणाऱ्‍या दुखापती बहुधा बाहेर खेळत असतानाच होतात. एकतर खाली पडून दुखापत होते किंवा मग सायकलवरून ते पडतात. पण, तीन ते सात वर्षांच्या मुलांना होणारे सगळ्यात सर्वसामान्य अपघात म्हणजे वाहन अपघात किंवा पाण्यात बुडून होणारा अपघात.

तेव्हा, तुमची मुलं खेळतात त्या प्लेग्राऊंडचा विचार करा. तिथली खेळाची साधनं सुस्थितीत आहेत की नाहीत ते पाहा जेणेकरून त्यावर खेळत असताना मुलाला काही दुखापत होणार नाही. झोपाळा, मंकी बार्स यांवर खेळत असताना मूल खाली पडले तरी त्याला जास्त दुखापत होऊ नये म्हणून खेळाच्या या साधनांखालची जमीन, वाळू वगैरे घालून मऊ, भुसभुशीत केलेली आहे का?

घराच्या आसपास पाण्याचे तळे किंवा झरे आहेत का? काही इंच पाणी असले तरीसुद्धा एकदोन वर्षांचे मूल त्यात बुडू शकते. बाल मनोवैज्ञानिक बेकस्ट्रोईम यांच्या म्हणण्यानुसार, “लहान मूल जेव्हा एखाद्या तळ्यात तोंडावर पडते तेव्हा वर काय आहे आणि खाली काय आहे हे त्याला समजत नाही. मग ते स्वतःहून वरती येऊच शकत नाही.”

यास्तव, एक महत्त्वाचा नियम नेहमी पाळा: एक ते तीन वर्षांच्या मुलाला कोणा प्रौढ व्यक्‍तीची देखरेख नसताना एकटे कधीच बाहेर खेळायला पाठवू नका. घराच्या जवळपास विहीर किंवा पाण्याचे तळे असल्यास, मूल मोठ्यांच्या देखरेखीविना एकटे खेळण्याच्या वयात येईपर्यंत थांबा.

वाहतुकीच्या रस्त्यावर

हीच गोष्ट, तुम्ही रहदारीच्या ठिकाणी राहत असल्यास देखील लागू होते. बेकस्ट्रोईम यांच्या मते, “शाळेला जाण्याच्या वयात न आलेलं मूल केवळ सुस्पष्ट आणि निश्‍चित अशा सूचना समजू शकतं; शिवाय, एका वेळी एकाच गोष्टीवर ते लक्ष लावू शकतं. पण, रहदारीच्या रस्त्यावर केव्हा कोणत्या दिशेने एखादे वाहन येईल हे सांगता येत नाही, शिवाय लगेच काय कृती करावी हे गोंधळून गेल्यामुळे मुलांना कळत नाही.” तेव्हा, आपले मूल शाळेला जाण्याच्या वयात येईपर्यंत त्याला एकट्याने रस्ता ओलांडू देऊ नका. तज्ज्ञांचा असा सल्ला आहे, की कमीतकमी १२ वर्षांपर्यंत तरी वर्दळीच्या रस्त्यावरून मुलांना एकट्याने सायकल चालवायला देऊ नये.

सायकल चालवताना, रोलर-स्केटिंग करताना किंवा बर्फावरची घसरगाडी चालवताना आपल्या मुलांना सुरक्षा हेल्मेट घालण्यास सांगा. डोक्याला होणाऱ्‍या दुखापतीवर उपचार करणे सोपे नसते शिवाय या दुखापतीमुळे गंभीर हानी—वेळीस प्राणहानीही होऊ शकते! उदाहरणार्थ, मुलांच्या एका क्लिनिकमध्ये सायकलच्या अपघातात सापडून उपचाराकरता आलेल्या ६० टक्के मुलांच्या डोक्याला आणि तोंडाला मार लागला होता; पण, हेल्मेटचा उपयोग करणाऱ्‍या मुलांच्या डोक्याला कोणतीही गंभीर स्वरूपी हानी पोहंचली नव्हती.

कारमधून प्रवास करताना देखील आपले मूल सुरक्षित आहे की नाही याची खात्री करा. कित्येक देशांनी, खास मुलांसाठी तयार केलेल्या सीट्‌समध्ये मुलांना बक्कल लावून बसवणे कायद्याने बंधनकारक केले आहे. या कायद्यामुळे वाहन अपघातांत मुलांना होणाऱ्‍या दुखापतीत आणि त्यांच्या मृत्यू प्रमाणात लक्षवेधक घट झाल्याचे दिसून आले आहे. तुमच्या देशांत सेफ्टी सीट्‌सची सुविधा उपलब्ध असल्यास या सीट्‌स तुमचे जीवनच असे समजा. पण, सीट्‌स स्वीकृत मॉडेलच्या आहेत याची देखील खात्री करा. तान्ह्या मुलांसाठी आणि तीनएक वर्षांहून मोठ्या मुलांसाठी असलेल्या सीट्‌स वेगळ्या असतात हे लक्षात असू द्या.

मुले ही यहोवाकडील अमूल्य देणच आहे तेव्हा आपण हर परिस्थितीत त्यांची काळजी घेतली पाहिजे. (स्तोत्र १२७:४) जबाबदार पालक या नात्याने कार्ल-एरिक आणि बर्गिटा नेहमीच आपल्या मुलांच्या सुरक्षेसंबंधी दक्षता बाळगायचे. “पण, हॅनावर जो प्रसंग ओढवला त्यानंतर आम्ही जास्तच सावधगिरी बाळगतो,” असे कार्ल-एरिका कबूल करतात. “आमची मुलं मोठी होऊन आता आम्हाला नातवंडं आहेत; त्यामुळे आजही आमची गोळ्याऔषधं आम्ही कपाटात लॉक करून ठेवतो,” असे शेवटी बेरिटा म्हणते.

[२२ पानांवरील चौकट]

घरात बाळगायची सुरक्षा

• गोळ्याऔषधं: मुलांपासून दूर, कपाटात लॉक करून ठेवा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतली जाणारी आणि वनस्पती औषधे देखील दूर ठेवावीत. घरी मुक्कामाला आलेल्या पाहुण्यांनाही आपली औषधे जपून ठेवायला सांगा.

• घरात वापरले जाणारे रासायनिक पदार्थ: मुलांच्या हाती लागणार नाहीत अशा ठिकाणी उदाहरणार्थ, एखाद्या कपाटात लॉक करून ठेवावेत. रासायनिक पदार्थ त्या त्या डब्ब्यांमध्येच ठेवावेत जेणेकरून ते पटकन ओळखता येतील. हे पदार्थ वापरताना देखील नीट लक्ष द्या आणि वापरून झाल्यानंतर नेहमी जागच्या जागी ठेवा; केवळ एक मिनिटासाठी जरी तुम्ही खोलीतनं बाहेर पडणार असलात तरी असे करा. तसेच, डिशवॉशरमधून डिटरजंटचा हरएक अंश काढून टाकण्याची काळजी घ्या.

• स्टोव्ह: स्टोव्हवर पॅन ठेवला असल्यास पॅनचं हॅन्डल कधीच स्टोव्हच्या समोरच्या बाजूला ठेवू नये. आणि उपलब्ध असल्यास त्याला सॉसपॅन गार्ड जोडून घ्या. मूल अव्हनच्या उघड्या दरवाजावर चढल्यास स्टोव्ह एकाबाजूला कलू नये म्हणून स्टोव्हला टिल्ट गार्डची व्यवस्था करून घ्या. खरे तर, अव्हनच्या दरवाजालाच लॉक करण्याची सोय असावी. अव्हनच्या दरवाजाला हात लावल्यामुळे मूल भाजण्याची शक्यता आहे का? असल्यास, त्याला गार्ड किंवा जाळी लावून घ्या जेणेकरून गरम झालेल्या दरवाजाला मूल हात लावू शकणार नाही.

• घरात वापरली जाणारी घातक उपकरणं: चाकू, कात्री आणि अशी इतर घातक उपकरणं कपाटात किंवा ड्रॉवर्समध्ये बंद करून अथवा मुलांचा हात पोहंचणार नाही अशा ठिकाणी ठेवा. अशी उपकरणं वापरत असताना तुम्ही थोड्यावेळासाठी ती बाजूला ठेवता तेव्हा मुलांपासून दूर ठेवा; टेबलच्या किंवा तुम्ही जिथे स्वयंपाक करत आहात त्याच्या कडेला ही उपकरणं ठेवू नका. काडीपेटी किंवा प्लास्टिकच्या बॅग्स देखील लहान मुलांसाठी फार घातक असतात.

• जिना: जिन्याच्या दोन्ही टोकांना कमीतकमी ७० ते ७५ सेंटिमीटर उंच दारं लावून घ्या.

• खिडक्या आणि बाल्कनीचे दरवाजे: मुलांचे संरक्षण करणाऱ्‍या सुरक्षा कडीकोयंडे किंवा उंचावर साखळ्या किंवा अशा इतर काही सुरक्षा व्यवस्था खिडक्यांना आणि बाल्कनीच्या दरवाजांना बसवून घ्या, जेणेकरून मूल खिडक्या किंवा बाल्कनीचे दरवाजे उघडू शकणार नाही किंवा खेळती हवा ठेवण्यासाठी दरवाजा उघडा ठेवला जातो तेव्हा त्यांना सहज बाहेर पडता येणार नाही.

• बुकशेल्फ: मुलं सारखी यावर चढत असली किंवा लटकत असली तर पुस्तकांचे कपाट आणि इतर उंच फर्निचर भिंतीत बसवून घ्या, जेणेकरून मुलं त्यावर चढून खाली पडणार नाहीत.

• प्लग पॉईंट्‌स आणि इलेक्ट्रिकच्या वायर्स: तुमच्या घरातले प्लग पॉईंट्‌स सुरक्षित आहेत का? नसल्यास, तुम्ही वापरत नसलेले प्लग पॉईंट्‌स बंद करून ठेवा. टेबल लॅम्पच्या आणि अशा इतर उपकरणांच्या वायर्स भितींना किंवा फर्निचरला जोडलेल्या असाव्यात जेणेकरून मुले ओढाताण करून अशी उपकरणं अंगावर पाडून घेणार नाहीत. हे शक्य नसल्यास असल्या लॅम्पचा वापरच करू नये. इस्त्री वापरून झाल्यानंतर ती कधीच टेबलावर ठेवू नका; तिची वायर देखील खाली लटकू देऊ नका.

• गरम पाणी: तुमच्या गीझरमध्ये तापमान कमीजास्त करण्याची सोय असल्यास तापमान ५० डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहू द्या म्हणजे अचानक जाऊन नळ उघडल्यास मूलाला भाजणार नाही.

• खेळणी: टोकदार कडा किंवा कोपरे असलेली खेळणी टाकून द्या. लहान खेळणी किंवा लहानलहान तुकडे करता येण्यासारखी खेळणी घरात ठेवू नका. कारण अशी खेळणी तोंडात घातल्यास ती घशात अडकून मुलाचा दम कोंडू शकतो. आणि म्हणूनच मुलांच्या बाहुलीचे डोळे आणि नाक देखील घट्ट बसलेले असावेत. बाळ जमिनीवर खेळत असताना छोटीछोटी खेळणी त्यांच्यापासून दूर ठेवण्यास मोठ्या भावंडांना शिकवा.

• खाद्यपदार्थ: शेंगदाणे, गोळ्या यांसारखे खाद्यपदार्थ मुलांपासून दूर ठेवा. हे पदार्थ मुलांच्या घशात अडकू शकतात.

[चित्राचे श्रेय]

मूळ स्रोत: स्वीडनमधील मुलांचे लोकपाल

[२२ पानांवरील चौकट]

अपघात झाल्यास

• विषबाधा झाल्यास: मुलानं एखादं विषारी द्रव प्यायल्यास प्रथम मुलाचं तोंड स्वच्छ धुऊन घ्या; त्यानंतर त्याला एकदोन ग्लास पाणी किंवा दूध प्यायला द्या. एखाद्या डॉक्टरांशी किंवा विषबाधा माहिती केंद्राशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घ्या. चुरचुरणारं काही मुलाच्या डोळ्यात गेलं असल्यास भरपूर पाण्याने कमीतकमी दहा मिनिटांपर्यंत डोळा लगेच स्वच्छ धुवा.

• भाजल्यास: मुलाला किरकोळ भाजले असल्यास भाजलेल्या ठिकाणी कमीतकमी २० मिनिटं थंड पाणी (पण फार थंड नव्हे) लावा. मुलाच्या तळहातापेक्षा जास्त भाजले असल्यास किंवा तोंडावर; सांध्यांमध्ये किंवा ओटीपोटीवर किंवा जननेद्रियांवर भाजले असल्यास मुलाला ताबडतोब इस्पितळात घेऊन जा. खोलवर झालेल्या त्वचा इजांवर नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावा.

• श्‍वास बंद होणे: मुलाच्या श्‍वासनलिकेत काही अडकून बसले असल्यास वेळ न लावता, ते लगेच काढून टाकणे अतिशय महत्त्वाचे आहे. या समस्येवर तुम्ही स्वतः देखील अंमलात आणू शकता अशी एक परिणामकारक पद्धत म्हणजे हेमरिख मनूव्हर. या पद्धतीविषयी माहीत नसल्यास याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा किवा मग या पद्धतीविषयी शिकवले जाते तो बाल अपघातांवर प्रथमोपचाराचा एखादा कोर्स करा.

[चित्राचे श्रेय]

मूळ स्रोत: स्वीडिश रेड क्रॉस

[२३ पानांवरील चित्र]

सायकल सुरक्षा हेल्मेटचा उपयोग करणे

[२३ पानांवरील चित्र]

कार सीटमध्ये सुरक्षित

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा