वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ११/८ पृ. १८-१९
  • विवाहसोबत्याची निवड कशी करावी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विवाहसोबत्याची निवड कशी करावी
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्वरूपावर जाऊ नका
  • ‘केवळ प्रभूमध्ये लग्न करावे’
  • जमवलेले विवाह
  • तुमच्या विवाहाकरता उत्तम पाया घालणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • विवाह जोडीदार निवडण्यासंबंधी देवाचा सल्ला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • विवाह—प्रेमळ देवाकडून मिळालेली देणगी
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • आजच्या जगातही यशस्वी वैवाहिक जीवन शक्य आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ११/८ पृ. १८-१९

बायबलचा दृष्टिकोन

विवाहसोबत्याची निवड कशी करावी

एका अविवाहित स्त्रीला असे विचारण्यात आले, “तुम्ही लग्नाचा विचार कधी करता का?” ती पटकन उत्तरली, “विचार? चिंता वाटते मला.”

या स्त्रीच्या लहानशा उत्तरावरून काही लोक जिव्हाळा आणि साहचर्य मिळवण्यासाठी केवढे आसुसलेले असतात हे समजते. पुष्कळांना विवाहसोबती शोधणे ही जीवनातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट वाटते. म्हणूनच, वैवाहिक जोडीदार शोधून देणाऱ्‍या विवाह संस्था जिकडे तिकडे सुरू झाल्या आहेत. तथापि, जगाच्या अनेक भागांमध्ये यशस्वी विवाहांपेक्षा अयशस्वी ठरलेल्या विवाहांचे प्रमाण जास्त आहे.

पाश्‍चिमात्त्य देशांमध्ये विवाहेच्छुक तरुण तरूणी आपला जोडीदार स्वतःच निवडतात. तथापि, आशिया आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये विवाह जमवून आणण्याची प्रथा अजूनही रूढ आहे. दोन्हीही बाबतीत, विवाहाचा विषय गंभीर आहे हे विसरता कामा नये. विवाहाचा निर्णय हा जीवनातील अतिशय महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक आहे कारण तुमच्या भवितव्यातील आनंद बऱ्‍याच प्रमाणात यावर अवलंबून असतो. पतिपत्नींचे एकमेकांवर प्रेम असेल, तर त्यांचे जीवन सुखासमाधानाने परिपूर्ण होईल. पण त्यांचे एकमेकांशी कधी पटलेच नाही तर पदोपदी दुःखदायक आणि तापदायक प्रसंग येत राहतील.—नीतिसूत्रे २१:१९; २६:२१.

इतरांप्रमाणेच खऱ्‍या ख्रिश्‍चनांनाही आपले वैवाहिक जीवन आनंदी व समाधानकारक असावे असेच वाटते. पण यासोबतच आपण देवाला संतुष्ट करावे आणि त्याचा सन्मान करावा असेही त्यांना वाटते. (कलस्सैकर ३:२३) देव आपला निर्माणकर्ता आणि विवाहाचा आरंभकर्ता असल्याकारणाने आपल्या खऱ्‍या गरजा काय आहेत आणि आपल्यासाठी काय योग्य आहे याची त्याला पुरेपूर जाण आहे. (उत्पत्ति २:२२-२४; यशया ४८:१७-१९) त्याशिवाय, मानवी अस्तित्वाच्या हजारोहजार वर्षांपासून त्याने कोट्यवधी विवाह पाहिले आहेत—यशस्वी ठरलेले विवाह, अपयशी ठरलेले विवाह. त्यामुळे, कोणत्या गोष्टी सुखी वैवाहिक जीवनाला हातभार लावतात आणि कोणत्या गोष्टी त्यात अडथळे आणतात याची त्याला जाणीव आहे. (स्तोत्र ३२:८) आपले वचन, बायबल यात त्याने काही खास तत्त्वे स्पष्टपणे मांडली आहेत; त्यांच्या साहाय्याने कोणाही ख्रिश्‍चनाला साधकबाधक विचार करून निवड करता येऊ शकते. यांतील काही तत्त्वे कोणती आहेत?

स्वरूपावर जाऊ नका

जेथे स्वतःचा विवाहसोबती स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य असते, तेथे दोन विवाहेच्छुक व्यक्‍तींची कुठेतरी अनपेक्षित भेट होते किंवा मित्रांकरवी अथवा कुटुंबियांकरवी ओळख करून दिली जाते. अशा प्रसंगांमध्ये सहसा शारीरिक आकर्षणामुळे समोरच्या व्यक्‍तीबद्दल प्रणय भावना वाटू लागते. अर्थात अशी ही भावना स्वाभाविक आणि तीव्र असते; परंतु विवाहाचा विचार करताना केवळ स्वरूपावर भुलू नये असे उत्तेजन बायबल आपल्याला देते.

“सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्‍वराचे भय बाळगणाऱ्‍या स्त्रीची प्रशंसा होते,” असे नीतिसूत्रे ३१:३० येथे म्हटले आहे. प्रेषित पेत्र ‘देवाच्या दृष्टीने बहुमूल्य असलेल्या सौम्य व शांत आत्म्याविषयी’ बोलला होता. (१ पेत्र ३:४) होय, भावी जोडीदाराचे आध्यात्मिक गुण—देवाला ती व्यक्‍ती किती समर्पित आहे, देवाबद्दल त्याला किंवा तिला किती प्रेम आहे त्याचप्रमाणे त्याचे किंवा तिचे ख्रिस्ती व्यक्‍तिमत्त्व—या गोष्टी शारीरिक सौंदर्यापेक्षा फार फार महत्त्वाच्या आहेत. तेव्हा, घाईगडबड न करता आणि केवळ भावनांच्या आहारी न जाता आपल्यासारखी आध्यात्मिक ध्येये असलेली, त्याचप्रमाणे देवाच्या आत्म्याची फळे स्वतःच्या जीवनात दाखवण्याचा प्रयत्न करणारी व्यक्‍ती निवडणे महत्त्वाचे आहे. कारण या गोष्टी सुखी वैवाहिक जीवनाला अतिशय मोलाच्या ठरतील.—नीतिसूत्रे १९:२; गलतीकर ५:२२, २३.

‘केवळ प्रभूमध्ये लग्न करावे’

आपण विवाह करू इच्छितो त्या व्यक्‍तीची ध्येये आणि विश्‍वास आपल्यासारखेच असावेत हे फार महत्त्वाचे आहे. विवाह एक आव्हान आहे; त्यासाठी दोघांनाही आपल्या वर्तनात आणि मनोवृत्तीत कितीतरी वेळा तडजोडी कराव्या लागतात. तेव्हा, तुमच्या भावी विवाहसोबत्याचे आचारविचार आधीपासूनच तुमच्यासारखे असतील तर साहजिकच या तडजोडी करणे तितकेच सोपे जाईल.

म्हणूनच प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना “विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका” असे आवर्जून सांगितले. (२ करिंथकर ६:१४) दोघांचा सारखा विश्‍वास नसला किंवा बायबल तत्त्वांबद्दल सारखी समज नसली तर बेबनाव आणि मतभेद निर्माण होऊ शकतात हे पौलाला ठाऊक होते. तर मग, ‘केवळ प्रभूमध्ये लग्न करावे’ हा सल्ला योग्यच आहे. (१ करिंथकर ७:३९) हा देवाचा दृष्टिकोन आहे. या सल्ल्याचे सुज्ञपणे पालन करणारे, अनेक गंभीर अडचणी आणि समस्या टाळू शकतात.—नीतिसूत्रे २:१, ९.

जमवलेले विवाह

ज्या प्रदेशांमध्ये विवाह जमवून आणण्याची अजूनही प्रथा आहे अशा ठिकाणांविषयी काय? उदाहरणार्थ, दक्षिण भारतात, काहींच्या अंदाजानुसार ८० टक्के विवाह पालकांद्वारे जमवलेले असतात. ख्रिस्ती पालक ही परंपरा पाळतात की नाही हा ज्याचा त्याचा व्यक्‍तिगत निर्णय आहे. तथापि, जमवून आणलेले विवाह देखील आध्यात्मिक नीतिमूल्यांवर आधारलेले असतील तरच यशस्वी ठरतील.

जमवलेल्या विवाहांचे समर्थन करणाऱ्‍यांचे असे म्हणणे आहे की, अशा विवाहांमध्ये अनुभवी आणि प्रौढ लोक निर्णय घेतात. आफ्रिकेतल्या एका ख्रिस्ती वडिलांचे असे म्हणणे आहे की, “काही पालकांच्या मते मुलांचे वय आणि अनुभव लक्षात घेता भावी जोडीदाराची आध्यात्मिक प्रौढता ओळखण्याची क्षमता या मुलांमध्ये नसते.” “तरुण लोकांना जीवनात फार कमी अनुभव असतो आणि म्हणून कोणताही निर्णय ते भावनांच्या आहारी जाऊन घेऊ शकतात,” असे भारतातील एका प्रवासी पर्यवेक्षकाचे मत आहे. आपल्या मुलांच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी पालकांना जास्त ठाऊक असल्यामुळे आपल्या मुलांसाठी ते योग्य निर्णय घेण्याच्या स्थितीत असतात असे त्यांना वाटते. अर्थात, या बाबतीत मुलाचा आणि मुलीचा विचारही जाणून घ्यावा.

तथापि, पालकांनी बायबलमधील तत्त्वांकडे दुर्लक्ष केले आणि विवाहामध्ये नंतर अडचणी निर्माण झाल्या तर त्यांना पस्तावावे लागेल. कारण अशा विवाहांमध्ये, भावी विवाहसोबत्यांना एकमेकांशी चांगला परिचय करून घ्यायला सहसा संधी मिळत नाही, त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. आणि समस्या निर्माण होतात तेव्हा “बहुतेकवेळा सगळा दोष पालकांवरच ढकलला जातो” असे भारतातील एका ख्रिस्ती वडिलांचे म्हणणे आहे.

विवाह जमवून आणणाऱ्‍या ख्रिस्ती पालकांनी विवाह करून देण्यामागचा हेतू काय आहे याचाही विचार केला पाहिजे. विवाहसोबत्याची निवड करताना भौतिक गोष्टी किंवा प्रतिष्ठा मिळवणे यांवर जोर दिला जातो तेव्हा समस्या उद्‌भवतात. (१ तीमथ्य ६:९) यास्तव, विवाह जमवून आणणाऱ्‍यांनी स्वतःला असा प्रश्‍न करावा: ‘दोघेही आनंदी राहतील आणि आध्यात्मिकरित्या त्यांची प्रगती होईल हा उद्देश मनात बाळगून ही निवड केली जात आहे की कुटुंबाची प्रतिष्ठा, संपत्ती वाढावी किंवा धनलाभ व्हावा हा मुख्य उद्देश आहे?’—नीतिसूत्रे २०:२१.

बायबलचा सल्ला स्पष्ट आणि फायद्याचा आहे. विवाहसोबत्याचा विचार करत असताना, निवड कशीही केली जात असो पण भावी विवाहसोबत्यामधील चांगले गुण आणि त्याची किंवा तिची आध्यात्मिकता या गोष्टींना जास्त महत्त्व दिले जावे. असे केले जाते तेव्हा यहोवा देव, विवाह व्यवस्थेचा आरंभकर्ता याला सन्मान दिला जातो आणि विवाह करणाऱ्‍या व्यक्‍ती आपले वैवाहिक जीवन भरभक्कम आध्यात्मिक आधारावर सुरू करू शकतात. (मत्तय ७:२४, २५) सुखी आणि आनंदी विवाहाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा