वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ११/८ पृ. १५-१७
  • कोणाशी मैत्री करणं मला इतकं कठीण का जातं?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कोणाशी मैत्री करणं मला इतकं कठीण का जातं?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बुजरेपणा
  • बुजरेपणा एक सर्वसामान्य समस्या
  • एक दुष्ट चक्र
  • इतर कारणे
  • माझा स्वभाव इतका बुजरा का आहे?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • मला मनमिळाऊ होता येईल का?
    सावध राहा!—१९९९
  • तुम्ही लाजऱ्‍या स्वभावाचे आहात का?
    आमची राज्य सेवा—२०००
  • “यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ११/८ पृ. १५-१७

तरुण लोक विचारतात . . .

कोणाशी मैत्री करणं मला इतकं कठीण का जातं?

“कुणाशी जाऊन बोलायचं म्हटलं की सगळं अवसानच निघून जातं. छातीत धडधडायला लागतं. मी अतिशयोक्‍ती करत नाहीय.”—रिचर्ड.a

“मी वयात येऊ लागले तसतसा माझा स्वभाव अधिकच बुजरा होऊ लागला; हीच माझी सगळ्यात मोठी समस्या होती. मी जणू स्वतःला माझ्या छोट्याशा जगात कोंडून घतलं होतं.”—१८ वर्षांची एलिझाबेथ.

‘माझा असा विचित्र स्वभाव का आहे? मला कुणाशी मैत्री करणं इतकं इतकी कठीण का जातं?’ असे प्रश्‍न कधी तुम्हाला पडतात का? वर उल्लेख केलेल्या रिचर्डप्रमाणे, नवीन व्यक्‍ती भेटल्यावर कदाचित तुमच्याही छातीत धडधडत असेल किंवा तुम्ही अस्वस्थ होत असाल; वरिष्ठ लोकांच्या सहवासात तुम्हाला मनमोकळे वागणे कठीण जात असेल; किंवा मग इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात या एकाच गोष्टीची तुम्ही इतकी चिंता करत बसता की आपल्या मनातले बोलण्याची संधी तुम्हाला दिली जाते तेव्हा शब्दच फुटत नाहीत. ट्रेसी नावाची एक तरुणी म्हणते: “एखाद्या अनोळखी व्यक्‍तीशी स्वतःहून जाऊन बोलणं माझ्याकडून कधीच होणार नाही.”

पण, कशामुळे तुम्हाला असे वाटते? यावर मात करण्यासाठी, तुमची नेमकी समस्या काय आहे ते आधी समजून घ्या. (नीतिसूत्रे १:५, NW) एक स्त्री म्हणते: “चार लोकांत मला इतकं अवघडल्यासारखं का वाटायचं हे पूर्वी कधीच मला उमजलं नाही. पण, माझी नेमकी समस्या काय आहे हे आता समजल्यामुळे मी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करू शकते.” काही युवक इतके अंतर्मुख का असतात याची काही कारणे आपण पाहू या.

बुजरेपणा

बुजरेपणा. अंतर्मुख असण्याचे हे एक सर्वसामान्य कारण म्हणता येईल. एखाद्या हसऱ्‍या, बोलक्या व्यक्‍तीची बऱ्‍याच लोकांशी मैत्री असते पण त्याच्या अगदी उलट एखादा बुजरा, लाजाळू असल्यामुळे तो बिचारा एकलकोंडा होतो. उदाहरणार्थ, १८ वर्षांची एलिझाबेथ म्हणते: “मी वयात येऊ लागले तसतसा माझा स्वभाव अधिकच बुजरा होऊ लागला; हीच माझी सगळ्यात मोठी समस्या होती. मी जणू स्वतःला माझ्याच छोट्याशा जगात कोंडून घेतलं होतं.” डेयन नावाच्या तरुणीलाही तिच्या बुजऱ्‍या स्वभावामुळे हायस्कूलच्या पहिल्या वर्षांत खूप त्रास झाला. ती म्हणते: “सतत लोकांच्या नजरेसमोर राहण्याची, प्रसिद्ध होण्याची मला मुळीच हाव नव्हती. शाळेत असताना, आपल्याला प्रसिद्धी किती महत्त्वाची वाटते हे शून्य ते पाच या संख्येत दाखवण्यास एका शिक्षकानं आम्हाला सांगितलं होतं. शून्यचा अर्थ प्रसिद्धी मुळीच महत्त्वाची वाटत नाही आणि पाचचा अर्थ खूप महत्त्वाची वाटते. शाळेत प्रसिद्ध असलेल्या सर्व मुलींनी स्वतःला पाच गुण दिले. मी मात्र स्वतःला शून्य गुण दिले. प्रसिद्धीची तर मला सगळ्यात जास्त भीती होती; त्यामुळेच तर माझा स्वभाव इतका बुजरा होता. लोकांनी आपल्याला पसंत केलं नाही तर! या भीतीपोटी तुम्ही लोकांसमोर येऊ इच्छित नाही किंवा लोकांचे लक्ष वेधून घेऊ इच्छित नाही.”

अर्थात, बुजरेपणा सर्वस्वी वाईट नाही. कारण, बुजरेपणा आणि नम्रता—आपल्या कमतरतांची जाणीव राखणे—यांचा एकमेकांशी फार जवळचा असा संबंध आहे. खरे तर, बायबल आपल्याला अशी आज्ञा देते की आपण, ‘आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालावे.’ (मीखा ६:८) नेहमी स्वतःलाच वरचढ समजणाऱ्‍या, आपलेच म्हणणे खरे करणाऱ्‍या किंवा अतिशय आग्रही वृत्तीच्या व्यक्‍तीपेक्षा नम्र किंवा थोड्याफार बुजऱ्‍या स्वभावाच्या व्यक्‍तीशी सहवास करणे आपल्याला सोपे जाते. शिवाय, “बोलण्याचा समय” असतो हे जितके खरे तितकेच “मौन धरण्याचाही समय” असतो हेही तितकेच खरे. (उपदेशक ३:७) बुजऱ्‍या स्वभावाच्या लोकांना शांत राहणे फारसे कठीण जात नाही. असे लोक सहसा ‘ऐकण्यात तत्पर आणि बोलण्यात धीमे’ असल्यामुळे ते आपले ऐकून घेतील या खात्रीने लोक त्यांच्याशी बोलतात.—याकोब १:१९.

पण, पुष्कळदा असे होते, की एखादा युवक किंवा युवती इतकी शांत, बुजरी किंवा लाजाळू असते की त्याला किंवा तिला लोकांशी मैत्री करणे फार कठीण जाते. आणि बुजरेपणाचा अतिरेक झाल्यास एका लेखकाने लिहिले त्याप्रमाणे “स्वतःला कोंडून ठेवण्याची ही वृत्ती पुढे एक मनोविकार बनते.”—नीतिसूत्रे १८:१.

बुजरेपणा एक सर्वसामान्य समस्या

तुमचा स्वभाव अतिशय बुजरा असल्यास प्रथम हे लक्षात घ्या, की ही केवळ तुमच्या एकट्याची समस्या नाही. हायस्कूलच्या आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या एका अभ्यासातून असे दिसून आले की, “८२ टक्के विद्यार्थ्यांना जीवनात कधी ना कधी बुजरेपणाने ग्रासले होते.” (ईस्टवूड ॲटवॉटर यांचे पौगंडावस्था [इंग्रजी] हे पुस्तक) इतकेच काय, बायबल काळातल्या काही लोकांना देखील बुजरेपणाची समस्या होती. उदाहरणार्थ, मोशे, तीमथ्य यांसारख्या मानलेल्या पुरुषांची कदाचित हीच समस्या असावी.—निर्गम ३:११, १३; ४:१, १०, १३; १ तीमथ्य ४:१२; २ तीमथ्य १:६-८.

या ठिकाणी आपण शौलाचे उदाहरण घेऊ या. शौल हा प्राचीन इस्राएल राष्ट्राचा पहिला राजा होता. तो स्वभावतःच एक शूर पुरुष होता. एके प्रसंगी त्याच्या वडिलांची जनावरे चुकली तेव्हा जनावरांना शोधून काढण्यासाठी एक शोध मोहीम राबवण्याचे मोठे धाडस शौलाने केले. (१ शमुवेल ९:३, ४) पण, नंतर इस्राएल राष्ट्राचा राजा म्हणून त्याला नेमण्यात आले तेव्हा मात्र एकाएकी बुजरेपणाने त्याला पछाडले. आपला जयजयकार करणाऱ्‍या जमावापुढे येण्याऐवजी शौल अक्षरशः सामानासुमानात लपून बसला!—१ शमुवेल १०:२०-२४.

शौलाची ही भेदरट, संकोची वृत्ती तुम्हाला कदाचित बुचकळ्यात पाडेल. कारण बायबलमध्ये त्याचे वर्णन, एक उंचापुरा, उमदा तरुण असे करण्यात आले आहे. होय, “तो एवढा उंच होता की सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागत.” (१ शमुवेल ९:२) शिवाय, यहोवा त्याच्या राजवटीवर आशीर्वादांचा वर्षाव करील असे आश्‍वासन देखील देवाच्या संदेष्ट्याने शौलाला दिले होते. (१ शमुवेल ९:१७, २०) इतके असूनही शौलाला स्वतःविषयी आत्मविश्‍वास नव्हता. तो इस्राएलचा राजा होणार असे त्याला सांगण्यात आले तेव्हा विनम्रपणे तो म्हणाला: “इस्राएल वंशातले सर्वांहून कनिष्ठ जे बन्यामिनी त्यातला मी ना? आणि बन्यामिनाच्या वंशातील सगळ्या कुळात माझे घराणे कनिष्ठ ना? तर मग तुम्ही मजशी असले भाषण का करिता?”—१ शमुवेल ९:२१.

शौलासारखा मनुष्य जर आपला आत्मविश्‍वास गमावू शकतो तर काही वेळा तुम्हालाही तसे वाटल्यास त्यात नवल असे काहीच नाही. तुम्ही तरुण आहात आणि जीवनातील अशा एका वळणावर येऊन पोहंचला आहात जेव्हा तुमच्या शरीरात झपाट्याने बदल होत आहेत. प्रौढांच्या जगात कसे वावरायचे याचे धडे तुम्ही नुकतेच घ्यायला लागलेले आहात. तेव्हा, काही वेळा थोडेफार अवघडल्यासारखे किंवा असुरक्षित वाटणे साहजिक आहे. पालक (इंग्रजी) या आपल्या नियतकालिकात लिहिताना डॉ. डेव्हिड एलकाईंन्ड म्हणतात: “मुलंमुली पौगंडावस्थेत पदार्पण करतात तेव्हा सुरवाती-सुरवातीला ती फार बुजरी असतात; कारण या काळात ती आपल्या सभोवती एक काल्पनिक प्रेक्षकगण निर्माण करतात; त्यांच्या मते, लोकांचे सतत त्यांच्यावरच लक्ष असते आणि त्यामुळे मग ही मुलंमुली आपल्या स्वरूपाची, आपल्या प्रत्येक हालचालीची नको तितकी काळजी करू लागतात.”

शिवाय, तरुणांमध्ये केवळ सुंदर दिसणाऱ्‍यांनाच जास्त पसंत केले जात असल्यामुळे तरुण लोक आपल्या स्वरूपाची अवास्तव चिंता करू लागतात. (पडताळा १ शमुवेल १६:७) पण, स्वरूपाविषयीची अवास्तव काळजी हानिकारक असू शकते. उदाहरणार्थ, फ्रान्समधील लिलिया नावाची तरुणी आपला अनुभव सांगते: “इतर कोणत्याही तरुणीसारखी माझीही तिच समस्या होती. माझ्या चेहऱ्‍यावर—पुटकुळ्या होत्या! अशा वेळी इतरांशी स्वतः जाऊन बोलण्याची हिम्मत होत नाही, कारण तुम्ही कसे दिसता याचीच तुम्हाला सगळ्यात जास्त चिंता लागलेली असते.”

एक दुष्ट चक्र

बुजऱ्‍या स्वभावाच्या युवकांविषयी लोकांना सहसा गैरसमज होतो आणि यामुळे ते सहजासहजी एकाकीपणाच्या दुष्टचक्रात अडकतात. पौगंडावस्था या पुस्तकात लेखक म्हणतो: “बुजऱ्‍या स्वभावाच्या युवकांबद्दल लोक नकारार्थी विचार करतात; साहजिकच अशा युवकांना मैत्री करणं आणखीनच कठीण जातं. बुजऱ्‍या स्वभावाचे लोक सहसा माणूसघाणे, बोअर करणारे, कुठल्याही गोष्टीत रस न घेणारे, शिष्ट, थंड स्वभावाचे आणि अंतर देणारे असतात असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते. आणि त्यांच्याशी मग तसाच व्यवहार केला जातो, ज्यामुळे त्यांना अधिकच एकलकोंडे, एकाकी आणि उदास वाटण्याची शक्यता आहे.” परिणामस्वरूप, ते आणखीनच बुजरे होत जातात आणि मग ते फार शिष्ट आहेत, घमंडी आहेत असे त्यांच्याविषयी झालेले गैरसमज अधिकच बळावतात.

अर्थात ख्रिस्ती या नात्याने तुम्ही ‘जगाला तमाशा’ असल्यामुळे तुम्ही लोकांवर कोणती छाप पाडता याचा विचार करणे फार जरूरीचे आहे. (१ करिंथकर ४:९) इतरांशी बोलताना तुम्ही त्यांच्या डोळ्यांत पाहून बोलायचे टाळता का? तुमच्या शरीराच्या हालचाली किंवा तुमच्या अविर्भावावरून आपल्याला कोणाशी बोलायला किंवा मैत्री करायला आवडत नाही असे इतरांना सुचवता का? तसे असल्यास, इतर जण तुमच्याबद्दल चुकीचे मत बनवतील आणि तुम्हाला टाळतील याची जाणीव राखा. यामुळे लोकांशी मैत्री करणे तुम्हाला आणखीनच कठीण जाईल.

इतर कारणे

अपयशाची भीती ही आणखीन एक सर्वसामान्य अशी समस्या आहे. तुम्ही नेहमीपेक्षा वेगळे, किंवा ज्याचा तुम्हाला अनुभव नाही असे एखादे काम हाती घेता, तेव्हा थोडीफार असुरक्षितता किंवा भीती वाटणे साहजिकच आहे. पण, या बाबतीत काही युवक अतिरेक करतात. उदाहरणार्थ, गेअल नावाच्या एका तरुणीला लोकांची इतकी भीती वाटायची की तो तिचा एक विकारच बनला. ती म्हणते: “मी वर्गात कधीच उत्तरं देत नसे. त्यामुळे ‘ही, वर्गात कधीच हात वर करत नाही, ती कुणाशीही बोलत नाही,’ असली बोलणी आईबाबांना खावी लागत. पण, मला काही केल्या ते जमायचंच नाही; मला अतिशय अवघडल्यासारखं वाटायचं आणि मी तणावग्रस्त व्हायचे. आणि खरं सांगू, अजूनही मला तसंच वाटतं.” होय, अपयशी होण्याची भीती एखाद्याला गलितगात्र करू शकते. “मी चुकतो की काय, याचीच मला सतत भीती असते. मी काय करत आहे याची मला स्वतःला खात्री नसते,” असे पीटर नावाचा एक युवक म्हणतो. त्यातच, तुमचे मित्र निर्दयपणे तुम्हाला हिणवतात तुमची टिंगल करतात तेव्हा तुम्ही आणखीनच धास्तावता आणि यामुळे तुमचा आत्मविश्‍वास कायमचा खचू शकतो.

लोकांशी कसे बोलावे, कसे वागावे हे माहीत नसणे ही देखील एक सर्वसामान्य समस्या असू शकते. एखाद्या नवीन व्यक्‍तीला स्वतःची ओळख करून देण्यास तुम्ही कचरत असाल कारण त्याच्याशी काय बोलावे हेच तुम्हाला कळत नाही. पण, काही वेळा प्रौढांना देखील चारचौघांत असेच अवघडल्यासारखे वाटते हे जाणून तुम्हाला कदाचित आश्‍चर्य वाटेल. फ्रेड नावाचा एक बिझनेसमॅन म्हणतो: “व्यापारी जगात मला जे सगळ्यात चांगलं जमतं तितकंच मला करता येतं. उदाहरणार्थ, एकदा का उद्योगधंद्याविषयी बोलायला सुरवात केली की लोकांवर आपली चांगली छाप पडेल किंवा नाही याची मला काळजी नसते, मला पूर्ण आत्मविश्‍वास असतो. पण, याच लोकांसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा करताना मात्र मी भीतभीत बोलतो. अशावेळी मग, फार बोअर करणारा, पुस्तकातली भाषा करणारा किंवा जरा जास्तच कायद्याच्या गप्पा करणारा, कशातच रस नसलेला या मालिकेत लोक मला बसवतील अशी मला भीती वाटते.”

तुम्ही बुजऱ्‍या स्वभावाचे असाल, भांबावलेले असाल किंवा चार लोकांत तुम्हाला अवघडल्यासारखे वाटत असेल; समस्या कोणतीही असो, तुम्ही लोकांशी मैत्री करण्याचे शिकून घेतले तर यात तुमचा फायदाच आहे. बायबल देखील सर्व ख्रिश्‍चनांना हाच सल्ला देते की त्यांनी ‘आपली मने मोठी करावीत’ आणि लोकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्याशी मैत्री करावी! (२ करिंथकर ६:१३) तुम्हाला हे कसे करता येईल? याचा खुलासा नंतरच्या एका लेखात केला जाईल.

[तळटीपा]

a काही नावे बदललेली आहेत.

[१६ पानांवरील चित्र]

बुजऱ्‍या स्वभावाच्या लोकांना सहसा माणूसघाणे म्हटले जाते

[१६ पानांवरील चित्र]

अपयशी होण्याच्या भीतीमुळे काहीजण चारचौघांपासून दूर राहण्याचे पसंत करतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा