दुष्काळ पडतो तेव्हा
ब्राझीलमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
मागच्या वर्षी ब्राझीलमध्ये पडलेल्या दारुण दुष्काळामुळे ईशान्येकडील बऱ्याचशा भागाला जबरदस्त तडाखा बसला. वेजा नियतकालिकानुसार, या भागातले नॉर्डेस्टीनूस म्हटले जाणारे लाखो रहिवासी “दुष्काळापुढे हतबल झाले.” दुष्काळामुळे भात, बीन्स आणि मक्याच्या पिकाची नासाडी झाल्यामुळे जो भयंकर दुष्काळ पडला तसा गेल्या १५ वर्षांत कधीही पडला नव्हता. काही ठिकाणी तर पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई होती.
पण, ब्राझीलच्या लोकांसाठी ही काही नवीन गोष्ट नाही. सन १८७७ मध्ये या देशात पडलेल्या सगळ्यात भयंकर दुष्काळात लोकांची अन्नान्न दशा होऊन सुमारे ५,००,००० मृत्यूमुखी पडले. त्यावेळी ब्राझीलचा सम्राट डोन पेद्रू दुसरा यांनी अशी शपथ वाहिली, की दुष्काळाच्या या समस्येवर ते एक ना एक उपाय जरूर शोधून काढतील; मग यासाठी आपल्या राजमुकुटातला हिरा न् हिरा विकावा लागला तरी चालेल! या गोष्टीला आज १०० वर्षे उलटून गेली आहेत; पण, समस्या आहे तशीच आहे. गेल्या वर्षी दुष्काळ पडला तेव्हा, ब्राझीलच्या ईशान्य भागातील १,२०९ शहरांत राहणाऱ्या एक कोटी लोकांना याचा फटका बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
साक्षीदारांची प्रेमळ मदत
पण, दुष्काळाची बातमी कानांवर पडताच, ब्राझीलमधील वॉच टावर संस्थेचे शाखा दफ्तर मदतीच्या तयारीला लागले. समस्या किती गंभीर आहे याचा आढावा घेण्यासाठी ज्या भागांना दुष्काळाचा सगळ्यात जास्त तडाखा बसला होता तिथे म्हणजे बाहिया, सिएरा, पारायबा, पेरनामबूको आणि पियाई या ठिकाणी प्रवासी प्रतिनिधींची रवानगी करण्यात आली. प्रवासी पर्यवेक्षकांच्या लक्षात आले, की या भागांत राहणारे ९०० साक्षीदार आणि बायबल विद्यार्थी भयंकर हलाखीच्या परिस्थितीत होते. यांच्यापैकी काहीजण केवळ कंदमुळं खाऊन दिवस काढत होते तर इतर काहीजण भात खाऊन पोटाची खळगी भरत होते. एक कुटुंब तर चक्क तिन्ही वेळा फक्त दुधावर जगत होते; तर कॅन्सर झालेल्या एका ख्रिस्ती बहिणीला आपला पलंग विकावा लागला, तेव्हा कुठे तिला थोडेफार अन्न विकत घेता आले. सहा सदस्यांच्या एका कुटुंबाजवळचे उरलेसुरले अन्नही संपले आणि अगदी त्याचवेळेस मदत करणारे ख्रिस्ती बांधव तिथे पोहंचले.
अन्न आणि इतर सामग्रींचे वितरण करण्यासाठी ताबडतोब साह्य समित्या नेमण्यात आल्या. गरजवंतांची मदत करण्यासाठी रेसीफे आणि जवळपासच्या इतर शहरांत राहणाऱ्या साक्षीदारांनी मोठे औदार्य दाखवले. पण, अधिक मदतीची गरज भासली तेव्हा रीओ दी जेनिरोमधील ख्रिस्ती देखील आपल्या बांधवांची मदत करण्यासाठी पुढे आले. काही वेळातच, साक्षीदारांनी ३४ टन अन्नदान केले, शिवाय रेसीफेपासून २,३०० मीटर अंतरावर ही अन्नसामग्री पाठवण्याचा खर्चही उचलला.
पियाई आणि पारायबाच्या राजधानी शहरांत काही वेळातच चक्क सहा टन अन्नसामग्री गोळा करण्यात आली. दान केलेली अन्नसामग्री ठेवण्यासाठी काही दिवस फोर्टलेझा शहरातल्या राज्य सभागृहाचा कोठार म्हणून उपयोग करण्यात आला. पण, येथून इतर ठिकाणी अन्नसामग्री कशी पाठवावी या पेचात साक्षीदार पडले असता साक्षीदार नसलेल्या एक मनुष्याने त्यांना आपला ट्रक दिला. पण, अन्नसामग्री वाहून नेताना लोकांना मध्येच लुटले जायचे. मग, दान केलेली सामग्री हवी तिथे व्यवस्थित पोहंचणार होती का? साक्षीदारांनी आपले काम पूर्ण करण्याचा पक्का निर्धार केला होता. यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून अन्नसामग्रीने भरलेला ट्रक त्यांनी त्या क्षेत्रात नेला. अन्नसामग्री व्यवस्थित पोहंचली आणि सगळ्यांनी मोठ्या कृतज्ञतेने तिचा स्वीकार केला.
मदत देण्यात नि घेण्यातील आनंद
मदतकार्याचे आयोजन करणाऱ्या साक्षीदारांना आपल्या बांधवांना मदत करण्याची संधी मिळाल्याबद्दल फार आनंद झाला. साँऊ पाउलूमध्ये राहणाऱ्या एका वडिलांनी म्हटले: “गेल्या वेळेस दुष्काळ पडला तेव्हा अन्नदान करण्यास आम्हाला संधीच देण्यात आली नाही. यावेळी मात्र आम्हालाही ही संधी देण्यात आली याबद्दल आम्ही किती आभारी आहोत!” फोर्टालेझामधील साक्षीदारांनी लिहिले: “आम्हाला आमच्या बांधवांना मदत करता आली यामुळे आणि खासकरून यहोवाचं मन आम्ही आनंदित केलं याचा आम्हाला फार आनंद होतो. याकोब २:१५, १६ मधील शब्द आम्ही कधीच विसरू शकत नाही.” बायबलच्या या वचनांत म्हटले आहे की, “भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे, आणि तुम्हांमधील कोणी त्यांना म्हणतो, सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा; पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ?”
काही वेळेस अन्नसामग्री दान करणारे साक्षीदार अन्नाच्या पुडक्यासोबत दोनचार उत्तेजनपर शब्दही लिहून पाठवत असत. एकाने लिहिले होते: “देवाच्या नवीन जगात खाण्या-पिण्याची काहीच कमी नसेल हे स्तोत्र ७२:१६ मध्ये लिहिलेले अभिवचन नेहमी लक्षात असू द्या.” बांधवांनी दाखवलेल्या या कृपेबद्दल दुष्काळग्रस्त साक्षीदारांना किती कृतज्ञ वाटले हे वेगळे सांगायला नको. उदाहरणार्थ, एका अत्यंत गरजू कुटुंबानं मोठ्या कृतज्ञतेने लिहिले: “ही मदत म्हणजे आपला दयावंत परमेश्वर आणि पिता यहोवा याच्या प्रेमाचा आणि आपल्याबद्दल अर्थात आपल्या सदस्यांबद्दल त्याची संघटना दाखवत असलेल्या प्रेमळ कळकळीचा प्रत्यक्ष साक्षात्कारच आहे. यामुळे आम्हाला यहोवाच्या आणि त्याच्या लोकांच्या अधिक जवळ असल्यासारखं वाटतं.”
एक तरणोपाय
तसे पाहायला गेले तर ब्राझीलच्या ईशान्येकडे पाण्याचा मुळीच तुटवडा नाही; तिथल्या जमिनीखाली गोड्या पाण्याचा समुद्र आहे. तसेच, तिथल्या जलाशयांमध्येही भरपूर पाणी आहे. तेव्हा, सर्वांनाच हे पाणी मिळाले असते तर तिथली जमीन लागवडीखाली आली असती.
पण, सम्राट डोन पेद्रू दुसरे यांना पछाडणारा हा प्रश्न एक दिवस कायमचा सोडवला जाईल. तो दिवस म्हणजे दुष्काळासोबतच मानवजातीच्या इतर सर्व समस्यांचा अंत करण्यासाठी देवाचे राज्य येशू ख्रिस्तामार्फत येईल तेव्हा हे घडेल. मग कोरडी भूमी यशयाच्या पुढील अभिवचनाची पूर्णता पाहील: “रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल; तृषित भूमीचे ठिकाणी उपळते झरे होतील.”—यशया ३५:१, २, ६, ७.
[२३ पानांवरील चौकट/चित्रं]
‘सर्वांचे बरे करा’
प्रेषित पौलाने सहविश्वासूंना असा सल्ला दिला होता: “तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” अलीकडे ब्राझीलमध्ये पडलेल्या दुष्काळामुळे तिथे असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांना वरील सल्ला कार्यात उतरवण्याची संधी मिळाली. त्यांनी केवळ सहविश्वासूंचीच नव्हे तर इतरांचीही प्रेमाने काळजी घेतली. परिणामस्वरूप, ज्या लोकांना यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य पटत नव्हते ते आता साक्षीदारांबद्दल असलेल्या आपल्या मतांचा पुन्हा विचार करू लागले.
उदाहरणार्थ, सुरवातीला एका स्त्रीने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिचा पती तिच्या या निर्णयाबद्दल फारसा खूष नव्हता. काही काळानंतर आपण शिकत असलेल्या नवनवीन गोष्टी पत्नी त्यालाही सांगू लागली. पुढे त्या भागातला दुष्काळ अगदीच असह्य झाला तेव्हा स्थानिक साक्षीदार अन्नसाम्रगी घेऊन या दांपत्याच्या घरी पोहंचले; हे पाहून या स्त्रीचा पती इतका प्रभावित झाला, की जे कधीच न करण्याचे अर्थात राज्य सभागृहातील सभेला कधीच न येण्याचे त्याने ठरवले होते नेमके तेच करण्याचा निर्णय त्याने आता घेतला. अर्थात, बायबल ईश्वरप्रेरणेने लिहिले आहे की नाही याविषयी त्याच्या मनात अद्यापही काही शंका आहेत; पण, एक मात्र खरं, की एकेकाळी विरोध करणाऱ्या या मनुष्याने गृह बायबल अभ्यास स्वीकारला.
आणखी एका ठिकाणच्या साक्षीदारांनी म्हटले: “मदत सामग्री इतक्या लवकर आमच्यापर्यंत पोहंचली याबद्दल आम्हाला फार आश्चर्य वाटलं. तुम्ही पाठवलेलं अन्न पुरून उरेल इतकं होतं. म्हणून मग आपल्या बांधवांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा भागवल्यानंतर आम्ही बायबल विद्यार्थ्यांना, त्यांच्या नातेवाईकांना आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या शेजाऱ्यांना देखील ही अन्नसामग्री वाटली.”
एका गावातल्या साक्षीदारांनी आपल्या शेजाऱ्यांना अन्नाचे पुडके दिले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना एका स्त्रीने म्हटले: “खरंच, ख्रिस्तानं सांगितलं तेच तुम्ही करत आहात; तुम्ही सर्वांना मदत करता पण त्याच्या बदल्यात कशाचीही अपेक्षा करत नाही.”
[२२ पानांवरील चित्र]
दुष्काळाचे परिणाम
[२१ पानांवरील चित्राचे श्रेय]
UN/DPI Photo by Evan Schneider