समुद्रातले स्वादिष्ट धावपटू
ऑस्ट्रेलियातील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
आकाशातल्या बहिरीससाण्यांसारखेच हे समुद्रातले सुपरफास्ट मासे आहेत. तुळतुळीत चकाकत्या बाणांसारखे ते पाण्याला छेदून सर्रकन निघून जातात. क्षणाचीही उसंत न घेता सतत भक्ष्याच्या शोधात असतात. गंमत म्हणजे, थन्नस टायनस हे त्यांचे शास्त्रीय नाव “झपाट्याने पुढे जाणे” या अर्थाच्या एका शब्दातूनच आले आहे. प्रतिष्ठित घराण्यातले हे मासे मार्लिन्स, स्पीअरफिश आणि स्वोर्डफिश यांचे भाऊबंद आहेत. तुम्ही अजूनही ओळखले नाही ना; हे पाण्यातले धावपटू ट्यूना कुटुंबातले आहेत. त्यांच्या एकूण १३ जाती आहेत.
या धावपटूंच्या खानदानात ब्ल्यूफिन मासे प्रमुख धावपटू आहेत. विषुववृत्ताच्या दक्षिणेला आढळणारे सदर्न ब्ल्यूफिन मासे जवळजवळ २०० सेंटीमीटर लांबीचे आणि २०० किलो वजनाचे असू शकतात. परंतु या घराण्यातले सर्वात वजनदार मासे आहेत जायंट नदर्न ब्ल्यूफिन मासे; त्यांच्या नावावरूनच कळते त्याप्रमाणे हे उत्तर गोलार्धात सापडतात. २७० सेंटीमीटर किंवा त्याहून अधिक (आजकाल अति मासेमारीमुळे फार क्वचित सापडतात) लांबीचे हे मासे चक्क ७०० किलोग्रॅम वजनाचे असू शकतात—त्यातला ७५ टक्के भाग शक्तिशाली स्नायूंचा बनलेला असतो. अवाढव्य वजनामुळे ब्ल्यूफिन माशाचा वेग काही कमी होत नाही. खरे तर, हे मोठाले मासेच सर्वात वेगवान आहेत; ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने ते मुसंडी मारू शकतात.
जलद धावासाठी आणि मॅरेथॉनसाठी योग्य
ब्ल्यूफिन मासे इतक्या वेगाने कसे पोहतात? नॅशनल जिओग्रॅफिक ही पत्रिका म्हणते: “शरीराचे तीन भाग स्नायू, जलगतिकीच्या दृष्टीने अप्रतिम, शक्तिशाली हृदय, रॅमजेट पद्धतीची हवा घेण्याची पद्धत, उष्णता विनिमयक आणि इतर खास व्यवस्थांनी युक्त असलेल्या ब्ल्यूफिन माशाची रचनाच वेगाने जाण्यासाठी केली आहे.” खरे तर, ब्ल्यूफिन माशाचे शक्तिशाली हृदय इतर माशांच्या हृदयापेक्षा कितीतरी पटीने मोठे असते आणि ते माशाच्या नव्हे तर सस्तन प्राण्याच्या हृदयासारखेच असते. शिवाय, या माशाचे हृदय शीत रक्ताच्या माशासारखे नसते, तर त्याच्या अद्भुत अभिसरण तंत्राद्वारे त्यातून उष्ण रक्त पाठवले जाते. ब्ल्यूफिनच्या रक्ताचे तापमान १० डिग्री सेल्सियसने वाढले तर त्याची शक्ती तिप्पट होते; मग, तो मासे, स्क्विड आणि क्रिल यांचा फडशा पाडू लागतो तेव्हा त्याच्या तावडीतून सुटणे अगदीच अशक्य.
ब्ल्यूफिन माशाला एखादे भक्ष्य दिसले—समजा मॅकेरेल दिसला, तर खुरप्यासारख्या शेपटीच्या साहाय्याने तो क्षणार्धात त्याच्यावर झपटतो. त्याच्या गतीला प्रतिरोध होऊ नये म्हणून त्याचे वक्षपर आणि श्रोणीपर त्याच्या शरीराच्या खास खाचांमध्ये आत ओढून घेतले जातात. मॅकेरेल मासा कितीही वेगवान असला, तरी ब्ल्यूफिनच्या तावडीतून निसटणे जरा कठीणच असते, कारण ब्ल्यूफिनला द्विनेत्री दृष्टी, अत्यंत सूक्ष्म श्रवणशक्ती आणि पाण्याची तपासणी करणारे रासायनिक अभिमापक असते. भक्ष्यावर झडप घालण्याच्या क्षणी तोल सांभाळण्यासाठी त्याचे पर पुन्हा एकदा बाहेर येतात. मग, त्याचे कल्ले आणि तोंड उघडले जाऊन एका झटक्यात मॅकेरेल मासा गिळंकृत केला जातो.
शक्तिशाली हृदय, इतर माशांच्या तुलनेत उष्ण रक्त आणि भलेमोठे कल्ले असल्यामुळे ट्यूना मासे अशा जलद धावांमधून इतर कोणत्याही माशांपेक्षा दहा पटीने लवकर सावरतात. तथापि, ‘दम घेताना’—त्याचप्रमाणे झोपतानाही—त्यांचे पोहणे काही थांबत नाही कारण त्यांचे वजन पाण्याहून जास्त असल्यामुळे आणि तोंडातून घेतलेले पाणी कल्ल्यांमधून बाहेर टाकता येत नसल्यामुळे इतर माशांप्रमाणे विश्रामासाठी ते पूर्णतः थांबू शकत नाहीत. म्हणून, शार्क माशांप्रमाणे ट्यूना मासे आपले तोंड हलकेसे उघडे ठेवूनच पोहतात. ट्यूनाच्या कबरेवर असे लिहिले जाऊ शकते: “जन्मापासून मृत्यूपर्यंत मॅरेथॉनची शर्यत, अधूनमधून फक्त जलद धावा.”
ट्यूना घराण्यातले सर्वात देखणे मासे आहेत जायंट यलोफिन ट्यूना. पूर्ण वाढ झालेले यलोफिन मासे जवळजवळ दोन मीटर लांबीचे असतात; अंगावर पिवळी रेष, पिवळे पर आणि मागे वळणारे लांबलचक पर घेऊन ते मिरवत असतात. एखाद्या लाटेतून पार होताना हे सुंदर मासे विशेषतः रात्रीच्या वेळी अग्निबाणांसारखेच चमकतात. हवाई लोक तर त्यांना आही म्हणतात; त्याचा अर्थ होतो “आग.”
धावपटू धोक्यात
ट्यूना मासा चांगला मांसल असतो, शिवाय त्याचे लाल मांस तेलकट असल्यामुळे तो फार लोकप्रिय आहे. साशिमी आणि सुशी या खास जपानी पदार्थांमुळे तर जपानी बाजारात ब्ल्यूफिन माशाला सर्वात जास्त मागणी आहे आणि ते सर्वात जास्त महागही आहे. सुशी पदार्थाचे चाहते ट्यूना माशाच्या लहानशा तुकड्यांसाठी देखील भरपूर पैसा द्यायला तयार असतात. ब्ल्यूफिन माशाच्या लिलावात फक्त एका माशाची किंमत तुम्ही ऐकली तर एखाद्या नवीन मोटारीसाठीच हा लिलाव चालला आहे असे तुम्हाला वाटेल; तसे वाटणे अगदी साहजिक आहे. ११,००० डॉलर किंवा त्याहून अधिक किंमत म्हणजे काहीच नाही. एक ३२४ किलोग्रॅमचा ब्ल्यूफिन मासा तर चक्क ६७,५०० डॉलर्सला विकला गेला! “पोर्शे कारइतकाच मोठा, वेगवान आणि महागही,” असे एका पर्यावरणवादीने म्हटले.
ट्यूना माशाची मागणी पाहता, माशांचा साठा अचानक घटू लागला आहे. त्यांची “प्रमाणापेक्षा जास्त मासेमारी होत आहे, प्रमाणापेक्षा जास्त उपयोग होत आहे [आणि] फक्त पैशांसाठी त्यांचा नाश केला जात आहे; उद्याचा कोणाला विचारच नाही,” असे खाऱ्या पाण्यातील मासेमारी (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते. हवेतून टेहळणी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त असलेली औद्योगिक जहाजे भरपूर प्रमाणात त्यांची मासेमारी करतात. उदाहरणार्थ, बटवा जाळ्याच्या जहाजाला ट्यूना माशांचा थवा दिसला की एक वेगवान होडी पाण्यात सोडण्यात येते; त्या होडीने माशांभोवती जाळे किंवा बटव्याच्या आकाराचे जाळे टाकले जाते ज्यामुळे चारही बाजूंनी त्यांचा मार्ग बंद होतो. तर गळाची दावण वापरणारी जहाजे १३० किलोमीटर लांबीची दोरी खेचून नेतात असे म्हटले जाते. या मुख्य दोरीला सुमारे २,२०० लहान दोऱ्या असतात आणि त्या प्रत्येक दोरीला आमीष लावलेले गळ बांधतात. ट्यूना माशांकरता तर हे मृत्यूचेच आमंत्रण! मोठाल्या ब्ल्यूफिन माशांना इतकी किंमत दिली जाते की, टेहळणी करणाऱ्या होड्या आणि विमाने फक्त “मोजकेच मासे शोधण्यासाठी कित्येक आठवडे फिरत असतात,” असे जागतिक वन्यजीवन निधीचे म्हणणे आहे.
काही देशांनी आपल्या परिसरातल्या मासेमारीवर मर्यादा घातली आहे, पण ट्यूनासारख्या सागरी माशांच्या मासेमारीवर लक्ष कसे ठेवणार? (जपानमध्ये चिन्हित करून पाण्यात सोडलेला एक नदर्न ब्ल्यूफिन मासा नंतर मेक्सिकोपासून थोड्या अंतरावर पकडण्यात आला—सुमारे ११,००० किलोमीटर दूर!) आतापर्यंत तरी या प्रश्नाचे उत्तर आहे की लक्ष ठेवणे शक्य नाही. संयुक्त राष्ट्रांमधील काही संघटना, पर्यावरणाच्या दृष्टीने हानीकारक नसलेली मासेमारी करण्याचे उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मोठमोठाल्या निहित हितसंबंधांकडून त्यांना कडा विरोध आहे. काही देशांनी मासेमारीवर देखरेख करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हिंसक घटना घडल्या आहेत.
पण आधीच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माशांची मासेमारी करून कोळी लोक सागरी उत्पन्न आणि स्वतःचा भावी रोजगारही का धोक्यात घालत आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नॅशनल जिओग्रॅफिक ही पत्रिका म्हणते: “[माशांचे प्रमाण] अशातऱ्हेने कमी होत असताना पारंपरिक मच्छीमार किंवा औद्योगिक मच्छीमारही स्वेच्छेने पर्यावरणाचे संरक्षण करू शकत नाहीत कारण त्याचा काही फायदा होत नाही. कारण ती मासेमारी दुसरे स्वार्थी माणसे करतात. त्याउलट, मासेमारीचे प्रमाण आणखीनच वाढवले जाते.”
चिन्हित केल्याने आणि मत्स्यसंवर्धनाने ट्यूना वाचेल का?
सदर्न ब्ल्यूफिन माशावर बरेचसे संशोधन केले जात आहे. या संशोधनात अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक टॅग्सचा वापर केला जातो; त्यामुळे ट्यूना माशांच्या थव्यांच्या सवयी आणि त्यांचे आरोग्य यांसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती मिळते. या माहितीच्या साहाय्याने मासेमारीवर मर्यादा घालण्यास मदत मिळेल.
सध्या तरी, मत्स्यसंवर्धनाला—ट्यूना माशाच्या संवर्धनालाही—काही देशांमध्ये लोकप्रियता मिळू लागली आहे. जननक्षमतेच्या बाबतीत पाहिले तर, मादा ब्ल्यूफिन मासा म्हणजे मत्स्यसंवर्धन करणाऱ्याला फायदाच आहे कारण एकाच प्रजोत्पादन काळामध्ये एक ब्ल्यूफिन मादी कमीतकमी १.५ कोटी अंडी घालते! मत्स्यसंवर्धन यशस्वी ठरले, तर सागरातल्या अगदी थोड्याफार उरलेल्या माशांची कदाचित सुटका होईल. केवळ देखणेच नव्हे तर चवीलाही रुचकर असलेले ट्यूनासारखे दिमाखदार सागरी धावपटू आणि विशेषकरून त्या घराण्यातले सुपरस्टार म्हणवणारे ब्ल्यूफिन मासे नामशेष झाले तर ही अत्यंत खेदाची गोष्ट ठरेल.
[१८, १९ पानांवरील चित्र]
यलोफिन ट्यूना
[चित्राचे श्रेय]
Innerspace Visions
[२० पानांवरील चित्र]
ब्ल्यूफिन ट्यूना
[चित्राचे श्रेय]
Innerspace Visions