शोध मानवाच्या पूर्वनियतीचा
नशिबावरील विश्वास इतका रूढ का आहे? आतापर्यंत, मानवाने जीवनातील गूढ गोष्टींचा खुलासा करण्याचा आणि घडणाऱ्या घटनांमागचे कारण शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. “त्या घटना व्यक्तित्व असलेल्या शक्तीमुळे घडल्या की व्यक्तिभावरहित योजनेमुळे घडल्या किंवा कोणत्याही योजनेविना घडल्या यानुसार ‘देव,’ ‘पूर्वनियती,’ आणि ‘योगायोग’ या संकल्पना निर्माण होतात,” असे इतिहासकार हेल्मर रिंगग्रन म्हणतात. नशीब आणि पूर्वनियती यांसंबंधीचे निरनिराळे विश्वास, दंतकथा आणि पौराणिक कथा इतिहासात विपुल प्रमाणात आढळतात.
असेरियन इतिहासतज्ज्ञ झॉन बॉटेरॉ म्हणतात: “आपल्या संस्कृतीच्या प्रत्येक पैलूवर मेसोपोटेमियन संस्कृतीचा पगडा आहे” आणि ते पुढे असेही म्हणतात की, प्राचीन मेसोपोटेमिया किंवा बॅबिलोनियामध्येच “मानवजातीने अलौकिक जगाप्रती दाखवलेली प्रतिक्रिया आणि त्यावर केलेले मनन यांचा सर्वात जुना पुरावा आणि सिद्ध झालेली सर्वात जुनी धार्मिक संरचना” आपल्याला आढळते. नशिबाच्या कल्पनेचा मूळ उगमही आपल्याला येथेच सापडतो.
नशिबाची प्राचीन मुळे
सध्या इराक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन मेसोपोटेमियाच्या खंडरांमध्ये, सर्वात जुनी लिखाणे सापडली आहेत. कीलाकारात लिहिलेले हजारो पाषाणलेख सुमर आणि आखड त्याचप्रमाणे बॅबिलोनच्या प्रसिद्ध शहरातील प्राचीन संस्कृतींमधील जीवनाचे स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभे करतात. पुरातत्त्वशास्त्रज्ञ सॅम्युएल एन. क्रेमर यांच्या मते, सुमेरियन लोक “मानवाच्या जीवनातील दुःख पाहून विशेषतः त्यामागील अनाकलनीय कारणांमुळे अस्वस्थ होते.” उत्तरांच्या शोधात त्यांना नशिबाची कल्पना सुचली.
बॅबिलोन (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात, पुरातत्त्वशास्त्रज्ञ जोन ओट्स म्हणतात की, “प्रत्येक बॅबिलोनी व्यक्तीचा एक देव किंवा देवी होती.” बॅबिलोनी लोकांचा असा विश्वास होता की देवदेवता, “प्रत्येक व्यक्तीला त्याचप्रमाणे सर्व मानवजातीला पूर्वनियत करून ठेवतात.” क्रेमर यांच्या मते, सुमेरियन लोकांचा असा विश्वास होता की, “विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या देवदेवतांनी दुष्टता, लबाडी आणि हिंसा यांची योजना करून त्या गोष्टींना संस्कृतीचा अंग बनवले.” नशिबावरील विश्वास रूढ होता आणि त्या विश्वासाला खूप महत्त्व दिले जात होते.
बॅबिलोनी लोकांचा असा समज होता की, शकुनविचार अर्थात “देवदेवतांशी दळणवळण करण्याचे तंत्र” वापरून ते देवदेवतांच्या योजना जाणून घेऊ शकतात. शकुनविचारात वस्तूंचे आणि घटनांचे परीक्षण करून, अर्थ लावून आणि उलगडा करून भविष्य भाकीत करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यासाठी खासकरून, स्वप्ने, प्राण्यांचे वर्तन आणि पशूंचे अवयव यांचे परीक्षण केले जाई. (पडताळा यहेज्केल २१:२१; दानीएल २:१-४.) लोकांच्या धारणेनुसार भविष्याचे भाकीत करणाऱ्या अनपेक्षित किंवा असाधारण घटना पाषाणांवर कोरल्या जात होत्या.
प्राचीन संस्कृतींचा फ्रेंच विद्वान, एडवार डॉर्म यांच्या मते, “मेसोपोटेमियन इतिहासाचा मागोवा घेतल्यावर त्यांच्यामध्ये ज्योतिष आणि शकुनविचाराची कल्पना आधीपासूनच आढळते.” शकुनविचार हा त्यांच्या जीवनाचा एक भाग बनला होता. प्राध्यापक बॉटेरॉ तर म्हणतात की, “कोणतीही वस्तू परीक्षणासाठी आणि शकुनविचाराचे अनुमान काढण्यासाठी योग्य मानली जायची . . . सबंध भौतिक विश्वच पुरावा मानले जाई ज्याचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यावर कोणत्या न कोणत्या प्रकारे भविष्य जाणून घेता येत होते.” अशाप्रकारे, मेसोपोटेमियन लोक भविष्य सांगण्यासाठी फलज्योतिषाचा हमखास उपयोग करायचे.—पडताळा यशया ४७:१३.
शिवाय, बॅबिलोनी लोक फासे किंवा चिठ्ठ्या टाकून भविष्य जाणून घेत होते. रॅन्डमनेस्स या आपल्या पुस्तकात डेबरा बेनट असे म्हणतात की, “मानवांना कोणताही हस्तक्षेप करता येऊ नये आणि देवदेवतांना आपली इच्छा प्रकट करण्याचा मार्ग मोकळा व्हावा” म्हणून ते असे करत होते. परंतु, देवदेवतांचा निर्णय अटळ समजला जात नव्हता. देवदेवतांची मनधरणी करून एखादे वाईट नशीब टाळता येते असा त्यांचा समज होता.
प्राचीन ईजिप्तमधील नशिबाची कल्पना
सा.यु.पू. १५ व्या शतकात, बॅबिलोन आणि ईजिप्त यांच्यामध्ये फार सलोखा होता. या सलोख्यामुळे त्यांच्यामधील ज्या संस्कृतींची देवाणघेवाण झाली त्यामध्ये नशिबाशी संबंधित असलेल्या धार्मिक चालीरीती देखील होत्या. ईजिप्शियन लोकांनी नशिबावरील विश्वास का स्वीकारला? ऑक्सफर्ड विद्यापीठात ईजिप्टोलॉजीचे प्राध्यापक, जॉन आर. बेन्झ यांच्या मते, “[ईजिप्शियन] धर्मात बहुतेककरून भाकीत करता न येणाऱ्या आणि दुर्दैवी घटनांचा अर्थ समजून घेण्याचा आणि त्यांना प्रतिक्रिया दाखवण्याचा प्रयत्न केला जात असे.”
ईजिप्तच्या अनेक देवदेवतांपैकी, आयसिस या देवीला “जीवनाची मालकीण, नशीब आणि पूर्वनियतीची राणी” असे मानले जाई. ईजिप्शियन लोकांमध्ये शकुनविचार आणि फलज्योतिषाची प्रथा रूढ होती. (पडताळा यशया १९:३.) “देवदेवतांशी सल्लामसलत करण्यात त्यांच्या तोडीचे कोणीच नव्हते,” असे एक स्त्री इतिहासकार म्हणते. तथापि, फक्त ईजिप्शियन संस्कृतीनेच बॅबिलोनच्या चालीरीती आपल्यात सामावून घेतल्या नव्हत्या.
ग्रीस आणि रोम
धर्माच्या बाबतीत, “बॅबिलोनियाचा दूरवर पसरणारा प्रभाव प्राचीन ग्रीसवर पडल्याशिवाय राहिला नाही,” असे झॉन बॉटेरॉ लिहितात. ग्रीसमध्ये पूर्वनियतीची कल्पना इतकी रूढ का होती याचे स्पष्टीकरण प्राध्यापक पीटर ग्रीन देतात: “त्या अनिश्चित जगात लोकांना स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला मुळीच आवडत नव्हते; शिवाय नशिबाच्या गूढ व अटळ अपेक्षांनुसार आपल्याला कठपुतळ्यांसारखे खेळवण्यात येत आहे असे त्यांना वाटत होते म्हणून दैवी आज्ञा [देवदेवतांनी ठरवलेले नशीब], प्रत्येक व्यक्तीचे भविष्य योजण्याचा एक मार्ग होता. नशिबाद्वारे ठरवलेले भविष्य खास कौशल्याचा किंवा अंतर्ज्ञानाचा उपयोग करून सांगता येऊ शकत होते. लोकांना ते पसंत पडले नाही, तरी तो पूर्व इशारा निदान मनाची तयारी करायची संधी द्यायचा.”
नशिबावरील विश्वासाद्वारे फक्त भविष्याची खात्री पटवून देण्याचा उद्देशच साध्य केला जात नव्हता तर त्या व्यतिरिक्त इतर अनेक अनिष्ट उद्देश साध्य केले जायचे. याच नशिबाच्या कल्पनेद्वारे लोकांना कह्यात ठेवणे शक्य होत होते आणि म्हणून, “हे जग संपूर्णतः ईश्वराद्वारे चालवले जाते हा विश्वास राजेशाही लोकांच्या सत्ताधारी वर्गाला अपीलकारक ठरला असावा,” असे इतिहासकार एफ. एच सँडबॅक म्हणतात.
पण का? प्राध्यापक ग्रीन सांगतात की, हा विश्वास “तेव्हाच्या स्थिरावलेल्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेसाठी नैतिक, धर्मशास्त्रीय आणि भाषेच्या दृष्टीने सबब होता: ग्रीक लोकांच्या सत्ताधारी वर्गाने स्वतःचा जम बसवण्यासाठी शोधून काढलेले ते सर्वात शक्तिशाली आणि कावेबाज साधन होते. जे काही घडते ते सर्व नशिबात असल्यामुळेच घडते; शिवाय, निसर्ग मानवांप्रती अनुकूल असल्यामुळे नशिबात जे काही लिहिलेले असते ते सगळ्यांच्या भल्यासाठीच असते असे मानले जाई.” वास्तविक पाहता, “आपलेच स्वार्थ साध्य करण्यासाठी त्यांनी या सामान्य समजुतीचा आधार घेतला.”
ग्रीक साहित्यावरूनही नशिबाची कल्पना रूढ होती हे सिद्ध होते. महाकाव्य, अख्यायिका आणि शोकांतिका या प्राचीन वाङ्मयीन प्रकारांत नशिबाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. ग्रीक दंतकथेनुसार, मानवाच्या पूर्वनियतीचे चित्रण मोयराय नावाच्या तीन देवी करत. जीवनाचा दोर विणणारी क्लोथो, जीवन किती दीर्घ असावे ते ठरवणारी लॉखेसिस आणि ठरलेली वेळ संपली की जीवनाचा दोर कापणारी ऑट्रोपोस. रोमी लोकही अशाच तीन देवतांना मानायचे ज्यांना त्यांनी पारकी हे नाव दिले होते.
रोमी आणि ग्रीक लोकांना आपल्याला कशासाठी पूर्वनियत केले आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता होती. यास्तव, त्यांनी बॅबिलोनकडून फलज्योतिष आणि शकुनविचाराच्या कल्पना घेतल्या आणि त्यांच्यात आणखी भर घातली. भविष्य भाकीत करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या घटनांना रोमी लोक पोरटेंटा, किंवा चिन्हे असे म्हणत. या चिन्हांद्वारे मिळणाऱ्या संदेशांना ओमिना म्हटले जाई. सा.यु.पू. तिसऱ्या शतकापर्यंत, ग्रीसमध्ये फलज्योतिषाची प्रथा अत्यंत लोकप्रिय झाली होती आणि सा.यु.पू. ६२ मध्ये ज्ञात असलेली सर्वात प्रथम ग्रीक राशी उदयास आली. ग्रीक लोकांना फलज्योतिषामध्ये इतका रस होता की, प्राध्यापक गिल्बर्ट मरे यांच्या मते “एखाद्या दूर वसलेल्या द्वीपावरील लोकांना जसा एखादा नवीन रोग जडतो त्याचप्रमाणे ग्रीक लोकांची मने [फलज्योतिषाने] ग्रस्त झाली होती.”
भविष्य जाणून घेण्यासाठी ग्रीक आणि रोमी लोक कौल लावायचे किंवा आत्मिक जगाशी संपर्क राखणाऱ्या व्यक्तींचा सर्रास उपयोग करायचे. यांच्याद्वारे देवदेवता मानवांशी संपर्क साधतात असा त्यांचा विश्वास होता. (पडताळा प्रेषितांची कृत्ये १६:१६-१९.) या विश्वासांचा काय परिणाम झाला? वेदान्ती बरट्रंड रस्सल म्हणाले: “लोकांमध्ये आशा निर्माण होण्याऐवजी दहशत निर्माण झाली; काहीतरी चांगले साध्य करण्याऐवजी दुर्भाग्य चुकवावे हा जीवनाचा उद्देश होऊन बसला.” अशाच विषयांवर ख्रिस्ती धर्मजगतातही वादविवाद होऊ लागले.
नशिबाबद्दलचे “ख्रिस्ती” वादविवाद
प्रारंभिक ख्रिस्ती राहत होते त्या काळाच्या संस्कृतीवर पूर्वनियती आणि नशीबाच्या ग्रीक व रोमी कल्पनांचा पगडा होता. उदाहरणार्थ तथाकथित धर्मगुरू, अरिस्टोटल आणि प्लेटोसारख्या ग्रीक तत्त्वज्ञान्यांच्या साहित्यांचा भरपूर उपयोग करायचे. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान व ‘आरंभीच शेवट कळविणाऱ्या’ देवाचा मेळ प्रीतीच्या देवाशी कसा घालता येईल हा प्रश्न त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला होता. (यशया ४६:१०; १ योहान ४:८) त्यांनी असा तर्क केला की, जर देवाला आरंभापासूनच शेवटाविषयी माहीत होते, तर मानव पाप करील आणि त्यामुळे अनिष्टकारक परिणाम निर्माण होतील यांविषयीही त्याला आधीपासूनच ठाऊक असायला हवे होते.
प्रारंभिक ख्रिस्ती लेखकांपैकी सर्वात जास्त लिखाण केलेला एक लेखक ओरिजन याने असा वाद घातला की, स्वतंत्र इच्छेची कल्पना ही लक्षात ठेवण्याची एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्याने असे लिहिले की, “शास्त्रवचनांमध्ये असे असंख्य उतारे आहेत ज्यांमधून स्वतंत्र इच्छा आहे याचा स्पष्ट पुरावा मिळतो.”
ओरिजन म्हणाला की, आपल्या कार्यांसाठी दुसऱ्या एखाद्या बाह्य उगमाला जबाबदार ठरवणे “यात सत्यही नाही आणि तथ्यही नाही, पण ज्याला स्वतंत्र इच्छेची कल्पनाच मिटवून टाकायची आहे त्या व्यक्तीचे हे शब्द आहेत.” ओरिजनने असा वाद घातला की, देवाला कालक्रमानुसार घटनांची पूर्व माहिती करून घेता येते याचा अर्थ तो एखादी घटना घडवून आणतो किंवा ती घटना घडण्यास भाग पाडतो असे नाही. परंतु, सगळेच त्याच्या मताशी सहमत झाले नाही.
प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेला एक धर्मगुरू, ऑगस्टीन (सा.यु. ३५४-४३०) याने घडणाऱ्या घटनांमध्ये स्वतंत्र इच्छेची काही भूमिकाच नाही असे म्हणून हा वाद आणखीनच गुंतागुंतीचा करून टाकला. ऑगस्टीनने पूर्वनियतीला ख्रिस्ती धर्मजगतात धर्मशास्त्रीय आधार देऊ केला. त्याची लिखाणे विशेषकरून, द लीबरो ऑरबिटऱ्यो हा त्याचा ग्रंथ मध्ययुगात चर्चेचा विषय होता. या वादविवादाने धर्मसुधारणेच्या वेळी कळस गाठला; परिणामस्वरूप, ख्रिस्ती धर्मजगतात पूर्वनियतीच्या विषयावर तीव्र दुमत झाले.a
सर्वदूर पसरलेला विश्वास
परंतु, नशिबाची कल्पना फक्त पाश्चात्त्य देशांमध्येच नाही. संकट सामोरे आले की, अनेक मुसलमान लोक “मेकतूब” अर्थात, लिहिले आहे असे म्हणतात आणि यावरून त्यांचाही पूर्वनियतीवर विश्वास आहे हे प्रकट होते. अनेक पौर्वात्य देशांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या पूर्वनियतीमध्ये त्या त्या व्यक्तीची भूमिका महत्त्वाची असते यावर जोर दिला जात असला, तरीही त्यांच्या शिकवणींमध्ये दैववादाचा समावेश असतो.
उदाहरणार्थ, हिंदू आणि बौद्ध धर्मांतील कर्म म्हणजे पूर्वजन्मात केलेल्या कार्यांमुळे मिळालेली अनिवार्य पूर्वनियती. चीनमध्ये, सर्वात प्राचीन लिखाणे कासवाच्या कवचावर लिहिलेली आढळली; त्यांचा उपयोग शकुनविचारासाठी करण्यात येई. अमेरिका खंडाच्या मूळच्या रहिवाशांमध्येही नशिबाचा विश्वास रूढ होता. उदाहरणार्थ, ॲझ्टेक लोकांनी वैयक्तिकांना कशासाठी पूर्वनियत केले होते ते दाखवण्यासाठी भविष्याशी संबंधित असलेल्या दिनदर्शिका बनवल्या. दैववादी विश्वास आफ्रिकेतही रूढ आहेत.
नशिबाची कल्पना सर्वत्र स्वीकारली आहे यावरून खरे म्हणजे हे दिसून येते की, कोणा श्रेष्ठ शक्तीवर विश्वास ठेवणे ही मानवाची मूलभूत गरज आहे. मानवाचे धर्म (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात जॉन. बी. नॉस्स हे कबूल करतात: “सर्व धर्म कोणत्या न कोणत्या प्रकारे हे म्हणतात की, मानव एकटा नाही आणि कधीच एकटा राहू शकत नाही. निसर्ग आणि समाज या बाह्य शक्तींशी त्याचे महत्त्वाचे नाते आहे आणि तो त्यांच्यावर अवलंबूनही असतो. जगापासून वेगळे राहण्याचे सामर्थ्य असलेला तो स्वतंत्र शक्तीकेंद्र नाही हे त्याला स्पष्ट किंवा अस्पष्टपणे ठाऊक असते.”
देवावर विश्वास करण्याच्या गरजेव्यतिरिक्त, आपल्या भोवती काय चालले आहे हेसुद्धा जाणून घेण्याची आपली मूलभूत गरज आहे. परंतु, एक सर्वशक्तिमान निर्माणकर्ता आहे हे मानणे आणि तो आपले भाग्य कायमचे ठरवून टाकतो असा विश्वास करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपले भाग्य ठरवण्यात आपली काय भूमिका आहे? आणि देवाची काय भूमिका आहे?
[तळटीपा]
a या नियतकालिकाच्या सोबतचे नियतकालिक, टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १५, १९९५, पृष्ठे ३-४ पाहा.
[५ पानांवरील चित्र]
एक बॅबिलोनी फलज्योतिष दिनदर्शिका, सा.यु.पू. १०००
[चित्राचे श्रेय]
Musée du Louvre, Paris
[७ पानांवरील चित्र]
ग्रीक आणि रोमी लोकांचा विश्वास होता की, मानवाचे भाग्य ठरवणाऱ्या तीन देवी आहेत
[चित्राचे श्रेय]
Musée du Louvre, Paris
[७ पानांवरील चित्र]
“नशीब आणि भाग्याची राणी” ईजिप्तची देवी आयसिस
[चित्राचे श्रेय]
Musée du Louvre, Paris
[८ पानांवरील चित्र]
कासवाच्या कवचांवर लिहिलेल्या प्राचीन चिनी लिखाणांचा शकुनविचारासाठी उपयोग केला जाई
[चित्राचे श्रेय]
Institute of History and Philology, Academia Sinica, Taipei
[८ पानांवरील चित्र]
राशी दाखवणारी पर्शियन चौकट
[चित्राचे श्रेय]
Photograph taken by courtesy of the British Museum