वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 १०/८ पृ. ३-४
  • नशीब म्हणायचे की योगायोग?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नशीब म्हणायचे की योगायोग?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उत्तरांच्या शोधात
  • नशिबाची व्याख्या
  • एक महत्त्वाचा मुद्दा
  • बायबल दैवावरील विश्‍वासाची शिकवणूक देते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • तुमच्या जीवनावर नशीबावरील विश्‍वास नियंत्रण करतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • शोध मानवाच्या पूर्वनियतीचा
    सावध राहा!—१९९९
  • प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 १०/८ पृ. ३-४

नशीब म्हणायचे की योगायोग?

“नशिबामुळे अनेकांचे भक्षण, तर काहींचे रक्षण,” असे इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्यून या वृत्तपत्रात म्हटले होते. मागच्या वर्षी, केनिया आणि टान्झानिया येथील अमेरिकन वकिलातींवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये जवळजवळ २०० लोक ठार झाले आणि शेकडो जखमी झाले. परंतु, “काळाने वकिलातीतल्या ज्येष्ठ मुत्सद्दींना मात्र तारले,” असे त्या वृत्तपत्रात म्हटले होते.

हे लोक वाचले कारण स्फोट झाला तेव्हा ते इमारतीच्या दुसऱ्‍या भागात एका बैठकीत होते. पण, एरवी सभेला उपस्थित राहणारा वकिलातीतला एक उच्च अधिकारी त्याच दिवशी उपस्थित नव्हता आणि नेमका स्फोट झालेल्या ठिकाणाजवळ असल्यामुळे ठार झाला.

“नशिबाने ऑर्लीन कर्कसोबतही दुष्ट खेळ खेळला,” असे त्या वृत्तपत्रात म्हटले होते. सुटीहून केनियाला परतताना पूर्णपणे बुकिंग झालेल्या विमानामधील आपली जागा इतरांना देण्यास ऑर्लीन तयार झाली होती. पण, तिच्याआधी दुसऱ्‍या प्रवाशांनी आपल्या जागा दिल्यामुळे तिला तिची जागा देण्याची गरज पडली नाही. त्यामुळे, तिला वकिलातीत कामावर जाता आले पण नेमका त्याच दिवशी स्फोट झाला आणि त्या दुर्घटनेची ती शिकार झाली.

विपत्तीच्या अनुभवातून मानवाला पुष्कळदा जावे लागले आहे. तरीही, अशा दुर्घटना का घडतात हे सांगणे कठीण आहे. सबंध जगभरात, अपघातांमध्ये आणि दुर्घटनांमध्ये नेहमी असे घडते की, काहीजण मरतात तर काही वाचतात. तथापि, ‘हे मलाच का व्हावे?’ असा प्रश्‍न लोकांना फक्‍त अरिष्टांच्या बाबतीतच पडतो असे नाही, तर जीवनात घडणाऱ्‍या चांगल्या गोष्टींच्या बाबतीतही पडतो. कारण काहींना जीवनात इतरांपेक्षा जास्त चांगल्या गोष्टी मिळतात. काहींचे जीवन कायमचा संघर्ष असतो तर काहींचे एकदम सुरळीत. म्हणून, तुम्ही असा प्रश्‍न कराल, ‘हे सगळं आधीच नियोजित असतं का? माझ्या जीवनावर नशिबाचे नियंत्रण आहे का?’

उत्तरांच्या शोधात

सुमारे ३,००० वर्षांआधी, एका बुद्धिमान राजाने काही अनपेक्षित घटना पाहिल्या. त्यांचे स्पष्टीकरण त्याने अशाप्रकारे दिले: “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.” (उपदेशक ९:११, पं.र.भा.) काहीवेळा, अनपेक्षित घटना घडतात. त्या घडणार आहेत हे आधीच सांगण्याचा कोणताही मार्ग नसतो. कोणत्याही असामान्य घटना, मग त्या चांगल्या असोत किंवा वाईट, त्या सहसा योगायोगानेच घडत असतात.

तथापि, अशा या घटना योगायोगाने घडतात असे म्हणण्याऐवजी यामागे दुसरी एक शक्‍ती—नशीब आहे असे काहीजण म्हणतात; कदाचित तुम्हीही त्यांच्यापैकी एक असाल. नशीब किंवा पूर्वनियती यांवरचा विश्‍वास हा मानवाच्या धार्मिक विश्‍वासांपैकी सर्वात जुना आणि रूढ आहे. पॅरिस विद्यापीठाच्या दंतकथा संशोधन केंद्राचे अध्यक्ष प्राध्यापक फ्रॉन्स्वे झुआन म्हणतात: “जीवनातल्या न उमजणाऱ्‍या अनपेक्षित घटनांसाठी . . . माणसाचे नशीब लिहून ठेवणाऱ्‍या दैवी शक्‍तीला जबाबदार धरण्याची प्रवृत्ती इतिहासातील प्रत्येक कालखंडात आणि प्रत्येक संस्कृतीत पाहायला मिळते.” म्हणूनच, लोकांना सहसा असे म्हणताना आपण ऐकतो: “काळ आला होता पण त्याची वेळ आली नव्हती” किंवा, “व्हायचं ते होतंच.” तर मग, हे नशीब आहे तरी काय?

नशिबाची व्याख्या

‘नशीबासाठी’ असलेला इंग्रजी शब्द, फेटम या लॅटिन शब्दावरून आलेला आहे, ज्याचा अर्थ “भविष्याविषयी कथन, देवाकडून आलेले उत्तर, ईश्‍वराचा निर्णय” असा होतो. एक अज्ञात शक्‍ती, अपरिवर्तनीय व गूढ पद्धतीने भविष्य ठरवते असे काहीजण मानतात, पण बहुतेकांची अशी समजूत आहे की, ही शक्‍ती म्हणजे कोणी देवदेवता आहे.

हेल्मर रिंगग्रन हे धार्मिक इतिहासाचे अभ्यासक म्हणतात: “मानवाच्या पूर्वनियतीची कल्पना अर्थहीन नाही किंवा तो केवळ योगायोग नाही तर त्यामागे हेतूपुरस्सर आणि उद्देशपूर्ण शक्‍तीचा हात आहे हा लोकांच्या धार्मिक विश्‍वासातील एक महत्त्वाचा घटक आहे.” थोड्याफार प्रमाणात परिस्थिती बदलणे शक्य आहे असे वाटत असले, तरी अनेकांच्या मते मानव अशा एका खेळातले असहाय प्यादे आहेत ज्या खेळावर त्यांचे काहीच नियंत्रण नाही. आणि म्हणूनच नशिबाच्या दुष्ट डावाला ते बळी ठरतात.

वेदान्ती आणि तत्त्ववेत्त्यांनी नशिबाचा खुलासा करण्याचा अनेक वर्षांपासून प्रयत्न केला आहे. द एन्सायक्लोपिडिया ऑफ रिलिजन असे म्हणतो: “नशिबाची संकल्पना कोणत्याही स्वरूपात, भाषेत किंवा छटेत असली, तरी त्यात रहस्याचे मूल घटक गोवलेले असतेच.” परंतु, या सर्व गुंतागुंतीच्या कल्पनांमध्ये एक सामान्य घटक आहे आणि तो म्हणजे, मानवी व्यवहारांचे नियंत्रण व निर्देशन करणाऱ्‍या श्रेष्ठ शक्‍तीची कल्पना. ही शक्‍ती व्यक्‍तींचे आणि राष्ट्रांचे भविष्य आधीच ठरवते आणि त्यामुळे गतकाळाप्रमाणेच भविष्यातही कोणत्याच घटनेवर कोणालाही नियंत्रण करता येत नाही अशी समजूत आहे.

एक महत्त्वाचा मुद्दा

नशिबावर तुमचा विश्‍वास असल्यानसल्याने काही फरक पडतो का? “मनुष्य सहसा आपल्या परिस्थितीच्या आधारावर जीवनाबद्दल काही मतं बनवत असतो, पण याच्याच उलट, त्याने बनवलेल्या मतांवरच त्याच्या जीवनातली परिस्थिती बऱ्‍याच प्रमाणात अवलंबून असते हेही तितकेच खरे,” असे इंग्रज तत्त्ववेत्ता बरट्रंड रस्सल यांनी लिहिले.

तेव्हा, नशिबामध्ये विश्‍वास करण्यावर आपले वर्तन बऱ्‍याच प्रमाणात अवलंबून आहे; अर्थात नशिबासारखे खरेच काही असले तर. काहीजण, आपल्या वाट्याला कितीही अन्याय किंवा जुलूम आला तरी तो अपरिहार्य आहे आणि देवदेवतांची हीच इच्छा आहे असे समजून त्यास निमूटपणे स्वीकारतात. अशाप्रकारे, नशिबावर विश्‍वास केल्यामुळे मनुष्य स्वतः आपल्या कृत्यांसाठी जबाबदार असतो या तत्त्वाला काही अर्थच राहत नाही.

दुसऱ्‍या बाजूला पाहता, पूर्वनियतीवरील विश्‍वासाने काहींना याच्याच अगदी उलट दिशेने प्रवृत्त केले आहे. उदाहरणार्थ, भांडवलशाही आणि औद्योगिक क्रांतीचा विकास होण्यामागील अनेक कारणे इतिहासकारांनी शोधून काढली आहेत. यांमध्ये एक आहे पूर्वनियतीवरील विश्‍वास. काही प्रोटेस्टंट धर्मांची शिकवण अशी होती की, काहींचे तारण देवाने आधीच ठरवलेले आहे. जर्मन समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर असे म्हणतात: “मी तारणासाठी निवडलेला आहे का? हा प्रश्‍न विश्‍वास करणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीला कधी न कधी पडला असेलच.” आपल्यावर देवाचा अनुग्रह आहे का आणि त्यामुळे आपल्या माथी उद्धार लिहून ठेवला आहे का हे जाणून घेण्याचा लोक प्रयत्न करू लागले. “सांसारिक यशप्राप्तीकरवी” त्यांनी हे जाणण्याचा प्रयत्न केला असे वेबर यांचे मत आहे. व्यापारात यश मिळणे आणि खूप धनसंपत्ती असणे हे देवाच्या कृपेचे चिन्ह मानले जात होते.

नशिबावर विश्‍वास करत असल्यामुळे काहींनी तर टोकाची भूमिका स्वीकारली. दुसऱ्‍या महायुद्धात, मानवी बॉम्ब बनलेल्या जपानी विमानचालकांचा कामीकाझे किंवा “दैवी वारे” यावर विश्‍वास होता. देवदेवतांचा एक उद्देश आहे आणि त्यामध्ये आपणही एखादी भूमिका अदा करू शकतो या कल्पनेमुळे भयंकर मरणाला धार्मिकतेचे स्वरूप दिले जात होते. गत दशकात, मध्यपूर्वेतील मानवी बॉम्बचे इतके भीषण हल्ले झाले की ते ठळक बातम्यांचा विषय बनले होते. या “धर्मप्रेरित आत्मघातक हल्ल्यांमध्ये” दैववादाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे असे एक विश्‍वकोश म्हणतो.

परंतु, नशिबावरील विश्‍वास इतका रूढ का आहे? त्याचा उगम कोठून झाला हे थोडक्यात पाहिल्यावर आपल्याला याचे उत्तर मिळेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा