सिडनी—बंदर असलेले उत्साही शहर
ऑस्ट्रेलियातील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
तुम्हाला “ऑस्ट्रेलियातील सिडनीचे” नाव घेताच कशाची आठवण येते? पाण्याच्या कडेला जहाजांच्या शिडांसारखे किंवा मोठाल्या शिंपल्यांसारखे छप्पर असलेल्या आगळ्यावेगळ्या ऑपेरा हाऊसचे (कलाकेंद्र) चित्र डोळ्यांसमोर उभे राहते का? तुम्हाला आवडत असल्यामुळे कदाचित याचेच चित्र तुमच्या मनात येत असावे.
अनेकांच्या मते, सिडनी—ऑस्ट्रेलियाचे प्रवेशद्वार—जगातल्या सर्वात आकर्षक शहरांपैकी एक मानले जाते. ते ऑस्ट्रेलिया खंडाच्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या न्यू साऊथ वेल्स राज्याची राजधानी आहे. तथापि, ऑस्ट्रेलियाची राजधानी, सिडनी आणि मेल्बर्नच्या मध्यंतरी वसलेले कॅनबेरा शहर आहे.
सिडनीचे दिलखुलास, मनमिळाऊ रहिवाशी मोठ्या अभिमानाने स्वतःला सिडनीसायडर्स म्हणवतात. गीतांमध्ये “सिडनी टाऊन” असे संबोधल्या जाणाऱ्या सिडनी शहराची तीन उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत: (१) नैसर्गिक खोल बंदर, (२) बंदरावरचा प्रचंड मोठा अखंड पूल, आणि (३) अनोखे ऑपेरा हाऊस.
येथील हवामान समशीतोष्ण असून सर्वात उष्ण महिन्यात अर्थात फेब्रुवारीत येथील तापमान सरासरी २२ डिग्री सेंटीग्रेड तर सर्वात जास्त थंडी असलेल्या महिन्यात अर्थात जुलैमध्ये येथील तापमान सरासरी १२ डिग्री सेंटीग्रेड असते. ऑस्ट्रेलियातला पाऊस म्हणजे लहरी आणि अनिश्चित असतो; पण सिडनीत दरवर्षी सरासरी १,१४० मिलिमीटर पाऊस पडतो. आणि हा पाऊस सहसा उन्हाळ्यात (डिसेंबर ते मार्च दरम्यान) पडतो.
येत्या वर्षांमध्ये तुम्हाला सिडनीविषयी बरेच काही ऐकायला मिळेल कारण सन २००० च्या ऑलम्पिक गेम्ससाठी सिडनीची निवड झाली आहे.
गुन्हेगारांच्या वसाहतीतून बहरलेले शहर
जगद्विख्यात शहरांसोबत तुलना केल्यास सिडनी तसे नवीनच शहर आहे, कारण या शहराचा इतिहास फक्त २०० वर्षे जुना आहे; १७७० साली, कॅप्टन जेम्स कुक या ब्रिटिश शोधकाचे बॉटनी बे येथे ऐतिहासिक आगमन झाले. (बॉटनी बेच्या उत्तर किनाऱ्यावर सध्या सिडनीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.) उत्तर दिशेने पुढे काही किलोमीटर प्रवास करताना त्याने एक नैसर्गिक खोल बंदर ओलांडले; त्या बंदराचे नाव त्याने पोर्ट जॅकसन ठेवले. तथापि, बंदराकडे नेणाऱ्या दोन भूशिरांमधून तो गेला नाही.
मग १७८८ साली, गव्हर्नर आर्थर फिलिप्प इंग्लंडहून फर्स्ट फ्लीटमधून ब्रिटिश गुन्हेगारांना घेऊन प्रथम येथे आले. बॉटनी बे येथे वसाहत स्थापन करण्यास तो गेला पण ते ठिकाण त्याला नंतर अयोग्य वाटले. त्यामुळे तो तीन बोटी घेऊन उत्तरेच्या दिशेने चांगले ठिकाण शोधण्यासाठी गेला.
काही किलोमीटरच्या अंतरावरच एक खोल आणि विस्तारित उपसागर त्याच्या नजरेस पडला; कुक हेच उपसागर ओलांडून गेला होता. लॉर्ड सिडनीला पाठवलेल्या प्रसिद्ध संदेशात इंग्लंडचा गृह सचिव फिलिप्प याने पोर्ट जॅकसनबद्दल आपले मत या शब्दांत प्रकट केले: “आम्हाला . . . जगातले सर्वात सुंदर बंदर सापडले आहे, ज्यामध्ये हजार लढाऊ जहाजे अगदी सुरक्षितपणे मावू शकतात.” लॉर्ड सिडनी यांच्या सन्मानार्थ या खाडीला सिडनी कोव असे नाव फिलिप्पने दिले आणि तेथे पहिली वसाहत स्थापन केली. तेव्हापासून आजतागायत सिडनी हे नाव बदलेले नाही.
सर्व अपराधी पुरुषांना येथे उतरवण्यात आले आणि लगोलग जागा साफ करण्याचे आणि तात्पुरते तंबू उभारण्याचे काम सुरू झाले. या जहाजांमधून पुष्कळ गुन्हेगारांना त्याचप्रमाणे त्यांच्या बायकामुलांना येथे उतरवण्यात आले; स्वतःच्या मायदेशापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या या नवीन ठिकाणालाच “घर” समजून त्या सर्वांना होता होईल तितके जुळवून घ्यावे लागले. पुढील २० वर्षांपर्यंत ही वसाहत कामचलाऊ तंबू आणि तात्पुरत्या घरांची बनलेली होती—बहुतेक घरे म्हणजे निव्वळ झोपड्या होत्या—कारण सुरवातीला गन्हेगारांच्या शिक्षेसाठीच ही वसाहत स्थापण्यात आली होती. परंतु १८१० साली, गव्हर्नर लॅकलन मकक्वारी सिडनीमध्ये आले आणि त्यांच्या ११ वर्षांच्या कालावधीत या वसाहतींचा पाहता पाहता कायापालट झाला.
शहराचा जन्म
मकक्वारीच्या निदर्शनाखाली, इंग्लंडहून त्याच्यासोबत आलेल्या एका वास्तुविशारदाने सिडनी शहरात आणि भोवतालच्या परिसरात पुष्कळ इमारती बांधल्या; यामध्ये त्याला एका सुटका झालेल्या कैद्याने मदत केली जो स्वतः एक वास्तुविशारद होता. यामुळे गुन्हेगारांच्या या वसाहतीला कायमपणाचे स्वरूप मिळाले. अर्थात गुन्हेगारांची संख्या भरपूर असल्यामुळे मजुरांची वाण नव्हती. शिवाय, बांधकामासाठी अगदी उपयुक्त असलेले वालुकाश्मही भरपूर प्रमाणात उपलब्ध होते.
बॉटनी बेच्या स्त्रिया (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात पोर्टिया रॉबिन्सन या लेखिका, वसाहतीच्या कायापालटाचे वर्णन अशाप्रकारे करतात: “ब्रिटनमधील वसाहतींमध्ये असते त्याचप्रमाणे येथेही सुखविलास, दारूबाजी आणि स्वैराचार पाहायला मिळेल अशा अपेक्षेनेच मकक्वारीच्या दशकाच्या उत्तरार्धात [१८१०-२१] न्यू साऊथ वेल्स येथे आलेले पर्यटक, मुक्त रहिवाशी, अधिकारी, सैनिक, खुद्द गुन्हेगार देखील येथील ‘सुसंस्कृतपणा’ पाहून थक्क झाले. झोपड्या आणि तंबूंऐवजी त्यांना ‘हॅनोवर स्क्वेअरला शोभतील असे प्रशस्त बंगले, . . . ऑक्सफोर्ड स्ट्रीटएवढे लांब रस्ते’ भव्य चर्चेस आणि सार्वजनिक इमारती, रस्ते आणि पूल, दुकाने आणि सर्व प्रकारचे व्यापार, मजुरांची लहानशीच पण टुमदार घरे, धनिक लोकांसाठी देखण्या गाड्या पाहायला मिळाल्या . . . ‘ती गुन्हेगारांची वसाहत वाटतच नव्हती’.”
सन १८२१ मध्ये, गव्हर्नर मकक्वारी सिडनी शहर सोडून गेले तोपर्यंत तेथे ५९ वाळूच्या खडकाच्या इमारती, २२१ विटांच्या इमारती आणि ७७३ लाकडी घरे उभारण्यात आली होती; शिवाय, सरकारी घरे आणि सार्वजनिक इमारती होत्या त्या वेगळ्या. आज, सुमारे ४० लाख लोकसंख्या असलेले हे सिडनी शहर, गुन्हेगारांच्या, मुक्त रहिवाशांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या कौशल्याला आणि या वसाहतीच्या आधीच्या गव्हर्नर्सच्या कल्पक दूरदृष्टीला आदरांजली आहे.
सिडनीचे ‘प्रचंड आणि विस्तीर्ण पात्र’
सिडनीचे रहिवाशी पोर्ट जॅकसनला सिडनी हार्बर म्हणत असले, तरी नेमके बंदर तीन भागांचे बनलेले आहे—मिडल हार्बर, नॉर्थ हार्बर आणि सिडनी हार्बर. परामाटा आणि लेन कोव या नद्या बंदरापासून पार उपनगरापर्यंत गेलेल्या आहेत.
सिडनी हार्बर हे जगातल्या नैसर्गिक बंदरांपैकी सर्वोत्तम असून त्याच्या ओबडधोबड वाळूच्या खडकांची किनारपट्टी २४० किलोमीटरपर्यंत विस्तारलेली आहे. सरळ रेषेत पाहिल्यास, बंदराच्या तोंडापासून ते परामाटा नदीला जाऊन मिळते तेथपर्यंतचे नेमके अंतर १९ किलोमीटर आहे आणि पाण्याच्या पृष्ठभागाचे एकूण क्षेत्रफळ ५४ चौरस किलोमीटर आहे. बंदराच्या किनाऱ्याजवळची खोली हे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे आणि सर्वात जास्त खोली ४७ मीटर इतकी मोजण्यात आली आहे. पॅसिफिक महासागरातून असलेल्या विलक्षण प्रवेशद्वारी दोन सुळ्यासारखे भूशिर आहेत—उत्तर भूशिर आणि दक्षिण भूशिर. या दोन्ही भूशिरांमधील अंतर फक्त एक-दोन किलोमीटर इतकेच आहे आणि बंदरामध्ये आतपर्यंत आल्याशिवाय ते केवढे मोठे आहे हे कळत नाही. यावरून, कॅप्टन कुकने या उपसागराला इतर उपसागरांसारखेच समजून या बंदराकडे दुर्लक्ष का केले हे नीट लक्षात येईल.
सन १७८८ मध्ये गव्हर्नर फिलिप्प यांनी सिडनी हार्बरविषयी असे म्हटल्याचे सांगितले जाते: ‘विस्तीर्णता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने माझ्या पाहण्यात आलेले हेच सर्वात उत्तम [बंदर] आहे आणि माझ्यासोबत असलेल्या सर्वात अनुभवी नाविकांनी देखील हे कबूल केले की, हे एक प्रचंड व विस्तीर्ण पात्र असून मोठाल्या जहाजांसाठी ते पुरेसे खोल आहे शिवाय, तेथे येणाऱ्या सर्व जहाजांसाठी उत्तम सुरक्षा आणि पुरेशी जागाही तेथे आहे.’
सिडनी हार्बरवरचा पूल—वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना
सन १८१५ सालीच बंदराच्या उत्तरेपासून दक्षिणेकडे जाण्यासाठी पुलाची आवश्यकता आहे यावर गंभीरपणे विचार केला जात होता, पण अहवालानुसार १८५७ साली पुलाचा सर्वप्रथम नकाशा तयार करण्यात आला. आज हा पूल, बंदराच्या दक्षिणेकडील डॉज पॉईंटपासून उत्तर किनाऱ्यावरील मिल्सन्स पॉईंटपर्यंत गेला आहे—अगदी सुरवातीला सुचवल्याप्रमाणेच! जगातील अखंड पुलांपैकी हा सर्वात लांब पूल बांधायला तब्बल नऊ वर्षे लागली आणि त्यासाठी जवळजवळ दोन कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतका खर्च आला—१९३० या दशकाच्या उत्तरार्धातील मंदीच्या काळात हा खर्च म्हणजे अवाढव्य होता. मार्च १९, १९३२ रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रचंड मोठ्या मध्यवर्ती कमानीची लांबी ५०३ मीटर असून त्याचे टोक पाण्यापासून १३४ मीटर उंच आहे. पुलाखालचे अंतर ५० मीटर असल्यामुळे सर्वात मोठे जहाज देखील सहजगत्या पुलाखालून जाऊ शकते. पुलाची रुंदी ४९ मीटर आहे आणि आधी त्यावर दोन रेलमार्ग, ट्रॅमसाठी दोन रूळ, सहापदरी रस्ता आणि दोन पादचारी पथ होते. १९५९ साली, सिडनीमध्ये बसने ट्रॅमची जागा घेतली म्हणून ट्रॅमच्या रूळांच्या जागी रस्ते करण्यात आले. सध्या मोटारगाड्या, बस आणि ट्रकसाठी आठपदरी रस्ते आहेत. पुलाच्या दोन्हीकडचे प्रवेश धरून पुलाची एकूण लांबी, १,१४९ मीटर इतकी आहे.
सन १९८० च्या दशकापर्यंत पुलावरील वाहतूक इतकी वाढली होती की, आणखी एक पूल बांधण्याचा विचार होऊ लागला. यावेळी पाण्याखालून वाट काढणे जास्त इष्ट वाटले. म्हणून ऑगस्ट १९९२ साली, चारपदरी हार्बर टनलचे उद्घाटन करण्यात आले.
पुलावरून फेरफटका मारल्याने सिडनी शहराचे विलोभनीय दर्शन घडते. बंदराच्या उत्तर दिशेला उताऱ्यांवरील वनराईत टराँगा प्राणीसंग्रहालय आहे. बंदराच्या विरुद्ध दिशेला, अगदी पुलाच्या खालोखाल, बेनेलाँग पाईंटवर सिडनीचे वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाऊस आहे.
बंदरावर सिडनीचे रत्न
“बेनेलाँग पॉईंटचे रत्न” असे संबोधले जाणारे सिडनीचे ऑपेरा हाऊस तिन्ही बाजूंनी सिडनी बंदराच्या निळ्याशार पाण्यांनी वेढलेले आहे. सूर्याच्या तेजोमय प्रकाशात ते एखाद्या रत्नासारखेच दिसते. रात्रीच्या वेळी, गॉथिक पद्धतीची ही खवले ऑपेरा हाऊसच्या प्रकाशात चकाकत असतात.
कल्पना वास्तवात साकार (इंग्रजी) या पुस्तकाच्या प्रस्तावनेत, ऑपेरा हाऊस पाहिल्यावर काय वाटते याचे वर्णन दिले आहे: “सिडनी ऑपेरा हाऊसकडे प्रत्येक वेळी वेगळ्या दिशेने किंवा वेगळ्या प्रकाशात पाहिल्यास त्याचे रूप प्रत्येक वेळी वेगळे वाटते. . . . पहाटेच्या धुक्यात किंवा संधिप्रकाशात पाहिल्यास ही शिंपले जणू राक्षसांच्या दंतकथेतील शिरस्राणासारखीच दिसतात.”
ऑपेरा हाऊसच्या डिझाईनची कल्पना, डेनिश वास्तुविशारद, जॉर्न उटझन यांची होती; देशोदेशीच्या २०० लोकांनी भाग घेतलेल्या एका डिझाईन स्पर्धेत सरतेशेवटी त्यांचीच निवड करण्यात आली होती. परंतु, त्या डिझाईनचे काही भाग बांधणे अशक्य आहे असे मत पडल्यामुळे बरेच बदल करावे लागले.
लंडनच्या वास्तुविशारदेची पत्रिका (इंग्रजी) यामध्ये त्याचे वर्णन, “कल्पनेतल्या अद्भुत शिल्पकलेचा भव्य साक्षात्कार” असे करण्यात आले होते. तरीही, हे स्वप्न वास्तवात साकार करताना मोठमोठाल्या स्थापत्यशास्त्राच्या अडीअडचणी सामोऱ्या आल्या. सर ओव आरुप आणि जॅक झुन्स हे दोन स्थापत्यविशारद म्हणाले: “सिडनी ऑपेरा हाऊसचे . . . बांधकाम धाडसी होते. . . . त्याचे बांधकाम इतक्या असामान्य परिस्थितींमध्ये झाल्यामुळे शिवाय त्याच्या समस्या इतक्या कठीण असल्यामुळे नवीन तंत्रांचा विकास होण्यासाठी . . . अनोख्या संधी निर्माण झाल्या. तेव्हापासून, यांतील अनेक तंत्रे रूढीबद्ध पद्धतींच्या पुलांसाठी आणि बांधकामांसाठी वापरण्यात आली आहेत.”
या ऑपेरा हाऊसच्या खर्चाचा पहिला अंदाज होता ७० लाख ऑस्ट्रेलियन डॉलर. पण १९७३ मध्ये बांधकाम पूर्ण होईपर्यंत १०.२ कोटी डॉलर इतका अवाढव्य खर्च झाला होता!
ऑपेरा हाऊसचा फेरफटका
छतावरच्या खवलेदार घुमटांच्या तोंडाशी दोन तावदाने लावली आहेत; ऑपेरा हाऊसच्या लॉबीत प्रवेश केल्या केल्या या तावदानांमधून शिरलेला सूर्यप्रकाश सर्वत्र पसरलेला दिसतो. इमारतीच्या भोवती, चक्क ६,२२५ चौरस मीटरची खास फ्रान्समध्ये तयार केलेली काच लावलेली आहे. नंतर आपण कॉन्सर्ट हॉलमध्ये येतो. मागच्या बाजूला उभे राहून २,६९० आसनांचा तो हॉल पाहत असता एक ट्रॅकर ऑर्गन नजरेस पडतो. हा जगातला सर्वात मोठा यांत्रिक ट्रॅकर ऑर्गन असून त्यात १०,५०० बाजे आहेत.a हॉलचे छत २५ मीटर उंच असल्यामुळे त्याचा घनाकार २६,४०० क्युबिक मीटर इतका होतो. यामुळे “प्रतिध्वनी उमटण्यास जास्तीत जास्त दोन सेकंद लागतात आणि म्हणून वाद्यसंगीताचे सूर कमालीचे परिपूर्ण, सघन आणि मुलायम ऐकू येतात,” असे एका मार्गदर्शक पुस्तिकेत म्हटले आहे.
बाकीची तीन रंगमंदिरे देखील इतकीच भव्य आहेत; ती रंगमंदिरे ऑपेरा, सिंफनी कॉन्सर्ट, बॅले, चित्रपट, सोलो रिसायटल, नाटक, चेम्बर म्युझिक, प्रदर्शने आणि अधिवेशनांसाठी बनवण्यात आली होती. ऑपेरा हाऊसमध्ये एकूण १,००० खोल्या आहेत. त्यामध्ये रेस्टॉरंट, प्रसाधन कक्ष आणि इतर सुविधा देखील आहेत.
प्राणीसंग्रहालयात जायला विसरू नका!
तुम्ही जर सिडनीचे दर्शन करणार असलात, तर बंदराभोवती बोटीतून किंवा होडीतून अवश्य फेरी मारा. याचे नक्कीच सार्थक होईल. बोटीतून टराँगा प्राणीसंग्रहालयाला भेट द्या. ऑस्ट्रेलियाला येणाऱ्या सर्वच पर्यटकांना ऑस्ट्रेलियन जंगल आणि वन्यजीवन पाहण्याची संधी मिळत नाही. म्हणून, एक दिवस प्राणीसंग्रहालयात घालवल्याने ऑस्ट्रेलियाच्या “ग्रामीण भागाचे” सोयीस्कर दर्शन होऊन जाईल. प्राणीसंग्रहालयात ऑस्ट्रेलियाचे अनोखे वन्यजीवन पाहायला मिळेल—कांगारूंपासून कोआलांपर्यंत आणि प्लॅटिपसपासून डिंगोपर्यंत सर्वकाही. ऑपेरा हाऊसच्या शेजारहून निघणाऱ्या बोटीतून प्राणीसंग्रहालयाला जायला फक्त काही मिनिटे लागतात. सिडनीच्या अगदी मध्यभागी असलेले हे प्राणीसंग्रहालय जगातल्या सर्वोत्कृष्ट प्राणीसंग्रहालयांत गणले जाते. बंदराच्या परिसरात, विनामूल्य मनोरंजन करणारे बरेच लोक आढळतात—ॲक्रोबॅट्स, डिगरीडू (एक ॲबोरिजनल सुषिर वाद्य) वाजवणारे ॲबोरिजन लोक किंवा जॅझ संगीत वादक.
सिडनीचा प्रवास तुम्हाला निश्चित आवडेल याची आम्हाला खात्री आहे. दक्षिण पॅसिफिकच्या निळ्याशार पाण्याची पार्श्वभूमी लाभलेल्या विलक्षण बंदरावर वसलेले हे खरोखरच उत्साहपूर्ण शहर आहे. आणि कोण जाणे, तुम्ही आलाच तर कदाचित खास तुमच्यासाठी बारबेक्यू केलेल्या कोळंबीचा बेत करू!
[तळटीपा]
a ट्रॅकर ॲक्शन ही एक यांत्रिक पद्धत आहे ज्यामध्ये बाज्यांमध्ये हवा पाठवली जाते आणि त्यामुळे वादक अधिक हळुवार हाताने वाद्य वाजवू शकतो.
[१४ पानांवरील नकाशा]
(For fully formatted text, see publication)
सिडनी
सिडनी हार्बर पूल
पोर्ट जॅकसन
सिडनी
मॅन्ली बीच
बॉटनी बे
[१५ पानांवरील चित्र]
सिडनीचा केंद्रीय व्यापार परिसर
[१५ पानांवरील चित्र]
बॉटनी बेमध्ये ‘बाऊंटीचे’ प्रतिरूप
[१५ पानांवरील चित्र]
सिडनीच्या मुख्य व्यापार केंद्रात हवाई ट्रेन
[चित्राचे श्रेय]
By courtesy of Sydney Opera House Trust (photograph by Tracy Schramm)
[१७ पानांवरील चित्र]
सिडनीचे ऑपेरा हाऊस आणि हार्बर पूल
[१७ पानांवरील चित्र]
ऑपेरा हाऊसची आतील बाजू, शिवाय १०,५००-बाजांचा ऑर्गन
[चित्राचे श्रेय]
By courtesy of Australian Archives, Canberra, A.C.T.
[१८ पानांवरील चित्र]
मॅन्ली बीच, सिडनी