निकोप मानसिक दृष्टिकोन कसा राखावा
आपण जे काही सेवन करतो त्यावर पुष्कळ प्रमाणात आपले शारीरिक आरोग्य अवलंबून असते. नियमितपणे आरोग्याला हितकर नसलेले अन्न खाल्ल्याने कालांतराने प्रकृती बिघडू शकते. हेच तत्त्व मानसिक आरोग्याच्या बाबतीतही लागू होते.
उदाहरणार्थ, आपल्या मनात भरणाऱ्या गोष्टींना आपण मानसिक खाद्य म्हणू शकतो. मानसिक खाद्य? होय, शारीरिक आहाराचा शरीरावर परिणाम होतो त्याचप्रमाणे पुस्तके, मासिके, टीव्हीवरचे कार्यक्रम, व्हिडिओ, व्हिडिओ खेळ, इंटरनेट आणि गीतांचे बोल या सर्वांमधून घेतली जाणारी माहिती देखील आपल्या विचारपद्धतीवर आणि आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करू शकते. कशाप्रकारे?
भूतपूर्व जाहिरात अध्यक्ष, जेरी मॅन्डर यांनी टीव्हीचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो त्याविषयी लिहिले: “इतर कोणत्याही प्रभावापेक्षा टीव्हीच आपल्या मनावर ठसा उमटवण्यात सर्वात प्रभावकारी आहे.” परंतु, मनावर उमटलेली ती चित्रे फक्त आपले मनोरंजन करत नाहीत. द फॅमिली थेरपी नेटवर्कर हे मासिक म्हणते: “प्रसार माध्यमांची भाषा, चित्रे, आवाज, कल्पना, पात्रे, दृश्ये, मूल्ये, सौंदर्याविषयीचे तत्त्व हीच आपल्या विचारांचा, भावनांचा आणि कल्पनांचा विषय बनतात.”
होय, टीव्हीवर आपण पाहत असलेल्या कार्यक्रमांचा आणि इतर मनोरंजनाच्या प्रकारांचा आपल्या विचारांवर आणि भावनांवर कळत नकळत प्रभाव पडू शकतो. नेमका येथेच धोका संभवतो. मॅन्डर म्हणतात त्याप्रमाणे, “आपल्या मनावर जी चित्रे उमटलेली असतात तसेच आपण हळूहळू बनतो.”
मेंदूसाठी विष
पुष्कळजण आपल्या शारीरिक आहाराबद्दल फार काटेकोर असतात; पण तेच लोक प्रसार माध्यमांतून दिले जाणारे सटरबटर मानसिक खाद्य मात्र अविचारीपणे खातात. उदाहरणार्थ, कोणाला असे म्हणताना तुम्ही ऐकले आहे का: “टीव्हीवर एकही चांगला कार्यक्रम लागत नाही!” काहीजण जणू मंतरल्याप्रमाणे टीव्हीचे फक्त चॅनल बदलत बसतात—त्यांना वाटते एखादा चांगला कार्यक्रम लागलाच तर लागेल. टीव्ही बंद करून टाकावा हा विचार त्यांच्या मनाला शिवतही नाही!
वेळखाऊ असण्याखेरीज टीव्हीवरचे पुष्कळसे कार्यक्रम ख्रिस्ती लोकांसाठी उचित नसतात. ललितकलेच्या विषयाचे लेखक गॅरी कोटुकयान असे म्हणतात, “पूर्वीपेक्षा आजकाल, टीव्हीवरती अश्लीलतेशिवाय आक्षेपार्ह आणि लैंगिक गोष्टीही सर्रास दाखवल्या जात आहेत.” संयुक्त संस्थानांतील अलीकडील अभ्यासात असे आढळले की, टीव्हीच्या प्रमुख प्रसारण वेळेत प्रत्येक तासामध्ये सरासरी २७ वेळा लैंगिक दृश्ये दाखवली जातात.
याचा लोकांच्या विचारांवर काय परिणाम होत असावा असा प्रश्न पडतो. जपानमध्ये, टीव्हीवरील एका लोकप्रिय कार्यक्रमाने पुष्कळ लोक प्रभावित झाले; त्याविषयी त्या राष्ट्राच्या वृत्त माध्यमाने असे म्हटले की, टीव्हीवरील त्या कार्यक्रमामुळे सबंध देशात जणू “व्यभिचाराची लाट” आली. शिवाय, अमेरिकेवर एक नजर (इंग्रजी) या पुस्तकाचे लेखक म्हणतात: “आज लैंगिक वर्तणुकीचे बहुतेक प्रकार . . . व्यक्तिगत जीवनशैलीच्या योग्य निवडी मानल्या जातात.”
लैंगिक विषयांवर भर देणारे टीव्हीवरचे कार्यक्रम, समस्येचा केवळ एक भाग आहेत. हिंसाचाराची उघड दृश्ये दाखवणे देखील सामान्य झाले आहे. कोवळ्या, सहज प्रभावित होणाऱ्या तरुण मुलांवर टीव्हीच्या हिंसक कार्यक्रमांमुळे आणि चित्रपटांमुळे होणारा हानीकारक परिणाम विशेष चिंतेची बाब आहे. निवृत्त लष्कर अधिकारी आणि हत्येमागील मानसिकता या विषयावरचे तज्ज्ञ, डेव्हिड ग्रोसमन म्हणतात, “लहान मुले जेव्हा टीव्हीवरती गोळी मारणे, भोसकणे, बलात्कार, अत्याचार, अपमान किंवा खून पाहतात तेव्हा ते खरेच घडत आहे असे त्यांना वाटत असते.” याच समस्येविषयी बोलताना, अमेरिकन वैद्यकीय संस्थेची पत्रिका (इंग्रजी) असे विवेचन देते: “३ किंवा ४ वर्षांचे होईस्तोवर पुष्कळ मुलांना टीव्हीच्या कार्यक्रमांमधील वास्तविकता आणि काल्पनिकता यांच्यातला फरक कळत नसतो आणि प्रौढांनी समजावले तरीही त्यांना फरक कळत नसतो.” दुसऱ्या शब्दांत, पालकाने आपल्या मुलाला, ‘बाळा, ते लोक खरोखर मेले नाहीत; ते फक्त मरण्याचं नाटक करताहेत,’ असे सांगितले तरीही त्या लहान मुलाला त्यातला फरक कळत नाही. लहान मुलाला टीव्हीवरची हिंसा खरी वाटत असते.
‘प्रसार माध्यमातील हिंसेच्या’ प्रभावाविषयी टाईम पत्रिकेने सारांशात असे म्हटले: “टीव्हीवरील आणि चित्रपटांमधील रक्तपाताचा लहान मुलांवर प्रभाव पडतो याबद्दल आक्षेप घेण्याचे संशोधकांनी आता सोडून दिले आहे.” कोणता प्रभाव? “दशकानुदशकांपासून हिंसक मनोरंजन दाखवले गेल्यामुळे लोकांचे विचार आणि नीतिमूल्ये बदलली गेली आहेत,” असे चित्रपट टीकाकार मायकल मेडवेड म्हणतात. ते पुढे म्हणतात: “ज्या समाजाला काही म्हणून काहीच धक्केदायक वाटत नाही, तो समाज प्रगतीच्या पथावर निश्चितच नाही.” म्हणूनच, एका लेखकाने म्हटले की, चार वर्षांच्या मुलाला हिंसक चित्रपटांना नेणे म्हणजे त्याच्या “[त्याच्या] मेंदूसाठी विष आहे.”
अर्थात, याचा अर्थ टीव्हीवरचे सगळेच कार्यक्रम वाईट असतात असे नाही. हेच, पुस्तके, मासिके, व्हिडिओ, कम्प्युटर खेळ आणि इतर मनोरंजनाच्या प्रकारांबाबतीतही खरे ठरते. तथापि, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, निकोप मानसिक दृष्टिकोन राखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी मनोरंजनाच्या नावाखाली येणाऱ्या बहुतेक गोष्टी अनुचित असतात.
विचारीपणे मनोरंजन निवडा
डोळ्यांकरवी आपल्या मनावर उमटणाऱ्या चित्रांचा आपल्या विचारांवर आणि कार्यांवर खूप प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, नियमितपणे अनैतिक मनोरंजन मनात भरवत राहिल्यास, “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा” ही बायबलची आज्ञा पाळण्याचा आपला निर्धार डगमगू शकतो. (१ करिंथकर ६:१८) त्याचप्रमाणे, ‘अनीती करणाऱ्या मनुष्यांचे’ मनोरंजन आपण आवडीने पाहत असलो, तर “सर्व माणसांबरोबर . . . होईल तितके शांतीने” राहणे आपल्याला जमणार नाही. (स्तोत्र १४१:४; रोमकर १२:१८) हे टाळण्यासाठी आपण ‘अनुचित गोष्टींपासून’ आपली नजर फिरवली पाहिजे.—स्तोत्र १०१:३; नीतिसूत्रे ४:२५, २७.
वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेमुळे आपणा सर्वांना उचित गोष्ट करण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो हे मान्य आहे. प्रेषित पौलाने प्रामाणिकपणे असे कबूल केले: “माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करितो; तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो.” (रोमकर ७:२२, २३) याचा अर्थ पौलाने आपल्या शारीरिक कमतरतांपुढे हात टेकले का? मुळीच नाही! तो म्हणाला: “मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी . . . स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.”—१ करिंथकर ९:२७.
आणखी एक गोष्ट म्हणजे, आपल्या अपरिपूर्णतेला आपण पाप करण्यासाठी बहाणा बनवू नये. यहूदा या बायबल लेखकाने म्हटले: “प्रियांनो, . . . जो विश्वास एकदाच पवित्रांना सोपून दिला होता तो राखण्यास तुम्ही फार झटावे असा बोध करून तुम्हास लिहिण्याचे मला अगत्य वाटले.” (यहूदा ३, ४, पं.र.भा.) होय, आपल्याला ‘फार झटण्याची’ आणि वाईट काम करण्यास प्रवृत्त करणारे मनोरंजन टाळण्याची गरज आहे.a
देवाची मदत घ्या
या व्यवस्थीकरणात निकोप मानसिक दृष्टिकोन बाळगणे नेहमीच सोपे नाही. तथापि, बायबल याची खात्री पुरवते की, मानसिक त्याचप्रमाणे नैतिक शुद्धता राखणे शक्य आहे. कसे? स्तोत्र ११९:११ येथे असे वाचायला मिळते: “मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे.”
देवाची वचने जपून ठेवणे म्हणजे त्यांना बहुमोल किंवा अति मौल्यवान समजणे. स्पष्टतः, बायबल काय म्हणते तेच माहीत नसले, तर बायबलला मौल्यवान समजणे कठीण आहे. देवाच्या वचनातून अचूक ज्ञान घेतल्याने, आपण देवाचे विचार आत्मसात करत असतो. (यशया ५५:८, ९; योहान १७:३) यामुळे आध्यात्मिकरित्या आपली प्रगती होते आणि आपली विचारसरणी सुधारते.
एखादी गोष्ट आध्यात्मिकरित्या आणि मानसिकरित्या हितकर आहे हे ठरवण्याचा काही विश्वसनीय मापदंड आहे का? निश्चितच! प्रेषित पौलाने असा सल्ला दिला: “जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुति, त्यांचे मनन करा.”—फिलिप्पैकर ४:८.
परंतु, खरा लाभ मिळवण्याकरता फक्त देवाचे ज्ञान मिळवणेच पुरेसे नाही. संदेष्ट्या यशयाने देवाच्या प्रेरणेने असे लिहिले: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.” (तिरपे वळण आमचे.) (यशया ४८:१७) होय, फक्त ईश्वरी मार्गदर्शन मिळवून गप्प बसू नये तर त्या ज्ञानानुसार कार्य करण्याचीही गरज आहे.
नैतिक आणि आध्यात्मिक लाभ मिळवण्याचा आणखी एक मार्ग आहे, ‘प्रार्थना ऐकणाऱ्या’ यहोवाचा धावा करणे. (स्तोत्र ६५:२; ६६:१९) प्रामाणिकतेने आणि नम्रतेने आपण आपल्या निर्माणकर्त्याकडे गेलो, तर आपली विनंती तो ऐकेल. आपण त्याला ‘शोधले तर तो आपल्याला सापडेल.’—२ इतिहास १५:२, पं.र.भा.
तर मग, या हिंसक आणि अनैतिक जगात आपली मानसिक प्रकृती टिकवून ठेवणे शक्य आहे का? निश्चितच! या जगिक मनोरंजनाने आपले मन कोडगे होऊ न दिल्याने, देवाच्या वचनाचा अभ्यास करून आपली विचारसरणी अधिक सक्षम केल्याने आणि ईश्वरी मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न केल्याने आपण निकोप मानसिक दृष्टिकोन राखू शकतो!
[तळटीपा]
a हितकर मनोरंजनाची निवड करण्यासंबंधी अधिक माहितीसाठी पाहा सावध राहा!, जून ८, १९९७, पृष्ठे ८-१०.
[९ पानांवरील संक्षिप्त आशय]
“पुष्कळ मुलांना टीव्हीच्या कार्यक्रमांमधील वास्तविकता आणि काल्पनिकता यांच्यातला फरक कळत नसतो”
[११ पानांवरील संक्षिप्त आशय]
“दशकानुदशकांपासून हिंसक मनोरंजन दाखवले गेल्यामुळे लोकांचे विचार आणि नीतिमूल्ये बदलली गेली आहेत”
[११ पानांवरील चौकट]
हृदय विकाराचा धोका कमी करणे
न्यूट्रिशन ॲक्शन हेल्थलेटर, हृदय विकाराचा धोका कसा कमी करावा त्यासाठी पुढील उपाय सुचवते.
• धूम्रपान थांबवा. आजच थांबवले, तर एका वर्षाच्या आत हृदय विकाराचा धोका कमी होऊ शकतो, वजन वाढले तरीही.
• वजन कमी करा. प्रमाणापेक्षा जास्त वजन असल्यास, फक्त पाच ते दहा पौंड वजन कमी केले तरीही पुष्कळ फरक पडू शकतो.
• व्यायाम. नियमित व्यायामाने (आठवड्यातून निदान तीन वेळा) हानीकारक कोलेस्ट्रॉलचे (एलडीएल) प्रमाण कमी करण्यात, रक्तदाब संतुलित राखण्यास आणि प्रमाणाबाहेर वजन न वाढवण्यास मदत मिळते.
• आपल्या आहारात संतृप्त मेदाचे प्रमाण कमी ठेवा. तुमचे एलडीएल जास्त असल्यास, कमी चरबी असलेले मटण खाण्यास सुरवात करा आणि नेहमीचे दूध घेण्याऐवजी मेदाचे प्रमाण कमी असलेले दूध किंवा स्किम (वसारहित) दूध घेऊन पाहा.
• मद्याचे प्रमाण मर्यादित ठेवा. माफक प्रमाणात रेड वाईन घेतल्यास हृदय विकाराचा धोका कमी होऊ शकतो असे दिसून आले आहे.
• द्रावणीय तंतूमय पदार्थांचे जास्त प्रमाण असलेली फळे, भाज्या आणि इतर अन्नपदार्थांचे सेवन करा.
[८ पानांवरील चित्र]
टीव्हीवरील हिंसा लहान मुलाच्या मेंदूकरता जणू विष आहे
[९ पानांवरील चित्र]
लहान मुले काहीवेळा टीव्हीवरील हिंसेची नकल करतात
[१० पानांवरील चित्र]
आपल्या मुलांना विविध प्रकारचे वाचनीय साहित्य पुरवून पालक त्यांची मदत करू शकतात