प्रकृती कशी सांभाळावी
आपल्या प्रकृतीवर कशाचा सर्वात जास्त विपरीत परिणाम होईल हे ठरवणे आजकाल कठीण आहे. प्रसारमाध्यमांनी आहार, व्यायाम, पूरक असणारे पौष्टिक पदार्थ आणि प्रकृतीशी संबंधित असलेल्या इतर अनेक गोष्टींविषयी भरमसाट माहिती बाजारात उपलब्ध करून दिली आहे. पण, दुःखाची गोष्ट म्हणजे यातील बहुतेक माहिती परस्परविरोधी आहे. डेनिस ग्रेडी हे वैज्ञानिक विषयांवरील लेखक म्हणतात: “वैद्यकीय पत्रिकेत प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक नवीन शोधानुसार, लोकांनी काय खावे, कोणती औषधे घ्यावीत आणि नेमके कसे राहावे याबद्दलचा सल्लाही आधी दिलेल्या सल्ल्याच्या अगदीच विरोधात असतो.”
काही डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, आरोग्य टिकवून ठेवण्याविषयीच्या प्रत्येक नवीन सल्ल्याचा प्रयोग करून पाहण्याऐवजी मूलभूत नियम पाळणे हेच सर्वात उत्तम. उदाहरणार्थ, अमेरिकन वैद्यकीय संघटना कौटुंबिक वैद्यकीय मार्गदर्शक (इंग्रजी) म्हणते: “जीवनशैलीत बदल करण्यासाठी विधायक पावले उचलून आणि कोणताही रोग झाला असेल तर तो लक्षात यावा आणि त्यावर लवकरात लवकर उपचार केला जावा म्हणून नियमितपणे वैद्यकीय तपासणी करून आयुष्यभर शारीरिक स्वास्थ्य सांभाळता येते.” परंतु, ‘जीवनशैलीत कोणते सकारात्मक बदल’ केल्याने सर्वाधिक फायदा होईल? आपण तीन बदल पाहू या.
स्वास्थ्यकारी भोजन निवडा
वैद्यकीय तज्ज्ञ असे सुचवतात की, आपल्या आहारात विविधता असावी. शिवाय, सर्वात जास्त कॅलरी मिळवण्याकरता आपल्या आहारात विशेषतः धान्य, द्विदल धान्य, भाज्या आणि फळे यांसारख्या कठीण पिष्टमय पदार्थांचा समावेश असायला पाहिजे.a तथापि, आपण काय खातो हेच नव्हे तर किती खातो याचाही आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. मर्यादेने भोजन करणे महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराला उपयोगी आहे त्यापेक्षा अधिक कॅलरींचे सेवन केल्याने लठ्ठपणा येतो. यामुळे हृदयावर दाब पडू शकतो, शरीर कमजोर होऊ शकते आणि “हृदयरोग, मधुमेह, संधिवात आणि इतर अनेक विकार होण्याची शक्यता वाढू शकते,” असे एक वैद्यकीय मार्गदर्शक पुस्तक म्हणते.
अलीकडील वर्षांमध्ये, आहारातील मेदाच्या प्रमाणाकडे पुष्कळ लक्ष देण्यात आले आहे. अनेक स्वास्थ्य तज्ज्ञांचे असे मत आहे की, संतृप्त मेदाचे जास्त प्रमाण असलेल्या आहाराने हृदय विकाराचा आणि काही विशिष्ट कर्करोगांचा धोका वाढतो. परंतु, याचा अर्थ आपण आपल्या आहारात मेद संपूर्णतः टाळावा असे नाही. मारी ॲबॉट हेस्स, अमेरिकन आहारविषयक संघटनेच्या भूतपूर्व अध्यक्षा म्हणतात की, “आदर्श संतुलित आहारात आपल्या सर्व आवडीच्या वस्तूंचा ठराविक प्रमाणात समावेश करता येतो, तोही दररोज.” त्यामुळे, लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे, प्रमाण कमीच ठेवावे आणि इतर मेदयुक्त पदार्थ टाळावेत.
एवढे खरे की, खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी लावून घेणे ही काही सोपी गोष्ट नाही. काहींचे म्हणणे तर असे असेल, की आवडते पदार्थ खाता येत नाहीत तर जगण्यात काय अर्थ? पण, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असे धोरण ठेवण्यापेक्षा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करावा. खरे तर, काही विशिष्ट पदार्थ संपूर्णतः खाण्याचे सोडूनच द्यायचे नसतात तर फक्त त्यांचे प्रमाण कमी करायचे असते. आधी उल्लेखिलेले कौटुंबिक वैद्यकीय मार्गदर्शक पुस्तक असे म्हणते: “आरोग्यदायी जीवनशैली म्हणजे जीवनात काही मौजमजा करायचीच नाही असे नाही.”
आहार तज्ज्ञ असे सुचवतात की, आहारात बदल करण्याची सोपी पद्धत म्हणजे शरीराला स्वास्थ्यकारी नसलेले पदार्थ हळूहळू कमी करणे. उदाहरणार्थ, प्रत्येक दिवसाचा नव्हे तर आठवड्याचा आहार नियंत्रणात ठेवा. सध्या तुम्ही दररोज बीफ किंवा शेळी-मेंढीचे मटण खात असला, तर आठवड्यातून फक्त तीन वेळा खाण्याचा प्रयत्न करा. हेच संतृप्त मेदाचे प्रमाण जास्त असलेल्या लोणी, चीज, आईस्क्रिम यांसारख्या पदार्थांच्या बाबतीत त्याचप्रमाणे मेदयुक्त अल्पोपहारांबाबतीतही खरे ठरते. मेदयुक्त पदार्थ इतके कमी करण्याचे लक्ष्य असावे की एकूण कॅलरींमध्ये त्यांचे प्रमाण केवळ ३० टक्के असावे.
हार्वर्ड विद्यापीठाचे डॉ. वॉल्टर विलेट असा इशारा देतात की, मेदयुक्त पदार्थांचे प्रमाण कमी करून पिष्टमय पदार्थांचे आणि शर्करेचे जास्त सेवन करू नये. यामुळे बहुधा वजन वाढते. आहारातील मेद आणि पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी करणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
संतुलित व्यायाम
स्वास्थ्यकारी जीवनशैलीकरता नियमित व्यायामाची जोड असायलाच पाहिजे. शारीरिक स्वास्थ्यासंबंधी अमेरिकेच्या सर्जन जनरलच्या अहवालाचे संपादक डॉ. स्टीव्हन ब्लेअर असे म्हणतात: “बैठी जीवनशैली असलेले लोक माफक प्रमाणात व्यायाम करू लागतात तेव्हा हृदय विकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण निम्म्याने कमी होते.” पण, आजकाल बहुतेक लोक माफक प्रमाणातही शारीरिक हालचाल करत नाहीत ही खेदाची गोष्ट आहे. उदाहरण म्हणून, संयुक्त संस्थानांत, ४ पैकी १ व्यक्ती कोणत्याच प्रकारची शारीरिक हालचाल करत नाही. कॅनडात, १९९७ शारीरिक कार्यहालचालींचे प्रमाण (इंग्रजी) असे शीर्षक असलेल्या एका अभ्यासात असे आढळले की, “कॅनडातील ६३ टक्के लोक दिवसातील एक ताससुद्धा शारीरिक हालचाल करत नव्हते,” असे वृत्त द टोरेंटो स्टारने दिले. तसेच ब्रिटनमधील संशोधकांचे म्हणणे आहे की, त्यांनी अभ्यासलेला लहान मुलांचा एक गट “इतका अक्रियाशील होता की जागेपणी आणि झोपलेले असताना त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये जवळजवळ काहीच फरक नव्हता.”—द संडे टाईम्स.
आधी असे समजले जायचे की, कष्टदायी एरोबिक व्यायाम केल्यानेच आरोग्याला फायदा होतो. परंतु, शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी असे कष्टदायी व्यायाम आवश्यक नाहीत. त्याउलट, “दिवसा [सौम्य व्यायामाने] फक्त १५० कॅलरी घटवल्या तरी हृदय विकार, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि मधुमेह यांचा धोका कमी होऊ शकतो,” असे सर्जन जनरलच्या अहवालात म्हटले आहे.
व्यायाम निवडताना तुम्हाला आवडेल असा व्यायाम निवडणे महत्त्वाचे आहे. नाहीतर, तुम्ही तो दररोज करणार नाही. तुम्ही कोणता व्यायाम करता हे महत्त्वाचे नाही तर कितीदा करता हे महत्त्वाचे आहे. एक सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्व म्हणून अमेरिकन राष्ट्रीय आरोग्य संस्था असे सुचवते की, “लहान मुलांनी तसेच प्रौढांनी देखील आठवड्यातील बहुतेक दिवशी, जमल्यास दररोज, निदान ३० मिनिटे तरी सर्वसाधारण प्रकारचा शारीरिक व्यायाम करावा.”
कोणता व्यायाम सर्वसाधारण प्रकारात मोडतो? पोहणे, भरभर चालणे, सायकल चालवणे, मोटार गाडी धुणे आणि पॉलिश करणे, पायऱ्या चढणे आणि अंगण स्वच्छ करणे. सुदृढ राहण्यासाठी जिममध्ये किंवा हेल्थ क्लबमध्ये जाण्याची गरज नाही. परंतु एक सावधानतेचा इशारा: वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्हाला हृदय विकाराचा त्रास असला किंवा तुम्ही चाळिशी ओलांडलेले पुरुष असला अथवा पन्नाशी ओलांडलेल्या स्त्री असला, तर कोणताही व्यायाम सुरू करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
धूम्रपान, मादक औषधे आणि मद्य यांच्याबद्दल काय?
धूम्रपान: सिगारेटीच्या धुरात आरोग्याला हानीकारक असलेले ४,००० पेक्षा अधिक घटक आहेत; त्यांतील २०० घटक विषारी म्हणून ओळखले जातात. विषारी घटकांचे प्रमाण कितीही असले, तरी धूम्रपानाचा आरोग्यावर विनाशकारी परिणाम होतो यात काहीच शंका नाही. तंबाखूने जितके मृत्यू घडतात तितके इतर कशानेही घडत नाहीत. उदाहरणार्थ, संयुक्त संस्थानांत, मोटारगाड्यांच्या अपघातांमध्ये मरणाऱ्या व्यक्तींपेक्षा तंबाखूसंबंधित रोगांमुळे मरणाऱ्या लोकांचे प्रमाण दहा पटींनी अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, जगभरात धूम्रपानामुळे दरवर्षी ३० लाख लोकांवर मृत्यू ओढवतो!
कर्करोग आणि हृदय विकार होण्याचा धोका वाढण्याखेरीज धूम्रपान करणाऱ्यांना धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा सर्दी, पोटाचे अल्सर, दीर्घकालिक श्वासनलिकादाह आणि उच्च रक्तदाब हे विकार जास्त होतात. धूम्रपानामुळे गंध आणि चव घेण्याची शक्ती देखील नाहीशी होते. स्पष्टतः, धूम्रपान सोडून देणे हाच चांगल्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे. परंतु, मादक औषधे आणि मद्यपान यांविषयी काय?
मादक औषधे: सबंध जगभरात मादक औषधांनी मानवांना प्रचंड हानी पोहंचवली आहे. यु.एस. आरोग्य आणि मानव सेवा विभाग म्हणतो: “दरवर्षी, मादक औषधांमुळे १४,००० अमेरिकन मरण पावतात.” पण मादक औषधांच्या या व्यापाराचा परिणाम फक्त बेकायदेशीरपणे मादक औषधांचा वापर करणाऱ्यांवरच होत नाही. ही सवय पुरवण्यासाठी पुष्कळसे व्यसनी हिंसा आणि गुन्हेगारीच्या मार्गाने पैसे मिळवतात. बाल अपराधाचे समाजशास्त्र (इंग्रजी) म्हणते: “क्रॅक [कोकेनचे] वाटप करणाऱ्या गटांमधील स्पर्धांमुळे शहरातल्या काही गरीब वसत्या तर चक्क ‘धोकेदायक क्षेत्रे’ बनली आहेत; तेथे इतके खून होतात की, पोलिसांनी त्या ठिकाणांना बेबंदशाहीची ठिकाणे म्हणून सोडून दिले आहे.”
अर्थात, मादक औषधांचा दुरुपयोग ही केवळ संयुक्त संस्थानांतच आढळणारी समस्या नाही. एका अंदाजानुसार, जगभरामध्ये दरवर्षी १,६०,००० ते २,१०,००० लोक मादक औषधे अंगात टोचून घेतल्याने मरण पावतात. याशिवाय, कोट्यवधी लोक इतर प्रकारचे हानीकारक मादक पदार्थ वापरतात जसे की, खट (हिरव्या पानाचा एक मादक पदार्थ), सुपारी, आणि कोकेन.
दारू: क्रॅक कोकेन आणि हेरॉईनसारख्या हानीकारक मादक पदार्थांकडे जनतेचे लक्ष वेधले जाते, परंतु दारूने होणारे नुकसान त्याहूनही जास्त आहे. द मेडिकल पोस्ट असे वृत्त देते की, मद्यपानाच्या समस्येचा “१० कॅनेडियन लोकांपैकी एकावर परिणाम होतो आणि आरोग्य निगा व्यवस्थेला दरवर्षी त्याचा १० अब्ज डॉलर्स इतका फटका बसतो.” संयुक्त संस्थानांमध्ये, मोटारगाड्यांच्या प्राणघातक अपघातांची आणि आग लागण्याची ५० टक्के प्रकरणे, पाण्यात बुडण्याची ४५ टक्के प्रकरणे आणि पादचाऱ्यांचे ३६ टक्के अपघात होण्यासाठी दारू कारणीभूत आहे. पुष्कळशा हिंसक गुन्ह्यांमागेही दारू हे कारण असल्याचे दिसून येते. खून, आक्रमण, बलात्कार, बाल अत्याचार किंवा आत्महत्या करणाऱ्या लोकांना सहसा दारूची अज्ञात साथ असते.
तुमच्या कोणा प्रिय व्यक्तीला दारूचे, तंबाखूचे किंवा मादक औषधांचे व्यसन असल्यास मदत मिळवा.b देवाचे वचन, बायबल म्हणते की, “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.” (नीतिसूत्रे १७:१७) होय, कुटुंबाकडून तसेच मित्रमंडळीकडून प्रेमळ आधार मिळाल्यास कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करायला माणसात ताकत येते.
पण, खरोखर सुदृढ राहण्यासाठी फक्त शारीरिक आरोग्य पुरेसे नाही. सुदृढ जीवनशैली राखण्यात मानसिक आणि आध्यात्मिक घटकही महत्त्वाचे आहेत. पुढील लेख यावर चर्चा करील.
[तळटीपा]
a स्वास्थ्यकारी आहाराबद्दल तपशीलवार माहितीसाठी पाहा सावध राहा! जुलै ८, १९९७, पृष्ठे ७-१३.
b “मद्यपी आणि त्यांच्या कुटुंबांकरता मदत,” ही मे २२, १९९२ सावध राहा! (इंग्रजी) अंकातील लेखमाला पाहा.
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
“आरोग्यदायी जीवनशैली म्हणजे जीवनात काही मौजमजा करायचीच नाही असे नाही”
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
तंबाखू आणि बेकायदेशीर मादक पदार्थ वर्ज्य करा
[७ पानांवरील संक्षिप्त आशय]
“आदर्श संतुलित आहारात आपल्या सर्व आवडीच्या वस्तूंचा ठराविक प्रमाणात समावेश करता येतो, तोही दररोज”
[५ पानांवरील चित्र]
नियमित व्यायाम हा सुदृढ जीवनशैलीचा एक भाग असू शकतो
[६ पानांवरील चित्र]
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, धूम्रपानामुळे दरवर्षी तीस लाख लोक दगावतात
[७ पानांवरील चित्र]
फळे आणि भाज्या तुमच्याकरता उत्तम आहेत
[७ पानांवरील चित्र]
घरातली दररोजची कामेसुद्धा आरोग्यासाठी उत्तम व्यायाम ठरू शकतात