अधू असतानाही चांगले फलदायी जीवन जगणे
“गिर्यारोहक पुन्हा एकदा शिखरावर.” टॉम वीट्टेकर एव्हरेस्ट पर्वत शिखरावर पोहंचला तेव्हा एका वृत्तपत्राने वरीलप्रमाणे म्हटले. या आधी अनेकजणांनी तो उंच शिखर गाठला आहे पण टॉम वीट्टेकर हा पहिलाच अपंग गिर्यारोहक होता जो एव्हरेस्ट चढून गेला! एका वाहन अपघातात वीट्टेकरचा पाय गेला होता. पण नकली पाय किंवा कृत्रिम अवयवामुळे तो पुन्हा गिर्यारोहण करू शकला. अशा अनेक साधनांमुळे इतर हजारो विकलांग लोक, चांगले फलदायी जीवन जगू शकत आहेत. उलट, विकलांग लोकांना धावताना, बास्केटबॉल खेळताना किंवा सायकल चालवताना पाहणे काही असामान्य गोष्ट राहिलेली नाही.
सुरवातीचे नकली हात आणि पाय, लाकडाच्या ओबडधोबड निमूळत्या ठोकळ्यांच्या आणि लोखंडी हुकांच्या रूपात होते. पण, युद्धांमुळे जेव्हा हजारो लोक विकलांग होऊ लागले तेव्हापासून नकली हातापायांच्या निर्मितीत सुधार घडू लागले. म्हणूनच, १६ व्या शतकातले ॲम्ब्रॉइस पॅरी या लष्करातल्या फ्रेंच सर्जनला कृत्रिम हातापायांचे पहिले अस्सल नमुने बनवण्याचे श्रेय दिले जाते. आजकालच्या कृत्रिम साधनांमध्ये, जलस्थापत्य, सुविकसित गुडघ्यांचे सांधे, लवचीक कार्बन फायबरने बनवलेले पाय, सिलिकॉन, प्लास्टिक इत्यादि उच्च तंत्रज्ञानाने तयार केलेल्या उत्पादनांचा वापर केला जातो ज्यामुळे लोकांना कधी वाटलेही नसेल इतक्या स्वाभाविकपणे आणि आरामदायीपणे चालता-फिरता येऊ शकते. सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे कृत्रिम हातापायांना अधिक स्वाभाविकपणे हालचाल करता येणे शक्य झाले आहे. या कृत्रिम अवयवांचे स्वरूपही फार सुधारले आहे. आधुनिक नकली हातापायांमध्ये बोटे आहेत आणि काहींमध्ये तर शिरा देखील दिसतात. मॉडेलिंग करणाऱ्या एका स्त्रीचा पाय कर्करोगामुळे कापून टाकला होता, पण तिला जो कृत्रिम पाय बसवण्यात आला तो इतका खरा वाटत होता की नंतर तिच्या मॉडेलिंगच्या कारकीर्दीत कोणताच खंड पडला नाही.
मनोवृत्ती महत्त्वाची
तथापि, मनोरुग्ण तज्ज्ञ, एलन विन्चल, सावधानतेचा असा इशारा देतात: “हात किंवा पाय कापून टाकण्यासारख्या संकटाला तुम्ही स्वतः अनुभवता तेव्हा—शारीरिक, भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक—अशा प्रत्येक बाजूने तुमची जणू कठीण परीक्षा होत असते.” विल्यम यांचे उदाहरण घ्या; जखमेचे रूपांतर गँगरीनमध्ये झाल्याने त्यांना त्यांचा पाय गमवावा लागला. ते म्हणतात: “आपल्या जीवनातल्या कोणत्याही संकटावर मात करण्याचा एकमेव मार्ग आहे आपली मनोवृत्ती. माझ्या विकलांगतेकडे मी तोटा म्हणून कधीच पाहिले नाही. उलट, या घटनेनंतर माझ्या जीवनात आलेल्या अडथळ्यांकडे मी नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले आहे.” स्वतः विकलांग असलेल्या एलन विन्चल याच्याशी सहमत होऊन अशा म्हणतात की, नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपेक्षा सकारात्मक मनोवृत्ती बाळगणारे लोक विकलांगतेच्या समस्येशी स्वतःला अधिक चांगल्या तऱ्हेने जुळवून घेतात. बायबल म्हणते त्याप्रमाणे, “आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय.”—नीतिसूत्रे १७:२२.
सावध राहाने! अशा अनेक ख्रिश्चनांशी बातचीत केली ज्यांनी स्वतःला विकलांगतेच्या स्थितीशी चांगले जुळवून घेतले आहे. अनेकांनी असे सुचवले की अधू झालेल्यांनी आपल्या अपंगत्वाचा सतत विचार करू नये किंवा त्याविषयी बोलण्याचेही टाळू नये. “लोक हा विषय मुद्दामहून टाळतात तेव्हा मी अधिकच अस्वस्थ होतो. अशामुळे सगळ्यांनाच अस्वस्थता वाटू लागते असं मला वाटतं,” असे गुडघ्यापासून खालचा डावा पाय नसलेले डेल म्हणतात. काही तज्ज्ञांचे असे मत आहे की, कोणाला उजवा हात नसला आणि त्यांचा कोणाशी परिचय करून दिला गेला, तर त्या व्यक्तीने पुढे होऊन सरळ डाव्या हाताने हात मिळवावा. आणि कोणी तुम्हाला तुमच्या नकली हाताविषयी किंवा पायाविषयी विचारले तर त्यांना त्याविषयी सांगा. तुम्हाला जर संकोच वाटला नाही तर समोरच्या व्यक्तीलाही संकोच वाटणार नाही. आणि मग आपोआप विषय बदलेल.
“हसण्याचा समय” असतो. (उपदेशक ३:४बी) आपला हात गमावलेली एक स्त्री म्हणते: ‘सर्वात महत्त्वाचे म्हणजे विनोदबुद्धी कायम ठेवा! आपण नेहमी हे लक्षात ठेवायला हवे की, स्वतःबद्दल आपली जी मनोवृत्ती असते त्यानुसार इतर लोक आपल्याबद्दल मत ठरवतात.’
“रडण्याचा समय”
आपला पाय गमावल्यानंतर, डेल यांनी सुरवातीला असा विचार केला, “आता सगळं संपलं. पुढं आयुष्यात काहीच उरलेलं नाही.” फ्लोरिंडो आणि फ्लोऱ्यानो या दोघांचेही पाय अंगोलामध्ये सुरुंगांमुळे उडाले. फ्लोरिंडो म्हणतात की, ते सलग तीन दिवस आणि तीन रात्र रडत होते. फ्लोऱ्यानो यांना देखील अशाच भावना अनावर झाल्या होत्या. “तेव्हा मी फक्त २५ वर्षांचा होतो,” ते लिहितात. “कालपर्यंत मी सर्वकाही करू शकत होतो आणि आज मला धड उभंही राहता येत नव्हतं. मी खूप निराश आणि हताश झालो.”
“रडण्याचा समय” असतो. (उपदेशक ३:४अ) गंभीर दुखापत झाल्यावर काही काळासाठी दुःखी होणे स्वाभाविक आहे. (पडताळा शास्ते ११:३७; उपदेशक ७:१-३.) “दुःखद अनुभवातून गेल्यावरच त्यातून बाहेर निघता येते,” असे एलन विन्चल लिहितात. अशावेळी कोणा सहानुभूती दर्शवणाऱ्या व्यक्तीजवळ मन मोकळे केल्याने बरीच मदत मिळते. (नीतिसूत्रे १२:२५) पण दुःख हे कायम राहत नाही. हात किंवा पाय गमावल्यानंतर काही व्यक्ती काही काळासाठी लहरी, टीकात्मक, चिंताग्रस्त किंवा शांत होतील. परंतु, या भावना कालांतराने ओसरतात. जर नाही ओसरल्या तर, हे अवसादाचे लक्षण असू शकते—हा एक विकार असून त्यासाठी वैद्यकीय मदत घ्यावी लागते. अशाप्रकारच्या मदतीची गरज दाखवणारी काही लक्षणे आपल्या प्रिय व्यक्तीत दिसताहेत का याबद्दल कौटुंबिक सदस्यांनी आणि मित्रमैत्रिणींनी दक्ष असावे.a
दोन्ही पाय लुळे झालेले डब्ल्यू. मिशेल यांनी लिहिले: “आम्हा सर्वांना काळजी करणाऱ्या लोकांची गरज असते. जीवनामध्ये आधार देणारे मित्र आणि कौटुंबिक सदस्य असले, तर कोणतेही संकट सहन करण्यासारखे असते पण एकट्याने जीवनातल्या संघर्षांना तोंड द्यायचे म्हटले तर अगदी लहानातली लहान समस्या देखील मोठा अडथळा होऊ शकते. पण, मैत्रिसंबंध आपोआप बनत नाहीत, ते बांधावे लागतात आणि त्यांना टिकवण्याचा सतत प्रयत्न करावा लागतो नाहीतर ते फार काळ टिकत नाहीत.”—पडताळा नीतिसूत्रे १८:२४.
विकलांग असूनही चांगले फलदायी जीवन जगणे
विकलांग असूनही अनेकजण चांगले फलदायी जीवन जगू शकले आहेत. उदाहरणार्थ, रस्सल यांना जन्मतःच डाव्या पायाचा अर्धा भाग नव्हता. आता ७८ वर्षांच्या वयातही ते अजून नियमितपणे व्यायाम करतात आणि जीवनाचा पुरेपूर आनंद लुटताहेत; अर्थात, आता त्यांना चालताना काठीचा आधार घ्यावा लागतो. हसऱ्या स्वभावाचे रस्सल सांगतात की त्यांचे टोपणनाव हॅपी (आनंदी) आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी पाय गमावलेले डग्लस आता आधुनिक कृत्रिम पायाच्या साहाय्याने चालतात. यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे, गेल्या सहा वर्षांपासून ते नियमित पायनियर म्हणून पूर्ण वेळेच्या सुवार्तिकेचे काम आनंदाने करत आहेत. तुम्हाला डेल आठवतात का, ज्यांना आपला पाय गमावल्यावर आयुष्यात काहीच उरलेले नाही असे वाटले होते? ते देखील पायनियर म्हणून आनंदी जीवन जगताहेत; शिवाय आपला उदरनिर्वाह ते स्वतः करतात.
परंतु, गरीब अथवा युद्धग्रस्त देशांमधील विकलांग लोकांची काय अवस्था आहे? जागतिक आरोग्य संघटना म्हणते: “आज वास्तविकता ही आहे की, विकलांग असलेल्या फक्त मोजक्या लोकांनाच मदत मिळते.” अनेकांना चालायला फिरायला काठ्यांचा किंवा कामचलाऊ कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो. तरीही, काहीवेळा मदत दिली जाते. जमिनीत पुरलेल्या सुरुंगांना बळी पडलेले फ्लोऱ्यानो आणि फ्लोरिंडो या अंगोलाच्या दोघांनाही आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि स्विस सरकारतर्फे कृत्रिम पाय देण्यात आले. फ्लोऱ्यानो सध्या यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीत सेवा सेवकाचे काम आनंदाने करत आहेत आणि फ्लोरिंडो वडील या नात्याने आणि पूर्ण-वेळेचे सुवार्तिक म्हणून सेवा करत आहेत.
विकलांग लोकांची सेवा करणाऱ्या एका संघटनेने अगदी उचितपणे असे म्हटले: “ज्या लोकांनी धीर सोडून दिला आहे तेच खरे तर अपंग आहेत!” मनोवेधक गोष्ट अशी की, विकलांग लोकांना प्रोत्साहन देण्यात बायबलने मोठी भूमिका बजावली आहे. “मी बरा होत असताना बायबलमधील सत्याविषयी शिकल्याने मला फार मदत मिळाली,” असे डेल म्हणतात. त्याचप्रमाणे रस्सलही म्हणतात: “बायबलवर आधारित असलेल्या माझ्या आशेने मला नेहमी अडीअडचणींना तोंड द्यायला मदत दिली आहे.” विकलांग लोकांना बायबल नेमकी कोणती आशा देते?
[तळटीपा]
a मार्च १५, १९९०, टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकात “खिन्न झालेल्यांना पुन्हा आनंदी होण्यासाठी कशी मदत करावी” हा लेख पाहा.
[८ पानांवरील चौकट]
आभासात्मक वेदना
हाताची किंवा पायाची आभासात्मक संवेदना म्हणजे नसलेला हात किंवा पाय अद्याप आहे अशी जाणीव होणे. शस्त्रक्रियेनंतर, विकलांग झालेल्या लोकांना वाटणारी ही स्वाभाविक भावना असते आणि ही संवेदना इतकी खरी असते की विकलांग लोकांसाठी असलेल्या एका पुस्तिकेत म्हटले आहे: “कृत्रिम पाय न लावता खाटेवरून किंवा खुर्चीतून उठताना आभासात्मक संवेदनेविषयी दक्ष असा. आपला पाय नाही याची आठवण देण्यासाठी नेहमी खाली पाहत जा.” एका स्त्रीचे दोन्ही पाय गेले होते आणि डॉक्टरांशी हात मिळवायला ती उभी राहायला गेली तर खाली पडली!
दुसरी एक समस्या आहे हातात किंवा पायात होणारी आभासात्मक वेदना. यामध्ये, काढलेल्या हातात किंवा पायात वेदना होत असल्यासारखे वाटते. अशा आभासात्मक वेदनेची तीव्रता, प्रकार आणि कालावधी प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असतात. पण सुदैवाने, हाताची किंवा पायाची आभासात्मक संवेदना आणि आभासात्मक वेदना बहुतेक प्रकरणांत कालांतराने कमी होतात.
[६ पानांवरील चित्र]
आधुनिक कृत्रिम हातापायांमुळे विकलांग लोकांचे जीवन आणखी आनंददायी बनते
[चित्राचे श्रेय]
Photo courtesy of RGP Prosthetics
[७ पानांवरील चित्र]
काहीतरी मोठे गमावल्यानंतर दुःखी होणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया असते
[८ पानांवरील चित्र]
अनेक विकलांग लोक फलदायी जीवन जगतात