विकलांगता—धोका कसा टाळावा
बहुतेक प्रकरणांत, विकलांगता टाळता येते! अगदी परिधी वाहिनीवंत रोग (पीव्हीडी) झालेले लोक देखील ती टाळू शकतात. आधीच्या लेखात सांगितल्यानुसार, पीव्हीडी हा बहुधा मधुमेहाचा परिणाम असतो.a आनंदाची गोष्ट म्हणजे, मधुमेहावर सहसा नियंत्रण केले जाऊ शकते.
“इन्सुलिन घ्यायला सांगितलेले असो अथवा नसो तरी पथ्य पाळणे ही मधुमेहाच्या उपचारातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे,” असे द एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका म्हणतो. न्यूयॉर्क शहरातल्या किंग्स काऊंटी दवाखान्याचे डॉ. मार्सल बायोल यांनी सावध राहाला! सांगितले: “मधुमेहींनी आपल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले नाही, व्यवस्थित पथ्य पाळले आणि नियमितपणे वैद्यकीय उपचार करत राहिले, तर पाय गमावण्याचा धोका ते कमी करू शकतील.” दुसऱ्या प्रकारचा मधुमेह झालेल्या लोकांनी हा सल्ला अनुसरला तर त्यांना कालांतराने सुधारणा झाल्याचे दिसून येईल.b
व्यायाम अत्यावश्यक
व्यायाम देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे शरीरात ग्लुकोज किंवा साखरेचे योग्य प्रमाण राखायला मदत मिळते. पीव्हीडी असल्याचे निदान लागते तेव्हा, व्यायाम केल्याने शरीराला आवश्यक असलेली ताकद, लवचीकता आणि हानी पोचलेल्या भागांना रक्त पुरवठा मिळत राहतो. व्यायामामुळे, अधूनमधून येणारे पेटके अर्थात, पीव्हीडी झालेल्या लोकांना चालताना किंवा व्यायाम करताना पोटऱ्यांमध्ये होणारी तीव्र वेदना देखील कमी करण्यास मदत मिळते. तथापि, अशांनी पायांवर ताण आणणारे किंवा झटके देणारे व्यायाम टाळावेत. त्याऐवजी, पायरपेट करणे, सायकल चालवणे, होडी चालवणे, पोहणे आणि पाण्यातले व्यायाम यांसारखे व्यायाम जास्त उचित ठरतील. पथ्य पाळायला सुरवात करण्याआधी किंवा व्यायाम सुरू करण्याआधी नेहमी डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
चांगले आरोग्य हवे असणाऱ्या कोणाही व्यक्तीने धूम्रपान करूच नये. धूम्रपान केल्याने सुरू होणाऱ्या किंवा वाढणाऱ्या वैद्यकीय समस्यांच्या लांबलचक यादीत पीव्हीडी ही केवळ एक समस्या आहे. “हात किंवा पाय कापला जाण्याला धूम्रपान हे फार मोठे कारण ठरू शकते; विशेषतः धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला मधुमेह आणि पीव्हीडी असतो तेव्हा,” असे डॉ. बायोल यांचे म्हणणे आहे. हे कारण किती मोठे आहे? हात किंवा पाय कापलेल्या व्यक्तींसाठी असलेल्या एका निर्वासन मार्गदर्शिकेत असे म्हटले आहे की, “धूम्रपान न करणाऱ्या लोकांपेक्षा धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये हात किंवा पाय कापण्याचे प्रमाण १० पटीने अधिक असते.”
रोगटलेल्या हातापायांची काळजी
पीव्हीडीमुळे पायांना होणारा रक्ताचा पुरवठा कमी होऊ शकतो ज्यामुळे न्यूरोपॅथी नावाची एक स्थिती उत्पन्न होऊ शकते; यात शिरा निकामी किंवा बधिर होतात. यामुळे त्या व्यक्तीला अगदी सहजपणे इजा होऊ शकते, अगदी खाटेवर पडल्या पडल्या सुद्धा. उदाहरणार्थ, त्या व्यक्तीला वेदना जाणवत नसल्याने तिची इलेक्ट्रिक ब्लँकेट किंवा शेकण्यासाठी असलेला हिटींग पॅड जास्त गरम झाला तरी तिला वाईट तऱ्हेने भाजू शकते! म्हणूनच, मधुमेहींनी ही उत्पादने वापरताना दक्ष असावे असा सावधानतेचा इशारा उत्पादक देतात.
रोगटलेल्या हातापायांना संसर्ग होण्याची शक्यताही अधिक असते. जराशा खरचटण्याने देखील फोड येऊ शकतात किंवा गँगरीनसुद्धा होऊ शकतो. म्हणून पायांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे; त्यासाठी आरामदायक, नीट बसणारे बूट घालावेत आणि पाय नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. अनेक इस्पितळांमध्ये पायांची काळजी घेण्यासंबंधी खास विभाग असतात जेथे रुग्णांना पायांची काळजी कशी घ्यावी याचे शिक्षण दिले जाते.
पीव्हीडी फार वाढल्यावर शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते तेव्हा, शल्यचिकित्सक सहसा पाय कापून टाकण्याचे टाळतील. एक पर्यायी उपाय आहे बलून ॲन्जीयोप्लॅस्टी. व्हॅस्क्यूलर सर्जन, टोकाला फुगा असलेली सुषिरी (कथिटर) आत घालतात. मग फुगा फुगवला जातो आणि त्यामुळे आकुंचन पावलेली वाहिनी रुंदावली जाते. दुसरा एक उपाय आहे बायपास सर्जरी—यामध्ये खूपच खराब झालेल्या रक्त पेशी काढून त्यांच्या जागी शरीरातल्या दुसऱ्या भागातून घेतलेल्या रक्त पेशी घातल्या जातात.
बार्बरा आता ५४ वर्षांच्या आहेत, पण चार वर्षांच्या असल्यापासून त्यांना पहिल्या प्रकारचा मधुमेह होता. त्यांनी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांना पीव्हीडी झाला. काही डॉक्टरांनी पाय कापून टाकावेत असे सुचवले. परंतु, बार्बरा यांना एक नामवंत व्हॅस्क्यूलर सर्जन मिळाले ज्यांनी ॲन्जीयोप्लॅस्टीच्या साहाय्याने त्यांच्या पायांमधील रक्ताभिसरणाची क्रिया सुधारली. ॲन्जीयोप्लॅस्टीचा परिणाम काही काळासाठीच टिकला पण नंतर मात्र बार्बरा यांना बायपास करण्याची आवश्यकता पडली आणि ती यशस्वी ठरली. आता बार्बरा आपल्या पायांची फार काळजी घेतात.
इजा टाळा
विकलांगतेचे दुसरे प्रमुख कारण आहे इजा. इजा ही शरीराच्या कोणत्या विशिष्ट भागांनाच नव्हे तर शरीराच्या कोणत्याही भागाला होऊ शकते आणि त्यामुळे तो भाग निकामी होऊ शकतो. परंतु, जीवनाबद्दल देवाचा दृष्टिकोन बाळगल्याने आपण इजा होण्याची शक्यता खूपच कमी करू शकतो. काम करताना, गाडी चालवताना किंवा मौजमजा करतानाही ख्रिश्चनांनी आपले शरीर देवाकडून दान आहे असे मानले पाहिजे. यास्तव, सुरक्षेच्या सर्व गरजा पाळून अविचारीपणे कोणताही धोका घेण्याचे ते टाळतील.—रोमकर १२:१; २ करिंथकर ७:१.
ज्या देशांमध्ये जमिनीत सुरुंग पुरलेले आहेत तेथे इजा होण्याचा धोका कमी करण्याबाबत काय केले जात आहे? पुष्कळ राष्ट्रांमध्ये, सुरुंगांबद्दल दक्षता बाळगण्याचे सरकार आयोजित कार्यक्रम राबवले जात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सेक्रेटरी जनरलच्या एका अहवालानुसार, हे कार्यक्रम “धोक्यात असलेल्या लोकांना . . . सुरुंग लावलेल्या क्षेत्रांमध्ये राहताना आणि काम करताना स्वतःवर इजा ओढवण्याची शक्यता कशी कमी करावी” हे शिकवतात.
पण दुःखाची गोष्ट अशी आहे की, “लोकांना या सुरुंगांची सवय होऊन जाते आणि ते निष्काळजी बनतात,” असे संयुक्त राष्ट्रांचा एक अहवाल सांगतो. “काहीवेळा धार्मिक कारणांमुळे, नशिबात असले तर हे धोके घडतील अशी मनोवृत्ती बाळगायला [लोकांना] उत्तजेन मिळते.” परंतु, देवाचे वचन अपघातांबाबतीत अशा दैववादी दृष्टिकोनांना आधार देत नाही. त्याउलट, बायबलमध्ये सावधगिरी बाळगण्याचे आणि सुरक्षा उपाय घेण्याचे उत्तेजन दिले आहे.—अनुवाद २२:८; उपदेशक १०:९.
यास्तव, सावधगिरी बाळगल्याने आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उचित पावले उचलल्याने तुम्ही विकलांगतेचा धोका पुष्कळ प्रमाणात कमी करू शकता. पण जे आधीच विकलांग आहेत त्यांच्याबाबत काय? या स्थितीत देखील ते चांगले फलदायी जीवन जगू शकतात का?
[तळटीपा]
a पायाच्या वाहिनीवंत समस्या, तंग कपडे घातल्याने किंवा नीट न बसणारे बूट घातल्याने किंवा खूप वेळ बसल्याने (विशेषतः मांडी घालून) अथवा उभे राहिल्यानेही सुरू होऊ शकतात किंवा वाढू शकतात.
b पहिल्या प्रकारचा मधुमेह झालेल्या लोकांना दररोज इन्सुलिन इंजेक्शन घ्यायला सांगितले जाते. पण दुसऱ्या प्रकारचा मधुमेह (इन्सुलिनवर अवलंबून नसणारा मधुमेह) झालेले लोक बहुधा पथ्य पाळून आणि व्यायाम करून आपली परिस्थिती नियंत्रणात ठेवू शकतात. संयुक्त संस्थानांत, ९५ टक्के मधुमेहींना दुसऱ्या प्रकारचा मधुमेह झालेला आहे.
[४ पानांवरील चित्र]
धूम्रपानामुळे विकलांगतेचा धोका खूप वाढतो, विशेषतः ज्यांना वाहिनीवंत रोग आहेत त्यांना
[५ पानांवरील चित्र]
उचित व्यायाम आणि योग्य आहार घेतल्याने वाहिनीवंत संस्था निरोगी राहते