विकलांगतेचे—तुम्ही शिकार होऊ शकता का?
वसंत ऋतूच्या उबदार ऊन्हाने सारायेवो शहरात सुखावह वातावरण निर्माण केले होते; घराबाहेर या वातावरणाचा आस्वाद घेत फेरफटका मारत असता बेन्जामिनचा पाय जमिनीत पुरलेल्या एका सुरुंगावर पडला. स्फोटात त्याचा डावा पाय जायबंदी झाला. बेन्जामिन आठवून सांगतो, “मी उठायचा प्रयत्न केला. पण मला उठताच येईना.” दर वर्षी जमिनीत पुरलेल्या अशा सुरुंगांनी ठार मारल्या जाणाऱ्या किंवा अधू होणाऱ्या २०,००० लोकांपैकी बेन्जामिन हा केवळ एक आहे.
अंगोलात तर, चक्क १.५ कोटी सुरुंग लावले आहेत—त्याचा अर्थ त्या देशातल्या प्रत्येक स्त्री, पुरुष किंवा बालकामागे एकाहून अधिक सुरुंग आहेत. अंगोलात सध्या ७०,००० लोक आहेत जे विकलांग झाले आहेत. कंबोडियात, ऐंशी लाख ते एक कोटी सुरुंग जमिनीत पुरलेले असल्यामुळे, संपूर्ण जगभरात विकलांग झालेल्या लोकांचे प्रमाण येथे सर्वात जास्त आहे—अंदाजे, प्रत्येक २३६ व्यक्तींमध्ये १ व्यक्ती. अहवालानुसार, बोस्निया आणि हर्जेगोविना येथे तीस लाखांहून अधिक सुरुंग आहेत—प्रत्येक चौरस किलोमीटरमध्ये ५९.
पण फक्त युद्धग्रस्त देशांमध्येच लोक विकलांग होतात असे नाही. उदाहरणार्थ, संयुक्त संस्थानांत, सुमारे ४,००,००० लोक विकलांग आहेत. त्यांपैकी बहुतेक प्रौढांना, “परिधी वाहिनीवंत रोग” किंवा पीव्हीडी असे सर्वसामान्यपणे नाव दिलेल्या एका पराकोटीच्या स्थितीचा परिणाम म्हणून विकलांगता झालेली आहे. ही एक सर्वसामान्य संज्ञा असून त्यामध्ये अनेक व्याधी मोडतात. टेबर्स सायक्लोपेडिक मेडिकल डिक्शनरी यात पीव्हीडीची व्याख्या, “हातापायाच्या धमन्यांचे आणि वाहिन्यांचे रोग, विशेषतः हातापायांकडे जाणाऱ्या किंवा तेथून येणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या स्थिती” यांच्यासाठी सर्वसामान्यपणे वापरण्यात येणारी संज्ञा अशी केली आहे. पीव्हीडीचे एक प्रमुख कारण आहे मधुमेह. जागतिक आरोग्य अहवाल १९९८ यानुसार, “जगभरात, प्रौढांमधील मधुमेहाची प्रकरणे १९९७ मध्ये १४.३ कोटींपासून २०२५ सालापर्यंत ३० कोटींइतकी दुप्पटहून अधिक होईल.”
संयुक्त संस्थानांत, विकलांगतेचे दुसरे प्रमुख कारण आहे आघात—त्यामध्ये मोटारगाड्या, यंत्रे, वीजेवर चालणारी यंत्रे आणि दारूगोळ्याची हत्यारे यांमुळे होणारे अपघातही समाविष्ट आहेत; या कारणामुळेच हात किंवा पाय कापून टाकण्याची २० ते ३० टक्के प्रकरणे घडतात. विकलांगतेची इतर कारणे आहेत गाठी (सुमारे ६ टक्के) आणि जन्मदोष (सुमारे ४ टक्के).
आपला मौल्यवान हात किंवा पाय गमावण्याची कल्पनाच अत्यंत क्षुब्ध करणारी असते. हा धोका कमी करण्याचा कोणता मार्ग आहे का? आणि तुम्ही जर आधीच विकलांग असाल, तर तुम्हाला चांगले अर्थपूर्ण जीवन कसे जगता येईल? पुढील लेखांमध्ये या तसेच इतर प्रश्नांची चर्चा करण्यात आली आहे.