क्षयरोगाविरुद्ध एक नवीन पावित्रा
क्षयरोग (टीबी) हा मनुष्याचा सर्वात जुना, सांसर्गिक मारेकरी असून तो आजही इतका भयंकर आरोग्य धोका आहे, की जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) त्याची तुलना टाईम बॉम्बशी केली आहे. “वेळ फारच कमी आहे,” असा डब्ल्यूएचओचा एक टीबीवरील अहवाल इशारा देतो. या बॉम्बचा विस्फोट होण्याआधी मनुष्याने त्याला निकामी केले नाही, तर एक ना एक दिवस, “हवेतून पसरणाऱ्या आणि एड्सइतक्याच जीवघेण्या,” औषध-प्रतिरोधक रोगाला त्याला सामोरे जावे लागेल. टीबीचे हे संभाव्य विध्वंसकारी परिणाम ओळखून पावले उचलण्याची हीच वेळ आहे, असे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे. खरे तर, टीबीच्या “या धोक्यामुळे वॉल स्ट्रीटपासून ग्रेट वॉलपर्यंत हवेतून श्वासोच्छ्वास करणारी प्रत्येक व्यक्ती . . . , धोक्यात आहे.”
ही अतिशयोक्ती आहे का? मुळीच नाही. येत्या १० वर्षांच्या काळात कॅनडासारख्या देशातील एकूण एक मनुष्याचे अस्तित्व कायमचे पुसून टाकण्याइतका एखादा रोग हाताबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला तर सबंध जग कसे खडबडून जागे होईल याची जरा कल्पना करा! हे काल्पनिक वाटेल, पण हा धोका खराखुरा आहे. जगभरात एड्स, मलेरिआ आणि इतर उष्णकटिबंधीय रोग समाईकपणे जितक्या लोकांचा बळी घेतात त्याच्या कितीतरी पटीने अधिक म्हणजे दिवसाकाठी ८,००० लोकांचा बळी टीबी घेतो. आज सुमारे दोन कोटी लोकांना सक्रिय टीबी झालेला असून या रोगामुळे पुढील दहा वर्षांत सुमारे तीन कोटी लोकांचा—कॅनडाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांचा—मृत्यू होण्याची संभावना आहे.—“टीबीची जागतिक मगरमिठी,” या शीर्षकाची पृष्ठ २२ वर दिलेली पेटी पाहा.
पण आता आशा आहे
आज मात्र या रोगातून बरे होण्याची आशा आहे. तब्बल दहा वर्षे शोधतपासणी केल्यानंतर संशोधकांना या रोगावर एक उपचारपद्धत गवसली आहे; या उपचारामुळे टीबी हा रोग मोकाट फिरणाऱ्या मारेकऱ्याऐवजी, ताब्यात घेतलेल्या एका गुन्हेगारासारखा होऊ शकतो. डब्ल्यूएचओचे माजी महासंचालक डॉ. हीरोशी नाकाजीमा यांनी या नवीन उपचारपद्धतीस, “चालू दशकातला एक महत्त्वपूर्ण जन आरोग्य शोध” म्हटले आहे. तर, डब्ल्यूएचओ जागतिक टीबी कार्यक्रमाचे संचालक डॉ. एराटा कोच्ची यांच्या मते, यामुळे “टीबीचा संसर्ग पार उलथून टाकण्याची” सुवर्णसंधी आपल्याला लाभते. इतके अत्यानंदित होण्याचे कारण? डॉट्स उपचारपद्धत.
डॉट्स हे डायरेक्टली ऑबसर्व्ड ट्रीटमेंट, शॉर्ट-कोर्स (थेटपणे निरीक्षिलेला अल्प-मुदतीचा उपचार) याचे संक्षिप्त नाव आहे. ती एक आरोग्य व्यवस्थापन रचना असून त्यामुळे एकही दिवस इस्पितळात न राहता, केवळ सहा ते आठ महिन्यांत अधिकांश क्षयरोगी बरे होऊ शकतात. डॉट्स उपचारपद्धतीचे यश ५ घटकांवर अवलंबून असते. यांपैकी एकही नसला तर टीबीच्या रुग्णांना बरे करण्याची संधी “हातातून निसटते” असे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. हे पाच घटक कोणते?
● १. डायरेक्टली (थेटपणे): टीबीचा सर्वाधिक भयंकर प्रकार म्हणजे निदान न लावलेला टीबी. त्यामुळे, आरोग्य निगा कार्यकर्त्यांनी प्रथम आपल्या समाजातील संसर्गी क्षयरोग्यांचा तपास लावण्यासाठी आपले प्रयत्न खर्ची घालावे यावर डब्ल्यूएचओचा भर आहे.
● २. ऑबसर्व्हड (निरीक्षिलेला): डॉट्सच्या या दुसऱ्या घटकात, बरे होण्याकरता रुग्ण नव्हे, तर आरोग्य संस्था जबाबदार असते. क्षयरोगी टीबी-प्रतिरोधक औषधांचा प्रत्येक डोस घेतो तेव्हा आरोग्य-निगा कर्मचारी किंवा दुकानदार, शिक्षक किंवा बरे झालेले क्षयरोगी यांसारखे प्रशिक्षित स्वयंसेवक त्याचे निरीक्षण करतात. क्षयरोग बरा होण्यासाठी ‘रुग्ण निरीक्षकांची’ नितान्त गरज असते; कारण टीबीचा अद्याप नायनाट न झाल्याचे एक प्रमुख कारण म्हणजे काही काळातच रुग्ण औषधे घेण्याचे बंद करतात. (“पुन्हा वाढ होण्याचे कारण?” या शीर्षकाची पृष्ठ २२ वर दिलेली पेटी पाहा.) काही आठवड्यांतच त्यांना बरे वाटू लागते आणि मग ते परस्पर गोळ्याऔषधे बंद करतात. पण, शरीरातील टीबी बॅसिलाय नावाचे जीवाणू पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सहा ते आठ महिने औषधे चालू ठेवणे जरूरीचे असते.
● ३. ट्रीटमेंट (उपचार): या सहा ते आठ महिन्यांच्या उपचारकाळात, आरोग्य कार्यकर्ते उपचाराच्या परिणामांवर लक्ष ठेवतात आणि रुग्णाची तब्येत किती सुधारली आहे त्याची नोंद करतात. अशाप्रकारे, रुग्ण पूर्ण बरा झाला आहे की नाही आणि त्याच्याकडून इतरांना संसर्ग तर होणार नाही ना, याची खात्री ते करतात.
● ४. शॉर्ट-कोर्स (अल्प मुदतीचा उपचार): शॉर्ट कोर्स कीमोथेरपी म्हटलेल्या टीबी-प्रतिरोधक औषधांचा योग्य संयोग, सांगितलेल्या काळापर्यंत योग्य प्रमाणात घेणे हा डॉट्स उपचारपद्धतीचा चवथा घटक. ही संयुक्त औषधे टीबी बॅसिलायचा बिमोड करण्याइतकी शक्तिशाली असतात.a औषधोपचारात एकदाही खंड पडू नये म्हणून औषधांचा पुरेसा साठा असण्याची गरज आहे.
● ५. !: डॉट्स उपचारपद्धतीचा पाचवा घटक, डब्ल्यूएचओने डॉट्सच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह देऊन दाखवला आहे. ते निधीपुरवठ्याला आणि उत्तम योजनांना सूचित करते. सरकारी आणि गैरसरकारी संघटनांशी आर्थिक करारनामा करून टीबी उपचारास देशाच्या चालू आरोग्य संस्थेचा एक भाग बनवण्याचा आर्जव डब्ल्यूएचओ आरोग्य संस्थांना करते.
निधी पुरवठ्याविषयी बोलता, अर्थसाह्य करण्याचा अधिकार असणाऱ्या योजनास्थापकांना डॉट्स उपचारपद्धत अपीलकारक वाटते. जागतिक बँकेने डॉट्स उपचारपद्धत ‘रोगाविरुद्ध उपलब्ध असलेला सगळ्यात किफायतशीर हस्तक्षेप’ आहे असे म्हटले आहे. डब्ल्यूएचओच्या हिशोबानुसार, गरीब देशांत ही उपचारपद्धत उपयोगात आणण्याची एकूण किंमत प्रत्येक रुग्णामागे सुमारे १०० डॉलर इतकी आहे. “विकसनशील देशांत क्वचितच ही किंमत दरडोई १० सेंट्सच्या (युएस) पुढे जाते; आणि अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीतही ती परवडण्यासारखी आहे. पण, कमी खर्चात होणारे अमाप फायदे लक्षात घ्यायला हवेत.”
कितपत परिणामकारक?
मार्च १९९७ मध्ये डब्ल्यूएचओच्या प्रतिनिधींनी केलेल्या घोषणेनुसार, डॉट्सच्या मर्यादित उपयोगामुळे “कितीतरी दशकांत पहिल्यांदाच टीबीचा जागतिक संसर्ग स्थिरावत” असल्याचे आढळले. “जिथे डॉट्सचा उपयोग केला जातो तेथे रोगमुक्तीचे प्रमाण जवळजवळ दुप्पट होते.” टीबी रुग्णांचे अत्याधिक प्रमाण असलेल्या ठिकाणी डॉट्सचे प्रायोगिक प्रकल्प राबवल्यामुळे ही उपचारपद्धत यशस्वीरित्या काम करत असल्याचे दिसू लागले आहे. डब्ल्यूएचओने दिलेली काही यशाची उदाहरणे विचारात घ्या.
भारतात, “१.२ कोटीहून अधिक लोकांचा समावेश करणाऱ्या प्रायोगिक क्षेत्रांत डॉट्सचा अंमल करण्यात आला आहे. . . . परिणामस्वरूप, आज दर ५ रुग्णांपैकी ४ क्षयरोगी रोगमुक्त झाले आहेत.” दहा लाख लोक असलेल्या बांगला देशामध्ये राबवलेल्या प्रायोगिक कार्यक्रमात, “८७ टक्के [क्षयरोगी] पूर्णपणे बरे झाले.” तर एका इंडोनेशियन बेटावर डॉट्स प्रकल्पामुळे सध्या, “१० संसर्गी रुग्णांपैकी ९ रुग्ण रोगमुक्त होत आहेत.” चीनमध्ये राबवलेल्या प्रायोगिक प्रकल्पांना तर “घवघवीत यश” आले असून ९४ टक्के क्षयरुग्ण रोगमुक्त होत आहेत. एका दक्षिण आफ्रिकी देशात, “८० टक्के [क्षयरोग्यांना] यशस्वीरित्या रोगमुक्त केले जात आहे.” अलीकडेच, न्यूयॉर्क शहरातही डॉट्स प्रकल्प राबवण्यात आला आणि त्याचे उत्तम परिणाम दिसून आले आहेत.
डझनवारी राष्ट्रांत केलेल्या प्रयोगांती असे निदर्शनास आले, की ही उपचारपद्धत, “कुठेही वापरली जाऊ शकते आणि ८५ टक्क्यांनी किंवा त्याहून जास्त पटीने रोगनिवारण होऊ शकते,” असे डॉ. कोच्ची शेवटी म्हणाले.
खळबळ माजली नाही—पण प्रगतीपथावर
मनुष्याच्या सर्वात प्राणघातक संसर्गजन्य मारेकऱ्याचा पूर्णपणे बिमोड करणारी किफायतशीर उपचारपद्धत उपलब्ध असल्यामुळे डॉट्स उपचारपद्धतीचा अफाट वापर होत असावा असे तुम्हाला वाटत असेल. “पण आश्चर्य म्हणजे, मोजकेच देश डब्ल्यूएचओची ही प्रयोगसिद्ध आणि किफायतशीर टीबी नियंत्रण उपचारपद्धत अंमलात आणत आहेत” असे डब्ल्यूएचओचे एक अधिकारी म्हणतात. खरे तर, १९९६ च्या सुरवातीस केवळ ३४ देशांनी राष्ट्रीय पातळीवर तिचा अंमल केला होता.
पण, सुधारणा मात्र निश्चित होत आहे. सन १९९३ च्या आधी, डब्ल्यूएचओने टीबीमुळे जागतिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याचे घोषित केले तेव्हा प्रत्येक ५० क्षयरोग्यांपैकी केवळ १ रुग्णाला डॉट्स उपचारपद्धत उपलब्ध होती. आज मात्र हे प्रमाण प्रत्येक १० पैकी १ असे आहे. आणि अहवालांनुसार, १९९८ मध्ये सुमारे ९६ देश डॉट्स उपचारपद्धतीचा उपयोग करत असल्याचे समजते. जर अधिकाधिक देश डॉट्सला पाठबळ देण्यासाठी एकत्र आले तर ‘केवळ दहा वर्षांच्या काळात वार्षिक टीबीच्या केसेस निम्म्यावर येतील.’ डॉ. कोच्ची म्हणतात: “आमच्याजवळ एक प्रयोगसिद्ध आरोग्य निगा योजना उपलब्ध आहे; तिचा केवळ बहुव्यापक वापर होण्याची गरज आहे.”
टीबीविरुद्ध यशस्वी लढत देण्यासाठी मनुष्याजवळ ज्ञान आहे, साधने आहेत; कमी आहे केवळ एका गोष्टीची आणि ती म्हणजे ‘संबंध जगभरात या औषधांचा उपयोग केला जातो याची खातरजमा करणाऱ्या लोकांची.’ म्हणूनच, “आपण आता कशासाठी थांबलो आहोत?” असे जे जगभरातील डॉक्टरांच्या तसेच आरोग्य सेवकांच्या एका प्रकाशनात डब्ल्यूएचओने विचारले त्याचे नवल वाटू नये.
[तळटीपा]
a या औषधांत ईसोनिआझिड, रिफामपिन, पायरिझिनामाइड, स्ट्रेप्टोमायसिन आणि इथॅमब्युटॉल ही समाविष्ट आहेत.
[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]
प्रती सेकंद, जगभरात एकाला क्षयरोगाचा संसर्ग होतो
[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]
‘जीवदान देणारी औषधे कपाटांत धूळ खात पडली आहेत तर दुसरीकडे लाखोंच्या संख्येने लोक दगावत आहेत.’ डॉ. एराटा कोच्ची
[२३ पानांवरील संक्षिप्त आशय]
“डॉट्स उपचारपद्धत, चालू दशकातला सगळ्यात महत्त्वाचा जन आरोग्य शोध सिद्ध होईल.” WHO press release
[२२ पानांवरील चौकट]
पुन्हा वाढ होण्याचे कारण?
चाळीसपेक्षा अधिक वर्षांपूर्वी क्षयरोगावरील (टीबीवरील) उपचार गवसला होता. तेव्हापासून, १२ कोटींहून अधिक लोक टीबीमुळे दगावले आहेत तर या वर्षी, जवळजवळ ३० लाखांहून अधिक लोक दगावतील. टीबीवर उपचार उपलब्ध असताना आजही इतक्या मोठ्या संख्येने लोक त्यामुळे दगावतात याचे कारण काय? त्याची तीन मुख्य कारणे आहेत: दुर्लक्ष, एचआयव्ही/एड्स आणि बहुऔषधी-प्रतिरोधक टीबी.
दुर्लक्ष. आज सगळ्या जगाचे लक्ष, एड्स आणि ईबोला यांसारख्या संसर्गजन्य रोगांवर केंद्रित आहे. पण, १९९५ साली ईबोलामुळे दगावलेल्या एका व्यक्तीमागे चक्क १२,००० लोक टीबीमुळे दगावले. खरे तर, विकसनशील देशांत टीबी इतका सर्रासपणे आढळतो की तिथल्या लोकांसाठी तो जीवनाचा एक भागच होऊन बसला आहे; तर समृद्ध देशांत, टीबीवरील परिणामकारक औषधे कपाटात धूळ खात पडल्यामुळे टीबीला मोकळे रान मिळत आहे. या जागतिक दुर्लक्षितपणामुळे एक जीवघेणी चूक घडली आहे. ती म्हणजे, लोकांकडून टीबीची हेळसांड होत असताना टीबी बॅसिलायचा अधिकाधिक उत्कर्ष होत होता. मानवी इतिहासात कधी नव्हते इतक्या मोठ्या प्रमाणात हे जीवाणू आज लोकांवर हल्ला चढवत आहेत.
एचआयव्ही/एड्स. टीबी हा एचआयव्ही आणि एड्सचा सहप्रवासी आहे. रोगप्रतिकार शक्ती कमजोर करणारा एचआयव्ही संसर्ग लोकांना होतो तेव्हा टीबी होण्याची त्यांना ३० पट शक्यता असते. त्यामुळे, सध्या जगभरातील एचआयव्ही संसर्गामुळे टीबीच्या रुग्णांमध्येही वाढ झाली त्यात आश्चर्य ते काय! अंदाजानुसार, १९९७ साली एचआयव्हीचा संसर्ग झालेले २,६६,००० लोक टीबीमुळे दगावले. “हे ते लोक आहेत ज्यांनी टीबीतून बाहेर पडण्यासाठी उपलब्ध असलेल्या स्वस्त टीबी-प्रतिरोधक औषधांचा फायदा घेतला नाही,” असे एचआयव्ही/एड्सवरील संयुक्त राष्ट्रांच्या सामाईक कार्यक्रमाचे संचालक पीटर पीयॉ यांचे म्हणणे आहे.
बहुऔषधी-प्रतिरोधक टीबी. माणसाच्या प्रतिजैविक शस्त्रागरास पुरून उरणाऱ्या “सुपररोगजंतूंबद्दल” सहसा विज्ञानकथांतून वाचायला मिळते, पण टीबीच्या बाबतीत मात्र ते झपाट्याने एक वास्तविकता बनत आहे. पाच कोटींहून अधिक लोकांना बहुऔषधी-प्रतिरोधक (एमडीआर) टीबीचा संसर्ग झालाही असेल. ‘आता आपण बरे झालो’ या भावनेमुळे, औषधेच उपलब्ध नाहीत यामुळे किंवा मग या रोगाशी एक सामाजिक कलंक निगडित असल्यामुळे काही आठवड्यांतच औषधे बंद करणाऱ्या क्षयरुग्णांच्या शरीरातील सर्व टीबी बॅसिलाय पूर्णपणे नष्ट झालेले नसतात. उदाहरणार्थ, एका आशियाई देशात, प्रत्येक ३ क्षयरोग्यांपैकी २ जण अर्धवट औषधोपचार करतात. त्यामुळे ते पुन्हा आजारी पडतात तेव्हा रोगावर उपचार करणे सोपे नसते; याचे कारण शरीरातील नष्ट न झालेले जीवाणू उचल खातात आणि टीबी-प्रतिरोधक औषधांना दाद देईनासे होतात. परिणामस्वरूप, स्वतः रुग्णांना आणि त्यांच्यापासून संसर्ग होणाऱ्या लोकांना कधीही बरा न होणारा एक प्रकारचा टीबी होतो. आणि एकदा का या जीवघेण्या एमडीआर जीवाणूला मोकळे रान मिळाले, की त्याला पुन्हा पायबंद बसवणे शक्य आहे का? असा एक चिंताजनक प्रश्न मानवजातीसमोर उभा राहील.
[२२ पानांवरील चौकट]
टीबीची जागतिक मगरमिठी
वर्षामागून वर्षे, क्षयरोग (टीबी) अधिक व्यापक, अधिक महागडा आणि अधिक प्राणघातक बनत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने गोळा केलेल्या माहितीवरून या मूक मारेकऱ्याच्या व्यापकतेची कल्पना येते. उदाहरणार्थ: “क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात पाकिस्तानचा पराजय.” “थायलंडमध्ये क्षयरोगाचे अभूतपूर्व पुनरागमन.” “ब्राझीलमध्ये क्षयरोग—आजार आणि मृत्यूचे प्रमुख कारण.” “मेक्सिको क्षयरोगाच्या मगरमिठीत.” रशियामध्ये, “टीबीच्या प्रमाणात झपाट्याने वाढ.” इथिओपियावर “क्षयरोगाचे थैमान.” आणि “टीबीच्या बाबतीत दक्षिण आफ्रिका आघाडीवर.”
टीबीच्या प्रत्येक १०० रुग्णांपैकी ९५ रुग्ण गरीब देशांतले असले तरी आता समृद्ध राष्ट्रांवरीलही टीबीची पकड अधिकाधिक घट्ट होत आहे. उदाहरणार्थ, १९९० च्या दशकाच्या सुरवातीस संयुक्त संस्थानांत टीबी प्रकरणांत लक्षणीय वाढ झाल्याचे अहवालांवरून दिसून आले. “आता पुन्हा एकदा अमेरिकन लोकांना पछाडण्यासाठी टीबीने पुनरागमन केले आहे,” असे यु.एस. पत्रकार वॅलरी गार्टसेफ म्हणतात. त्याचप्रमाणे, रॉयल नेदरलंड्स टीबी असोसिएशनचे संचालक डॉ. याप ब्रूकमान्स यांनी अलीकडेच असे म्हटले की, “पूर्व युरोपच्या तसेच पश्चिम युरोपच्या काही भागांमध्ये” टीबीचा संसर्ग “अधिकाधिक रौद्र रूप धारण करत आहे.” म्हणूनच, “क्षयरोग हा अजूनही सर्वात भयंकर आरोग्य धोका आहे,” असे जे ऑगस्ट २२, १९९७ च्या विज्ञान (इंग्रजी) नियतकालिकात म्हटले होते त्यात आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही.
[२४ पानांवरील चौकट]
टीबीची नीलप्रत आता गवसली
अलीकडेच, संशोधकांना क्षयरोगाच्या (टीबीच्या) जीवाणूची संपूर्ण आनुवंशिक नीलप्रत तयार करण्यात यश आले आहे. ही कामगिरी म्हणजे, “मानवजातीच्या सर्वात यशस्वी भक्षकाविरुद्ध एक नवीन पावित्रा,” असे लंडनच्या इम्पीरियल कॉलेज स्कूल ऑफ मेडिसीनचे डॉ. डग्लस यंग म्हणतात. जागतिक आरोग्य संघटना अहवाल देते, की हा शोध “टीबी-प्रतिरोधक औषधे आणि लसी यांवरील भावी संशोधनाच्या दृष्टीने अति मोलवान ठरेल.”—टीबी ऑबसर्व्हर, सप्टेंबर १५, १९९८. (पृष्ठ २३ पाहा)
[२३ पानांवरील चित्र]
ही संयुक्त औषधे टीबी बॅसिलाय नष्ट करू शकतात
[चित्राचे श्रेय]
Photo supplied by WHO, Geneva
Photo: WHO/Thierry Falise
[२४ पानांवरील चित्र]
एका रुग्णाला बरे करण्यासाठी १०० डॉलर खर्च करावे लागतात
[चित्राचे श्रेय]
Photo: WHO/Thierry Falise
Photo supplied by WHO, Geneva
[२१ पानांवरील चित्राचे श्रेय]
Photo: WHO/Thierry Falise
Photo supplied by WHO, Geneva
Photo: WHO/Thierry Falise