अमेरिकन इंडियन्सकरता बायबलची भाषांतरे
युरोपीय लोकांनी अमेरिकेवर कब्जा मिळवला अगदी तेव्हापासून अनेकांनी येथे राहणाऱ्या मूळ अमेरिकन इंडियन्सना बायबलचे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला.
म्हणूनच १७ व्या शतकापासून आजपर्यंत उत्तर अमेरिकेच्या सहा इंडियन भाषांमध्ये संपूर्ण बायबलचे भाषांतर झाले आहे. पैकी पहिले जॉन एलियॉटचे बायबल होते; सन १६६३ मध्ये मॅसॅचूसेट्स इंडियन लोकांसाठी बोस्टन आणि राक्सबेरी, मॅसॅचूसेट्सपाशी हे छापण्यात आले. एन्सायक्लोपिडिया ऑफ नॉर्थ अमेरिकन इंडियन्स यात हार्वे मार्कोविट्स यांनी लिहिले: “[अमेरिका खंडातील ‘असंस्कृत लोकांना’ “‘सुसंस्कृत’ करण्याच्या हेतूने”] बऱ्याच वसाहतवाल्यांनी करार केले होते, पण त्यांपैकी किती जणांनी हे प्रांजळ हेतूने केले होते याविषयी बरेच इतिहासकार शंका व्यक्त करतात; तथापि, एलियॉट हे आपल्या कार्याप्रती किती कर्तव्यनिष्ठ होते हे उघड आहे कारण बायबलचे भाषांतर करण्याच्या उद्देशाने त्यांनी मॅसॅचूसेट भाषा शिकून या भाषेची लिपी तयार करण्यासाठी पंधरा वर्षे अथक परिश्रम केले. एलियॉटच्या मते ही कठीण कामगिरी ‘देवाचे पवित्र कार्य होते आणि ते देवाची भीती बाळगून, काळजीपूर्वक आणि आदरभावाने करायचे होते.’”
बायबलच्या काही भागांचे इतर अमेरिकन इंडियन भाषांत भाषांतर झाले असले तरी संपूर्ण बायबल मात्र एलियॉट यांचे बायबल प्रकाशित झाल्यानंतर तब्बल दोनशे वर्षांनंतरच आले; हे होते ब्रिटिश ॲण्ड फॉरन बायबल सोसायटीच्या सदस्यांनी वेस्टर्न क्री (१८६२) या भाषेत काढलेले भाषांतर. यानंतर लवकरच आणखीन काही भाषांतरे प्रकाशित झाली: ईस्टर्न आर्क्टिक इन्यूइट (१८७१); डाकोटा किंवा ईस्टर्न स्यू (१८८०); आणि ग्वीचीन या सबआर्कटिक अमेरिकन भाषेत (१८९८).
अगदी अलीकडे प्रकाशित झालेले संपूर्ण बायबल हे ४१ वर्षांच्या प्रयत्नांनंतर आणि दोन बायबल संस्थांच्या संयुक्त विद्यमाने १९८५ साली प्रकाशित झालेले नवाहो भाषांतर आहे. आज, हिब्रू व ग्रीक शास्त्रवचनांचे काही भाग कमीतकमी ४६ इंडियन भाषांत उपलब्ध आहेत.
कोणाचा पुढाकार?
मार्कोविट्स म्हणतात: “बायबल भाषांतराच्या कार्यात खासकरून प्रोटेस्टंट चर्चनेच पुढाकार घेतला . . . ही लक्षात घेण्याजोगी बाब आहे.” हेच लेखक पुढे म्हणतात, दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेच्या (१९६२) आधी कॅथलिक चर्चने “सर्वसामान्य लोकांमध्ये बायबलचे वितरण करण्यास विरोध केला होता; कारण त्यांचे असे म्हणणे होते की बायबलच्या वचनांची अचूक समज प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे . . . प्रशिक्षण या सामान्य लोकांना नव्हते.”
सध्या वेगवेगळ्या बायबल संस्थांचे उत्तर अमेरिकेतील इंडियन्सच्या २० भाषांतरांवर काम सुरू आहे; यांत शायन, हावसूपाय, मिकमॅक आणि झूनी या भाषा आहेत. नवाहो लोकांसाठी ग्रीक शास्त्रवचनांचे एक नवे भाषांतर तयार केले जात आहे. मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील इंडियन्ससाठीही भाषांतरे तयार केली जात आहेत.
यहोवाच्या साक्षीदारांचा कोणत्याही प्रोटेस्टंट संस्थांशी संबंध नाही. तरीसुद्धा अमेरिकन इंडियन्सच्या सर्व प्रदेशांत त्यांचे कार्य सुरू आहे; आणि यामुळे ज्यात नीतिमत्त्व वास करिते असे “नवे आकाश व नवी पृथ्वी” यांसंबंधित बायबल सत्यांकडे अनेक अमेरिकन इंडियन्स आकृष्ट होत आहेत. (२ पेत्र ३:१३) यहोवाचे साक्षीदार अमेरिकन इंडियन्सच्या भाषांत उपलब्ध असलेल्या बायबलचा उपयोग करत आहेत. तसेच, आयमरा, क्री, डाकोटा, ग्वारनी, इनकटीटट, आयरोक्वाई, नवाहो, केचूआ यांसहित अमेरिकन इंडियन्सच्या इतर नऊ भाषांतून वॉच टावर संस्थेने प्रकाशित केलेल्या बायबल साहित्याचा देखील ते उपयोग करत आहेत.—सप्टेंबर ८, १९९६ चे सावध राहा! (इंग्रजी) पाहा.
[२० पानांवरील चित्र]
नवाहो बायबलमध्ये “यहोवा” हे नाव स्तोत्र ६८:४ मध्ये आढळते