मुलांच्या घामातून
“मुले, आता उत्पादन प्रक्रियेचा भाग बनली आहेत, समाजाच्या भविष्याचे शिल्पकार समजण्याऐवजी त्यांना आर्थिक नफा मिळवून देणाऱ्या चीजवस्तू समजले जाते.”—चिरा होंग्लाडारोम, मानव संपत्ती संस्थेचे संचालक, थायलंड.
आपल्या मुलीसाठी तुम्ही कधी बाहुली आणली तर लक्षात ठेवा की ती बाहुली कदाचित आग्नेय आशियातील लहान मुलांनी बनवलेली असेल. तुमचा मुलगा ज्या फुटबॉलशी खेळतो तो फुटबॉल, आपल्या आई आणि चार बहिणींसोबत दिवसाला ३० रुपये कमावणाऱ्या तीन वर्षांच्या मुलीने शिवला असावा याचा विचार करा. तुम्ही कधी गालिचा आणलात, तर तो कदाचित सहा वर्षांच्या मुलांनी आपल्या कोवळ्या हातांनी विणला असावा जे गलिच्छ परिस्थितींमध्ये पुष्कळ तास राबण्यातच आपले आयुष्य घालवतात.
बालमजुरी कितपत फैलावलेली आहे? मुलांवर तिचा काय परिणाम होत आहे? या समस्येचे निरसन करण्यासाठी काय केले जाऊ शकते?
समस्येची व्यापकता
आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेनुसार (आयएलओ), विकसनशील राष्ट्रांमध्ये ५ ते १४ वर्षांच्या वयोगटातील कामकरी मुलांची संख्या २५ कोटी असण्याचा अंदाज केला आहे.a असे मानले जाते की त्यापैकी ६१ टक्के आशियात, ३२ टक्के आफ्रिकेत आणि ७ टक्के लॅटिन अमेरिकेत आहेत. औद्योगिकरण झालेल्या राष्ट्रांमध्येही बालमजुरी आहे.
दक्षिण युरोपमध्ये, पगारी नोकरी करत असलेली पुष्कळ मुले आहेत जी खासकरून शेतीसारखी हंगामी कामे आणि लहान कारखान्यांमधील कामे करतात. अलीकडेच, मध्य तसेच पूर्व युरोपमध्ये समाजवादाऐवजी भांडवलशाही सत्ता आल्याने बालमजुरी वाढली आहे. संयुक्त संस्थानांत, बालमजुरांची नोंदलेली संख्या ५५ लाख आहे, पण त्यामध्ये खूप वेळ काम कराव्या लागणाऱ्या कारखान्यांमध्ये किंवा मोठ्या शेतांवर हंगामी आणि भटके कामगार म्हणून बेकायदेशीरपणे कामाला असलेली १२ वर्षांखालील मुले सामील नाहीत. इतकी लाखोलाख मुले या कामगार वर्गात कशी खेचली जातात?
बालमजुरीची कारणे
दारिद्र्याचा गैरफायदा. “मुलांना धोकेदायक, क्षीणवणाऱ्या मजुरीत ढकलणारे सर्वात शक्तिशाली कारण आहे दारिद्र्याचा गैरफायदा,” असे जगातील मुलांची दशा १९९७ म्हणते. “अगदी गरीब कुटुंबांमध्ये, लहान मुलाच्या पगाराने किंवा त्याच्या मदतीने आईवडिलांना कामावर जाता येते म्हणून कशीबशी गुजराण व्हायला मदत होते नाहीतर उपाशी मरण्याची पाळी येऊ शकते.” बालमजुरांचे पालक बहुधा बेकार असतात किंवा त्यांना पुरेसा पगार देणारी नोकरी नसते. खात्रीलायक मिळकतीची त्यांना अत्यंत गरज असते. तर मग त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलांना नोकऱ्या का दिल्या जातात? कारण मुलांना कमी पगार देता येतो. कारण लहान मुले सालस असतात, वाकवाल तशी वाकणारी असतात—पुष्कळजण अधिकाऱ्यांपुढे अवाक्षरही न काढता सांगितले असेल तसे मुकाट्याने काम करतात. कारण सहसा मुले संघटित होऊन जुलूमाविरुद्ध प्रतिकार करत नाहीत. शिवाय, त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केल्यावरही ते प्रतिकार करत नाहीत.
शिक्षणाचा अभाव. भारतातला सुधीर हा ११ वर्षांचा मुलगा त्या कोट्यवधी मुलांपैकी आहे ज्याने शाळा मधूनच सोडून दिली आणि कामावर जाऊ लागला. का? “शाळेत शिक्षक नीट शिकवत नव्हते,” तो म्हणतो. “आम्हाला अक्षरं शिकवा म्हटलं तर मारायचे. वर्गात झोपायचे. . . . आम्हाला काही समजलं नाही तर समजावूनही सांगायचे नाहीत.” दुःखाची गोष्ट म्हणजे, सुधीरने शाळेतली जी परिस्थिती सांगितली आहे त्यात जराही अतिशयोक्ती नाही. विकसनशील देशांमध्ये, सामाजिक संस्थांवर केल्या जाणाऱ्या खर्चात कपात करण्यात आल्यामुळे शिक्षण क्षेत्राला सर्वात जोराचा फटका बसला आहे. जगातल्या सर्वात कमी विकसित असलेल्या १४ देशांमध्ये १९९४ साली घेण्यात आलेल्या युएनच्या एका सर्वेक्षणातून काही मनोवेधक वास्तविकता प्रकट झाल्या. उदाहरणार्थ, यांतील निम्म्या देशांमध्ये पहिलीतल्या प्रत्येक १० विद्यार्थ्यांपैकी फक्त चौघांसाठी आसने आहेत. निम्म्या विद्यार्थ्यांजवळ पाठ्यपुस्तके नाहीत, आणि निम्म्या वर्गांमध्ये फळा नाही. तेव्हा अशा या शाळांमधली पुष्कळशी मुले शेवटी कामाला जाऊ लागतात यात आश्चर्याचे काही नाही.
पारंपरिक अपेक्षा. सर्वात धोकेदायक आणि कष्टाचे काम सहसा अल्पसंख्यांक समुदायांसाठी, खालच्या जातींसाठी, समाजातल्या मागासलेल्यांसाठी आणि गरीब लोकांसाठी राखून ठेवले जाण्याची शक्यता असते. एका आशियाई देशाबद्दल संयुक्त राष्ट्रे बाल निधी याने असा अहवाल दिला की, “काही लोक अधिकाराची आणि बौद्धिक स्वरूपाची कामे करायला जन्मलेले असतात तर बाकीचे अधिकांश लोक शारीरिक काम करायला जन्माला येतात असा लोकांचा समज आहे.” पाश्चात्त्य देशांमध्येही लोकांचे दृष्टिकोन फारसे वेगळे नाहीत. बड्या लोकांना आपल्या मुलांनी धोकेदायक काम करण्याची कल्पना करवणार नाही पण तेच जर खालच्या जाती-जमातीतल्या किंवा गरीब अल्पसंख्यांक लोकांच्या लहान मुलांनी केले तर त्यांना त्याचे काहीच वाटणार नाही. उदाहरणार्थ, उत्तर युरोपमध्ये बालमजूर बहुधा तुर्क किंवा आफ्रिकन असतात; संयुक्त संस्थानांत, ते आशियाई किंवा लॅटिन अमेरिकन असतात. भोगवादात जखडलेल्या आधुनिक समाजात तर बालमजुरीला आणखीनच खतपाणी मिळाले आहे. स्वस्त उत्पादनांना जास्त मागणी आहे. पण ही उत्पादने ज्या कोट्यवधी अनामिक, शोषित मुलांनी तयार केली असतील, त्यांचा विचार सहसा कोणी करत नाही.
बालमजुरीचे प्रकार
बालमजुरी कोणकोणते स्वरूप धारण करते? एकंदर पाहायला गेले तर, बहुतेक बाल कामगार घरगुती कामात जुंपलेले असतात. अशा मजुरांना “जगातील सर्वात विस्मरण झालेली मुले” असे म्हटले गेले आहे. घरगुती कामकाज खरं तर धोकेदायक असायला नको पण बहुधा ते धोकेदायक असते. घरात चाकरी करणाऱ्या मुलांना फार कमी पगार दिला जातो—किंवा दिलाच जात नाही. त्यांच्या कामाच्या अटी ठरवणे, हे सर्वस्वी त्यांच्या मालकांवर अवलंबून असते. त्यांना जिव्हाळा, शिक्षण, खेळ आणि सामाजिक कार्यहालचाली यांपासून वंचित ठेवले जाते. ते सहजपणे शारीरिक आणि लैंगिक अत्याचारालाही बळी पडतात.
इतर लहान मुले वेठबिगारीत आणि बंधपत्रित मजुरीत जखडलेली असतात. दक्षिण आशिया त्याचप्रमाणे इतर भागांमध्येही, आईवडिल आपल्या आठ-नऊ वर्षांच्या मुलांना डोक्यावरचे लहान कर्ज फेडेपर्यंत कारखान्यातल्या मालकांकडे किंवा त्यांच्या एजंटकडे मजुरी करायला पाठवतात. पण ही मुले आयुष्यभर राबून कर्ज फेडणे तर दूरच कमीसुद्धा करू शकत नाहीत.
लहान मुलांचे व्यापारी कारणांसाठी लैंगिक शोषण होते त्याविषयी काय? असा अंदाज बांधला जातो की, दरवर्षी जगभरात किमान दहा लाख मुलींना फसवून या शरीरविक्रय व्यापारात आणले जाते. मुलांचे देखील सहसा लैंगिक शोषण होते. अशाप्रकारच्या अत्याचारामुळे होणारा शारीरिक आणि भावनिक आघात—शिवाय एचआयव्हीची लागण—लक्षात घेता, ही सर्वात भयंकर स्वरूपाची बालमजुरी ठरते. “समाजात, ठावठिकाणा नसलेल्या लोकांसारखीच आमची गत आहे,” असे सेनेगल येथील १५ वर्षांची एक वेश्या म्हणते. “आमच्याशी जवळीक ठेवण्याची किंवा आमच्यासोबत ओळख दाखवण्याचीही लोकांना लाज वाटते.”b
पुष्कळ बालमजुरांचे कारखान्यांमध्ये आणि मळा उद्योगात शोषण केले जाते. ही कच्चीबच्ची, प्रौढांसाठी धोकेदायक समजल्या जाणाऱ्या खाणींमध्ये राबत असतात. पुष्कळांना क्षयरोग, ब्राँकायटिस आणि दमा यांसारखे आजार असतात. मळ्यांमध्ये काम करणाऱ्या बालमजुरांना कीटकनाशक औषधे, साप आणि किडे चावणे असले सगळे प्रकार सहन करावे लागतात. काही मुले तर विळ्याने ऊस कापताना अधू झाली आहेत. इतर कोट्यवधी मुले रस्त्यावर काम करतात. उदाहरणार्थ, दहा वर्षांच्या शिरीनचे उदाहरण घ्या; कचरा गोळा करून ती आपली गुजराण करते. तिने शाळेचे तोंड कधी पाहिले नाही, पण रोजीरोटी कमवण्याच्या अर्थशास्त्रात ती निपुण आहे. १२ ते २० रुपये मोलाचा कचरा आणि प्लास्टिक बॅगा विकल्या तरच तिला एक वेळचे जेवण मिळते. त्याहून कमी पैसे मिळाले तर उपाशी पोटी राहावे लागते. घरातला अत्याचार किंवा दुर्लक्षितपणा चुकवण्यासाठी रस्त्यावर आल्यानंतर या मुलांवर अधिकच अत्याचार होतो आणि त्यांचे जास्त शोषण होते. एका आशियाई शहरात रस्त्यावर गोळ्या विकणारी दहा वर्षांची जोझी म्हणते, “मला वाईट लोकांच्या हाती पडू देऊ नकोस अशी मी देवाला दररोज प्रार्थना करते.”
बेचिराख झालेले बालपण
बालमजुरीच्या अशा प्रकारांमुळे, कोट्यवधी मुलांना गंभीर धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. हे धोके त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे असू शकतात किंवा कामाच्या ठिकाणाच्या खराब परिस्थितीमुळे उद्भवू शकतात. प्रौढांपेक्षा लहान मुले आणि तरुण कामगार, अधिक गंभीर व्यावसायिक अपघातांत सापडतात. याचे कारण म्हणजे, लहान मुलाचे शरीरशास्त्र प्रौढ व्यक्तीपेक्षा वेगळे असते. जड कामाने त्याच्या पाठीच्या कण्यावर किंवा कटिभागावर सहजासहजी दुष्परिणाम होऊ शकतो. शिवाय, घातक रसायनांमुळे किंवा प्रारणामुळे प्रौढांपेक्षा लहान मुलांना अधिक त्रास होतो. या व्यतिरिक्त, तास न् तास कष्टाचे आणि एकसुरी काम त्यांना शारीरिकरित्या मानवत नाही—आणि सहसा तेच त्यांच्या वाट्याला येते. त्यांना बहुधा धोक्यांची काहीच जाणीव नसते, शिवाय कोणती खबरदारी घ्यावी याची त्यांना जास्त माहिती नसते.
बळी पडलेल्या या लहान मुलांच्या मानसिक, भावनात्मक आणि बौद्धिक वाढीवर होणारे बालमजुरीचे परिणामही गंभीर आहेत. या मुलांना कधीच कोणाचे प्रेम मिळत नाही. मारहाण, अपमान, जेवण न देण्याची शिक्षा आणि लैंगिक छळ या गोष्टी त्यांना सर्रास सहन कराव्या लागतात. एका अभ्यासानुसार, अंदाजे २५ कोटी बालमजुरांतील जवळजवळ निम्म्या मुलांनी शाळा सोडून दिली आहे. शिवाय, खूप तास काम करणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे निरीक्षण करण्यात आले आहे.
या सगळ्याचा काय अर्थ होतो? हाच की बहुतेक बालमजूर, दारिद्र्य, हालअपेष्टा, आजारपण, निरक्षरता आणि समाजातील अपसामान्य भूमिकेच्या चक्रातून बाहेर पडू शकत नाहीत. किंवा, पत्रकार रॉबिन राईट यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, “जगाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात इतकी प्रगती करूनही, २० व्या शतकाच्या अंताला असलेले हे जग अशा कोट्यवधी मुलांना जन्म देत आहे ज्यांना सर्वसामान्य जीवन जगण्याची आशाच नाही, तर मग जगाला २१ व्या शतकात नेण्याची कल्पना तर दूरच राहिली.” या विचारप्रवर्तक गोष्टींमुळे हे प्रश्न उठतात: मुलांना कशी वागणूक मिळावी? अत्याचारी बालमजुरीच्या समस्येवर काही उपाय आहेत का?
[तळटीपा]
a सर्वसाधारणपणे, काम करणारी मुले कमीत कमी १५ वर्षांची असली पाहिजेत असे आयएलओने ठरवले आहे—तेपण किमान शिक्षण १५ वर्षांच्या आत पूर्ण होत असेल तरच. जगभरात सध्या किती मुले काम करत आहेत हे सहसा याच आधारावर ठरवले जाते.
b मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविषयी अधिक माहितीसाठी, मे ८, १९९७ च्या सावध राहा! अंकातील पृष्ठे ११-१५ पाहा.
[५ पानांवरील चौकट]
बालमजुरी म्हणजे काय?
सर्व समाजातली बहुतेक मुले कोणत्या न कोणत्या प्रकारचे काम करतात. त्यांच्या कामाचे स्वरूप निरनिराळ्या समाजांनुसार आणि काळानुसार वेगवेगळे असते. काम करणे हा मुलांच्या शैक्षणिक अनुभवातील एक अत्यावश्यक भाग असू शकतो आणि पालकांनी मुलांना महत्त्वाची कलाकौशल्ये शिकवण्याचे एक माध्यमही असू शकते. काही देशांमध्ये, लहान दुकानांमध्ये आणि कारखान्यांमध्ये मुले कामाला असतात; यामुळे पुढे जीवनात ते वाकबगार कामगार बनतात. इतर देशांमध्ये, किशोरवयीन मुले आठवड्यातले काही तास काम करून वरखर्च मिळवतात. संयुक्त राष्ट्रे बाल निधीनुसार असे काम, “मुलाच्या शालेय शिक्षणाच्या, मनोरंजनाच्या आणि विश्रामाच्या वेळेआड न येता त्याच्याकरता फायदेकारक आहे आणि त्याच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, नैतिक किंवा सामाजिक विकासाची उन्नती किंवा वृद्धी करणारे आहे.”
दुसऱ्या बाजूला पाहता, बालमजुरी म्हणजे कमी पगारावर तेही सहसा प्रकृतीला इष्ट नसणाऱ्या परिस्थितींमध्ये पुष्कळ तास काम करणे. अशाप्रकारचे काम, “स्पष्टतः विनाशकारक किंवा शोषण करणारे असते,” असे जगातील मुलांची दशा १९९७ यात म्हटले आहे. “वेश्याकामासाठी मुलांचे शोषण करणे हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणीय आहे असे चारचौघांत म्हणण्याची कोणीही हिंमत करणार नाही. हेच ‘बंधपत्रित बालमजुरीच्या’ बाबतीतही म्हटले जाऊ शकते; ही संज्ञा अशा मुलांकरता वापरली जाते ज्यांना त्यांच्या आईवडिलांनी किंवा आजीआजोबांनी काढलेले कर्ज फेडण्यासाठी अक्षरशः गुलाम बनवून ठेवले जाते. शिवाय, आरोग्याला आणि सुरक्षेला धोकेदायक असणाऱ्या उद्योगांनाही हे लागू होते . . . धोकेदायक काम हे लहान मुलांना मुळीच मानवत नाही.”
[८, ९ पानांवरील चौकट/चित्र]
“आणखी पुष्कळ करायचे बाकी”
आंतरराष्ट्रीय मजूर संघटना (आयएलओ), बालमजुरीच्या सर्वात कौर्य प्रकारांचे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नात पुढाकार घेत आहे. आयएलओ संस्था, १५ वर्षांखालील मुलांच्या मजुरीवर बंदी आणणारे कायदे बनवायला सरकारांच्या मागे लागते. त्याचप्रमाणे, १२ वर्षांखालील बालमजुरांवर बंदी घालण्याच्या आणि शोषणाचे सर्वात भयंकर प्रकार अवैध ठरवण्याच्या ठरावांचाही ते पुरस्कार करते. हे प्रयत्न कितपत यशस्वी ठरले आहेत हे जाणून घेण्यासाठी सावध राहा! नियतकालिकाने यु.एस. श्रम विभागातल्या आंतरराष्ट्रीय बालमजूर कार्यक्रमाच्या संचालिका सोन्या रोझन यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आयएलओच्या विविध कार्यक्रमांशी फार जवळून कार्य केले आहे. त्या चर्चेचा काही भाग येथे देण्यात आला आहे.
प्र.: बालमजुरीचा प्रतिकार करण्याचा सर्वात प्रभावशाली मार्ग कोणता आहे?
उ.: या प्रश्नाचे एकही अचूक उत्तर आमच्याजवळ नाही. परंतु, आंतरराष्ट्रीय पातळीवर आम्ही ज्या विषयांची चर्चा केली आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत; खासकरून, कायद्याची योग्य अंमलबजावणी त्याचप्रमाणे सर्वत्र प्राथमिक शिक्षण, जमल्यास आवश्यक आणि मोफत करावे हे विषय महत्त्वपूर्ण आहेत. शिवाय, पालकांना पुरेसा पगार देणारी नोकरी असणे हेसुद्धा आवश्यक आहे.
प्र.: बालमजुरीचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने जी प्रगती झाली आहे तिच्याबद्दल तुम्हाला समाधान वाटते का?
उ.: मला कधीच समाधान वाटलेले नाही. आमचं म्हणणं असं आहे की, अत्याचारी वातावरणात एक मूल जरी काम करत असलं तरी आमचं काम अपूर्णच आहे. आम्ही आयएलओ कार्यक्रमांच्या साह्याने प्रगतीची बरीच शिखरे गाठली आहेत. पण तरीही आणखी खूप काम शिल्लक आहे.
प्र.: बालमजुरीचे उच्चाटन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कितपत प्रतिसाद मिळतो?
उ.: या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाही. सध्यातरी आम्हाला जगभरातून काही अंशी असे एकमत मिळाले आहे की, बालमजुरीच्या समस्येवर काहीतरी केलेच पाहिजे. पण, या क्षणी, कसे आणि केवढ्या लवकर हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत असे मला वाटते. काही विशिष्ट प्रकारच्या बालमजुरीच्या समस्येचे निरसन करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय कोणते आहेत? हे शोधून काढणेच आपल्यासमोर असणारे खरे आव्हान आहे असे मला वाटते.
प्र.: भविष्यात आपण बालमजुरांसाठी काय करणार आहात?
उ.: जगभरातले सर्व देश या वर्षी जिनेव्हा येथे पुन्हा एकदा एकत्र मिळून बालमजुरीच्या सर्वात भयंकर प्रकाराविषयी एक नवीन ठराव संमत करणार आहेत. यातून पुष्कळ आशा मिळते कारण सर्व राष्ट्रे, पुन्हा कामगार संघटना आणि मालकांच्या संघटना एकत्र येणार आहेत. यामुळे बालमजुरीचे सर्वात भयंकर प्रकार नाहीसे करण्याचे उद्दिष्ट असलेली एक नवीन संरचना तयार होईल अशी आशा आहे.
परंतु सर्वच जण सोन्या रोझनसारखे आशावादी नाहीत. चार्ल्स मकॉरमक, मुलांचा बचाव करा या संघटनेचे अध्यक्ष साशंक आहेत. “हे साध्य करण्यासाठी पुरेसा राजकीय उत्साह आणि जनजागृती नाहीये,” असे ते म्हणतात. का? संयुक्त राष्ट्रे बाल निधी अशी टिपणी करते: “बालमजुरी ही एक गुंतागुंतीची समस्या आहे. तिला शक्तिशाली गटांचा पाठिंबा आहे, त्यात पुष्कळ कंपन्यांचे मालक, हितसंबंध गुंतवलेले गट आणि अर्थशास्त्रज्ञ हे सर्व म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत मुक्त बाजार असला पाहिजे तर रूढीवाद्यांचे असे म्हणणे आहे की, विशिष्ट जातीच्या किंवा वर्गाच्या मुलांना हे हक्क नाहीत.”
[चित्र]
सोन्या रोझन
[५ पानांवरील चित्र]
बालमजुरीची ही दुःखद कहाणी म्हणजे खाणींमध्ये आणि कापसाच्या कारखान्यांमध्ये राबणे
U.S. National Archives photos
[चित्राचे श्रेय]
[७ पानांवरील चित्र]
कापड कारखान्यात काम करताना
[७ पानांवरील चित्र]
कचरा गोळा करताना
[चित्राचे श्रेय]
UN PHOTO 148046/ J. P. Laffont - SYGMA
[७ पानांवरील चित्र]
कष्टाने फाट्याचे लाकूड गोळा करताना
[चित्राचे श्रेय]
CORBIS/Dean Conger
[८ पानांवरील चित्र]
रस्त्यावरचे बाल विक्रेते दिवसाला २ रुपये ४० पैशांसाठीसुद्धा काम करतात
[चित्राचे श्रेय]
UN PHOTO 148027/Jean Pierre Laffont
[८ पानांवरील चित्र]
सुताराच्या दुकानात मजुरी
[चित्राचे श्रेय]
UN PHOTO 148079/ J. P. Laffont - SYGMA
[९ पानांवरील चित्र]
गुजराण करण्यासाठी धडपड
[चित्राचे श्रेय]
UN PHOTO 148048/J. P. Laffont - SYGMA