जागतिक शोकांतिका टाळण्याचा मार्ग
संयुक्त राष्ट्र संघाने त्यास “जागतिक शोकांतिका”—असे समर्पक नाव दिले आहे. जगभरात, प्रती मिनिटाला गरोदरपणात किंवा प्रसूतीकाळात एक स्त्री दगावते.
हे प्रामुख्याने विकसनशील देशांत घडते. युरोपमध्ये गर्भारपण-निगडित कारणांमुळे, १०,००० स्त्रियांपैकी एकीचा आणि संयुक्त संस्थानांत १२,५०० स्त्रियांपैकी एकीचा मृत्यू होतो, तर लॅटिन अमेरिकेत ७३ पैकी १, आशियामध्ये ५४ पैकी १ आणि आफ्रिकेत चक्क २१ पैकी १ इतकी ही मृत्यूची संभाव्यता वाढते!
खरे तर, दर वर्षी गर्भारपण-निगडित कारणांमुळे दगावणाऱ्या या ६,००,००० स्त्रियांपैकी बऱ्याच जणी कुशल प्रसूती सेवकांच्या साह्याने वाचल्या असत्या; म्हणूनच, संयुक्त राष्ट्रे बाल निधी (युनिसेफ) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), स्त्रियांना (तसेच पुरुषांना) पेशेवाईक सुईणींचे प्रशिक्षण देण्यावर आता भर देत आहे.
डॉक्टरांची कमी असलेल्या देशांत अशा प्रशिक्षित सुईणी म्हणजे जीवनदायीनीच. अलीकडेच, युनिसेफचे डॉ. फ्रान्स डॉने आणि डब्ल्यूएचओच्या सल्लागारपदी असणाऱ्या ॲन थॉम्पसन यांनी युएन रेडिओला सांगितले, की प्रशिक्षित सुईणींना अधिकाधिक जबाबदाऱ्या दिल्याचे उत्तम परिणाम दिसून येत आहेत. उदाहरणार्थ, अनेक आफ्रिकन देशांत, बाळंतपणानंतर बाहेर न पडलेला वार काढून टाकण्याची अनुमती सुईणींना दिल्यापासून मातांच्या मृत्यूप्रमाणात उल्लेखनीय घट झाल्याचे त्यांनी सांगितले. इंडोनेशियामध्ये प्रत्येक गावासाठी दोन सुईणींना प्रशिक्षण देणारा एक प्रकल्प राबवला जात आहे आणि त्यामुळे तिथेही अशीच प्रगती होत असल्याचे दिसून येते. आतापर्यंत, ५५,००० प्रशिक्षित सुईणींना पाठवण्यात आले आहे.
पर्स्पेक्टीव्ह नावाच्या युएन रेडिओ कार्यक्रमानुसार, “विकसनशील देशांमध्ये आजही बाळंतपणात सुईणी मदत करतात.” फ्रान्स, नेदरलँड्स, स्वीडन आणि संयुक्त राज्य यांसारख्या देशांनी या प्रथेला कधीच मुठमाती दिली नाही, तर संयुक्त संस्थानांत ही प्रथा आता पुन्हा डोके वर काढू लागली आहे. खुद्द एक प्रशिक्षित सुईण असलेली ॲन थॉम्पसन म्हणते, की या सुईणी बाळंतपण होईपर्यंत वैयक्तिक काळजी घेतात आणि त्यामुळेच वर उल्लेखिलेल्या देशांमध्ये सुईणींना खूप महत्त्व आहे. “कुठल्याही प्रसूतीला जवळजवळ चोवीस तास तर लागतातच; पण, २४ तास तिथेच थांबण्यासाठी डॉक्टरांना कुठं वेळ असतो?” पण खरे पाहता, “सहानुभूतिशील, जाणकार, समजूतदार आणि स्त्रीचं मनोधैर्य उंचावणारं कोणी तिच्या जवळ असणं,” ही देखील सुरक्षित बाळंतपणास कारणीभूत असणारी एक गोष्ट आहे असेही त्या म्हणतात.
पर्स्पेक्टीव्हने पुढे असे म्हटले की, “दर वर्षी अशा ६ कोटी प्रसूती होतात ज्यात स्त्रीची काळजी घेण्यासाठी केवळ एखादा कौटुंबिक सदस्य तिच्या जवळ असतो किंवा प्रशिक्षण नसलेला एखादा प्रसूती सेवक असतो अथवा त्याहून वाईट म्हणजे कोणीही नसते.” त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी युएन सध्या प्रयत्नशील आहे. सुरवात म्हणून, डब्ल्यूएचओने १९९८ च्या जागतिक आरोग्य दिनाचे शीर्षक, “सुरक्षित मातृत्व” असे ठेवले आहे. “अर्थात, पुढच्या दोनतीन वर्षांत हे ध्येय साध्य होणार नाही याची आम्हाला जाणीव आहे,” असे डॉ. डॉने म्हणतात. पण, “बाळंतपणाच्या वेळी प्रत्येक स्त्रीच्या जवळ एक प्रशिक्षित कर्मचारी” असावा हा त्यामागील युएनचा हेतू आहे.
[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]
UN/J. Isaac