खऱ्या आशेचा संदेश ऐकण्यासाठी तुमचे स्वागत
हा संदेश, “देवाचे भविष्यसूचक वचन” या यहोवाच्या साक्षीदारांच्या या वर्षीच्या प्रांतीय अधिवेशनातील “भाकीत केल्यानुसार—सर्व काही नवीन करणे” या जाहीर व्याख्यानात तुम्हाला ऐकायला मिळेल; वर्ष २००० सबंध मानवजातीसाठी आशीर्वाद घेऊन येणारे वर्ष ठरेल असे अनेकांना वाटते.
एका विद्यापीठातील प्राध्यापकाने म्हटले: “नव्या सहस्रकात प्रवेश केल्यावर एका खरोखरच महाभयंकर शतकातून आपली सुटका होणार आहे.” शिवाय, “वर्ष २००० हे दिनदर्शिकेवरील इतर कोणत्याही वर्षासारखेच आणखीन एक वर्ष असले” तरी मॅकलीनचे नियतकालिक म्हणते त्यानुसार, “एका नवीन युगाची सुरवात करणारे ते वर्ष ठरू शकेल.” पण अनुभवावरून असे होणे अशक्यप्राय वाटते.
याचे कारण, एक “नवीन युग” आणण्याचे मनुष्याचे सर्व प्रयत्न सतत फोल ठरले आहेत. तर मग, १,९०० वर्षांपूर्वी देवाने दिलेले अभिवचन: “पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो” त्यावर आपण विश्वास कसा ठेवू शकतो? (प्रकटीकरण २१:५) या आशादायक जाहीर भाषणात याची खात्रीलायक कारणे दिली जातील. या महिन्याच्या सुरवातीपासून जगभरातील शेकडो अधिवेशनांत हे व्याख्यान दिले जाणार आहे; तेव्हा तुम्हाला जवळ असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते ऐकू शकता. भारतात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत हा कार्यक्रम २७ ठिकाणी होणार आहे.
तुमच्यासाठी अधिवेशनाचे कोणते ठिकाण जवळ पडेल हे ठरवण्यासाठी स्थानिक यहोवाच्या साक्षीदारांशी अथवा या नियतकालिकाच्या प्रकाशकांशी संपर्क साधा.