वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ७/८ पृ. २८-२९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • परिणाम—कमी जनन प्रमाणाचे
  • वाढती अल्पनिद्रा
  • निद्रारोगाचे पुनरागमन
  • अनिष्ट परिणाम
  • शास्त्रीय संगीतामार्फत प्रवाशांचे डोके शांत ठेवणे
  • एकूण सगळेच जबाबदार
  • धूम्रपानामुळे अब्जावधी रुपयांचा भुर्दंड
  • तुमच्या हृदयाचे संरक्षण करा
  • तुमच्या बाळाशी बोला
  • विमाने सुस्थितीत कशी राहू शकतात?
    सावध राहा!—१९९९
  • वाहतुकीच्या समस्येवर तुमच्याकडे काही तोडगा आहे का?
    सावध राहा!—२००६
  • विमाने किती सुरक्षित आहेत?
    सावध राहा!—१९९९
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९७
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ७/८ पृ. २८-२९

जगावरील दृष्टिक्षेप

परिणाम—कमी जनन प्रमाणाचे

पॅरिसच्या दि इंटरनॅशनल ट्रिब्यून वृत्तपत्रानुसार, ‘अलीकडील काळात, औद्योगिक राष्ट्रांतील जनन प्रमाण घटत असल्यामुळे तिथे एक चिंताजनक स्थिती उत्पन्‍न झाली आहे.’ का? कारण त्याचा अर्थ, पुढे अशी एक वेळ येईल जेव्हा वयस्कर मंडळीची देखभाल करण्यासाठी पुरेसे तरुण लोक नसतील. उदाहरणार्थ, बऱ्‍याच युरोपियन देशांची स्थिती अशी आहे, की तिथे विशीखालच्या युवकांपेक्षा साठी ओलांडलेल्या लोकांचीच संख्या जास्त आहे. वृद्धांची संख्या वाढण्याचे एक कारण म्हणजे तिथली दांपत्ये काही काळ अपत्यहीन राहणे पसंत करतात; काहीजण देशाटन करण्यासाठी, काही आपले करिअर बनवण्यासाठी तर काही उच्च शिक्षण घेण्यासाठी. शिवाय, आर्थिक ओढाताणीमुळे मूल “एक अनावश्‍यक भार” किंवा “अडचण” असल्याचे समजले जाते; आणखी एक कारण असे, की हल्ली लोकांचे जीवनमानही पूर्वीपेक्षा जास्त वाढले आहे.

वाढती अल्पनिद्रा

न्यूजवीक नियतकालिक म्हणते की, ‘या शतकाच्या सुरवातीला अमेरिकन लोक दररोज रात्री जितका वेळ झोपायचे त्याच्या तब्बल दीडएक तास कमी ते आता झोपतात.’ याचे कारण सांगताना, विस्कॉनसिन विद्यापीठातील रोगप्रतिबंध शास्त्राचे प्राध्यापक टेरी यंग म्हणतात की, “झोप ही एक वस्तू असून तिला सहजासहजी फसविले जाऊ शकते असा लोकांचा आता ग्रह झाला आहे. कमी झोप घेणे हे कष्टाचे आणि प्रगतीचे चिन्ह मानले गेले आहे.” पण, पुरेशी झोप घेतली नाही तर अनेक अप्रत्यक्ष दूरगामी परिणाम, किरकोळ निराशेपासून ते भयंकर हृदयरोगांपर्यंत कुठलेही रोग होऊ शकतात. उंदरांवर केलेल्या एका प्रयोगांत, पुरेशी झोप न मिळाल्यामुळे अवघ्या अडीच आठवड्यात काही उंदीर मेले. “अर्थात, अल्पनिद्रेमुळे तुम्हाला असा एकाएकी मृत्यू येणार नाही हे खरे असले तरीही पुरेशी झोप न घेतलेला एखादा शिणलेला डॉक्टर चुकीची औषधे लिहून देतो किंवा एखादा झोपाळू वाहनचालक अचानक तुमच्या मार्गाआड येतो तेव्हा कदाचित अप्रत्यक्षपणे तुम्हाला तुमच्या जीवाची किंमत मोजावी लागेल,” असे न्यूजविक म्हणते. निद्रा संशोधक जेम्स वॉल्श म्हणतात: “यासाठी लोकांना हे पटवून देण्याची गरज आहे, की पुरेशी झोप घेणे तसेच वेळच्या वेळी वामकुक्षी घेणे हा डोळे उघडे ठेवून वाहन चालवण्याचा आणि लक्षपूर्वक काम करण्याचा सगळ्यात खात्रीलायक मार्ग आहेत.”

निद्रारोगाचे पुनरागमन

अंगोलामध्ये १९७४ साली निद्रारोगाची तीन प्रकरणे उघडकीस आली. मागच्या काही वर्षांत, तिथे या रोगाची कमीतकमी ३,००,००० प्रकरणे असल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्‍त केला. याशिवाय हजारो—नव्हे लाखो लोकांना हा रोग होण्याचा धोका आहे. निद्रारोग सहसा त्सेत्से माशीच्या चाव्यामुळे होतो. परोपजीवीचा संसर्ग झालेल्या व्यक्‍तीचे रक्‍तशोषण केल्यानंतर ही माशी दुसऱ्‍या व्यक्‍तीला संसर्गित करण्यास निघते. शेतावर काम करणाऱ्‍या किंवा नदीवर धुणे धुणाऱ्‍या लोकांना आणि खास करून आईच्या पाठीला कापडाने बांधलेल्या बालकांना हा रोग होण्याचा धोका आहे. डोकेदुःखी, ताप आणि उलट्या ही या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. रात्रभर डोळा न लागल्यामुळे या रोगाचे बळी दिवसा सहसा डुलक्या मारतात. परोपजीवी प्रथम व्यक्‍तीच्या केंद्रिय मज्जासंस्थेवर आणि शेवटी मेंदूवर हल्ला करतो; परिणामस्वरूप मानसिक असंतुलन, कोमा आणि शेवटी मृत्यू ओढवतो. दूषितीकरणाची साखळी मोडणे आणि बळींवर औषधोपचार करणे महागडे आणि अडचणीचे असते; याचे कारण एका रुग्णामागे सुमारे ९० डॉलर इतका खर्च होत असून तो “नक्कीच अंगोलाच्या लोकांना परवडण्यासारखा नाही” असे लंडनचे द डेली टेलिग्रॉफ म्हणते.

अनिष्ट परिणाम

शहरातील वाहतूक सहसा वाहनचालकांच्या सहनशीलतेची जणू परीक्षाच घेते. रोममधील, ला सापियनसा विद्यापीठातील मानसोपचारतज्ज्ञांच्या अभ्यासातून निष्पन्‍न झाले, की वाहतूक वाढते तशी शिवीगाळही वाढते. कोरीएरे डेला सेरा वृत्तपत्रानुसार, ग्रामीण भागांतल्या महामार्गांवरील “५४ टक्के अपशब्द आणि धर्मभ्रष्ट वर्तन” वाहतुकीच्या समस्यांमुळे घडले होते. मोठमोठ्या शहरातील वाहतुकीच्या बाबतीत मात्र, “ख्रिस्ती संत आणि मॅडोना यांची नावे घेऊन अपशब्द काढण्याचा प्रकार” दिसून येतो. “हल्ली महानगरांमध्ये अपशब्द किंवा शिव्याशाप म्हटलेल्या ७८ टक्के अभद्र भाषणासाठी वाहतूक कारणीभूत आहे,” असे सदर वृत्तपत्र म्हणते. अलीकडील काही दिवसांत रोममध्ये वाहतुकीची समस्या अधिकाधिक वाढत आहे; याचे कारण, वर्ष २००० च्या निमित्ताने तिथले बांधकाम जोरात चालू आहे; कॅथलिक धर्माचे पापमुक्‍तीचे वर्ष म्हटलेल्या या वर्षी सर्व पश्‍चात्तापी लोकांच्या पापांची क्षमा केली जाईल अशी जाहीर घोषणा केली गेली आहे. पण, जनता पापमुक्‍ती निरीक्षक सूत्रसंचालकांच्या मते “हा विरोधाभास वाटत असला तरी हे खरे आहे, की रोममध्ये पापमुक्‍ती वर्षांचे पहिलेवहिले परिणाम म्हणजे प्रायश्‍चित्तात वाढ होण्याऐवजी शिवराळ भाषेतच भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे.”

शास्त्रीय संगीतामार्फत प्रवाशांचे डोके शांत ठेवणे

अलीकडे, रिओ दी जेनिरोच्या १८ सबवे स्टेशन्सवर ट्रेनची वाट पाहत असताना स्ट्रॉस, विवाल्डी, शोपॅन, शायकॉफस्की, मोझार्ट, बॅख, बीझे, शूबर्ट आणि ब्रॅम्ज यांनी रचलेले शास्त्रीय संगीत प्रवासी ऐकतात. ओ ग्लोबो वृत्तपत्रानुसार याद्वारे “गाडीची वाट पाहत असताना प्रवाशांचं डोकं थंडं ठेवलं जाऊ शकतं” अशी सबवे अधिकाऱ्‍यांची आशा आहे. कोणत्या प्रकारचे संगीत लावावे हे ठरवताना “प्रवाशांना शांत ठेवू शकेल आणि त्याच वेळी प्लॅटफॉर्मला एखाद्या डान्स हॉलचे स्वरूप देणार नाही अशा संगीत रचनेची निवड करण्यात आली.” “याला अपेक्षा केली होती त्यापेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला,” असे रीओ दी जेनिरो सबवे यंत्रणेचे संचालक लूईश मारयो मीरान्डा म्हणाले.

एकूण सगळेच जबाबदार

द गार्डियन वीकली वृत्तपत्रानुसार, “ज्यांवर जीवन अवलंबून आहे ती अरण्ये, गोडे पाणी आणि समुद्र यंत्रणा यांचा नाश करण्याद्वारे १९७० पासून मानवांनी निसर्गाचा ३० टक्क्यांहून अधिक भाग नष्ट केला आहे.” वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) आणि इतर तीन संघटनांच्या अहवालावर आधारित असलेल्या या लेखाने म्हटले, की सुरवातीपासूनच पाश्‍चिमात्य जगाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा सर्वाधिक प्रमाणात उपभोग घेतला असला तरी आता मात्र विकसनशील देश “नैसर्गिक साधनसंपत्तींचा चिंता करण्याइतका ऱ्‍हास करत आहेत.” डब्ल्यूडब्ल्यूएफचे एक अधिकारी म्हणतात: “स्थिती चिंताजनक आहे हे आम्हाला ठाऊक होते; पण नेमकी किती चिंताजनक आहे याचा सुगावा मात्र सदर अहवाल तयार केल्यानंतरच आम्हाला लागला.” यावर बंदी घालण्यात निष्फळ ठरलेल्या शासनाला हा अहवाल जबाबदार धरत असला तरी “जगाच्या साधनसंपत्तीची हेळसांड करण्यात एकूण सगळेच जबाबदार आहेत,” असाही उल्लेख अहवालात आहे असे सदर वृत्तपत्र म्हणते.

धूम्रपानामुळे अब्जावधी रुपयांचा भुर्दंड

बर्नर ओबरलँडर वृत्तपत्रानुसार आज अनेक देशांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण घटले आहे; पण, याबाबतीत स्वित्झर्लंडमध्ये काहीएक बदल झालेला नाही. त्या देशातले जवळ जवळ तृतीयांश लोक धूम्रपान करतात. आणि दर वर्षी धूम्रपानामुळे ८,००० हून अधिक लोक दगावतात; ही संख्या एड्‌स, हेरोईन, कोकेन, मद्य, अग्नी, वाहन अपघात, खून आणि आत्महत्या एकत्रितपणे जितक्यांचे जीव घेतात त्याच्या कितीतरी पटीने अधिक आहे. तंबाखूच्या सेवनामुळे १९९५ साली समाजाला १० अब्ज स्विस फ्रँक्सचा म्हणजे ६ अब्जांहून अधिक अमेरिकन डॉलरचा भुर्दंड बसला होता असे स्वित्झर्लंडमधील फेडरल डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थच्या एका अभ्यासाचे अनुमान आहे. सदर अभ्यासाने उपचार आणि वैद्यकीय खर्च, कमी उत्पादन, धूम्रपान करणाऱ्‍या आजारी लोकांचा निकृष्ट जीवन दर्जा, परावलंबन आणि मृत व्यक्‍तीच्या कुटुंबियांचे हाल या सर्वांचे प्रमाण मोजण्याचा प्रयत्न केला.

तुमच्या हृदयाचे संरक्षण करा

“कालपरवापर्यंत आपण सगळेच हेच धरून चालत होतो, की हवामानातील उष्मा वाढते तसे हृदयविकाराचे झटके येण्याचा धोकाही वाढतो; परंतु, थंड हवामानात देखील याचा धोका असतो हे आता समजले आहे,” असे हृदयरोग तज्ज्ञ आणि ओन्टारिओ, कॅनडाच्या हृदय आणि मष्तिष्काघात स्थापनेचे प्रवक्‍ते डॉ. ॲन्टनी ग्रॅहम यांचे म्हणणे आहे. द ग्लोब ॲण्ड मेल वृत्तपत्राच्या अहवालानुसार, फ्रान्सच्या २,५०,००० पुरुषांच्या दशकभर केलेल्या एका अभ्यासातून असे निष्पन्‍न झाले, की सरासरी हवामान १० डिग्री सेल्सिअसनी वाढले किंवा कमी झाले तर “हृदयविकाराचा पहिला झटका येण्याची १३ टक्के शक्यता असते.” तापमान अचानक घसरते तेव्हा ऊर्जा संवर्धनासाठी त्वचेतील रक्‍त शरीराच्या अगदी आतल्या भागात गेल्यामुळे हृदय अधिक जोरात आणि जलद गतीने काम करते. शिवाय, लोक नको तितके कष्ट उपसतात किंवा हवामानानुरूप पेहराव करत नाहीत तेव्हा हा धोका आणखीनच बळावतो. डॉ. ग्रॅहम ईशारा देतात: “पाच महिने घरात बसून टीव्ही पाहणे आणि मग अचानक बर्फ काढण्यासाठी थंडीत बाहेर पडणे, असे तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला ते हळूहळू करण्याची गरज आहे.”

तुमच्या बाळाशी बोला

दररोज आपल्या बाळाशी कमीतकमी ३० मिनिटे बोलल्याने त्यांची बुद्धी कुशाग्र होऊ शकते आणि त्यांची भाषेची कौशल्येही विलक्षण वाढू शकतात असा लंडनचे डेली टेलिग्राफ अहवाल देते. संशोधकांनी नऊ महिन्यांच्या १४० बालकांचा अभ्यास केला. यांपैकी निम्म्या मुलांच्या पालकांना आपल्या बाळाशी कसे बोलावे यावर सल्ले दिले होते तर बाकीच्यांना या बाबतीत काहीएक सुचवले गेले नव्हते. सात वर्षांनंतर, [सल्ला दिला होता] त्या गटातील पालकांच्या मुलांची “सरासरी बौद्धिक क्षमता बाकीच्या मुलांपेक्षा एक वर्ष आणि तीन महिन्यांनी जास्त होती,” शिवाय, त्यांची भाषा कौशल्येही “तुलनात्मकपणे जास्तच होती” असे सदर अहवालाचे म्हणणे आहे. संशोधक डॉ. सॅली वॉर्ड यांच्या मते सामाजिक जीवनात अमूलाग्र बदल घडून आल्यामुळे आजकालचे पालक पूर्वीसारखे आपल्या तान्ह्या बाळांशी जास्त वेळ बोलत नाहीत. उदाहरणार्थ, आजकालच्या माता नोकरीसाठी बाहेर पडतात आणि अनेकानेक घरांमध्ये संभाषणांची जागा आता व्हिडिओटेप्सनी घेतली आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा