आमच्या वाचकांचे मनोगत
मंगळावरील यंत्रमानवाची शोधमोहीम मानव आणि प्राणी यांच्यातली तफावत दाखवणारी लेखमाला वाचल्यानंतर त्याच अंकातला, “मंगळावरील यंत्रमानवाची शोधमोहीम” (जुलै ८, १९९८) हा लेख मी वाचायला घेतला. किती चोख आणि सुस्पष्टपणे त्या लेखाने मानव आणि प्राणी यांच्यातील अफाट बौद्धिक तफावतीला पुष्टीपुरावा दिला!
जी. डी. एम., अमेरिका
पैसा कमवणे “तरुण लोक विचारतात . . . थोडाफार पैसा कमवण्यासाठी मी काय करावं?” हा माहितीपर लेख लिहिल्याबद्दल तुमचे मनस्वी आभारी. (सप्टेंबर ८, १९९८) मला देखील नोकरीची समस्या होती. शेवटी, तुम्ही दिलेले सल्ले लागू केल्यानंतर मला नोकरी लागली!
एस. डी., घाना
भयानक स्वप्ने “जगावरील दृष्टिक्षेप” (ऑक्टोबर ८, १९९८) यातील “मुलांना भयानक स्वप्ने पडणे सर्वसामान्य” या सदरात दिलेल्या सल्ल्यांसाठी मी खरोखर कृतज्ञ आहे. माझ्या मुलांना नेहमी असली भयानक स्वप्नं पडतात; पण, त्यांनी त्यांच्याविषयी बोलू नये असे सांगून मी त्यांना झोपायला सांगायचे. पण, आता तुम्ही जे सल्ले दिले त्यामुळे मी ही समस्या चांगली हाताळू शकते. अशी उपयुक्त माहिती सतत प्रकाशित करत राहावी अशी विनंती.
आर. एन., झिंबाब्वे
लक्ष लावणे वर्गात शिक्षक शिकवत असताना लक्ष एकाग्र करणं मला खूप कठीण जायचं. पण, “तरुण लोक विचारतात . . . एखाद्या गोष्टीवर मी लक्ष कसं देऊ शकतो?” (ऑक्टोबर ८, १९९८) हा तुमचा लेख वाचल्यामुळे ही सवय मोडण्यास मला मदत झाली. मी हा लेख वाचला तेव्हापासून या समस्येवर मात करू शकले आणि या बाबतीत मी स्वतःला चांगली शिस्त लावली आहे.
एम. ए. एम., ब्राझील
लक्ष लावणं ही माझी एक मोठी समस्या आहे. पण, केवळ थोडा प्रयत्न केल्याने आणि स्वतःला शिस्त लावल्याने यावर मात करता येते हे मला ठाऊक नव्हतं. यासाठी थोडीफार मेहनत करावी लागते हे मान्य; पण, माझ्यासाठी ती अगदीच अशक्य कोटीतील बाब आहे असंही नाही.
डी. आर. ए., अमेरिका
सावध राहा! नियतकालिकात सहसा माझ्यासारख्या युवकांसाठी बरीचशी मनोरंजक माहिती असते. एखाद्या गोष्टीवर लक्ष लावण्याची अडचण असल्यामुळे सदर लेखातून मला फायदा झाला आहे. त्याबद्दल मनस्वी आभारी!
एम. एन., इटली
एड्स “एड्सच्या संघर्षात विजय मिळणार?” (डिसेंबर ८, १९९८) या लेखमालेसाठी मी तुमचे मनस्वी आभार मानू इच्छिते. सदर लेखमाला अत्यंत माहितीपूर्ण होती. मी १९ वर्षांची आहे आणि शाळेत तसेच घरात मी एड्स, एचआयव्ही यांविषयी शिकले होते पण, तरीही माझ्या मनात याविषयी अद्यापही गोंधळ होता. या लेखानं मात्र, विवाहसोबत्याची निवड सुज्ञपणे करणे आणि नैतिकरित्या शुद्ध जीवन व्यतीत करणे किती महत्त्वाचं आहे हे समजण्यास माझी मदत केली.
एस. टी., संयुक्त संस्थाने
तुमचे हे लेख माहितीपूर्ण, अचूक आणि सत्याला धरून होते. मागच्या १० वर्षांपासून मला एड्सने ग्रासले आहे. सध्या माझी एक मैत्रीण तुमच्या साहित्यांमार्फत मला बायबलचं शिक्षण देत आहे. अशाप्रकारचे लेख निर्भिडपणे प्रकाशित करण्याबद्दल तुमचे आभार मानते.
बी. डब्ल्यू. संयुक्त संस्थाने
एड्सवरील हे लेख मी एका दमात वाचून काढले. सदर विषयावर इतकी अचूक माहिती आणि कुठंही मी वाचलेली नाही. हे मी केवळ म्हणायचे म्हणून म्हणत नाही, मी स्वतः एक नर्स आहे. तुमचे फार फार आभारी.
डी. ई. जर्मनी
माझ्या मुलानं ख्रिस्ती जीवनाचा मार्ग सोडला आणि तो परतला तो टोकाला पोहंचलेला एड्स रोग घेऊन. तेव्हा तुम्ही हे लेख लिहिल्याबद्दल मला कृतज्ञता वाटते. यहोवाच्या दयेनं आध्यात्मिकरित्या तो सध्या चांगल्या स्थितीत आहे. आणि वैद्यकीय उपचारामुळे त्याची तब्येतही सुधारली आहे. आम्हाला ठाऊक आहे, की असे कितीतरी लोक असतील ज्यांना या रोगाची बाधा झालेली असेल पण त्यांना त्याचा काहीएक पत्ता नसेल. तेव्हा विवाह करण्याचा विचार करणाऱ्यांनी यासंबंधी विशेष सावधगिरी बाळगावी.
एन. जे., संयुक्त संस्थाने