“चोरपावलांनी येऊन घात करणारा”—तणाव
“मला लक्षात आलेलं पहिलं लक्षण म्हणजे प्रचंड दाब. सुरवातीला छातीच्या हाडाजवळ जाणवला, पाहता पाहता तो खांद्यांत, मानेत आणि जबड्यात पसरला आणि मग दोन्ही हातांत खालपर्यंत दाटल्यासारखं वाटू लागलं, भला मोठा हत्ती छातीवर बसल्यागत. धड श्वासही घेता येईना. घामेघूम झालो. पोटात मुरडा आला आणि असह्य मळमळ होऊ लागली. . . . मला आठवतंय, नर्सेसच्या मदतीने हॉस्पिटलच्या बेडवर झोपताना मी आश्चर्याने म्हणालो होतो, ‘मला हार्टअटॅक आलाय.’ माझं वय त्यावेळेस चव्वेचाळीस होतं.”
तणावातून तणावमुक्तीकडे (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात डॉ. रॉबर्ट एस. एलियट यांनी २० वर्षांपूर्वी आलेल्या या मरणप्राय अनुभवाचे वरील शब्दांत वर्णन केले आहे. त्यादिवशी सकाळी त्यांनी एका परिषदेला उपस्थित राहून तेथे एक भाषण दिले होते—गंमत म्हणजे, ते भाषण हार्टअटॅक्स याच विषयावर होते. स्वतः हृदयविकार तज्ज्ञ असल्यामुळे एरवी पेशंट्सला तपासणाऱ्या डॉ. एलियट यांच्यावर अचानक, त्यांच्या शब्दांत सांगायचे तर, “हृदयोपचार विभागात स्वतःच रोगी बनून झोपण्याची” वेळ आली होती. या आकस्मिक दुर्घटनेसाठी ते कशाला जबाबदार ठरवतात? डॉ. एलियट उत्तर देतात, “तणावाविरुद्ध माझ्या स्वतःच्याच शारीरिक प्रतिक्रिया, आतल्याआत माझा जीव घेत होत्या.”a
डॉ. एलियट यांच्या अनुभवावरून स्पष्ट झाल्याप्रमाणे, तणाव जिवावर बेतू शकतो. किंबहुना, अमेरिकेत तर त्याला मृत्यू ओढवण्याच्या काही प्रमुख कारणांसोबत जोडले गेले आहे. तणावाचे दुष्परिणाम, दीर्घकाळापर्यंत अगदी बेमालूमपणे वाढत जाऊन एखाद्या वेळी धोक्याची काहीएक चाहूल न लागता अचानक पुढे येतात. “चोरपावलांनी येऊन जीव घेणारा” (सायलेंट किलर) या शब्दांत तणावाचे वर्णन काही उगाच केलेले नाही.
आश्चर्याची बाब अशी की, व्यक्तिमत्त्वांच्या वर्गीकरणात उतावीळपणा, आक्रमकता आणि स्पर्धात्मकता ही गुणलक्षणे असलेल्या ए-वर्गात मोडणाऱ्या लोकांनाच केवळ तणावासंबंधी समस्या उद्भवतात असे नाही. अगदी शांत दिसणाऱ्या लोकांना देखील धोका संभवू शकतो, विशेषतः, त्यांचा शांत स्वभाव हा प्रेशर कुकरवर ठेवलेल्या हलक्या थाळीसारखा, निव्वळ एक फुसके बाह्यरूप असल्यास. डॉ. एलियट यांच्या मते त्यांच्या बाबतीत असेच घडले. आता मात्र ते इतरांना सावध करतात: “तुम्हाला अगदी आजही मृत्यू येऊ शकतो—वर्षानुवर्षे आपल्या हृदयाला चिकटलेल्या या टाईम बॉम्बचा गंधही नसताना.”
पण ताणतणावाचा संबंध केवळ हार्टअटॅक आणि आकस्मिक मृत्यू या दोनच समस्यांशी जोडण्यात आलेला नाही; हेच पुढच्या लेखात स्पष्ट केले आहे.
[तळटीप]
a तणाव हे हार्टअटॅक्सचे एक संभाव्य कारण असले तरीसुद्धा, बहुतांशी प्रकरणांत रोहिणीविलेपीविकारामुळे हृदयरोहिणींचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झालेले असते. म्हणून, ताणतणाव कमी केला की आपण आपोआप बरे होऊ, असे समजून हृदयरोगाच्या लक्षणांकडे कानाडोळा करणे शहाणपणाचे ठरणार नाही. सावध राहाच्या! जानेवारी ८, १९९७ अंकातील पृष्ठे ३-१३ पाहा.