वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ५/८ पृ. २३-२६
  • ढगांवर साम्राज्य गाजवणारे भयप्रद गडगडाटी वादळ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ढगांवर साम्राज्य गाजवणारे भयप्रद गडगडाटी वादळ
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • गडगडाटी वादळ कसे येतात
  • आकाशातली आतशबाजी
  • वादळाचा सर्वात मोठा फायदा
  • गारांची वृष्टी कशी होते?
  • झंझावात आणि गडगडाटी वादळे
  • देवाच्या अद्‌भुत कृत्यांचे मनन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
सावध राहा!—१९९९
g99 ५/८ पृ. २३-२६

ढगांवर साम्राज्य गाजवणारे भयप्रद गडगडाटी वादळ

ऑस्ट्रेलियातील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

अगदी बालपणापासूनच अनेकांना ढगांचे विलक्षण आकर्षण वाटले आहे. ऐंशी वर्षांच्या एका वयस्कराला आठवते, लहानपणी कित्येकदा तरी ते हिरवळीवर पडून ‘आकाशातून जणू कवाईत करत जाणाऱ्‍या’ ढगांकडे पाहत राहायचे. ते नेमके कशाचे बनले असतील असा एक प्रश्‍न त्यांना नेहमीच पडायचा. ढग कापसाचे तर नसतील? ते एकमेकांपासून इतके वेगळे का दिसायचे? तो तिथला ढग अगदी शिडाच्या नौकेसारखा वाटायचा, तर तो तिकडचा, मागच्या पायांवर उड्या मारणाऱ्‍या घोड्यासारखा आणि हा इकडचा एका फुगीर मनोऱ्‍यासारखा. अशाप्रकारे आपले स्वरूप, आपला आकार सतत बदलत आकाशातून तरंगत जाणाऱ्‍या या मेघांनी त्यांच्या कल्पक बालमनाला नेहमीच सुखावले होते. आजही, आकाशात जणू काय ‘ओळखा बरं मी कोण?’ हा खेळ त्यांच्याशी खेळणाऱ्‍या ढगांना पाहत राहण्यात एक आगळीच मौज असते असे ते म्हणतात. कदाचित तुम्ही देखील या बालिश मौजेचा आनंद लुटत असाल.

पण, सगळ्यात असामान्य आणि भयचकित करणारे कोणते ढग असतील तर ते म्हणजे “बोलणारे” ढग. त्यांना गर्जन्मेघ (क्युम्युलोनिंबस) किंवा राशिमेघ म्हणतात. पुढे येणाऱ्‍या संकटाची चाहूल देणारे हे घनदाट ढग आकाशात १६ किलोमीटर किंवा त्याहून उंच वाढू शकतात आणि हेच ढग गडगडाटी वादळे निर्माण करतात. आकाशात उत्तुंग वाढत असताना, विजेमुळे हे वादळी ढग प्रकाशमय होतात आणि गर्जना करीत ते वादळाची जणू पूर्वसूचनाच देत असतात. रात्रीच्या वेळी तर, ध्वनी आणि वीज यांचा नयनसुखद मिलाफ असलेल्या आणि मानवाने आजवर तयार केलेल्या कोणत्याही आतशबाजीहून दैदीप्यमान आतशबाजी ते आकाशात उधळतात. वाऱ्‍याचा झोत सोडत, पावसाचा आणि गारांचा वर्षाव करत ते पुढे निघून जातात खरे पण, जाण्यापूर्वी रुक्ष, कोरड्या भूमीवर पावसाचा आल्हाददायक, स्वच्छ सुगंध सोडून जातात.

गडगडाटी वादळ कसे येतात

अलीकडे, मानवाला अंतरिक्षातून पृथ्वीचे अवलोकन करणे शक्य झाले आहे. अंतरिक्षातून त्याला पृथ्वीच्या बऱ्‍याच मोठ्या पृष्ठभागावर ढगांचा गालिचा तरंगत असल्याचा दिसतो. लेखक फ्रेड हॅपगूड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कोणत्याही एका वेळेस सबंध पृथ्वीग्रहाचा निम्मा अर्थात २५ कोटी चौरस किलोमीटर पृष्ठभाग निरनिराळ्या दिप्तीच्या आणि अपारदर्शकतेच्या [ढगांनी] आच्छादलेला असतो; वाढत जाणारे, पसरणारे, तरंगणारे आणि मध्येच नाहीसे होणारे हे ढग विविध आकाराचे असतात—चादरीसमान, गोलाकार, दुलईसारखे, तंतुमय, झालरयुक्‍त किंवा फुगीर.” गडगडाटी वादळ हा मेघमालेचाच एक आविष्कार आहे. खरे तर, जगभरात दर वर्षी तब्बल १,५०,००,००० गडगडाटी वादळे होत असून जवळजवळ २,००० सतत सक्रीय अवस्थेत असतात.

आर्द्र, हलक्या हवेवर जडतर, शीत हवा स्थिरावते तेव्हा गडगडाटी वादळ निर्माण होते. मग सौर तापन, सीमापृष्ठीय हवामान किंवा डोंगर, टेकड्या यांसारख्या अनपेक्षित कारणांमुळे खाली असलेली उष्णार्द्र हवा, शीत वायुराशितून वर चढू लागले. मग वायू प्रवाह निर्माण होतात आणि हवेत तसेच जलबाष्पात असलेल्या ऊष्मीय ऊर्जेचे वाऱ्‍यात आणि विद्युत ऊर्जेत रुपांतर होते.

गडगडाटी वादळे निर्माण होण्यास आवश्‍यक असणाऱ्‍या वातावरणीय परिस्थिती नीच अक्षांशांत अगदी सर्रास आढळतात. म्हणूनच, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका या ठिकाणी सर्वाधिक गडगडाटी वादळे उद्‌भवतात तसेच मध्य आफ्रिका आणि इंडोनेशिया ही ठिकाणे गडगडाटी वादळाच्या दृष्टीने बऱ्‍याच काळापासून पृथ्वीवरील केंद्रप्रदेश समजले जातात. कंपाला, युगांडा येथे दर वर्षी २४२ दिवस असे असतात की जेव्हा तेथे गडगडाटी वादळे होतात, अशी विश्‍वसनीय नोंद आहे. अर्थात, पृथ्वीच्या पाठीवर इतरही अनेक ठिकाणी गडगडाटी वादळे येतात.

आकाशातली आतशबाजी

गडगडाटी वादळांचे दोन प्रमुख, धडधडीत आविष्कार म्हणजे गर्जना आणि वीज. पण, या भव्यदिव्य, बहुधा भयप्रद निसर्गघटना कशा निर्माण होतात? दोन ठिकाणी असलेल्या विद्युत भारांमधील फरक वायुतील निरोधक परिणामांवर मात करण्यास पुरेसा मोठा असतो तेव्हा झालेले विद्युत विसर्जन म्हणजेच वीज. हे ढगाच्या आत, ढगा-ढगांमध्ये किंवा ढग आणि जमीन यांच्या मध्ये घडू शकते. वीज चमकल्यामुळे विद्युत भाराचे विसर्जन होते तेव्हा क्षणमात्र हवा कमालीची, कधी कधी तर ३०,००० डिग्री सेल्सिअस इतकी उष्म होते.

विजेचे तीन प्रकार आहेत: रेखीय, शाखायुक्‍त किंवा स्तररूप. रेखीय वीजेत, विद्युत विसर्जन होते तेव्हा केवळ एकच खडबडीत रेखा दिसते. पण, ही रेखा विभाजित झाल्याची किंवा तिचे अनेकानेक फाटे झाल्याचे दिसल्यास तिला शाखायुक्‍त वीज म्हणतात. आणि ढगामध्ये लखलखाट झाला किंवा ढगाचा बराचसा भाग प्रकाशित झाला तर त्यास स्तररूप वीज म्हणतात. अधिकाऱ्‍यांच्या मते, आपल्याला दिसणाऱ्‍या बहुतेक विजा, ढग ते पृथ्वी या प्रकारात मोडतात.

विजेमुळे सजीव वस्तूंना हानी पोहंचते; इतके काय, मानव आणि प्राणी यांचा जीव घेते, त्यांना दुखापतही पोहंचवते. विजेचा सर्वाधिक धोका असतो तो समुद्रकिनाऱ्‍यावर, गॉल्फ कोर्सेसपाशी आणि ग्रामीण भागांत मोकळ्यावर असणाऱ्‍या लोकांना; याचे कारण या लोकांना विद्युत विसर्जनापासून काहीच संरक्षण नसते. पृष्ठ १५ वरील पेटी पाहा.

विजेचा धक्का लागलेल्या लोकांपैकी केवळ ३० टक्के लोकांचा मृत्यू होतो; शिवाय, ताबडतोब प्रथमोपचार केल्यास दीर्घकालीन हानी देखील टाळता येते. एखाद्या ठिकाणी वीज पडल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी पडत नाही असा गैरसमज आहे, पण हे खरे नाही कारण असे घडू शकते, किंबहुना बऱ्‍याच वेळेस असे घडते.

विजा चमकल्यामुळे आगी देखील लागतात. या आगींमुळे जमिनीचा बराचसा भाग उद्ध्‌वस्त होऊ शकतो. संयुक्‍त संस्थानांतील अरण्यात लागणाऱ्‍या आगींपैकी सरासरी १० टक्के आगी विजेमुळे लागतात. परिणामस्वरूप, त्या देशात आगीमुळे नष्ट होणारी जंगले आणि झाडेझुडपे यांपैकी ३५ टक्क्यांहून अधिक भाग वीज पडून लागलेल्या आगीत भस्मसात होतो.

पण विजा चमकल्यामुळे फायदे देखील होतात. उदाहरणार्थ, जंगलांना त्याचे निरनिराळे फायदे होतात. विजेमुळे लागलेल्या कमी तापमानाच्या आगींचा एक फायदा म्हणजे, छोट्यामोठ्या आगींमुळे जंगलातली लहानसहान रोपटी भस्म होतात. त्यामुळे अधिक मोठ्या विध्वंसकारी आगी झाडांच्या टोकांपर्यंत पोहंचण्याचा धोका टळतो. विजेमुळे वायुरूपात असलेल्या नायट्रोजनमध्ये एक फायदेकारक बदल घडून येतो कारण वायुरूपात असलेले नायट्रोजन वनस्पतीच्या काहीच उपयोगाचे नसते. विजेमुळे या वायुचे नायट्रोजन संयुगांत रूपांतर होते आणि ही संयुगे रोपट्यांमधील ऊतीनिर्मितीसाठी तसेच प्राणीजीवनास अत्यावश्‍यक असणारी प्रथिने पुरवणाऱ्‍या बियांच्या विकसनासाठी उपयुक्‍त असतात. अंदाजानुसार, पर्जन्यात असणारे ३० ते ५० टक्के नायट्रोजन ऑक्साईड्‌स विजेमुळे तयार होतात आणि अशाप्रकारे संबंध विश्‍वभरात दर वर्षी तीन कोटी टन स्थायी नायट्रोजन तयार होते.

वादळाचा सर्वात मोठा फायदा

गडगडाटी वादळामुळे प्रचंड प्रमाणात पाणी उपलब्ध होते. अल्पावधीतच धो धो पाऊस पडण्याचे एक मुख्य कारण म्हणजे जोरदार वादळाच्या तीव्र उर्ध्व प्रवाहामुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात पाणी तोलून धरले जाते आणि मग ते अचानक, एकाचवेळी पृथ्वीवर कोसळते. या पावसाची त्वरा ताशी २० सेंटिमीटर असल्याचे मोजले गेले आहे. अर्थात, अशा मुसळधार पावसाची एक विद्रूप बाजू देखील आहे.

वादळ हळूहळू पुढे सरकत जाते तेव्हा भूपृष्ठाच्या अत्यल्प भागावर जास्त पाऊस पडतो आणि यामुळे मग त्या ठिकाणी छोटेमोठे पूर येण्याची शक्यता असते. अशा वेळेस, भूपृष्ठावरील पाणलोटामुळे नद्यानाले तुडूंब भरून वाहू लागतात. संयुक्‍त संस्थानांत पुरांमुळे होणारी एक तृतीयांश हानी गडगडाटी वादळांपासून उद्‌भवणाऱ्‍या अशा छोट्यामोठ्या पुरांमुळे होत असल्याचा अंदाज आहे.

पण, वादळामुळे झालेल्या पावसाचे अनेकानेक लाभही असतात. या पावसामुळे भूमीला तसेच जलाशयांना आणि धरणांना प्रचंड पाणी पुरवठा होतो. संशोधनावरून असे समजते, की काही क्षेत्रांत जमणारे ५० ते ७० टक्के पाणी गडगडाटी वादळांमुळे होते आणि म्हणूनच त्या ठिकाणी लोकांचे जीवन वादळी पावसावरच अवलंबून असते.

गारांची वृष्टी कशी होते?

गडगडाटी वादळांचा एक विध्वंसकारी आविष्कार म्हणजे गारांची जोरदार वृष्टी. उर्ध्व प्रवाहांमुळे तसेच अधोवात प्रवाहांमुळे जलबिंदू वर-खाली हेलकावे घेत असताना ते गोठतात आणि त्यांचा आकारमान वाढतो तेव्हा गार निर्माण होते. विश्‍वास बसणार नाही इतक्या आकाराच्या आणि वजनाच्या गारांविषयी नोंदी आहेत. उदाहरणार्थ, १९२५ साली जर्मनीमध्ये पडलेल्या एका गारेची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे २६, १४ आणि १२ सेंटिमीटर इतकी असल्याची नोंद आहे. आणि तिचे वजन २ किलोग्रॅमहून अधिक असल्याचा अंदाज आहे. संयुक्‍त संस्थानांत आजवर पडलेली आणि सगळ्यात मोठी, नोंद असलेली गार म्हणजे १९७० साली कॅनझस राज्यात पडलेली गार. या गारीचा परिघ सगळ्यात मोठा असून तो ४४ सेंटीमीटर होता तर तिचे वजन ७७६ ग्रॅम इतके होते. ढगांतून खाली पडणारी इतकी मोठी गार एखाद्या मनुष्याचा सहजासहजी जीव घेऊ शकते.

पण, गारा सहसा अतिशय लहान असल्यामुळे त्या प्राणघातक तर नसतात, पण त्यांच्यामुळे गैरसोय होते. शिवाय, गारा निर्माण करणाऱ्‍या गडगडाटी वादळांच्या स्वभावधर्मामुळे ज्या क्षेत्रांवर विध्वंसकारी गारा पडतात ती क्षेत्रे अतिशय लहान असतात. पण, गारांमुळे जगभरातील कृषी उत्पादनाचे होणारे नुकसान दर वर्षी कोटी कोटी डॉलरच्या घरात जात असल्याचा अंदाज आहे.

झंझावात आणि गडगडाटी वादळे

गडगडाटी वादळांचा सर्वाधिक विध्वंसकारी आविष्कार म्हणजे झंझावात. जवळजवळ सर्वच झंझावात, गडगडाटी वादळांशी निगडित असले तरी सर्व गडगडाटी वादळांमुळे झंझावात निर्माण होतातच असे म्हणता येणार नाही. झंझावात निर्माण होतो तेव्हा वाऱ्‍याचा निमुळता लोट तुफान वेगाने गरगरू लागतो. त्याचा व्यास अदमासे शेकडो मीटरचा असून तो गर्जन्मेघापासून भूपृष्ठापर्यंतही वाढतो. सर्वात तीव्र स्वरूपाच्या झंझावातांमधील वाऱ्‍याचा वेग ताशी ४०० किंवा ५०० किलोमीटर इतका असू शकतो. भयंकर स्वरूपाचे गरगरते वारे आणि केंद्रभागातील उर्ध्व प्रवाह या दोन्ही घटना एकाच वेळी घडल्याने मोठमोठ्या इमारती भुईसपाट होऊन हवेतून मोठमोठ्या वस्तू फेकल्या जातात, ज्यामुळे प्राणहानी देखील होते. आज जगाच्या पुष्कळशा भागांत झंझावात होतात.

पण, अधोवात प्रवाह आणि मायक्रोबर्स्ट यांच्याशी निगडित असलेले सरळ रेषेप्रमाणे वाहणारे वारे इतके नाट्यमय वाटत नसले तरी हाहाकारी जरूर असू शकतात. अधोवात प्रवाहांमुळे जमिनीवर किंवा जमिनीलगत विध्वंसकारी वारे निर्माण होण्याची शक्यता असते. या वाऱ्‍यांचा वेग ताशी १५० किलोमीटर इतका वाढू शकतो. मायक्रोबर्स्ट अधिक तीव्र असून त्यांचा वेग ताशी २०० किलोमीटरहून अधिक वाढू शकतो.

स्पष्टच आहे, की गडगडाटी वादळांविषयी आपण जाणून घेतलेच पाहिजे; शिवाय त्यांच्या धोक्यांची देखील आपल्याला जाणीव असली पाहिजे. गडगडाटी वादळे सृष्टीच्या अनेक पैलूंपैकी एक असून त्यांच्याविषयी आणखीन बरेच शिकण्यासारखे आहे.

[२५ पानांवरील चौकट/चित्र]

वीजेसंबंधी पूर्वदक्षता

गडगडाटी वादळे उद्‌भवल्यास काय दक्षता घ्याव्यात यांबद्दल इमर्जेन्सी मॅनेजमेंट ऑस्ट्रेलियाने पुढील काही सल्ले दिले आहे.

मोकळ्या हवेत असताना

◼ अशा वेळी मजबूत छप्पर असलेल्या वाहनाचा किंवा एखाद्या इमारतीचा आसरा घ्यावा; छोट्यामोठ्या इमारतींचा, तंबूंचा आणि जिथे मोजून एकदोन झाडे असतील त्या झाडांचा आसरा घेऊ नये.

◼ उघड्या हवेत असताना जवळपास आसरा घेण्यासारखे काहीच नसते तेव्हा शक्यतो (एकेकटे) एखाद्या खड्ड्यात, पाय जवळ आणून पायांवर बसा; धातूची कोणतीही वस्तू जवळ बाळगू नका. आडवे होऊ नका पण त्याचवेळी इतर कोणत्याही वस्तूपेक्षा तुम्ही सगळ्यात उंचावर असाल असेही बसू नका.

◼ अंगावरचे केस ताठ झाल्यास किंवा खडक, कुंपणे यांसारख्या जवळपासच्या वस्तूंमधून विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकताच आपली जागा बदला.

◼ नियंत्रक तारांचा उपयोग करून पतंग किंवा मॉडल विमाने उडवू नका.

◼ मासे धरायची काठी, छत्र्या, गॉल्फची यष्टी अशा लांब किंवा धातूमय वस्तू हाताळू नका.

◼ धातूमय इमारतींना, तारेच्या कुंपणांना किंवा कपडे वाळवण्यासाठी असलेल्या धातूच्या तारांना स्पर्श करू नका किंवा त्यांच्या फार जवळही जाऊ नका.

◼ घोड्यावरून रपेट मारू नका किंवा सायकल अथवा छप्पर नसलेली वाहने चालवू नका.

◼ वाहन चालवत असल्यास मंद गतीने चालवा किंवा झाडे आणि विद्युत तारा अशा उंच वस्तूंपासून दूर कुठेतरी वाहन उभे करा. मजबूत छप्पर असलेल्या वाहनांत आणि ट्रेलरमध्ये बसा पण त्यातील धातूमय घटकांना हात लावू नका.

◼ पोहत असल्यास किंवा सर्फिंगचा खेळ खेळत असल्यास लगेच पाण्यातून बाहेर निघा आणि आसरा घ्या.

◼ नौकाविहार करत असल्यास ताबडतोब किनाऱ्‍याला या. असे करणे सुरक्षित वाटत नसल्यास एखाद्या उंच बांधकामाखाली उदाहरणार्थ एखाद्या पूलाखाली किंवा धक्क्याखाली आसरा घ्या. शिडाची काठी आणि दोर पाण्यात बरोबर रोवलेली आहे याची खात्री करा.

घरात असताना

◼ खिडक्या, विजेवर चालणारी उपकरणे, नळ्या आणि इतर धातूमय वस्तू यांपासून दूर राहा.

◼ टेलिफोन वापरण्याचे टाळा. आवश्‍यक असलेच तर फोनवरचे बोलणे थोडक्यात बोलणे आटोपा.

◼ वादळ सुरू होण्याआधी बाहेरचा ॲन्टेना तसेच रेडिओ आणि टीव्हीचे सगळे कनेक्शन्स डिस्कनेक्ट करा. कॉम्प्युटरचे मोडम्स आणि विजेचे मीटर देखील बंद करा. शेवटी, विजेवर चालणाऱ्‍या सर्व उपकरणांपासून दूर राहा.

[चित्राचे श्रेय]

जोरदार वादळे: वास्तविकता, इशारे आणि संरक्षण या प्रकाशनातून.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा