जगावरील दृष्टिक्षेप
आईचे दूध बाळासाठी सगळ्यात चांगले
न्यूजवीक नियतकालिकानुसार, “आईचे दूध म्हणजे एक रामबाण औषधच. बाळाच्या मेंदूची योग्य वाढ होण्यासाठी आवश्यक असणारे पोषक पदार्थ आईच्या दुधातूनच बाळाला मिळतात; परिणामी, ॲलर्जी होण्याचा तसेच अतिसार, एक्झिमा आणि न्यूमोनिआचे इन्फेकशन यांसारखे कितीतरी रोग होण्याचा धोका कमी होतो.” म्हणूनच, दी अमेरिकन असोसिएशन ऑफ पेडिआट्रिक्स आणि दी अमेरिकन डायटिक असोसिएशन सर्व मातांना, कमीतकमी एक वर्ष तरी नवजात बालकाला अंगावरचे दूध पाजण्याचा आर्जव करते. “पण तरीही याकडे संपूर्णता दुर्लक्ष केले जाते,” असे सदर नियतकालिक म्हणते. याचे कारण? सहसा या बाबतीत असणारे अज्ञान. काही मातांना अशी भीती असते, की आपल्या बाळाला सुदृढ ठेवण्यास कदाचित त्यांना पुरेसे दूध येणार नाही. इतरांना असे वाटते, की बाळांना दिले जाणारे पावडरचे दूध लवकरात लवकर सुरू केले जावे. पण, सदर नियतकालिकेतील लेख म्हणतो की “सहा महिन्यांपर्यंत, जिथून पुढे बाळाला शिशू आहार हळूहळू चालू केला जातो तेव्हापर्यंत बहुतेक माता बाळाच्या सर्व पोषण गरजा तृप्त करू शकतात. आणि मुलांना इतर कोणतेही अन्न पदार्थ दिले जात असले तरीही २ वर्षांच्या मुलाला देखील आईच्या दुधातील प्रतिरक्षींचा आणि स्निग्धाम्लांचा उपयोग होऊ शकतो.” याचे आईलाही अनेक फायदे होतात: स्तनपानामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो; शिवाय बाळंतपणामुळे वाढलेले तिचे वजन लवकर घटते.
झोपाळू वाहनचालक
द जर्नल ऑफ दि अमेरिकन असोसिएशनचा अहवाल म्हणतो: “झोपेत गाडी चालवणे हे दारू पिऊन गाडी चालवण्याइतकेच धोकेदायक असते. झोपेत गाडी चालवण्यामुळे होणाऱ्या [वाहन] अपघातांना अगदी क्षुल्लक लेखले जाते, पण वस्तुतः, सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेसाठी हे झोपाळू वाहन चालक मोठा धोका आहेत.” टोरोन्टो स्टार वृत्तपत्रानुसार, अभ्यासांवरून असे लक्षात आले आहे, की आपल्याला नेमकी कधी झोप लागेल किंवा नेमकी कधी झोप लागते हे त्यांना सांगता येत नाही. “झोप ही देखील भूक आणि श्वासोच्छवास यांसारखीच एक गरज आहे” असे अमेरिकन ऑटोमोबाईल असोसिएशन फाऊन्डेशन फॉर ट्रॅफिक सेफ्टीचे प्रवक्ते स्टेफानी फॉल म्हणतात. “तुमच्या शरीराला झोपेची गरज असते तेव्हा तुम्हाला झोप लागते.” सतत जांभया येत असल्याचे किंवा डोळे बंद होत असल्याचे किंवा मग गाडी नियंत्रणाबाहेर चालल्याचे लक्षात येताच वाहन चालकांनी काय करावे? “जागे राहण्यासाठी खिडकीवर भार टाकून बसणे किंवा रेडिओचा आवाज वाढवणे यांसारख्या सर्वसामान्य गोष्टी केल्याने काहीएक होत नाही,” असे टोरोन्टो स्टार म्हणते. “थोड्या समयापर्यंत जागे राहण्यासाठी कॅफेन चांगले असते; पण त्यामुळे व्यक्तीच्या झोपेची शारीरिक गरज कमी होत नाही.” झोप लागल्यास वाहनचालकांनी एखाद्या सुरक्षित ठिकाणी गाडी लावून थोडीशी डुलकी घ्यावी असा एक सल्ला त्यांना दिला जातो.
दारिद्र्य—कोणताच देश सुटला नाही
इंटरनॅशनल हेरल्ड ट्रिब्यून या वृत्तपत्राने म्हटले, की अलीकडच्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार जगातल्या सगळ्यात श्रीमंत राष्ट्रांत देखील दारिद्र्य आता वाढत आहे. औद्योगिक विकास घडलेल्या देशातील अनेक लोकांच्या नोकऱ्या, शिक्षण आणि आरोग्य निगा यांसारख्या “मूलभूत मानवसुलभ गरजा” पूर्ण होत नाहीत. सदर अहवालानुसार, संयुक्त संस्थानांत १६.५ टक्के लोक दारिद्र्यावस्थेत राहतात. ब्रिटनमध्ये ही संख्या १५ टक्के आहे. औद्योगिक विकास घडलेल्या राष्ट्रांमध्ये १० कोटी लोक बेघर, ३.७ कोटी लोक बेकार आहेत तर जवळजवळ २० कोटी लोकांची “अपेक्षित आयुर्मर्यादा ६० वर्षांपेक्षा कमी आहे.”
मुले—युद्धाचे बळी
एक जर्मन दैनिक ग्रीवेना ट्सायटुन अहवाल देते की, “यु.एन. चे खासप्रतिनिधी ओलारा ओटूनू यांच्या मते मागील दशकात झालेल्या युद्ध-संघर्षांनी २० लाख मुलांचा बळी घेतला, १० लाखांपेक्षा अधिक मुलांना अनाथ केले आणि आणखीन ६० लाख मुलांना गंभीररित्या जखमी अथवा लुळेपांगळे केले.” मुलांना संघर्षाची शिकार करणाऱ्या सर्व कृत्यांचा, यु.एन. सुरक्षा मंडळाने निषेध केला. खास चिंता करण्याजोगी एक गोष्ट म्हणजे जगभरात ३,००,००० हून अधिक मुलांच्या हातात बंदुका दिल्या जातात. अनेकांना जबरदस्तीने लष्करात भरती केले जाते आणि विशेष म्हणजे यांच्यापैकी एक तृतीयांश मुली असतात. जीवावर बेतणाऱ्या गुन्हेगार कृत्यांसाठी बहुतेक वेळा बाल सैनिकांचा वापर केला जातो. अलीकडेच स्थापन झालेल्या एक सरकारेत्तर संघांच्या युतीने एका आंतरराष्ट्रीय आचारसंहितेची मागणी करत आहे; यामुळे लष्करात भरती होणाऱ्या मुलांचे किमान वय १८ केले जाईल.
त्यांना आजारी राहणेच परवडते
केप टाईम्स वृत्तपत्रानुसार, “आजही टीबी हा रोग एक प्रमुख मारक आहे.” दक्षिण आफ्रिकेच्या अतिशय गरीब लोकांत झपाट्याने पसरणारा हा रोग दर वर्षी १३,००० हून अधिकांचा बळी घेतो आणि इतर अनेकांना कामच करता येत नाही इतका आजारी पाडतो. अशा आजारी लोकांना सरकार आर्थिक साह्य आणि टीबीवरील उपचार खर्च देते. पण, नोकरीची समस्या आणि तुटपुंजा पगार यांमुळे, तसेच सरकारकडून मिळणारे आर्थिक साह्य मिळत राहावे म्हणून काही रुग्ण टीबीवर काहीएक उपचार न करण्याचे ठरवतात. “सरकारकडून मिळणारा पैसा, त्यांना छोटीमोठी कामं करून मिळणाऱ्या पैशाच्या १० पट असतो,” असा खुलासा दक्षिण आफ्रिकन संघ टीबी निगा याच्या संचालिका रीआ ग्रान्ट देतात. “एवढा पैसा मिळतोय हे पाहून आजारीच असलेलं बरं असं त्यांना वाटतं.”
जीवाणूंची एकूण संख्या किती?
जीवाणू हे पृथ्वीवरील एक सर्वसामान्य जीव आहेत. सगळ्यात खोल समुद्रतळापासून ते वातावरणात ६० किलोमीटरपर्यंत ते आढळतात. त्यांची एकूण संख्या इतर कोणत्याही जीवापेक्षा अधिक आहे. ही संख्या किती असेल याचा अंदाज बांधण्यासाठी केलेल्या पहिल्या प्रामाणिक प्रयत्नाची माहिती अमेरिकेतील जॉर्जीआ विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी प्रकाशित केली आहे. जीवाणूंची अंदाजे संख्या ५ पुढे ३० शून्य जोडल्यावर जितकी संख्या तयार होते इतकी आहे. लंडनचे द टाईम्स वृत्तपत्र म्हणते: “अनेकांना असे वाटते, की जीवाणूंमुळे रोगराई होते. पण खरे तर यांपैकी केवळ अत्यल्प संख्याक जीवाणूंमुळे रोगराई होते. सर्व प्राण्यांमध्ये जितके जीवाणू आहेत त्यांची बेरीज केली तरी जीवाणूंच्या एकूण संख्येपेक्षा केवळ १ टक्का जीवाणूंमुळे रोग होऊ शकतात. बहुतेक जीवाणू केवळ निरुपद्रवीच नाहीत तर पचनक्रियेसारख्या क्रियांसाठी अत्यावश्यक देखील आहेत.” आश्चर्य म्हणजे, एकूण जीवाणूपैकी ९२ ते ९४ टक्के जीवाणू समुद्रतळापासून १० सेंटिमीटर खाली असलेल्या गाळात आणि जमिनीपासून ९ पेक्षा अधिक मीटर खाली आढळतात. पूर्वी या ठिकाणी जीवच नसतात असा एक चुकीचा समज होता. जीवाणूच्या जवळजवळ निम्या शुष्क वजनात जीवनावश्यक कार्बनचा घटक असतो. “जीवाणूमध्ये असलेले कार्बनचे प्रमाण जवळजवळ सबंध विश्वातील वनस्पतीत संचित असलेल्या कार्बनच्या प्रमाणाइतके असते,” असे द टाईम्स म्हणते.
अजूनही वेळ गेलेली नाही
ब्रिटनच्या डेली टेलिग्राफ बातमीपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षे चाललेल्या एका अभ्यासातून असे निदर्शनास आले, की वयाची साठी गाठलेल्या लोकांनीही धूम्रपान सोडून दिल्यास त्यांच्यातील कर्करोग होण्याचा धोका बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी होतो. सटन, इंग्लंड येथील कर्करोग अनुसंधान केंद्राचे प्राध्यापक जूल्यन पीटो म्हणतात: “धूम्रपानामुळे किती भयंकर परिणाम उद्भवू शकतात हे खरे मागच्याच वर्षी आमच्या लक्षात आले; तेव्हापर्यंत आम्हाला वाटत होते त्याप्रमाणे धुम्रपान करणाऱ्यांपैकी केवळ एक चतुर्थांश लोकांचा नव्हे तर चक्क निम्या लोकांचा मृत्यू होतो; शिवाय, अगदी उतारवयात देखील [धूम्रपान] सोडल्याने किती मोठे लाभ होऊ शकतात हेही आमच्या लक्षात आले.” धूम्रपानाच्या धोक्यासंबंधी मुलांना नियमितपणे इशारे दिले जातात. पण, वृद्धांना हे माहीत होण्यास हवे, की तंबाखूची सवय मोडल्याने फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका अतिशय मोठ्या प्रमाणात कमी होतो असे पीटो यांचे म्हणणे आहे.