आमच्या वाचकांचे मनोगत
त्याचे माझ्यावर प्रेम नसले तर? आजच मला जुलै ८ चा, सावध राहा! अंक मिळाला आणि त्यातला “तरुण लोक विचारतात . . . त्याचे माझ्यावर प्रेम नसले तर?” हा लेख पाहताच, माझ्या प्रार्थनांचं उत्तर दिल्याबद्दल मी यहोवाचे आभार मानले. मी या लेखाची माझ्या आईसोबत चर्चा करायचे ठरवले आहे आणि त्यातला सल्ला मी जरूर माझ्या जीवनात लागू करेन. खरंच, तरुण लोक विचारतात ही लेखमाला यहोवा परमेश्वराची एक प्रेमळ तरतूदच म्हणावी.
के. एम., केनिया
मी २२ वर्षांची तरुणी आहे; तसं पाहिलं तर तुमचं हरएक मासिक मला वाचायला आवडतं; पण आज पहिल्यांदाच एखादा लेख माझ्या मनाला इतका चटका लावून गेला. मी वाचू लागले तसं माझ्या डोळ्यांत पाणी आलं. तुम्ही लेखात वर्णन केल्या, नेमक्या त्याच भावनांनी काही दिवसांपूर्वी मला ग्रासून टाकलं होतं आणि त्याबद्दल मनात अनेक शंकाकुशंका होत्या. पण, या लेखानं माझ्या बऱ्याच शंकांचं निरसन केलं.
आर. बी., लिथ्युएनिया
मी हा लेख वाचला तेव्हा मला प्रश्न पडला, “अरेच्या! तिऱ्हाईत व्यक्तीला आपल्या भावना कशा समजल्या?” यहोवा आपल्यावर प्रेम करतो आणि तो आपल्याला समजून घेतो हे जाणून मला खूप आनंद झाला. आजच मला हे मासिक मिळालं आणि आता मध्यरात्र झाली आहे; पण, तुम्हाला पत्र लिहिण्यासाठी मी सकाळपर्यंत थांबू शकत नाही.
ए. एन., जपान
हा लेख खासकरून स्त्रियांसाठी लिहिलेला असला तरी त्यापासून मलाही फायदा झाला. एका आठवड्यापूर्वीच, मी एका मुलीला मागणी घातली होती आणि तिनं सडेतोडपणे मला नकार दिला; माझ्या मनाला ते खूप खूप लागलं. पण तुमच्या लेखानं मला सावरण्यास मदत केली. त्यामुळे मला सांत्वन मिळालं आणि मुख्य म्हणजे पत्नीची निवड करताना आपण घेण्याचा नव्हे तर देण्याचा विचार करावा हे त्या लेखातून मी शिकलो.
पी. एच. एस., ब्राझील
कोरियन समाजात, मुलगी वयात येताच तिचं लग्न करून दिलंच पाहिजे या गोष्टीवर खूप जोर दिला जातो. अशा परिस्थितीत, एखाद्या ख्रिस्ती तरुणीला ‘तारुण्याचा बहर ओसरेपर्यंत’ थांबून राहणे सोपे नसते. (१ करिंथकर ७:३६; NW) पण, यावर उत्तम सल्ला दिल्याबद्दल आभारी आहे.
एस. सी., कोरिया
स्वयं-उपचार “स्वयं-उपचार—सुरक्षित की धोकेदायक?” ही श्रृंखला मिळाल्याबद्दल मला मनस्वी आनंद झाला. (ऑगस्ट ८, १९९८) श्रृंखला अगदी सुरेख लिहिलेली आहे आणि सदर विषयावर ती एकंदरीत संतुलित दृष्टिकोन मांडते; त्यामुळे जगभरातील पुष्कळशा देशांकरता ती व्यावहारिक ठरू शकते. त्यातली सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे, ‘प्रत्येक दुखण्यासाठी गोळ्याऔषधं घेण्याऐवजी’ प्रत्येकानं आरोग्यदायी जीवनशैलींद्वारे आपल्या आरोग्याची जपणूक करावी यावर ती लेखमाला भर देते.
जे. एम. जे., इंग्लंड
प्रणयचेष्टा “बायबलचा दृष्टिकोन: प्रणयचेष्टा (फ्लर्टींग) करण्यात गैर काय?” (जुलै ८, १९९८) या लेखाबद्दल तुमचे आभारी आहे. एकेकाळी मी देखील दुसऱ्यांच्या भावनांशी खेळत होतो आणि असे करत असताना माझ्या कौटुंबिक सदस्यांना आणि खासकरून माझ्यावर जिवेभावे प्रेम करणाऱ्या माझ्या पत्नीला मी किती दुखावत होतो याकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. आता कुठं माझं कुटुंब त्यातून सावरत आहे. माझ्या ख्रिस्ती बंधूभगिनींना मला एवढंच सांगावंसं वाटतं की, “कृपया, आपला पिता यहोवा याचे ऐका. प्रणयचेष्टा सोडून द्या; मदतीसाठी यहोवाकडे प्रार्थना करा आणि वाईटापासून अक्षरशः पळ काढा.”
डी. बी., अमेरिका
हा लेख वाचून माझी खात्री पटली, की प्रणयचेष्टा ही खरोखरच एक गंभीर बाब आहे. आमच्या कौटुंबिक जीवनात घटस्फोटामुळे जणू एक वादळ आले; आणि याला खासकरून कारणीभूत ठरली थट्टामस्करी; सहसा अशा विनोदामुळे काही नुकसान होणार नाही असे समजले जाते. पण आपल्या वागण्याबोलण्याचा, आपल्या हावभावांचा विरुद्धलिंगी व्यक्तीवर काय परिणाम होऊ शकतो याचा स्वतःहून विचार न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या लेखातील सल्ला मदतदायी ठरेल अशी माझी आशा आहे.
ओ. एम., चेक गणराज्य
या लेखाने अनेक बहिणींच्या दुखावलेल्या भावनांवर फुंकर घातली. या लेखातून आपल्याला स्पष्ट झालं आहे, की यहोवा आपल्या सगळ्यात खोलवर दडलेल्या भावनांची दखल घेतो आणि त्या समजूनही घेतो.
ए. एम. पी., स्पेन
“भावनिक प्रेम प्रकरणे” या उपशीर्षकाखाली दिलेली माहिती माझ्यासाठी अगदीच नवीन होती. माझ्या पतीची आणि मंडळीतल्या एका बहिणीची पार्श्वभूमी सारखीच असल्यामुळे त्या दोघांमध्ये बौद्धिक आकर्षण निर्माण होत होते. गेल्या १७ वर्षांत मला संशय येईल असे त्यांनी कधीच काही केले नव्हते. पण, आता मात्र मी त्यांच्यावर संशय घेत होते. आणि हे त्यांच्या लक्षात आणून देणं मला फार कठीण गेलं. सुरवातीला त्यांना धक्काच बसला पण मला नेमकं काय म्हणायचं होतं ते समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. माझे पती म्हणाले, की ते मला किंवा आमच्या तीन मुलांना दुखवू इच्छित नव्हते आणि त्यांनी ताबडतोब त्या बहिणीसोबतचे आपले सगळे संबंध मोडले. त्यांनी मला समजून घेतलं याबद्दल मला किती हायसं वाटलं!
डी. टी., कॅनडा