वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ४/८ पृ. १४-१७
  • पाच मुलांसाठी यहोवाची आभारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पाच मुलांसाठी यहोवाची आभारी
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विचारपालट
  • पाच मुलांचं संगोपन
  • मुलांनी दिलेली उत्तरं
  • कृतज्ञ होण्याचे कारण
  • सात मुलांचं संगोपन करताना मिळालेले आशीर्वाद आणि आलेल्या अडचणी
    सावध राहा!—१९९९
  • देवासोबत आणि आईसोबत शांतीचं नातं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
सावध राहा!—१९९९
g99 ४/८ पृ. १४-१७

पाच मुलांसाठी यहोवाची आभारी

हेलन सॉल्सबेरी यांच्याद्वारे कथित

मार्च २, १९९७. माझ्या आयुष्यातला सगळ्यात दुःखाचा दिवस. या दिवशी माझे प्रिय पती डीन आम्हाला कायमचे सोडून गेले; त्यांच्या मयतीसाठी जवळजवळ ६०० परिचित लोक आणि नातेवाईक विल्मिंग्टन, डेलेवेर, अमेरिका या ठिकाणी जमले होते. डीन हे यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीत, ख्रिस्ती वडील आणि अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करत होते. गेल्या ४० वर्षांच्या आमच्या आनंदी वैवाहिक जीवनात आम्हाला अनेकानेक आशीर्वाद लाभले. मला पूर्णपणे ठाऊक आहे, की डीन सध्या, विश्‍वातील सगळ्यात सुरक्षित ठिकाणी अर्थात सर्वसमर्थ देव यहोवा याच्या स्मृतीत आहे आणि भवितव्यात आम्ही जरूर त्यांना भेटू.

सन १९५० मध्ये, बारावी झाल्यानंतर डीन हवाई दलात भरती झाले. देवाधर्मावर त्यांचा मुळीच विश्‍वास नव्हता आणि त्यामुळेच मला त्यावेळी प्राणप्रिय असलेल्या माझ्या कॅथलिक चर्चच्या शिकवणुकींवरून आमच्यात मतभेद व्हायचे. पण मुलांवर मात्र कॅथलिक धर्माचेच संस्कार करायचे असं आम्ही ठरवलं होतं. दररोज रात्री आम्ही दोघं गुडघे टेकून मनातल्या मनात प्रार्थना करत असू. मी तोंडपाठ केलेल्या माझ्या कॅथलिक प्रार्थना म्हणायचे तर डीन त्यांच्या मनात असेल ते म्हणायचे. काही काळानंतर, आम्हाला पाच मुलं झाली: बिल, जिम, डीन ज्यु., जो आणि चार्ली अशी त्यांची नावं.

मी अगदी प्रामाणिकपणे, न चुकता चर्चला जायचे आणि यातून मुलांनाही सूट नव्हती. पण कालांतराने, खासकरून व्हिएटनामी युद्धात चर्चनं भाग घेतला तेव्हा चर्चवरून माझं मनच उडालं. चर्चनं घेतलेल्या या पावित्र्यावर लोकांनी आक्षेप घेतला तेव्हा रोमन कॅथलिक चर्चचे तत्कालीन वरिष्ठ धर्मगुरू, स्पेलमॅन जनतेला उद्देशून म्हणाले: “हे चूक असो, की बरोबर, शेवटी देश आपलाच.” माझ्या चर्चनं युद्धात भाग घेतला असला तरीही माझ्या मुलांनीही युद्धात भाग घ्यावा हा विचार काही केल्या माझ्या मनाला पटत नव्हता. पण, तरीही माझ्या एका तरी मुलानं पाळक व्हावं आणि पतीनं कॅथलिक धर्म स्वीकारावा अशी प्रार्थना मी करायचे.

विचारपालट

एकदा शनिवारच्या दिवशी संध्याकाळी मी काही कॅथलिक मित्र-मैत्रिणींसोबत आणि आमच्याच चर्चच्या एका पाळकासोबत आम्ही सगळे जण मद्याचा आनंद घेत खूप मजा करत होतो; इतक्यात, एका स्त्रीनं पाळकांना विचारलं: “पाळक साहेब, अशा प्रकारची पार्टी केल्यानंतर दुसऱ्‍या दिवशी सकाळी आपण मास चुकवतो तेव्हा आपण खरोखरच घोर पाप करत असतो का हो?”

“छे! छे! मुळीच नाही,” असं पाळकांनी तिला उत्तर दिलं. “काही हरकत नाही. नाहीतरी मंगळवारी रात्री पाळकांच्या निवासस्थानांत मास होतोच की. त्या मासला जाऊनही तुम्ही आपलं कर्तव्य पूर्ण करू शकता.”

परंतु, बालपणापासून माझ्या मनावर हे बिंबवलं गेलं होतं की काहीही झालं तरी, रविवार सकाळचा मास मुळीच चुकवायचा नाही. त्यामुळे पाळकांच्या म्हणण्यावर मी आक्षेप घेतला तेव्हा ते माझ्यावर खेकसलेच; नको ते बोलले आणि बायकांना पाळकांच्या चुका दाखवण्याचा काहीएक अधिकार नाही असंही ते म्हणाले.

मी विचार केला, ‘असल्या पाळकासारखं माझ्या मुलांनी व्हावं अशी का प्रार्थना करतेय मी?’ अर्थात, सगळेच पाळक असे नसतात हे कितीही खरं असलं तरीही या एका घटनेपासून माझं विचारचक्र फिरू लागलं.

सन १९६० दशकाच्या मध्यात प्रथम फिलाडेल्फियात, मग पेन्सिल्व्हेनियात आणि शेवटी न्यूअर्क, डेलेवेर या या ठिकाणी यहोवाच्या साक्षीदारांशी आमचा संपर्क आला. त्यांच्या ख्रिस्ती आवेशाचं मला नेहमीच कौतुक वाटत असलं तरीही प्रत्येक वेळी ते घरी यायचे तेव्हा मी त्यांना म्हणायचे: “हे पाहा, वाईट वाटून घेऊ नका; पण, मी कॅथलिक आहे त्यामुळे मला तुमचं ऐकायचं नाही.”

मग १९७० साली, नोव्हेंबर महिन्याच्या थंडीत एके दिवशी सकाळी साक्षीदार पुन्हा आमच्या घरी आले. त्यांनी बायबलविषयी एक प्रश्‍न विचारला आणि मग स्तोत्र ११९:१०५ हे शास्त्रवचन वाचून दाखवलं; ते वचन म्हणतं: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाश आहे.” हे शब्द जणू माझ्या मनावर अमिट छापच पाडून गेले. मला अजूनही आठवतं; हे शब्द ऐकल्यावर मी विचार करू लागले, ‘बायबल! हेच तर उत्तर नसेल? पण आपल्याकडे बायबल कुठे आहे?’ कॅथलिक लोकांना बायबलची गरज नाही, बायबल आपल्याला गोंधळात टाकते, ते फक्‍त पाळकांसाठी असून केवळ पाळकच त्याचं वाचन करून स्पष्टीकरण देऊ शकतात या गोष्टी लहानपणापासून मला शिकवण्यात आल्या होत्या. आणि बायबल न बाळगल्यामुळे आपण खरं तर निष्ठावान कॅथलिक असल्याची पुष्टी देत आहोत असंच आजवर मला वाटत आलं होतं.

त्या दिवशी, सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते हे खास बायबलचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेलं पुस्तक मी साक्षीदारांकडून घेतलं. त्याच आठवड्यात मी ते वाचूनही काढलं आणि माझी पूर्ण खात्री पटली, हेच सत्य आहे! पुढच्या वेळीही साक्षीदार आले आणि या वेळी मात्र ते दोन बायबल घेऊन आले; त्यापैकी एक कॅथलिक भाषांतर होतं. साक्षीदारांकडून घेतलेल्या पुस्तकात दिलेली सगळी शास्त्रवचनं कॅथलिक बायबल मधलीच होती हे पाहून मी अवाकच राहिले. तेव्हापासून मी बायबलचा अभ्यास सुरू केला, भराभर प्रगती केली आणि ऑगस्ट १९७२ साली माझी बहीण, सॅली हिच्यासोबत माझा बाप्तिस्मा झाला; सॅलीनंही बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली होती.

माझे पती डीन यांनी कधीच मला विरोध केला नाही; परंतु, कॅथलिक धर्म सोडून मी एका निराळ्याच धर्मात आस्था घेत आहे हे पाहून त्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. ते सगळं सतत निरीक्षण करत होते, ऐकत होते. पूर्वी, मुलं आपलं ऐकत नाहीत म्हणून मी त्यांच्यावर नेहमी खेकसायचे, ओरडायचे. पण, आता मी शिकले होते की, “क्रोध, गलबला व निंदा” हे सगळं बायबलच्या विरोधात आहे. (इफिसकर ४:३१, ३२) शिवाय, मुलांवर खेकसून, ओरडून थोडंच आपण मुलांना वळण लावू शकतो. एकदा माझे पती यहोवाच्या साक्षीदारांविषयी सासूबाईंना असं सांगत असल्याचं मी ऐकलं: “आई, हे लोक खरंच शिकवतात तसं वागतातही!” लवकरच, माझ्या पतींनीही बायबलचा अभ्यास करायला सुरवात केली आणि १९७५ च्या जानेवारी महिन्यात ते बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार बनले.

पाच मुलांचं संगोपन

मी राज्य सभागृहात जाऊ लागले तेव्हा मी विचार केला, की सभा बराच वेळ चालतात त्यामुळे आपली मुलं काही इतका वेळ तिथं बसू शकणार नाहीत. म्हणून मग मी त्यांना घरीच त्यांच्या वडिलांकडे सोडून जायचे. एकटंच सभांना जाणं किती बरं वाटायचं. पण मग, एकदा ख्रिस्ती सभांच्या अवधीबद्दल बोलता बोलता भाषण देणाऱ्‍या बांधवानं विचारलं: “तुमची मुलं टीव्हीच्या समोर किती वेळ बसतात याचा कधी तुम्ही विचार केलात का?” त्या क्षणी माझी मुलं टीव्हीसमोरच बसलेली आहेत हे मला पक्कं ठाऊक होतं. मी विचार केला, ‘आता टीव्हीबिव्ही काही नाही! ते दर वेळेस माझ्यासोबत येतील!’ याला माझ्या पतीनंही विरोध केला नाही; उलट काही काळानंतर ते देखील आमच्यासोबत सभांना येऊ लागले.

नियमितपणे सभांना उपस्थित राहिल्यानं आमचं कौटुंबिक जीवन सुव्यवस्थित आणि स्थिर झालं. पण, या शिवाय इतरही लाभ आम्हाला मिळाले. मी आणि डीन चुकायचो तेव्हा चुका कबूल करून आम्ही बायबलच्या मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक लागू करायचो; अशाप्रकारे पालक या नात्यानं अधिकाधिक बाकबगार होण्याचा आम्ही प्रयत्न केला. कोणाच्याच बाबतीत आम्ही नियमांची तडजोड करत नव्हतो. माझ्यासाठी, माझ्या पतींसाठी जे योग्य होतं तेच आमच्या मुलांसाठीही योग्य होतं. नियमितपणे जाहीर प्रचार कार्यात सहभाग घेणे याला दुसरा पर्याय नव्हता.

मनोरंजनासाठी पण त्यात हाणामारीच्या किंवा उत्तान चित्रपटांना आम्ही मुळीच परवानगी दिली नाही. सबंध कुटुंबासाठी हितकर असेल अशाच गोष्टी आम्ही एकत्र मिळून करत असू; जसे की स्केटिंग, बोलिंग, मिनिएचर गॉल्फ खेळणे, मेळ्यांना, सहलींना जाणे आणि शुक्रवारी संध्याकाळी पिझा खाण्याची मौज तर काही औरच असायची. आमच्या कुटुंबाचे प्रमुख डीन अतिशय प्रेमळ होते. आमच्या सबंध वैवाहिक जीवनात आम्हाला जाणवलं की कौटुंबिक जीवन असावं तर असं.—इफिसकर ५:२२, २३.

सन १९७० साली जेव्हा मी यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करू लागले तेव्हा बिली १२ वर्षांचा, जिमी ११ वर्षांचा, छोटा डीन ९ वर्षांचा, जो सात वर्षांचा आणि चार्ली अवघ्या २ वर्षांचा होता. एव्हाना चर्चला जाण्याची त्यांना सवय होऊन गेली होती; पण आता ते बायबलविषयी शिकत होते. आमच्यासाठी हे सगळं नवीन होतं. मी त्यांना म्हणायचे: “मुलांनो, इथं या, हे पाहा काय आहे?” मुलंही यायची आणि आमच्यासाठी नवीनच असलेल्या एखाद्या गोष्टीवर आम्ही भरभरून चर्चा करायचो. जगाच्या पाठीवरील सर्वोच्च अधिकाराच्या अर्थात बायबलच्या अभ्यासाद्वारे मुलं यहोवावर प्रेम करू लागली आणि केवळ पालकांनाच नव्हे तर देवा आपला सृष्टिकर्ता असल्यामुळे आपण त्यालाही जबाबदार आहोत ही जाणीव त्यांना होऊ लागली.

बायबलचं सत्य शिकण्याआधी आमच्यावर बरंच कर्ज होतं. कर्ज फेडण्यासाठी आम्ही आमचं घर विकून भाड्याच्या घरात राहू लागलो. शिवाय, आम्ही आमची नवीन कार विकून एक जुनी कार विकत घेतली. शक्य तितकं साधंसुधं जीवन जगण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यामुळेच नोकरी सोडून मुलांसोबत घरी राहणे मला शक्य झाले. मुलांना घरात आईची गरज आहे हे आम्हाला जाणवलं. शिवाय, यामुळे मुलं शाळेत असताना मी ख्रिस्ती सेवेतही जास्त वेळ खर्च करू शकले. शेवटी, सप्टेंबर १९८३ मध्ये मी एक पायनियर (पूर्ण-वेळ सेवक) बनले. हे मान्य, की आमच्या मुलांना नेहमीच सगळ्यात चांगल्या वस्तू मिळाल्या नाही; पण कधी काही कमी पडलं नाही. ते सगळे टेक्निकल हाय-स्कूलमध्ये शिकले आणि त्यांनी हॉर्टिकल्चर, कारपेंट्री, ऑटो मेकॅनिक्स आणि ग्राफिक आट्‌र्स ही हुन्‍नरं आत्मसात केली होती. त्यामुळे प्रत्येकजण कमवू शकत होता, स्वतःच्या पायांवर उभा राहू शकत होता.

पुष्कळदा मी आमच्या कौटुंबिक जीवनाचा विचार करायचे आणि म्हणायचे, ‘आपल्याकडे खूप पैसा नसला तरी जगात जर कोणतं आनंदी कुटुंब असेल तर ते आपलंच असं मला वाटतं.’ काही काळानंतर, डीन आणि त्यांच्यासह मुलं देखील मंडळीमध्ये जबाबदाऱ्‍या हाताळण्यास झटू लागले. प्रथम, १९८२ साली डीन एक ख्रिस्ती वडील झाला. त्याच्या आठ वर्षांनंतर म्हणजे १९९० मध्ये आमचा सगळ्यात थोरला मुलगा बिल मंडळीत वडील झाला. त्याच वर्षी जोची देखील वडील म्हणून नियुक्‍ती झाली; छोटा डीनची १९९१ मध्ये, चार्लीची १९९२ मध्ये आणि शेवटी जीमची १९९३ मध्ये वडील या नात्याने नियुक्‍ती झाली.

आम्ही कबूल करतो, की पालक या नात्याने आपली जबाबदारी पार पाडताना आमच्या दोघांच्याही हातून पुष्कळ चुका झाल्या आणि केलेल्या चांगल्या गोष्टी नेहमीच आठवणीत राहणे शक्य नाही. आमची मुलं ख्रिस्ती बनली त्या सुरवातीच्या काळातील त्यांच्या काही अविस्मरणीय गोष्टींविषयी आणि विशेष म्हणजे, ख्रिस्ती वडील बनण्यास पात्र होण्यासाठी बालपणाच्या प्रशिक्षणात ते कोणते बायबल सिद्धान्त शिकले याविषयी आमच्या एका मित्रानं त्यांना विचारलं. यावर मुलांनी दिलेली उत्तरं ऐकून मला मनस्वी आनंद झाला.

मुलांनी दिलेली उत्तरं

बिल: “रोमकर १२:९-१२ या शास्त्रवचनांतून आम्ही जे काही शिकलो ते मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. त्या वचनाचा काही भाग असा आहे: ‘बंधूप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना; . . . आत्म्यात उत्सुक असा; . . . आशेने हर्षित व्हा.’ लोकांवर प्रेम करणं म्हणजे काय हे आमच्या आईबाबांनी आम्हाला प्रत्यक्ष त्यांच्या कृतीतून दाखवलं. इतरांना प्रेम दाखवण्यात त्यांना जो आनंद मिळत होता तो आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिला आहे. आमच्या घरातील या प्रेमळ वातावरणामुळेच बायबलचं सत्य आमच्या मनात अगदी पक्कं बसलं आहे. माझ्या आईबाबांनी बायबलच्या सत्यावर अपार प्रेम केले. त्यामुळेच सत्यावर प्रेम करणं, त्याला कवटाळून धरणं माझ्यासाठी कधीच फार जड गेलं नाही.”

जिम: “मत्तय ५:३७ यात दिलेल्या एका महत्त्वपूर्ण सिद्धान्ताची मला आठवण होते जे म्हणते: ‘तर तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्‍याहून जे अधिक ते वाइटापासून आहे.’ आमचे आईबाबा आमच्याकडून काय अपेक्षित होते हे मला आणि माझ्या भावांना पूर्णपणे माहीत होते; ख्रिश्‍चनांनी कसं असावं याची जिवंत उदाहरणं आम्ही त्यांच्यात पाहिली. त्या दोघांमध्ये कधीच दुमत नसायचे. त्यांच्यात कधी वाद झाल्याचं मला आठवतच नाही. त्यांच्यात मतभेद झाले असतील. पण, आम्हा मुलांना त्यांनी कधी त्याचा पत्ता लागू दिला नाही. त्यांच्यात एकोपा होता आणि त्यामुळे आमच्या मनावर एक पक्की छाप पडली आहे. आम्ही आईबाबांचं आणि सर्वात मुख्य म्हणजे यहोवाचं मन कधीच दुःखी करू इच्छित नव्हतो.”

डीन: “नीतिसूत्रे १५:१ म्हणते: ‘मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.’ बाबा अतिशय सौम्य होते. त्यांच्यासोबत कधी वाद झाल्याचं मला आठवतच नाही; मी किशोरवयाचा होतो अगदी तेव्हा देखील त्यांच्यासोबत वाद घालण्याचा प्रसंग कधी उठला नाही. मनःस्थिती बिघडलेली असली तरीही ते शांतच असायचे. शिक्षा म्हणून ते कधीकधी मला माझ्या खोलीत पाठवून द्यायचे किंवा मला आवडणाऱ्‍या काही गोष्टी ते मला द्यायचे नाही. पण वादविवाद कधीच नाही. ते केवळ आमचे वडील नाही तर आमचे मित्रही होते आणि आम्ही कधीच त्यांना निराश करू इच्छित नव्हतो.”

जो: “२ करिंथकर १०:५ या ठिकाणी ‘प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास [आज्ञा मानण्यास] लावण्याविषयी’ बायबल सांगते. आम्ही यहोवाच्या दर्जांना आणि त्याने दिलेल्या सूचनांना आज्ञाधारक असावे अशी आमच्या घरची शिकवण होती. सत्य हेच आमचं जीवन होतं. सभांना उपस्थित राहणं ही तर आमची जीवनपद्धत होती. सभांच्या वेळी दुसरं काही करण्याची कल्पना मला अजूनही विचित्र वाटते. ख्रिस्ती सेवा देखील एक पर्याय नसून आमच्या जीवनाचा एक नियमित भाग बनला होता. राज्य सभागृहात आम्हाला इतके मित्र मिळाले की बाहेरच्यांशी मैत्री करण्याची कधी गरजच पडली नाही. आपल्या मुलांना जीवनाच्या मार्गावर आणणे हीच एक सगळ्यात मोठी देणगी वडील आपल्या मुलांना देऊ शकतात!”

चार्ली: “नीतिसूत्रे १:७ अगदी ठळकपणे मला आठवतं. ते म्हणतं: ‘परमेश्‍वराचे [“यहोवाचे,” NW] भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात.’ यहोवा एक खरीखुरी व्यक्‍ती आहे हे पाहण्यासाठी तसेच त्याचे भय बाळगणे, त्याच्यावर प्रेम करणे किती महत्त्वाचे आहे हे समजण्यासाठी माझ्या आईबाबांनी मला मदत केली. ते आम्हाला म्हणायचे: ‘केवळ आम्ही सांगतो म्हणून हे करू नका. तुम्हाला स्वतःला कसं वाटतं? यहोवा स्वतः हे पाहतो तेव्हा त्याला कसं वाटतं? सैतानाला कसं वाटतं? याचा विचार करा.”

“त्यामुळे, पाणी नेमकं कुठं मुरतय हे आमच्या लक्षात यायचं. आईबाबा नेहमीच चोवीस तास आमच्याबरोबर असू शकत नव्हते. आमच्या हृदयावर, आमच्या मनावर बायबलची सत्ये बिंबवण्यासाठी त्यांनी यापेक्षा जास्त करावं अशी अपेक्षा आम्ही करू शकत नव्हतो. शाळेत, नोकरीच्या ठिकाणी आणि मित्रांच्यात असताना आमचे निर्णय आम्ही स्वतः घेत असू. यहोवाविषयीच्या त्या सुदृढ भीतीमुळे मोठा फरक पडला आणि आजपर्यंत आम्ही तशीच भीती बाळगून आहोत.

“शिवाय, आई तिच्या पायनियर सेवेबद्दल, तिला येत असलेल्या चांगल्या अनुभवांबद्दल भरभरून बोलायची. सेवेबद्दल तिचा नेहमी सकारात्मक दृष्टिकोन होता आणि त्याचा आमच्यावर विलक्षण प्रभाव पडला. तिच्यासारखी मनोवृत्ती बाळगणाऱ्‍या लोकांवर आम्ही प्रेम करू लागलो आणि घरोघरचे कार्य सगळ्यात मोठा आनंद देणारे कार्य असू शकते याची जाणीव आम्हाला झाली.”

कृतज्ञ होण्याचे कारण

आज माझ्या पाचही मुलांचं लग्न झालं असून मला पाच गुणी सुना आहेत; त्या देखील यहोवाच्या विश्‍वासू सेविका आहेत. त्याशिवाय, मला आणखीन पाच मुलं—होय, पाच नातू झाले आहेत! या सगळ्यांना यहोवावर प्रेम करण्याचं आणि आपल्या जीवनात त्याच्या राज्याला नेहमी पहिलं स्थान देण्याचं शिक्षण दिलं जात आहे. माझी ही पाच नातवंडंही आपल्या वडिलांप्रमाणे आणि आजोबांप्रमाणे एक दिवस मंडळीत वडील व्हावीत अशी आमची प्रार्थना आहे.

डीनचा मृत्यू झाला त्याच्या काही काळानंतर आमच्या एका मुलानं असं लिहिलं: “मला बाबांची खूप खूप आठवण येईल, कारण आता ते झोपी गेले आहेत. आता वेदना नाहीत, दुःख नाही, शस्त्रक्रिय नाहीत, सुया नाहीत, नळ्या नाहीत—फक्‍त शांती. बाबा गेले तेव्हा मी त्यांच्याजवळ नव्हतो. आयुष्यात सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नसतात. पण मी इतकंच म्हणू शकतो, की पुनरुत्थानात निदान बाबांचं स्वागत करायला तरी मिळेल अशा प्रकारे जीवन व्यतीत करण्याचा मी निर्धार केला आहे!”

मला एक प्रेमळ पती दिल्याबद्दल तसेच पुनरुत्थानाची शाश्‍वत आशा दिल्याबद्दल मी यहोवाची किती आभारी आहे! (योहान ५:२८, २९) आणि माझ्या पाच मुलांसाठीही मी त्याची किती कृतज्ञ आहे!

[१७ पानांवरील चित्र]

हेलन सॉल्सबेरी आणि तिचं कुटुंब

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा