तरुण लोक विचारतात . . .
मला हव्या असलेल्या वस्तू मी का घेऊ शकत नाही?
“काही वस्तू फारच छान आहेत, मला घ्यायला आवडतील; पण माझ्या आईवडिलांना परवडत नाही.”—माईक.
तुम्हाला खरोखर हव्या असलेल्या परंतु घेता येत नाहीत अशा काही वस्तू आहेत का? कदाचित त्या नवीन स्टीरिओवर, सगळेजण घालत असलेल्या त्या शूजवर किंवा डिझायनर लेबलच्या नवीन जीन्सवर तुमचं मन बसलंय. तुमच्या काही साथीदारांकडे त्या गोष्टी आहेत—आणि तुमच्यासमोर ते त्या गोष्टी मिरवतात. म्हणून, तुमच्या आईवडिलांना ते परवडण्यासारखं नाही असं तुम्हाला सांगितलं असेल, तर तुमची निराशा झाली असणार.
वस्तू हव्या असण्यात गैर काही नाही पण पुष्कळ युवकांना त्या वस्तू काहीही करून मिळवण्याचं खूळ डोक्यात शिरलेलं असतं. हे बहुतेक प्रसार माध्यमांच्या जाहिरातींचा परिणाम आहे. टीव्ही, पत्रिका आणि रेडिओवरच्या चकाकत्या जाहिराती असा संदेश देतात की, विशिष्ट कपडे घातली नाहीत किंवा विशिष्ट नावाची उत्पादने वापरली नाहीत तर तुम्हाला कधीच यश मिळणार नाही. एकट्या संयुक्त संस्थानांत, किशोरवयीन दरवर्षी १०,००० कोटी डॉलर्सहून अधिक पैसे खर्च करतात!
त्यावर समवयस्कांचा दबाव असतो. खरेदी-विक्रीचे उपाय या पत्रिकेतल्या एका लेखात असे म्हटले होते, “किशोरवयीनांच्या निर्दयी भोळ्याभाबड्या जगात, तुम्हाला सामील व्हायचे असेल त्या सामाजिक गटाच्या मते तुम्ही ‘कूल’ नसलात, तर त्यांच्या दर्जानुसार तुम्ही नाहीत किंवा तुम्हाला झिडकारलं जातं एवढीच ती क्षुल्लक गोष्ट नाही: तर ते नेहमीच अपयशी ठरणाऱ्या व्यक्तीचं चिन्ह मानलं जातं.” मग “कूल” कसं बनता येतं? बऱ्याचशा गटांमध्ये, सर्वोत्तम आणि नवनवीन वस्तू बाळगल्याने! तुम्हाला त्या वस्तू परवडत नसल्या तर? एक ख्रिस्ती युवक कबूल करतो, “तेव्हा फारच कठीण होऊन बसतं. डिझायनर लेबल नसलेले कपडे शाळेला घालून गेलं की सगळी मुलं चिडवतात.” दुसरी एक यवुती म्हणते, “मला वाळीत टाकल्यासारखं वाटतं.”
विकसनशील देशांमध्ये राहणाऱ्या युवकांवरही असेच दबाव येत असतील; तिथं तर जीवनावश्यक गोष्टी कमावण्यासाठीच केवढं काबाडकष्ट करावं लागतं. तुमच्या कुटुंबात हीच गत असल्यास, आपलं जीवन आरामदायी असावं असं वाटणं साहजिक आहे. टीव्हीचे कार्यक्रम आणि चित्रपटांमध्ये श्रीमंत राष्ट्रांमधील महागडे कपडे, घरं आणि कार पाहून आपल्याकडेही हे सर्व असावं असं कदाचित तुम्हाला वाटू लागलं असेल. आणि या गोष्टी मिळवणं अशक्य असल्याने, तुम्हाला कदाचित राग येईल किंवा निराशाही वाटेल.
गरीब देशात काय किंवा श्रीमंत देशात काय, आपल्याला काही वस्तू खरेदी करता येत नाहीत म्हणून राग बाळगल्याने किंवा निराश झाल्याने आपलंच नकुसान होतं. त्यामुळे आईवडिलांसोबतही सतत खटके उडू शकतात. पण प्रश्न हा आहे की, याचा सामना कसा करावा?
भौतिक वस्तूंबद्दल संतुलित दृष्टिकोन
प्रथम हे लक्षात घ्या की, आपल्या लोकांनी गरिबीत दिवस कंठावेत किंवा आवश्यक वस्तू त्यांना मिळू नयेत असं यहोवा देवाला वाटत नाही. देवाने आदाम आणि हव्वेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ठेवले नाही तर दिसण्यात सुंदर अशा सर्व जातीची झाडे असलेल्या उत्तम बागेत ठेवलं. (उत्पत्ति २:९) नंतर, देवाचे काही सेवक जसे की, अब्राहाम, ईयोब आणि शलमोन यांच्याकडे भरपूर धनसंपत्ती होती. (उत्पत्ति १३:२; ईयोब १:३) शलमोनाकडे इतकं सोनं होतं की त्याच्या कारकीर्दीत चांदीला “कोणी विचारीत नव्हते”!—१ राजे १०:२१, २३.
पण एकंदर, देवाच्या बहुतेक लोकांची परिस्थिती सर्वसाधारण आहे. येशू ख्रिस्त स्वतः गरीब होता; त्याला ‘डोके टेकवायलासुद्धा ठिकाण नव्हते.’ (मत्तय ८:२०) तरीही, हव्या असलेल्या वस्तू घेता आल्या नाहीत म्हणून येशू कुरकूर करत होता असे तुम्ही कधीच वाचले नसेल. त्याउलट त्याने असं शिकवलं: “ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. . . . तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्तय ६:३१-३३.
याचा अर्थ, कोणाला डिझायनर कपडे हवे असतील किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे हवी असतील तर ती पुरवण्याची जबाबदारी देवाची आहे असे नाही. देव आपल्या गरजा पुरवतो—आपल्या इच्छा पूर्ण करीलच असे नाही. म्हणूनच “अन्नवस्त्र असल्यास” तेवढ्यात तृप्त राहावे असे बायबल आपल्याला आर्जवते. (१ तीमथ्य ६:८) पण, वास्तविकता अशी आहे की, तृप्त राहणे म्हणावे तितके सोपे नाही. “इच्छा आणि गरजा यांच्यामध्ये सतत लढत राहावं लागतं,” असं माईक नावाचा तरुण म्हणतो. आपल्या स्वतःच्या स्वार्थी इच्छांव्यतिरिक्त, आपल्याला देवाचा आद्य शत्रू, दियाबल सैतान याच्या प्रभावाला लढा द्यावा लागतो. (१ योहान ५:१९) त्याची एक सर्वात जुनी चाल म्हणजे, आपल्याला काहीतरी मिळत नाही असं लोकांना भासवणं. अशातऱ्हेने, हव्वेला फसवल्यामुळे ती विचार करू लागली की तिला कशापासून तरी वंचित ठेवलं होतं—एका परिपूर्ण परादीसमय बागेत राहत असूनही!—उत्पत्ति ३:२-६.
असमाधानी होण्याचे तुम्ही कसे टाळू शकता? माणसाला जे मिळाले आहे त्याचे त्याने आभार मानावेत हे म्हणीसारखे वाटत असले, तरी आभार मानायला अनेक कारणे आहेत. तुमच्याजवळ नाही त्या गोष्टींविषयी नकारात्मक विचार करत बसू नका. सकारात्मक विचार करा, तुमच्याजवळ जे आहे त्याची स्वतःला आठवण करून देत जा. (पडताळा फिलिप्पैकर ४:८.) माईकचे म्हणणे असे आहे: “मला पुष्कळशा गोष्टी हव्या आहेत पण त्यांचा विचार मी मनात घोळवत बसत नाही.”
आपल्या भावनांचा फायदा उचलणाऱ्या चलाख जाहिरातींवर पटकन विश्वास ठेवला नाही तरी मदत होऊ शकते.a (नीतिसूत्रे १४:१५) नवीन शूज किंवा सीडी प्लेयर मिळाला नाही तर आपण “मरू” असा निष्कर्ष काढण्याआधी शांत डोक्याने परीक्षण करून पाहा. स्वतःला विचारा: ‘मला खरंच याची गरज आहे का? याचा खरंच उपयोग होणार आहे का? माझ्याजवळ जे आहे त्याने माझं भागणार नाही का?’ विशेषतः, एखादी वस्तू आपल्या मालकीची असणे ही गर्वाची गोष्ट आहे या कल्पनेचा पुरस्कार करणाऱ्या जाहिरातींबद्दल हुशार राहा. १ योहान २:१६ येथे प्रेषित योहानाचे शब्द विचारप्रवर्तक आहेत: “जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.”
तुम्हाला खरोखर आवश्यकता असते तेव्हा
तुम्हाला खरोखर एखाद्या वस्तूची गरज असली तर? पालकांना त्याविषयी सांगण्याआधी, स्वतः त्याचा जरा विचार करा. तुम्हाला ती वस्तू का हवीय, तिचा तुम्ही कसा उपयोग करणार आहात आणि ती तुम्हाला फायद्याची का आहे हे त्यांना समजावून सांगण्याची तयारी करा. कदाचित तुमचे आईवडील ती वस्तू बजेटमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतील. पण, सध्या तरी त्यांना ते जमत नसेल तर? मग, थांबून राहण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नसेल. (उपदेशक ७:८) हे ‘शेवटल्या काळचे कठीण दिवस’ असल्याकारणाने पालकांना आपल्या मुलांना हव्या असलेल्या सर्वच गोष्टी पुरवता येत नाहीत. (२ तीमथ्य ३:१) आपल्या पालकांकडे तुम्ही अवाजवी मागण्या केल्या नाहीत, तर तुम्ही त्यांचे अवघड काम हलकं करू शकता.
कदाचित तुमच्या परीनं तुम्ही काही करू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला काही पैसे मिळतात का? मग स्वतःच्या पैशांचे नीट बजेट तयार करायला शिका म्हणजे दर महिन्याला तुम्ही थोडीफार बचत करू शकता. कदाचित जवळच्या बँकेत एखादे बचत खाते तुम्हाला उघडता येईल. (पडताळा लूक १९:२३.) अबीगेल नावाच्या एक तरुणीने असेच केले. ती म्हणते: “माझ्या पैशांचे मी दोन वाटे केले—एक बँकेत ठेवायला आणि दुसरा खर्च करायला.” तुम्ही वयाने मोठे असाल, तर अधूनमधून एखादे काम किंवा पार्ट टाईम नोकरीही करू शकता.b तुम्हाला खरंच एखादी वस्तू खरेदी करायची आहे आणि तुम्ही मन लावून बचत करत आहात हे तुमच्या पालकांनी पाहिलं, तर शक्य असल्यास त्यांनाही थोडीफार मदत करावीशी वाटेल.
तुमच्या खरेदी करण्याच्या पद्धतीत जरा बदल केल्यानेही तुम्हाला फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ, एखादी वस्तू फारच महाग असली, तर कदाचित किंमत कमी करता येण्यासारखी असेल. नसल्यास, आणखी थोडं थांबून ती वस्तू सेलमध्ये निघते का ते पाहा. दुसऱ्या दुकानांमध्ये, तीच वस्तू कमी किंमतीत मिळू शकते का ते पाहा. वस्तू चांगल्या दर्जाच्या आहेत का हे ओळखायला शिका; काहीवेळा कंपनीचे नाव नसलेल्या वस्तूही चांगल्या निघतात.c
तृप्त असायला शिका
नीतिसूत्रे २७:२० इशारा देते: “अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत; आणि मनुष्याचे नेत्रहि कधी तृप्त होत नाहीत.” होय, कबरेची भूक जशी शमत नाही तसेच काही लोकांना अधिकाधिक हवं असतं—त्यांच्याजवळ कितीही असलं तरीही. ती लोभी विचारपद्धत टाळा. शेवटी, लोभाने निराशा आणि दुःखाशिवाय आणखी काहीही मिळत नाही. जॉनथन नावाचा तरुण म्हणतो: “नेहमी मिळवण्यातच माणसाला आनंद वाटत असला, तर माणूस कधीच आनंदी होऊ शकत नाही. घ्याव्याशा वाटणाऱ्या नवीन वस्तू नेहमीच दिसतील. जे काही आपल्याकडे आहे त्यातच समाधान मानायला शिकण्याची गरज आहे.”
तुम्ही स्वतः समाधानी असला, तर समवयस्कांकडून येणाऱ्या दबावाचा तुम्ही सामना करू शकता. तरुण विन्सेंट म्हणतो: “कोणीतरी विशिष्ट कंपनीचे शूज घातलेत म्हणून मीसुद्धा ते आणलेच पाहिजेत असं काही नाही.” तरीही अधूनमधून, तुम्हाला हवी असलेली गोष्ट घेता येत नाही तेव्हा निराशा तर होतेच. पण, यहोवा तुमच्या गरजा विसरत नाही हे लक्षात ठेवा. (मत्तय ६:३२) आपल्याच निकटच्या भविष्यात तो ‘सर्व प्राणीमात्रांची इच्छा पुरी करेल.’—स्तोत्र १४५:१६.
[तळटीपा]
a “जाहिरातबाजी आणि तुम्ही!” ही सावध राहा!, सप्टेंबर ८, १९९८ अंकातील लेखमाला पाहा.
b “तरुण लोक विचारतात . . . थोडाफार पैसा कमावण्यासाठी मी काय करावं?,” हा सप्टेंबर ८, १९९८ अंकातला लेख पाहा.
c अतिरिक्त मदतदायी सल्ल्यासाठी, “तरुण लोक विचारतात . . . कपड्यांची खरेदी करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?” हा जानेवारी २२, १९९५ (इंग्रजी) अंकातला लेख पाहा.
[१९ पानांवरील संक्षिप्त आशय]
“डिझायनर लेबल नसलेले कपडे शाळेला घालून गेलं की सगळी मुलं चिडवतात”
[२० पानांवरील चित्र]
हव्या असलेल्या सर्व वस्तू आपल्याकडे नसतानाही आपण आनंदी असू शकतो