‘तुमच्या कार्यामुळे समाजाला काय फायदा होतो?’
हा प्रश्न, एक भारतीय पत्रकार श्री. चंद्रकांत पटेल यांनी ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयांत काम करणाऱ्या एक सदस्याला विचारला. श्री. पटेल हे संस्थेला भेट देण्यासाठी आले होते आणि त्यांनी स्वतः जे काही पाहिले, ऐकले त्यामुळे ते इतके प्रभावित झाले, की भारतात परतल्यावर त्यांनी एका गुजराती वृत्तपत्रात त्यावर लेख लिहिला.
यहोवाचे साक्षीदार आणि भारतातील चर्च संघटना यांच्या धार्मिक विश्वासांत काय फरक आहे हे दाखवताना श्री. पटेल यांनी लिहिले, की चर्चमधून शिकवल्या जाणाऱ्या त्रैक्याच्या सिद्धान्ताच्या अगदी विपरित यहोवाचे साक्षीदार एका सर्वशक्तिमान परमेश्वराला अर्थात यहोवाला मानतात; शिवाय, कोणत्याही मूर्तींची किंवा प्रतिमांची ते उपासना करत नाहीत. व्यभिचार, गर्भपात आणि द्वेष करणे किंवा हत्या करणे यांविषयी बायबलमध्ये घालून दिलेल्या ख्रिस्ती मूल्यांचे यहोवाचे साक्षीदार अगदी काटेकोर पालन करतात; त्यामुळे त्यांचे सिद्धान्त अतिशय उच्च प्रतीचे आहेत असेही त्यांनी लिहिले. तसेच, यहोवाचे साक्षीदार शांतिप्रिय, प्रेमळ, सहनशील आणि सेवाभावी वृत्तीचे असून ते इतरांना अगदी निर्भीडपणे आणि उत्साहाने बायबलचा संदेश सांगतात असे श्री. पटेल यांनी साक्षीदारांचे वर्णन केले.
‘तुमच्या कार्यामुळे समाजाला काय फायदा होतो’ या प्रश्नाचे या भारतीय पत्रकाराला काय उत्तर मिळाले? त्यांनी आपल्या लेखात सांगितल्याप्रमाणे ‘याचे उत्तर असे आहे, की बायबलचे शिक्षण जीवनाच्या हरएक पैलूत लाभदायक ठरते.’ श्री. पटेल यांनी खासकरून आरोग्य निगा आणि रोजगार या विषयांवर प्रश्न विचारले. त्या संदर्भात त्यांना मिळालेल्या उत्तराचे काही भाग उद्धृत करताना त्यांनी म्हटले: ‘एखादी व्यक्ती तंबाखू, मादक पदार्थ यांसारखे हानीकारक पदार्थ वर्ज्य करून एक शुद्ध, नैतिक जीवन व्यतीत करण्याविषयी बायबलचा सल्ला लागू करते तेव्हा अनेकानेक रोगांपासून तिचं संरक्षण होऊ शकतं. शिवाय, अशा कष्टाळू, शुद्धाचरणी, प्रामाणिक लोकांना नोकऱ्या मिळण्याची अधिक शक्यता असते. तसेच एका समजूतदार, प्रेमळ मार्गाने समस्या सोडवल्यामुळे इतरांसोबत शांतीनं राहण्यासही मदत होते. तेव्हा, लोकांना बायबलचे शिक्षण दिल्याने समाजाचा एकंदर फायदाच होतो.’
बायबलच्या शिकवणुकी कार्यात उतरवल्याचा प्रत्यक्ष अनुभव या पत्रकाराला यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयांत आला. त्यांच्या लेखात त्यांनी, आध्यात्मिक कार्याच्या केंद्रस्थानी असलेल्या समर्पित स्वयंसेवकांच्या स्वच्छतेची आणि उत्साहाची प्रशंसा केली. बायबलच्या शिकवणुकींपासून तुम्हालाही लाभ होऊ शकतो. तो कसा, हे दाखवण्याकरता यहोवाचे साक्षीदार तुमची मदत करण्यास सदैव तयार आहेत.
[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]
पार्श्वभूमीतील वृत्तपत्र: Courtesy Naya Padkar, Gujarati Daily published from Anand, India