वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ४/८ पृ. ४-५
  • “आकाश तर मोकळेच आहे”!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आकाश तर मोकळेच आहे”!
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ज्वालामय फुगे आणि “ज्वालाग्राही वायु”
  • वाऱ्‍याच्या पंखांवर
    सावध राहा!—२००२
  • विमान कसे तयार झाले?
    सावध राहा!—१९९९
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२००२
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ४/८ पृ. ४-५

“आकाश तर मोकळेच आहे”!

“उड्डाणाची इच्छा मानवजातीइतकीच जुनी आहे,” असे इतिहासकार बरटॉल्ट लाऊफर यांनी विमानचालनाचा पूर्वइतिहास (इंग्रजी) यात निरीक्षण केले. प्राचीन ग्रीक, ईजिप्शियन, असिरियन आणि पौर्वात्य दंतकथेच्या इतिहासात अनेक राजे, देव आणि महापुरुषांच्या कथा आहेत ज्यांनी उडण्याच्या शक्‍तीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ प्रत्येक प्रकरणात, त्या लोकांनी पक्ष्यांच्या उड्डाणाचे अनुकरण केल्याचे त्या कथांमध्ये सांगण्यात आले आहे.

उदाहरणार्थ, चीनी लोक, बुद्धिमान आणि साहसी सम्राट शून याच्याविषयी एक कथा सांगतात; येशू ख्रिस्ताच्या जन्माआधी सुमारे २,००० वर्षांआधी तो हयात होता असे म्हटले जाते. दंतकथेनुसार, एका धान्य भांडाराला आग लागली होती आणि शून त्या भांडाराच्या वरती अडकला होता; तेव्हा त्याने पंख लावले आणि उडून स्वतःचा बचाव केला. दुसऱ्‍या एका वृत्तान्तात असे म्हटले आहे की, त्याने एका उंच बुरूजावरून उडी मारली आणि जमिनीवर सुखरूप उतरण्यासाठी दोन मोठमोठ्या वेताच्या टोप्यांचा पॅरशूट म्हणून उपयोग केला.

ग्रीक लोकांमध्ये, महान कलाकार आणि शोधक, डेडलसची ३,००० वर्षांची एक जुनी दंतकथा आहे; त्याने पिसे, सुतळी आणि मेण यांचा उपयोग करून पंख तयार केले जेणेकरून क्रीट येथे बंदिवान करून ठेवलेल्या त्याला व त्याच्या मुलाला अर्थात इकॅरसला निसटून जाता आले. डेडलस म्हणाला, “आकाश तर मोकळेच आहे, आपण तेथूनच जाऊ.” सुरवातीला, काहीच त्रास झाला नाही. पण, आकाशात उडता येण्याच्या क्षमतेने इकॅरस उत्तेजित होऊन उडत उडत इतक्या वर गेला की, सूर्याच्या उष्णतेने पंखांना चिकटून ठेवणारा मेण वितळला. खाली समुद्र होता त्यात तो पडला आणि मरून गेला.

अशा कथांमुळे, खरोखर उड्डाण साध्य करण्याची इच्छा असलेल्या शोधकांच्या आणि तत्त्ववेत्त्यांच्या कल्पनेला आणखीनच चालना मिळाली. सा.यु. तिसऱ्‍या शतकातच चीनी लोक पतंग बनवून प्रयोग करू लागले आणि युरोपमध्ये याप्रकारचा कोणताही प्रयोग सुरू होण्याआधीच त्यांना विमानोड्डाणाच्या काही नियमांची समज असल्याचे दाखवून देत होते. १५ व्या शतकात, जोवानी दा फोनटाना नामक एका वेनेशियन डॉक्टरांनी लाकूड आणि कागदाचे साधेसुधे रॉकेट्‌स, स्फोटक दारूने हवेत सोडण्याचे प्रयोग करून पाहिले. सुमारे १४२० साली, फोनटाना यांनी लिहिले: “हलवता येण्याजोगे पंख माणसाला लावणे शक्य आहे यात मला काहीच शंका नाही; त्यांच्याकरवी तो हवेत वरती जाऊ शकेल, एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी जाऊ शकेल, उंच बुरूजांवर चढू शकेल आणि पाण्यावरूनही उडून जाऊ शकेल.”

सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात, चित्रकार, मूर्तीकार आणि वाकबगार यांत्रिकी अभियंता लिओनार्दो दा विंची यांनी हेलिकॉप्टर आणि वैमानिकाच्या छत्रीचे त्याचप्रमाणे फडकवू शकणाऱ्‍या पंखांच्या ग्लायडर्सचे साधारण चित्र काढले. पुराव्यावरून हे सूचित होते की, त्यांनी सुचवलेल्या उड्डाण यंत्रांचे काही मॉडेल त्यांनी तयार केले. परंतु, दा विंची यांची एकही रचना व्यावहारिक नव्हती.

त्यानंतरच्या दोन शतकांमध्ये, साहसी माणसांच्या प्रयत्नांचे अनेक अहवाल आहेत ज्यांनी अंगावर नकली पंख चिकटवून टेकड्यांवरून आणि बुरूजांवरून उड्या मारून उडण्याचा प्रयत्न केला. हे प्रारंभिक ‘चाचणी घेणारे वैमानिक’ अत्यंत धीट आणि साहसी होते—पण त्यांचे प्रयत्न पूर्णतः अयशस्वी ठरले.

ज्वालामय फुगे आणि “ज्वालाग्राही वायु”

सन १७८३ मध्ये, सबंध पॅरिस आणि फ्रान्सच्या प्रांतांमध्ये थक्क करून सोडणाऱ्‍या वैमानिकी आविष्काराची बातमी पसरली. झोझेफ-मीशेल आणि झाक-एटयन मॉन्टगोल्फियर या दोघा भावांना, लहान कागदी फुग्यांमध्ये गरम हवा भरली तर ते भरकन, न अडखळता वर जातात हे दिसून आले. त्यांचा प्रथम मोठा आगीचा फुगा—त्याला असेच नाव पडले होते—कागद आणि कापडाचा तयार केला होता आणि एका मोठ्या आगीच्या दुर्गंधकारी धूराने तो फुगवण्यात आला होता. पहिल्या उड्डाणावेळी, माणूस नसलेला हा फुगा १,८०० मीटरपेक्षाही वर गेला. नोव्हेंबर २१, १७८३ रोजी त्या फुग्यातून दोन प्रवाशांनी—जनतेने त्यांना वैमानिक नाव दिले—पॅरिसवरून २५ मिनिटांची संवारी केली. त्याच वर्षी, आणखी एक संशोधक झाक शार्ल याने हायड्रोजन किंवा “ज्वालाग्राही वायु” या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या वायुने भरलेल्या फुग्याचा प्रथम शोध लावला.

फुगा निर्मिती तंत्रज्ञानात वाढ होत गेली तसे, साहसी वैमानिकांसाठी आकाश झपाट्याने ‘मोकळे’ होऊ लागले. १७८४ सालापर्यंत, फुगे ३,४०० मीटरपेक्षा अधिक उंचीपर्यंत जाऊ लागले. त्याच्या एका वर्षानंतरच, झॉन-पायर-फ्रॉन्स्वा ब्लॉन्शार याने जगातले पहिले हवाई टपाल घेऊन एका हायड्रोजन फुग्यातून यशस्वीपणे इंग्लीश खाडी पार केली. १८६२ सालापर्यंत, वैमानिकांनी युरोपपलीकडे आणि सबंध संयुक्‍त संस्थानांत प्रवास केला होता आणि आठ किलोमीटरहून जास्त उंची गाठली होती.

पण या प्रारंभिक वैमानिकांना वाऱ्‍याच्या प्रवाहावरच अवलंबून राहावे लागायचे; फुग्यांची दिशा किंवा गती नियंत्रणात ठेवण्याचा कोणताच मार्ग नव्हता. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात, गॅसोलीन आणि विद्युतशक्‍तीवर चालणाऱ्‍या हवाई जहाजांच्या निर्मितीमुळे हवेतून प्रवास करणे मोठ्या प्रमाणात शक्य झाले, पण पपईच्या आकाराची आणि हवेपेक्षा हलकी असलेली ही हवाई जहाजे फार मंद गतीने प्रवास करायची—सहसा ताशी दहा किंवा तीस किलोमीटर इतका त्यांचा वेग असायचा. दा फोनटानाने भाकीत केल्याप्रमाणे, ‘हवेत वरती जायचे असेल आणि एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी जायचे असेल’ तर नवीन पद्धतीची गरज होती.

[४ पानांवरील चित्र]

दंतकथेतील डेडलस आणि इकॅरस

[४ पानांवरील चित्र]

लीओनार्दो दा विंची

[चित्राचे श्रेय]

From the book Leonardo da Vinci, 1898

[४ पानांवरील चित्र]

मॉन्टगोल्फियर बांधवांनी प्रवाशांना वाहून नेणाऱ्‍या सर्वप्रथम गरम हवेच्या फुग्याची रचना केली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा