उड्डाणाचे स्वप्न
“प्रत्येक उड्डाण यंत्राने ही म्हण खरी करून दाखवली आहे की, ‘जे काही वर जाते ते खाली आलेच पाहिजे.’”
अशा काहीशा शंकास्पद सुरात, मे २५, १९०८ च्या द न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्रातील एका संपादकीय लेखाने सुरवात केली; किटी हॉक, उत्तर कॅरोलिना, अमेरिका येथे राईट बांधवांना उड्डाणाचा हा पराक्रम करून पाच वर्षेही झाली नव्हती की हा लेख छापून आला. आकाशात घोंगावत असलेली ही नवीन “उड्डाण यंत्रे” खरोखरच यशस्वी ठरतील का याची शाश्वती नसल्याने लेखकाने असे म्हटले होते की, “तुलनात्मकपणे, पृथ्वीपासून इतक्या उंचावर हवेत तरंगण्याची इच्छा आपल्यापैकी फारच कमी लोकांना आहे.” भावी पिढींना कदाचित हवेतील प्रवासाची कल्पना रुचेल असे कबूल करूनही त्या लेखात असे ठासून म्हटले होते की, “दीर्घ पल्ल्याच्या प्रवासी विमानांचे स्वप्न . . . निव्वळ स्वप्नच राहील.”
ते भविष्यकथन केवढे खोटे ठरले! आज, एक अब्जाहून अधिक प्रवासी दरवर्षी ‘दीर्घ पल्ल्याच्या प्रवासी विमानांमधून’ प्रवास करतात. होय, एका शतकातच विमानांमध्ये केवढा बदल झाला आहे; या शतकाच्या सुरवातीच्या लाकूड आणि कापडाने बनलेल्या यंत्रांची जागा आजच्या आकर्षक संगणक-चलित जेट विमानांनी घेतली आहे जे भरधाव वेगाने पृथ्वीपासून दहा किलोमीटर उंचीवरून शेकडो प्रवाशांना वातानुकुलित सुखसोयीत दूर देशी घेऊन जातात.
या २० व्या शतकात विमानचालन तंत्रज्ञानाने गाठलेले शिखर खरोखर उल्लेखनीय असून त्यामुळे आपल्या जगाचा पार कायापालट झाला आहे. खरे पाहता, अवकाशावर विजय मिळवण्याचा मानवाचा प्रयत्न केवळ दोन-चार दशकांआधी—किंवा दोन-चार शतकांआधी सुरू झालेला नाही. अगदी प्राचीन काळापासून मानवाला उड्डाण करण्याचे स्वप्न होते.
[३ पानांवरील चित्र]
बोईंग स्ट्रेटोलायनर ३०७, सु. १९४०, ३३ प्रवासी, वेग ताशी २१५ मैल
[३ पानांवरील चित्र]
लॉकहीड एसआर-७१ ब्लॅकबर्ड, जगातला सर्वात वेगवान जेट, ताशी सुमारे २,२०० मैल
[चित्राचे श्रेय]
Boeing Company Archives
[३ पानांवरील चित्र]
राईट बंधूंचे “फ्लायर,” १९०३
[चित्राचे श्रेय]
U.S. National Archives photo