वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ३/८ पृ. २०-२२
  • गप्पागोष्टी करण्यात कोणते नुकसान आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गप्पागोष्टी करण्यात कोणते नुकसान आहे?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपण गप्पागोष्टी का करतो
  • हानीकारक गप्पागोष्टींचे धोके
  • द्वेषभावनेने केलेल्या गप्पागोष्टी थांबवणे
  • ऐकणे—गप्पागोष्टींची दुसरी बाजू
  • इतर जण माझ्याबद्दल माझ्यामागे बोलत असतील तर मी काय करू?
    तरुण लोक विचारतात
  • घातक चहाड्यांपासून स्वतःला आवरा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • घातक चहाडी कशी चिरडता येईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९९
सावध राहा!—१९९९
g99 ३/८ पृ. २०-२२

तरुण लोक विचारतात . . .

गप्पागोष्टी करण्यात कोणते नुकसान आहे?

“माझ्या हायस्कूलमध्ये तर सगळ्यांनाच हा रोग जडलाय. आमच्या शाळेत मादक औषधं घेतली जात नाहीत, कुणाकडं पिस्तुल नाही किंवा मारामारीसुद्धा होत नाही—पण गप्पागोष्टी मात्र फार चालतात. तीच मोठी समस्या आहे.”—१६ वर्षांची मिशेल.a

काहींना ते फार आवडतं. इतरांना वाटतं ते हानीकारक आहे. पत्रिका, वृत्तपत्रं आणि टीव्हीच्या कार्यक्रमांमध्ये तर सर्रास आढळतं. त्याने चर्चेची रंगतही वाढते. हे आहे तरी काय? लोकांबद्दल आणि त्यांच्या व्यक्‍तिगत जीवनाबद्दल बोलणे, दुसऱ्‍या शब्दांत गप्पागोष्टी.

“ए, माहीतेय तुम्हाला?” हे शब्द ऐकताच लोकांचे कान टवकारतात. त्यानंतरची माहिती कधी खरी असू शकते, तर कधी खोटी—किंवा खरे-खोटे दोन्हींचे मिश्रण असू शकते. काहीही असो, गप्पागोष्टी करण्याचा मोह काहीवेळा अनावर होतो. “लोकांचं काय चाललंय, कसं चाललंय याकडे लक्ष न देणे फार कठीण असतं,” असं १७ वर्षांची लॉरी म्हणते. “तुमच्यामध्ये आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये असा एक करारच असतो की, काहीतरी मसालेदार माहिती मिळाली की ती त्यांना सांगितलीच पाहिजे.”

आपण गप्पागोष्टी का करतो

गप्पागोष्टी करायला सगळेच इतके उत्सुक का असतात? एक कारण म्हणजे, मानव समाजप्रिय प्राणी आहेत. दुसऱ्‍या शब्दांत सांगायचं झाल्यास, लोकांना लोकांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. म्हणून, बोलता बोलता आपल्या मित्रमैत्रिणींचं आणि ओळखीच्या लोकांचं कसं चाललंय हा विषय आल्याशिवाय राहत नाही.

त्यात काही गैर आहे का? नेहमीच नाही. बहुतेक वेळा, असंच इकडच्या तिकडच्या बोलण्यामुळे फायदेकारक माहिती मिळते, जसे की, कोणाचं लग्न होतंय, कुणाला नुकतंच बाळ झालंय, कोण आजारी आहे वगैरे. पहिल्या शतकातले ख्रिस्ती देखील, आपल्या सहविश्‍वासूंच्या जीवनात काय काय घडत होतं त्याविषयी बोलत होते. (इफिसकर ६:२१, २२; कलस्सैकर ४:८, ९) आपल्या मित्रमैत्रिणींविषयी आणि ओळखीच्या लोकांविषयी बोलणे हा संवादाचा आणि स्वास्थ्यकारी नातेसंबंध टिकवण्याचा अविभाज्य भाग आहे.

हानीकारक गप्पागोष्टींचे धोके

परंतु, काहीवेळा इतरांबद्दल चिंता असते म्हणून त्यांच्या जीवनात घडत असलेल्या गोष्टींविषयी चर्चा होत नसते. उदाहरणार्थ, १८ वर्षांची डीएड्रा म्हणते: “लोकप्रियता मिळवण्यासाठी गप्पागोष्टी केल्या जातात. त्यांना असं वाटतं की, त्यांनी ऐकलेल्या गोष्टीला तिखट मीठ लावून सांगितलं तर लोक त्यांना [पसंत] करतील.” इतरांना प्रभावित करण्याची इच्छा असल्यामुळे गप्पागोष्टी करणारी व्यक्‍ती कदाचित खोटीनाटी माहितीपण सांगेल. १७ वर्षांची रेचेल म्हणते, “तुम्हाला खरी हकिगत ठाऊक असली, की मग ती पेश कशी करायची हे तुमच्या हातात असतं. जणू तुमच्याजवळ कच्चा माल असतो आणि तुम्ही वाटेल तसा मसाला त्यात घालू शकता.”

काहीवेळा, एखाद्याची परतफेड करायला खोट्या गप्पागोष्टी केल्या जातात. “मी एकदा माझ्या मैत्रिणीविषयी एक खोटी अफवा पसरवली,” असं १२ वर्षांची ॲमी म्हणते. “माझ्याबद्दल ती काहीतरी बोलली होती म्हणून मी असं केलं होतं.” त्याचा परिणाम? “सुरवातीला मला वाटलं, मी तिला चांगला धडा शिकवला.” पण ॲमी पुढे म्हणते: “ते पुढं वाढतच गेलं, मलाच फार मनःस्ताप होऊ लागला आणि सुरवातीलाच मी तोंड बंद ठेवलं असतं तर बरं झालं असतं असं मला वाटू लागलं.”

खरंच, गप्पागोष्टी अगदी सहजपणे हाताबाहेर जाऊ शकतात; म्हणून एक मनोरोग तज्ज्ञ म्हणतात की गप्पागोष्टी, “पाहता पाहता नियंत्रणाबाहेर जाणारी आग” आहे. (पडताळा याकोब ३:५, ६.) हे घडतं तेव्हा त्याचे परिणाम फार हानीकारक असू शकतात. उदाहरणासाठी, एखादी गुप्त माहिती फुटली तर? किंवा अफवा खोटी असली आणि ती पसरवल्यामुळे कोणाचं नाव खराब होत असेल तर? “मी मादक औषधं घेत नसताना मी मादक औषधं घेतो अशी अफवा माझ्या एका मित्राने पसरवली,” असं १२ वर्षांचा बिल म्हणतो. “माझ्या मनाला ते फार लागलं.”

द्वेषभावनेने केलेल्या गप्पागोष्टी थांबवणे

“जिव्हेच्या हाती मृत्यु व जीवन ही आहेत,” असे बायबल उचितपणे म्हणते. (नीतिसूत्रे १८:२१) होय, आपले शब्द उभारणी करणाऱ्‍या साधनांप्रमाणे असू शकतात किंवा विनाश घडवणाऱ्‍या हत्यारांप्रमाणे असू शकतात. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, आज पुष्कळजण विनाश घडवण्यासाठीच आपल्या जिभेचा उपयोग करतात. स्तोत्रकर्त्या दावीदाने वर्णिल्याप्रमाणे ज्यांनी “आपली जीभ तरवारीसारखी पाजळली आहे; सात्विकाला एकांतात मारावे म्हणून [ज्यांनी] तीरासारखा आपल्या कटु शब्दांचा नेम धरिला आहे” त्यांच्यासारखे ते आहेत.—स्तोत्र ६४:२-४.

देवाला संतुष्ट करू इच्छिणाऱ्‍या लोकांनी इतरांविषयी खोटी माहिती पसरवू नये, कारण “असत्य वाणी परमेश्‍वराला वीट आणिते” असं बायबल म्हणतं. (नीतिसूत्रे १२:२२) एखादी अफवा खोटी आहे हे ठाऊक असतानाही मुद्दामहून ती सुरू करणे किंवा पसरवणे खोटे बोलण्यासारखे आहे आणि बायबल म्हणते की, ख्रिश्‍चनांनी “लबाडी सोडून देऊन . . . आपआपल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे” बोलावे.—इफिसकर ४:२५.

म्हणून दुसऱ्‍या कोणा व्यक्‍तीबद्दल काही बोलण्याआधी स्वतःलाच विचारा: ‘मला खरी हकिगत ठाऊक आहे का? माझं बोलणं ऐकून मी जिच्याविषयी बोलत आहे ती समोरच्या व्यक्‍तीच्या मनातून उतरेल का? तसं असल्यास, माझा हेतू काय आहे?’ लक्षात ठेवा: एखादी माहिती खरी आहे याचा अर्थ ती पसरवता येते असं नाही—विशेषतः अशा माहितीने कोणा व्यक्‍तीचा नावलौकिक खराब होणार असल्यास.

आणखी असा प्रश्‍न स्वतःस विचारावा, ‘अशा गप्पागोष्टी करण्यामुळं माझ्या प्रतिमेवर त्याचा काय परिणाम होईल?’ होय, आपण गप्पागोष्टी करतो तेव्हा आपण स्वतःबद्दल काहीतरी सांगत असतो. उदाहरणार्थ, ख्रिस्टन म्हणते: “दुसऱ्‍याविषयी बोलायला तुमच्याकडे इतका वेळ असतो म्हणजे तुमचं स्वतःचं जीवन काही खास नसावं.” लिसा गप्पागोष्टी करायची म्हणून तिच्या जवळच्याच मैत्रिणीने तिच्यावर भरवसा ठेवायला नकार दिला. “ते इतक्या थराला गेलं की तिला माझ्यावरच विश्‍वास राहिला नाही,” ती म्हणते. “फार विचित्र स्थिती होती—मला हे सिद्ध करून दाखवावं लागलं की ती माझ्यावर विश्‍वास ठेवू शकते.”

गप्पागोष्टी करणारे म्हणून तुम्हाला ओळखलं जात असेल, तर तुम्हीपण इतरांना धोका देऊ शकता असं लोक समजू लागतील आणि ते तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील. बायबलमधील एक नीतिसूत्र म्हणते: “जो चहाडी करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करितो, म्हणून बडबड करणाऱ्‍याची संगत धरू नको.” (नीतिसूत्रे २०:१९) पण, एक शब्दही न बोलता तुम्ही हानीकारक गप्पागोष्टीत भर घालू शकता हे तुम्हाला ठाऊक होतं का?

ऐकणे—गप्पागोष्टींची दुसरी बाजू

गप्पागोष्टी करायला कमीत कमी दोन व्यक्‍ती लागतात—एक गप्पागोष्टी करणारी आणि दुसरी ऐकणारी. ऐकणारी व्यक्‍ती इतकी काही दोषी वाटत नसली, तरी बायबलमध्ये वेगळाच दृष्टिकोन दिला आहे. नीतिसूत्रे १७:४ येथे आपल्याला असं वाचायला मिळतं: “दुष्कर्मी मनुष्य दुष्ट वाणी लक्ष देऊन ऐकतो. लबाड मनुष्य उपद्रवी जिव्हेला कान देतो.” म्हणून गप्पागोष्टी ऐकणाऱ्‍यावर मोठी जबाबदारी येते. “काही वेळा गप्पागोष्टी करण्यापेक्षा ऐकणं जास्त वाईट असतं,” असं लेखक स्टीफन एम. वायलन म्हणतात. ते का? “ऐकण्याची उत्सुकता आहे हे दाखवल्याने बोलणाऱ्‍याला जास्तच प्रोत्साहन मिळतं,” असे वायलन पुढे म्हणाले.

हानीकारक गप्पागोष्टी तुमच्यापर्यंत पोचतात तेव्हा तुम्ही काय करावं? फारच सात्विक आहोत असं न दाखवता, तुम्ही फक्‍त असं म्हणू शकता: ‘आपण विषय बदलू या,’ किंवा ‘असं बोललेलं बरं नाही असं मला वाटतं. नाहीतरी, आपली बाजू मांडायला ती इथं नाहीय.’

तुम्ही लोकांच्या गप्पागोष्टींमध्ये भाग घ्यायला नकार देता म्हणून लोक तुमच्यापासून दूर राहू लागले तर? एका अर्थाने यामुळे तुमचेच संरक्षण होईल. ते कसे? लक्षात ठेवा की, जी व्यक्‍ती इतरांविषयी तुमच्याजवळ बोलते ती बहुतेक तुमच्याविषयीही इतरांजवळ बोलत असावी. म्हणून, बोलण्याने कोणाची चिरफाड करणाऱ्‍या तरुणांसोबत आणि प्रौढांसोबत संगती न ठेवल्याने उलट तुमच्या डोक्याचा त्रास वाचेल. वायलन म्हणतात: “गप्पागोष्टी न करण्यामुळे तुम्ही काही गमावले असेल तर ते एवढेच की, तुम्ही स्वतःच्या डोक्याला ताप करून घेतला नसेल. पण शेवटी तुमचाच फायदा झालेला असेल कारण भरवशालायक व्यक्‍ती म्हणून तुम्ही नाव कमावलं असेल.”

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देवासमोर तुम्ही चांगलं नाव कमवाल. आपण इतरांविषयी कसं बोलतो त्याकडे त्याचं लक्ष असतं कारण येशू ख्रिस्तानं असा इशारा दिला: “माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील.”—मत्तय १२:३६, ३७.

म्हणून प्रेषित पौलाचा हा सल्ला पाळणे सुज्ञतेचा मार्ग आहे: “शांतपणे आयुष्य कंठण्याचे ध्येय ठेवा, आपण भले की आपले काम भले.” (१ थेस्सलनीकाकर ४:११, १२, मराठी कॉमन लँग्वेज) असे केल्याने, इतरांसोबत तुमचे चांगले नातेसंबंध राहतील आणि देवासमोर उत्तम नाव राहील.

[तळटीपा]

a या लेखातील काही नावे बदलण्यात आली आहेत.

[२२ पानांवरील चौकट]

“गप्पागोष्टी पसरवणारे जगातले सर्वात प्रगत साधन”

तुम्ही ऐकलं का? इलेक्ट्रॉनिक मेल किंवा इ-मेलचा शोध लागल्यापासून गप्पागोष्टींनी आता उच्च तंत्रज्ञानात प्रवेश केला आहे. लेखक सेथ गॉडन, इ-मेलला “गप्पागोष्टी पसरवणारे जगातले सर्वात प्रगत साधन” असे म्हणते. त्याचे फायदे कबूल करत ते असाही इशारा देतात: “कोणीतरी एखादी खरी किंवा खोटी गोष्ट सांगतं आणि मग हजारो लोकांपर्यंत ते गुपित पोहंचण्याची शक्यता असते.”

इ-मेल खूप लोकांपर्यंत पोचू शकतं—तेही लगेचच. गॉडन म्हणतात: “हा दळणवळणाचा पहिलाच प्रकार आहे की ज्याला लिखित संदेशाइतके महत्त्व आणि काळजीपूर्वक विचार तसेच फोनची गती आणि तत्काळ लक्ष वेधण्याचे सामर्थ्य हे सर्वकाही प्राप्त झाले आहे.” म्हणून, इ-मेल पाठवताना तुमच्या संदेशाचा हेतू स्पष्ट करण्याची खात्री करणे सुज्ञतेचे आहे. शिवाय, ज्या माहितीविषयी तुम्हाला खात्री नाही तशी माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवू नका.

[२१ पानांवरील चित्रं]

जी व्यक्‍ती इतरांविषयी तुमच्याजवळ बोलते . . . ती बहुतेक तुमच्याविषयीही इतरांजवळ बोलत असावी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा