वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ३/८ पृ. १६-१९
  • आपण घातलेल्या कपड्यांमुळे—काही फरक पडतो का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण घातलेल्या कपड्यांमुळे—काही फरक पडतो का?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • फॅशन्स काय सांगतात?
  • कसली ही फॅशन?
  • आत्मप्रतिमेचे एवढे कौतुक कशासाठी?
  • माझा पेहराव उचित आहे का?
  • “मर्यादेने” पेहराव करा
  • यहोवाच्या नावाचा गौरव होईल असा तुमचा पेहराव आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • माझे कपडे माझे खरे रूप प्रकट करतात का?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • तुम्हाला कपड्यांविषयी काय वाटते?
    सावध राहा! माहितीपत्रक ८-२ (gbr8-2)
  • आपल्या पेहरावाकडे लक्ष देणं महत्त्वाचं का आहे?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ३/८ पृ. १६-१९

आपण घातलेल्या कपड्यांमुळे—काही फरक पडतो का?

“काय घालावे, काही सुचत नाही!” ही तक्रार बऱ्‍याचदा तुमच्याही कानावर पडली असेलच. अर्थात, आजकालचे फॅशन महाल आपल्या लेटेस्ट कलाकृती घेऊन अगदी सुसज्ज आहेत म्हणा तुम्हाला मदत करायला, आणि कधी तर आणखीनच बुचकळ्यात पाडायला.

“काय घालावे” हा निर्णय अधिकच कठीण होऊन बसलाय, अलीकडच्या नव्या फॅशन ट्रेंडमुळे. कपडे घालून नीटनेटके दिसण्याऐवजी होईल तितके गबाळग्रंथी दिसण्याची अलीकडे फॅशन आहे; म्हणजे इंग्रजीत “ड्रेस अप” होण्याऐवजी “ड्रेस डाऊन” होणे. ९० च्या दशकाच्या या उलट्या फॅशनबद्दल एका फॅशन पत्रिकेच्या संपादकीय लेखात असे म्हटले होते: “जीर्ण, जुनाट, झिजलेला, गांजलेला ‘लुक’ अलीकडे चालण्यासारखाच नव्हे, तर हवाहवासा आहे; तेव्हा काळजीचे कारण नाही.”

अतिशय परिणामकारक जाहीराती, टीव्ही वर झळकणारे आणि आदर्श वाटणारे मॉडेल्स, मित्रमंडळी, लोकांवर चांगली छाप पाडण्याची आणि आपला वेगळेपणा दाखवण्याची धडपड; या आणि अशा अनेक गोष्टींच्या मिश्र प्रभावात येऊन मागच्या काही वर्षांत लोक आपल्या कपड्यांची निवड करू लागले आहेत, विशेषतः तरुण लोक. फॅशनच्या बाबतीत आपणही कोणाहून मागे नाही हे दाखवायला त्यांच्यापैकी काही तर चक्क चोऱ्‍या करायलाही तयार असतात.

चालू दशकातल्या बऱ्‍याच लोकप्रिय स्टाईल्स गत दशकांतल्या अग्रवर्ती सामाजिक गटांतून जन्माला आल्या आहेत; उदाहरणार्थ पाश्‍चात्त्य देशांत १९६० च्या दशकात सुरू झालेली हिप्पींची चळवळ. वीतभर वाढलेल्या दाढ्या, पिंजारलेले केस आणि चुरगळलेमारगळले कपडे यांतून त्यांनी रुढिगत नीतीमूल्यांबद्दल आपला रोष व्यक्‍त केला. पण या विद्रोही पेहरावपद्धतीमुळे एक नवी फॅशनपद्धती जन्माला आली; समवयस्कांना एकमेकांवर दबाव आणण्याचे एक नवे निमित्त मिळाले.

आजकाल कपडे एखाद्या व्यक्‍तीची ओळख करून देणारे सर्वसामान्य आणि अतिशय बोलके माध्यम बनले आहे. विशेषतः टी-शट्‌र्स तर जणू जाहीरात फलकांचे काम करू लागले आहेत; स्पोट्‌र्स, चॅम्पियन्सची चित्रे, वात्रट विनोद, बेपर्वा, आक्रमक वृत्ती, नैतिकता किंवा अनैतिकता सर्वकाही या टी-शट्‌र्सवरून दाखवता येते, शिवाय विकाऊ उत्पादने देखील. काही टीशर्ट खास, पाहणाऱ्‍याला धक्का बसेल यासाठीच तयार केलेले असतात. अलीकडेच न्यूझवीक पत्रिकेत “क्रूरता, तरुणांचा नवा फॅशन संदेश,” या शीर्षकाखाली एक लेख प्रकाशित झाला. सदर लेखात, एक २१ वर्षीय तरुण आपल्या टी-शर्ट विषयी सांगताना बघा काय म्हणतो: “मी हा टी-शर्ट घालतो ते लोकांना मी कोणत्या मनस्थितीत आहे हे सांगण्यासाठी. आपल्याला कोणाची दादागिरी अजिबात सहन होत नाही, तेव्हा कोणी माझ्या वाटेला न आलेलंच बरं.”

जो तो आपल्या आवडीप्रमाणे छातीवर आणि पाठीवर काही न काही संदेश किंवा चित्र मिरवत असतो. पण त्या सर्वात एक समान धागा आढळतो—एखाद्या विशिष्ट गटासोबत त्यांची संलग्नता आणि बंडखोर किंवा अतिशय स्वार्थी, बेपर्वा आणि हिंसक वृत्तीला त्यांची मान्यता. एक डिझायनर तर कपड्यांवर बंदुकीने लहान किंवा मोठी, ग्राहकाला आवडतील त्या आकाराची, छिद्रं करून देतो. तो सांगतो, “हॅन्डगन, रायफल, मशीनगन, हव्या त्या बंदुकीने आम्ही कपड्यांवर छिद्रं पाडून देतो. नवी फॅशन आहे.”

फॅशन्स काय सांगतात?

ऑस्ट्रेलियात सिडनी येथे असणाऱ्‍या पावरहाउस म्यूझियममध्ये फॅशन व्यवस्थापक असणाऱ्‍या जेन द टेलीगा यांच्या मते, “समाजातल्या कोणत्या विशिष्ट वर्गात तुम्ही मोडता हे तुमच्या कपड्यांवरून सांगता येते.” त्या पुढे सांगतात, “तुमच्या पसंतीनुसार एखादा विशिष्ट वर्ग निवडून त्यानुसार तुम्ही पेहराव करू शकता.” सिडनी युनिव्हर्सिटीत सायकॉलॉजी विषयाच्या लेक्चरर डॉ. डायना केनी यांनी सांगितले की एखाद्या व्यक्‍तीचे वर्गीकरण जसे त्याचा धर्म, आर्थिक सुबत्ता, नोकरीपेशा, जात, शैक्षणिक पात्रता आणि राहता परिसर यांच्या आधारावर केले जाऊ शकते तसेच त्याच्या कपड्यांवरूनही तो कोणत्या वर्गातला आहे हे ठरवता येते. जेट मासिकात, अमेरिकेतल्या फक्‍त गोऱ्‍या मुलांसाठी असलेल्या एका शाळेत जातीय कारणांवरून उद्‌भवलेल्या तणावप्रसंगाचे वृत्त प्रकाशित झाले; हा तणावप्रसंग का म्हणून उद्‌भवला होता, तर “काही गोऱ्‍या मुली खास काळ्या लोकांसारखा पेहराव, म्हणजे वेण्या, ढगळ बॅगी कपडे आणि इतर ‘हिप-हॉप’ फॅशन मुद्दामहून करून आल्यामुळे.”

संगीतविश्‍वातही काही विशिष्ट गटाची ओळख करून देणाऱ्‍या फॅशनपद्धती आढळतात; मॅक्लीन्स मासिकात सांगितल्यानुसार, “ज्या प्रकारचे संगीत त्या प्रकारचेच कपडे घातले जातात: रेगे संगिताचे शौकीन जमैका देशातल्या लोकांसारखे भडक रंग आणि कॅप्स घालतात, तर ग्रंज रॉक संगीताचे फॅन्स, स्कीइंग करणाऱ्‍यांसारख्या लोकरी टोप्या आणि पट्ट्यापट्ट्यांचे शट्‌र्स.” कपड्यांचा प्रकार कोणताही असो, पण ग्रंजच्या नावाखाली कसेतरी अंगावर कपडे चढवून, गचाळ, दीनदरिद्री दिसण्यासाठीही भरमसाट पैसे मोजावे लागतात.

कसली ही फॅशन?

वूडी हॉक्सवेंडर यांच्या मते, “एखादा माणूस विचार करेल त्याच्या अगदी उलट आजकालच्या फॅशन्स असतात. एकेकाळी पुरुषांच्या पेहरावाची एक ठरलेली फॅशनसंहिता होती, आज मात्र गबाळग्रंथ्यांचा जमाना आहे . . . कपडे कसे, काट्याच्या टोकाने उचलून माणसावर फेकले आहेत असे दिसले पाहिजेत; ही आहे आजची फॅशनसंहिता.” पण काही विशिष्ट ठिकाणी असे कपडे घातल्यामुळे बेपर्वा वृत्ती दिसून येण्याची शक्यता आहे. असला पेहराव करणाऱ्‍या व्यक्‍तीला स्वतःविषयी आणि इतरांविषयी सन्मान नाही असेही वाटण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांविषयी काय वाटते या विषयावर पर्सेप्शुअल ॲन्ड मोटर स्किल्स नावाच्या पत्रिकेत प्रकाशित झालेल्या एका लेखात म्हटले होते, की “जीन्स घालणारा टीचर म्हणजे वर्गात मजाच मजा; पण एक मात्र आहे, या टीचरच्या शब्दाला मान नसतो; सहसा अशा टीचरबद्दल विद्यार्थ्यांनी असेच मत व्यक्‍त केले की त्याला काही येत जात नाही.” जीन्स घालून येणाऱ्‍या शिक्षिकेविषयी सदर लेखात असे म्हटले होते, की “ती खेळकर असते, विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने बोलते; तिला फारसे ज्ञान नसते आणि फार कमी मुले तिचा आदर करतात, ती शिक्षिकेसारखी दिसतच नाही, पण सहसा मुलांना अशीच शिक्षिका हवी असते.”

बिझनेसच्या वर्तुळातही एक नवी फॅशनपद्धती जन्माला आली आहे: पावर ड्रेसिंग, अर्थात, लोकांवर छाप पडेल असा पेहराव करण्याची. अलीकडे स्त्रिया देखील व्यवसायात अतिशय महत्त्वाकांक्षी झाल्या आहेत. एका प्रकाशन संस्थेत एक्झेकिटिव्ह पदावर असणारी मारी काय म्हणते पाहा: “मी समोरच्या माणसाला काबीज करण्याच्या हेतूने पेहराव करते. मला चारचौघांत उठून दिसायला आवडतं. माझ्याकडे पाहून ‘क्या कमाल की चीज है,’ असे लोकांना वाटले पाहिजे.” आपण किती आत्मकेंद्री आहो, हे मारीने अगदी प्रामाणिकपणे कबूल केले.

लोकप्रिय फॅशन्सचा ओघाओघाने चर्चेसमध्ये सुद्धा शिरकाव झाला आहे. काही फॅशनचे गुलाम चर्चला आपले अत्याधुनिक कपडे मिरवण्याचे ठिकाण समजतात. पाळक पूर्वीसारखेच लांब झगे घालतात, पण व्यासपिठावरून खाली पाहतात तेव्हा त्यांना जीन्स, स्पोर्ट शूज आणि चित्रविचित्र फॅशनचे कपडे घालून आलेले त्यांचे चर्चसदस्य दिसतात.

आत्मप्रतिमेचे एवढे कौतुक कशासाठी?

आधुनिक क्रेझला अनुसरून केलेला पेहराव—विशेषतः तरुण लोकांमध्ये—मानसशास्त्रज्ञांच्या मते आत्मकेंद्रित वृत्तीचा एक प्रकार आहे; अशा पेहरावातून ती व्यक्‍ती स्वतःकडे लक्ष आकर्षित करू पाहात असते. मानसशास्त्रज्ञ या प्रकाराला “स्वतःला इतरांचा आकर्षण बिंदू बनवू पाहण्याची ॲडॉलसंटची (किशोरवयीन) क्रॉनिक टेन्डेन्सी” म्हणतात. जणू तो किंवा ती म्हणत असते: “मी तर स्वतःवर फिदा आहेच, पण मला वाटतं तुम्हीपण झाला आहात.”—अमेरिकन जर्नल ऑफ ऑर्थोसायकिॲट्री.

माणसाला नको तितके महत्त्व देऊन देवाला एकीकडे सारणाऱ्‍या तत्त्वज्ञानी घटकांनी (बऱ्‍याचदा बिझनेस जगताच्या माध्यमाने) असा विचार पुढे आणला आहे, की व्यक्‍ती, अर्थात तुम्ही सबंध विश्‍वातल्या सर्वात महत्त्वपूर्ण व्यक्‍ती आहात. पण समस्या अशी आहे, की एव्हाना अशा जवळजवळ सहा अरब ‘सर्वात महत्त्वपूर्ण’ व्यक्‍ती झाल्या आहेत. ख्रिस्ती धर्मजगतातले लाखो लोक भोगवादी प्रभावाला बळी पडले आहेत; “सगळी चैन, इथेच आणि आताच भोगायच्या” ते मागे लागले आहेत. (पडताळा २ तीमथ्य ३:१-५.) शिवाय, कुटुंब एककाचा होत चाललेला ऱ्‍हास आणि खऱ्‍या प्रेमाची उणीव यामुळे बरेच लोक, विशेषतः तरुण लोक स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी, सुरक्षितता मिळवण्यासाठी साहजिकच, वाट्टेल ते करायला तयार आहेत.

पण पेहरावासोबतच देवाला आपल्याबद्दल काय वाटते याचीही काळजी बाळगणारे साहजिकच असा विचार करतात, की पदोपदी बदलणाऱ्‍या या फॅशन्स कितपत अनुसराव्यात? आपला पेहराव उचित आहे किंवा नाही, हे कसे ठरवावे? आपल्या पेहरावावरून आपल्याकडे पाहणाऱ्‍यांना आपण अस्पष्ट किंवा अनुचित संदेश तर देत नाही?

माझा पेहराव उचित आहे का?

पेहराव हा ज्याचा त्याचा वैयक्‍तिक प्रश्‍न आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि ऐपत वेगवेगळी असते. शिवाय, प्रत्येक ठिकाणच्या, प्रत्येक देशाच्या, विशिष्ट हवामान असलेल्या प्रत्येक प्रदेशातल्या चालीरितीही वेगवेगळ्या असतात. तुमची विशिष्ट परिस्थिती कोणतीही असो, हे तत्त्व सदैव आठवणीत ठेवा: “प्रत्येक गोष्टीला समय आहे; आणि आकाशाखालती प्रत्येक गोष्टीला वेळ आहे.” (उपदेशक ३:१, पं.र.भा.) दुसऱ्‍या शब्दांत, प्रसंगाला शोभेल असा पेहराव करा. दुसरे म्हणजे, ‘देवासमागमे राहून नम्रभावाने [शालीनतेने]’ चाला.—मीखा ६:८.

अर्थात डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत अंग झाकलेले असले पाहिजे असे सांगण्याचे तात्पर्य नाही; एवढेच, की पेहराव “स्वतःस साजेल असा,” आणि “मर्यादेने” केला जावा. (१ तीमथ्य २:९, १०) पेहराव करताना आत्मसंयम बाळगणे आवश्‍यक आहे; वर्किंग विमेन ही पत्रिका याचा संबंध सदभिरुची आणि सौंदर्याशी असल्याचे सांगते. यासाठी एक साधा नियम लक्षात ठेवावा, एखाद्या खोलीत शिरताच तुमच्याकडे लक्ष जाण्याआधी तुमच्या कपड्यांकडे लक्ष जाईल आणि लोकांना खटकेल असा पेहराव कधीही करू नका. वर्किंग विमेन पत्रिकेच्या भाषेत: “तुमच्या कपड्यांच्या पलिकडे, तुमच्या व्यक्‍तिमत्त्वातले सद्‌गुण लोकांना दिसून येतील . . . असा पेहराव करावा.”

पर्सेप्शुअल ॲन्ड मोटर स्किल्स या मासिकात म्हटले होते: “कपड्यांमुळे इतरांवर पडणारी छाप आणि शब्दांवाचून दिले जाणारे संकेत यांविषयी परीक्षण करणाऱ्‍या काही निवडक पुस्तकांच्या आधारावर हेच दिसून आले, की पहिल्या भेटींत इतरांविषयी जे मत बनवले जाते ते बऱ्‍याच अंशी त्यांनी घातलेल्या कपड्यांवर अवलंबून असते.” यासंदर्भात, आपल्या पेहरावाने सहजासहजी लोकांना आकर्षित करण्याची पूर्वी ख्याती असलेली चाळीशीतली एक स्त्री म्हणते: “[माझ्या पेहरावामुळे] मला बऱ्‍याच समस्यांना तोंड द्यावे लागले कारण लोक व्यावसायिक पातळीवर सोडून माझ्यासोबत खासगी वैयक्‍तिक पातळीवर संबंध जोडण्याचा प्रयत्न करू लागायचे. बिझनेसमुळे माझ्या संपर्कात येणारे पुरुष सहसा मला डिनरला न्यायला उत्सुक असायचे.” आणखी एका वेगळ्या प्रकारच्या स्टाईलविषयी एक महिला अकाउन्टंट सांगते: “पेहरावाकडे फारसे लक्ष न देणाऱ्‍या किंवा अगदी पुरुषी पेहराव करणाऱ्‍या स्त्रियांना पुरुष कसे वागवतात हे मी जवळून पाहिले आहे. अशा स्त्रियांना सहसा आक्रमक, स्पर्धक वृत्तीचे समजले जाते, आणि पर्यायाने त्यांना पुरुषांकडून आणखीनच त्रास दिला जातो.”

जेफ्फी नावाच्या एका तरुणीने अलीकडची फॅड पाहून तसेच केस कापून घेतले तेव्हा तिला पाहून लोक गोंधळात पडले. ती सांगते, “काहीतरी ‘वेगळं’ दिसतं म्हणून मी तसे केस कापले; पण लोक मला विचारू लागले, की ‘तू खरंच यहोवाची साक्षीदार आहेस का?’ तेव्हा लाजिरवाणं व्हायचं.” जेफ्फीला आत्मपरीक्षण करावे लागले. ‘अंतःकरणात जे भरून असते,’ ते केवळ आपल्या तोंडावाटेच नव्हे तर आपल्या पेहराव श्रृंगारातूनही व्यक्‍त होते हेच खरे, नाही का? (मत्तय १२:३४) तुमच्या पेहरावावरून—तुमच्या अंतकरणात निर्माणकर्त्या देवाकडे लक्ष वेधण्याची इच्छा आहे असे दिसून येते, की स्वतःकडे?

“मर्यादेने” पेहराव करा

तुम्ही घातलेल्या कपड्यांचा तुमच्यावर होणारा प्रभावही लक्षात घ्या. दुसऱ्‍यांवर वचक बसवण्यासाठी केलेल्या किंवा खूपच भपकेदार पेहरावामुळे तुम्ही अतिशय आत्मकेंद्रित बनू शकता, गबाळ्या पेहरावाने स्वतःविषयी नकारात्मक विचार तुमच्या मनात मुळावू शकतात, तुमच्या आवडत्या अभिनेत्याचे किंवा खेळाडूचे चित्र असलेले टी-शर्ट घातल्यामुळे हळूहळू तुम्ही व्यक्‍तीपूजेकडे वळू शकता; ही देखील एकप्रकारची मूर्तिपूजाच आहे. तेव्हा आठवणीत ठेवा, तुमचे कपडे इतरांशी बोलत असतात—तुमच्याविषयी त्यांना सांगत असतात.

लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याच्या हेतूने अतिशय ग्लॅमरस किंवा उत्तेजक पेहराव केल्यास तो तुमच्याविषयी लोकांना काय सांगेल? ज्या अवगुणांवर तुम्ही मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याच अवगुणांना तर तुम्ही खतपाणी देत नाही? शिवाय, तुम्ही जिला आकर्षित करण्यासाठी धडपडत आहात, ती कशाप्रकारची व्यक्‍ती आहे? रोमकर १२:३ येथे दिलेला सल्ला आपल्याला आत्मकेंद्रितपणा, गर्विष्ठपणा आणि नकारात्मक विचार यांवर मात करण्यासाठी सहायक ठरेल. या वचनांत प्रेषित पौल, “आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, . . . तर परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना” असा सल्ला देतो. “मर्यादेने” वागण्याचा अर्थ विचारपूर्वक वागणे असा होतो.

विशेषतः ज्यांच्यावर भिस्त टाकली जाते, अशा जबाबदारीच्या पदावर असणाऱ्‍यांनी याकडे लक्ष द्यावे. त्यांच्या उदाहरणाचा इतरांवर मोठा प्रभाव होत असतो. ख्रिस्ती मंडळीत सेवेचे विशेषाधिकार मिळवण्यास इच्छुक असणाऱ्‍यांनी, तसेच त्यांच्या ख्रिस्ती पत्नींनी देखील पेहराव, श्रृंगाराच्या बाबतीत शालीन आणि आदरपूर्वक वृत्ती प्रदर्शित केली पाहिजे. येशू ख्रिस्ताने लग्नाच्या मेजवानीचा जो दाखला दिला होता, त्यातल्या माणसासारखे आपल्यापैकी कोणीही होता कामा नये: “राजा जेवणाऱ्‍यांना पाहावयास आत आला, तेव्हा लग्नाचा पोषाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला.” कोणतेही समजण्याजोगे कारण नसताना हा माणूस असा असभ्य पोशाख घालून आला आहे हे राजाला कळले तेव्हा “राजाने चाकरांस सांगितले, ह्‍याचे हातपाय बांधून ह्‍याला बाहेरील अंधारात टाका.”—मत्तय २२:११-१३.

आईवडिलांनी आपल्या बोलण्यातून आणि आपल्या आदर्शाकरवी मुलांना पेहरावाबाबत निकोप दृष्टिकोन आणि सदभिरुची वाढवण्यास मदत करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्या मुलाला अथवा मुलीला समजवताना कधीकधी त्यांना कठोरही व्हावे लागेल. पण आपल्या मुलांचा आणि आपला दर्जेदार पेहराव पाहून अपेक्षा केली नसताना कोणी आपली प्रशंसा करतो तेव्हा किती आनंद होतो!

खरे आहे, यहोवाच्या सेवकांना दिमाख मिरवण्याची वृत्ती, महागड्या फॅड्‌स आणि फाजील आत्मकेंद्रितपणा यांपासून मुक्‍ती मिळाली आहे. ते या जगाच्या आत्म्यानुसार नव्हे तर देवाने घालून दिलेल्या तत्त्वांनुसार चालतात. (१ करिंथकर २:१२) तुम्ही देखील या तत्त्वांचा अवलंब केल्यास, कपड्यांची निवड करणे तुम्हाला जड जाणार नाही. शिवाय, एखाद्या अप्रतिम पेंटिगसाठी विचारपूर्वक निवडलेल्या फ्रेमप्रमाणे, तुमचा पेहराव तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाला झाकाळणार नाही आणि त्याला कमीपणाही आणणार नाही. देवाचे अनुकरण करण्याचा तुम्ही जितका जास्त प्रयत्न कराल, तितक्याच अधिक प्रमाणात तुमच्या अंगी एक आध्यात्मिक सौंदर्य विकसित होईल, असे सौंदर्य जे लाखमोलाच्या भरजरी कपड्यांनी येत नाही!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा