वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ३/८ पृ. ७-९
  • एकाच खऱ्‍या देवाला ओळखा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एकाच खऱ्‍या देवाला ओळखा
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ओळख पटविणारे नाव
  • जेहोवा की याव्हे?
  • नावाने काय फरक पडतो?
  • खऱ्‍या देवाचे गुण
  • खरा देव प्रकट होईल
  • यहोवा कोण आहे?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • देवाच्या नावाचा उच्चार कसा करायचा हे निश्‍चित माहीत नाही तर मग त्याचा उपयोग का करावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • देव—तो कोण आहे?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • क४ हिब्रू शास्त्रवचनांत देवाचं नाव
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ३/८ पृ. ७-९

एकाच खऱ्‍या देवाला ओळखा

मनुष्याने आदिम काळापासूनच असंख्य देवतांची आराधना केली आहे. इतके, की त्यांची नेमकी संख्याही सांगणे कठीण आहे—ती कोटींच्या घरात जाते एवढे मात्र निश्‍चित.

देव अस्तित्वात आहे हे मानल्यानंतर पुढचा प्रश्‍न साहजिकच असा येतो की जगाच्या पाठीवर मनुष्य ज्या असंख्य देवतांची आराधना करत आला आहे आणि आजही करतो आहे, त्यांपैकी खरा देव कोणता? खरा देव एकच असून आपण त्याला ओळखू शकतो हे बायबलमध्ये योहान १७:३ या वचनात स्पष्ट सांगितले आहे: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”

ओळख पटविणारे नाव

व्यक्‍तित्व असलेल्या कोणत्याही देवाला, आपापली नावे असणाऱ्‍या इतर देवतांमध्ये वेगळे दाखवण्यासाठी स्वतःचे एक नाव असले पाहिजे हे समजण्याजोगे आहे. आणि त्या देवाच्या भक्‍तांनी त्याला दिलेल्या नावापेक्षा हे नाव त्या देवाने स्वतः प्रकट केलेले असेल, हेही अपेक्षितच आहे.

पण या संदर्भात एक अतिशय विचित्र वस्तुस्थिती उघडकीस येते. ती अशी, की अधिकांश सुस्थापित धर्मांत त्यांच्या देवतांना वैयक्‍तिक नावांनी ओळखले जात असले तरीही यहुदी धर्म आणि ख्रिस्ती धर्मजगताची प्रमुख चर्चेस यांमध्ये ज्या देवाची उपासना केली जाते त्याला कोणत्याही खास वैयक्‍तिक नावाने ओळखले जात नाही. त्याऐवजी, प्रभू, परमेश्‍वर, सर्वशक्‍तिमान आणि पिता यांसारखे पदवीसूचक शब्द वापरले जातात.

थियोलॉजी या पुस्तकात लेखक डेव्हिड क्लाइन्स यांनी खालील विधान केले: “ख्रिस्तपूर्व पाचव्या ते दुसऱ्‍या शतकाच्या काळात देवावर एक दुर्घटना ओढवली आणि त्यात तो आपले नावच गमावून बसला. स्पष्ट सांगायचे झाल्यास, यहुद्यांनी याव्हे हे देवाचे वैयक्‍तिक नाव वापरण्याचे सोडून दिले आणि त्याऐवजी ते देव, प्रभू, देवनाम, पवित्र, देवाची उपस्थिती (द प्रेझेन्स), इतकेच काय तर स्थान (द प्लेस) यांसारखे शब्दप्रयोग वापरू लागले. बायबलमध्ये काही ठिकाणी याव्हे या नावाचा त्यांनी समावेश केला तरीसुद्धा वाचताना मात्र ते अदोनाई असे वाचले जात असे. आणि जेव्हा मंदिर शेवटल्या वेळेस नष्ट झाले त्यानंतर, निदान प्रार्थनाविधींत जे दोनचार वेळा हे नाव वापरले जायचे तेही बंद झाले; इतके, की या नावाचे उच्चारण कसे करायचे याचाही लोकांना कालांतराने विसर पडला.” पण, कर्मठ यहुद्यांनी देवाच्या नामाचे उच्चारण पूर्णपणे बंद करून त्याऐवजी देव आणि सार्वभौम प्रभू या अर्थाचे हिब्रू शब्द वापरण्याचे नेमके केव्हा सुरू केले हे कोणालाही नक्की सांगता येणार नाही.

त्याअर्थी मग, “एकच खरा देव” आपल्याला ओळखायचा असेल, तर सर्वप्रथम त्याचे नाव जाणून घ्यावेच लागेल. आणि हे कठीण अजिबातच नाही कारण सर्वशक्‍तिमान देवाचे अर्थात सृष्टिकर्त्याचे नाव स्तोत्र ८३:१८ येथे अगदी स्पष्टपणे सांगितलेले आहे: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.”—पं.र.भा.

जेहोवा की याव्हे?

किंग जेम्स वर्शन आणि इतर बायबल भाषांतरांत जेहोवा हे नाव आढळते तर काहीजण मात्र जेहोवाऐवजी याव्हे असे म्हणणे अधिक पसंत करतात. यांपैकी कोणते नाव बरोबर आहे?

बायबलची सर्वात जुनी हस्तलिखिते हिब्रू भाषेत लिहिण्यात आली होती. हिब्रू शास्त्रवचनांत, देवाचे नाव जवळजवळ ७,००० वेळा आढळते; हे नाव चार व्यंजने मिळून बनले आहे—YHWH किंवा JHWH. या चार व्यंजनांच्या शब्दांना सहसा टेट्राग्रॅमटॉन किंवा टेट्राग्रॅम म्हणतात. “चार अक्षरे” या अर्थाच्या दोन ग्रीक शब्दांनी मिळून हे टेट्राग्रॅमटॉन किंवा टेट्राग्रॅम बनले आहे. अचूक उच्चार कोणता हा प्रश्‍न यासाठी उपस्थित होतो, कारण सुरवातीच्या हिब्रू लिखाणांत केवळ व्यंजन असायचे, वाचकाने कसा उच्चार करावा हे दाखवण्यासाठी शब्दांत स्वर नसायचे. त्यामुळे YHWH किंवा JHWH या शब्दांचे उच्चारण Yahweh असे करावे की Jehovah असे करावे, हे वाचक त्या चार व्यंजनांत कोणते स्वर घालतो यावर अवलंबून आहे. आज बरेच हिब्रू विद्वान Yahweh हेच खरे उच्चारण आहे असे मानतात.

सुसंगततेच्या दृष्टीने विचार केल्यास मात्र Jehovah हा उच्चारच योग्य वाटतो. का? कारण Jehovah हेच उच्चारण इंग्रजी भाषेत शतकानुशतके वापरण्यात आले आहे. शिवाय, या उच्चारणाशी सहमत नसणाऱ्‍यांनी Jeremiah आणि Jesus यांसारख्या उच्चारणांचा देखील विरोध केला पाहिजे. कारण मूळ हिब्रू उच्चारणालाच जडून राहायचे असल्यास, Jeremiah बदलून Yir·meyahʹ किंवा Yir·meyaʹhu आणि Jesus बदलून हिब्रूनुसार Ye·shu·aʹ किंवा ग्रीकनुसार I·e·sousʹ असे करावे लागेल. म्हणूनच, यहोवाच्या साक्षीदारांसहित बायबलच्या बऱ्‍याच विद्यार्थ्यांचे असे मत आहे की सुसंगततेसाठी, इंग्रजी भाषेत आधीपासूनच प्रचलित झालेला “Jehovah” आणि प्रत्येक भाषेतला याचा समतुल्य शब्द वापरणेच तर्कशुद्ध आहे.

नावाने काय फरक पडतो?

काहीजण कदाचित म्हणतील की सर्वशक्‍तिमान देवाला त्याचे वैयक्‍तिक नाव घेऊनच संबोधले पाहिजे असे काही नाही; देवाबद्दल बोलताना किंवा त्याला संबोधित करताना पिता, किंवा सरळ देवही म्हटले तरी चालण्यासारखे आहे असे त्यांना वाटते. पण ही दोन्ही संबोधने, नावे नसून पदव्या आहेत; त्या देवाची वैयक्‍तिक पातळीवर ओळख करून देत नाहीत आणि इतर देवांपासून त्याचा वेगळेपणाही दाखवून देत नाहीत. बायबल काळांत देव या अर्थाचा शब्द (हिब्रू भाषेत, एलोहिम) कोणत्याही देवतेचे वर्णन करण्यासाठी वापरला जात असे—मूर्तिपूजक पलिष्टी ज्याची उपासना करायचे त्या दागोनच्या संदर्भातही हाच शब्द वापरलेला आढळतो. (शास्ते १६:२३, २४) त्यामुळे एखाद्या हिब्रू माणसाने एखाद्या पलिष्ट्याला, निव्वळ मी ‘देवाची’ उपासना करतो असे सांगितले असते तर तो ज्याची उपासना करत होता त्या खऱ्‍या देवाबद्दल तो बोलतो आहे हे स्पष्ट झालेच नसते.

सन १८७४ च्या दि इम्पिरियल बायबल-डिक्शनरीमध्ये एक लक्षवेधक विधान आढळते: “[यहोवा] हे प्रत्येक ठिकाणी एक विशेषनाम म्हणूनच वापरले आहे, त्याअर्थी ते देवाची आणि केवळ त्याचीच, एक व्यक्‍ती म्हणून ओळख करून देते; पण दुसरीकडे पाहता एलोहिम हे एक सामान्य नाम असून ते सहसा सर्वशक्‍तिमान देवाला सूचित करते, पण नेहमीच नाही. . . . इतर सर्व खोट्या देवांपेक्षा वेगळा आहे हे दाखवण्यासाठी हिब्रू भाषेत एलोहिम किंवा खरा देव असे म्हणताना त्यापुढे निश्‍चित उपपद वापरतात, पण यहोवा म्हणताना उपपद कधीच वापरले जात नाही कारण यहोवा हे केवळ खऱ्‍या देवाचेच नाव आहे. हिब्रू भाषिक कित्येकदा माझ्या देवा असे म्हणतो . . . पण माझ्या यहोवा असे तो कधीच म्हणत नाही, कारण माझ्या देवा म्हणजेच यहोवा. तो इस्राएलाच्या देवा असे म्हणतो पण इस्राएलाच्या यहोवा असे कधीच नाही कारण दुसरा यहोवा नाहीच. तसेच तो, जिवंत देव असे तर म्हणतो पण जिवंत यहोवा असे मात्र कधीच नाही कारण यहोवा जिवंत आहे याविषयी काही प्रश्‍नच नाही.”

खऱ्‍या देवाचे गुण

एखाद्याचे फक्‍त नाव माहीत असेल तर आपल्याला त्याची किंवा तिची चांगली ओळख झाली आहे असे म्हणता येणार नाही. आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना लोकप्रिय राजकीय पुढाऱ्‍यांची नावे माहीत असतात. कधीकधी परदेशातल्या लोकप्रिय स्त्रीपुरुषांचीही नावे आपल्याला ओळखीची असतात. पण फक्‍त त्यांचे नाव—इतकेच काय, त्या नावाचे अचूक उच्चारण माहीत असूनही—आपण या लोकांना व्यक्‍तिगतपणे ओळखतो किंवा ते कशाप्रकारचे लोक आहेत हे आपल्याला माहीत आहे असे म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे, एकाच खऱ्‍या देवालाही ओळखण्यासाठी त्याचे गुण कोणते हे आपण जाणून घेतले पाहिजे, आणि त्यामुळे आपण त्याच्याकडे आकर्षित झालो पाहिजे.

खऱ्‍या देवाला कधीही कोणताही मनुष्य पाहू शकणार नाही हे खरे असले तरीसुद्धा, त्याने बायबलमध्ये आपल्या फायद्यासाठी स्वतःच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी बरेच काही सविस्तर लिहून घेतले आहे. (निर्गम ३३:२०; योहान १:१८) काही हिब्रू संदेष्ट्यांना ईश्‍वर प्रेरणेने सर्वशक्‍तिमान देवाच्या स्वर्गातील दरबाराचे दृष्टान्त दिले गेले. त्यांनी केलेले वर्णन वाचताना फक्‍त महत्ता, भयप्रेरक वैभव आणि असीम सामर्थ्य यांचेच नव्हे तर शांतता, सुव्यवस्था, सौंदर्य आणि प्रसन्‍नता यांचेही दर्शन घडते.—निर्गम २४:९-११; यशया ६:१; यहेज्केल १:२६-२८; दानीएल ७:९; प्रकटीकरण ४:१-३.

यहोवा देवाने मोशेला आपल्या काही मनमोहक आणि स्तुत्य गुणांविषयी सांगितले, जसे आपण निर्गम ३४:६, ७ येथे वाचतो: “परमेश्‍वर, परमेश्‍वर, [“यहोवा, यहोवा,” NW] दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्‍यांची क्षमा करणारा.” देवाच्या या गुणांविषयी जाणून घेतल्यामुळे तो आपल्याला आणखी प्रिय वाटू लागतो, आणि त्याच्याबद्दल, त्याच्या गुणांबद्दल आणखी जाणून घेण्याची आपली उत्सुकता वाढते असे तुम्हाला वाटत नाही का?

कोणताही मनुष्य कधीच यहोवाला त्याच्या तेजोमय गौरवात पाहू शकणार नाही हे जरी खरे असले, तरीसुद्धा बायबल सांगते की येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना तो आपल्या स्वर्गीय पित्याच्या, अर्थात यहोवा देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचे हुबेहूब प्रतिबिंब होता. एकदा येशू म्हणाला: “पुत्र पित्याला जे काही करिताना पाहतो त्यावाचून काहीहि त्याला स्वतः होऊन करिता येत नाही; कारण जे काही तो करितो ते पुत्रहि तसेच करितो.”—योहान ५:१९.

यावरून आपण समजू शकतो की येशूचा दयाळूपणा, करुणा, नम्रता आणि प्रेमळपणा, नीतिमत्तेबद्दल त्याला वाटणारे प्रेम आणि दुष्टपणाचा त्याला वाटणारा तिटकारा, हे सर्व गुण त्याने पृथ्वीवर येण्याआधी स्वर्गातील दरबारांत असताना आपला पिता, यहोवा देव याच्यात पाहिले होते. आपण जेव्हा यहोवा या नावाचा खरा अर्थ पूर्णपणे समजून घेतो, तेव्हा आपण आपोआपच त्या नावावर प्रेम करू लागतो, त्याला धन्य म्हणतो, त्याची स्तुती करतो आणि त्यावर भरवसा ठेवतो.

देवाबद्दल जाणून घेण्याची, त्याला ओळखण्याची ही प्रक्रिया कधी न संपणारी आहे; आणि हे न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स या भाषांतरात योहान १७:३ या वचनात खासकरून स्पष्ट होते. त्यात ‘ज्ञान घेणे’ या क्रियापदासाठी योग्य काळाचा वापर केल्यामुळे अगदी अचूक बोध होतो. हे क्रियापद साध्या वर्तमानकाळाऐवजी अपूर्ण वर्तमानकाळात दिले आहे. सदर वचनात आपण वाचतो: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताचे त्यांनी ज्ञान घ्यावे.” होय, एकच खरा देव, यहोवा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांविषयीचे ज्ञान घेण्याचा सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे, ही प्रक्रिया कधीच संपू नये.

खरा देव प्रकट होईल

अशाप्रकारे, एकच खरा देव हा असंख्य खोट्या देवांपेक्षा वेगळा आहे हे सहज ओळखता येते. तो पृथ्वीग्रह आणि त्यावरील मनुष्यजातीसहित सबंध विश्‍वाचा सर्वशक्‍तिमान सृष्टिकर्ता आहे. त्याचे एक अद्वितीय वैयक्‍तिक नाव आहे, यहोवा किंवा याव्हे. तो कोणत्या गूढ त्रियेक देवाचा किंवा त्रैक्याचा भाग नाही. प्रीती हा त्याचा मुख्य गुण आहे आणि आपण निर्माण केलेल्या मानवजातीचे कल्याण व्हावे असेच तो नेहमी इच्छितो. पण न्याय हा देखील त्याचा एक प्रमुख गुण आहे आणि म्हणून या पृथ्वीची नासाडी करू पाहणाऱ्‍यांना तसेच युद्ध आणि हिंसाचाराला बढावा देणाऱ्‍यांना तो फार काळ अस्तित्वात राहू देणार नाही.

देवाने पृथ्वीवरील दुष्टपणा आणि दुःख, कष्ट काढून टाकण्याचा आणि त्यानंतर सत्हृदयी लोक सर्वकाळ सुखासमाधानाने नांदू शकतील अशा एका सुंदर बगीच्यात या पृथ्वीचे रूपांतर करण्याचा आपला उद्देश असल्याचे प्रकट केले आहे. (स्तोत्र ३७:१०, ११, २९, ३४) आता सर्वशक्‍तिमान देवाने आपल्या पुत्राला, येशूला देवाच्या राज्याचा स्वर्गीय राजा म्हणून सिंहासनाधिष्ट केले आहे आणि लवकरच येशू धार्मिकतेचे एक नवे जग आणेल आणि पृथ्वीवर सुरवातीला होती तशीच सुखासमाधानाची परिस्थिती अर्थात एक परादीस पुन्हा आणेल.—दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०.

देव खरोखर अस्तित्वात आहे का? या प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी आणि खऱ्‍या देवाला ओळखण्यासाठी ही माहिती तुम्हाला सहायक ठरली असेल अशी आम्हाला आशा आहे.

[९ पानांवरील चित्र]

येशू ख्रिस्ताने यहोवाची एकच खरा देव म्हणून ओळख करून दिली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा