देव कोणता उद्देश बाळगून आहे?
सर्वशक्तिमान, प्रेमळ देवाच्या अस्तित्वाविषयी साशंक असणारे बरेच लोक असा सवाल करतात की जर देव आहे, तर मग त्याने आजपर्यंत इतके दुःख, कष्ट, इतकी अनीती का राहू दिली? ही सर्वत्र दिसणारी अंधाधुंदी का चालू दिली? लढाया, गुन्हेगारी, अन्याय, गरिबी आणि इतर असंख्य समस्या धक्कादायक गतीने देशादेशांत वाढत चालल्या असताना, त्या संपुष्टात आणण्यासाठी का तो काही करत नाही?
काहीजण असे सुचवतात की देवाने हे विश्व निर्माण केले, पृथ्वीग्रहावर मनुष्याची निर्मिती केली आणि मग सर्वकाही मनुष्याच्या हाती सोपून दिले. त्यांच्या या मताप्रमाणे, मनुष्य आपल्या स्वार्थामुळे किंवा अव्यवस्थित कारभारामुळे जी संकटे स्वतःवर ओढवून घेतो, त्यांसाठी देवाला दोष देता येणार नाही.
इतर काहीजण मात्र या मताच्या विरोधात आहेत. उदाहरणार्थ, देवावर विश्वास ठेवत असल्याचे मान्य करणारे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक कॉन्यर्झ हेरिंग म्हणतात: “देवाने हे विश्वरूपी घड्याळ निव्वळ सुरू करून दिले आणि आता मनुष्य हा सगळा गुंता सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असताना तो फक्त बसून तमाशा पाहतोय या कल्पनेच्या मी पूर्णपणे विरोधात आहे. याचे पहिले कारण म्हणजे माझ्या सबंध वैज्ञानिक जीवनात या विश्वाची अगदी परिपूर्ण आणि अचूक ‘घड्याळासारखी’ प्रतिकृती मला अद्याप आढळलेली नाही. आपल्या वैज्ञानिक सिद्धान्तांत . . . आपण सतत प्रगतीशील सुधारणा करत राहू, पण मला खात्री आहे की त्यांत उणिवा या असतीलच. तेव्हा, माझ्या मते ही सुधारणा करणे जिच्यामुळे शक्य होते, त्या जैव शक्तीवर विश्वास ठेवण्यातच अधिक तथ्य आहे.”
देव निश्चित एक उद्देश बाळगून आहे
पृथ्वीवर नीतिमान, परिपूर्ण मानवांनी राहावे असा देवाचा या पृथ्वीसाठी मूळ उद्देश होता. भविष्यवक्ता यशयाच्या शब्दांत: “आकाशाचा उत्पन्नकर्ता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच; त्याने तिची स्थापना केली; त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली.”—यशया ४५:१८.
एकाच वेळेस मनुष्यांची स्वतःहून सृष्टी करून ही पृथ्वी भरून टाकण्याऐवजी, देवाचा उद्देश असा होता की मनुष्यांनी प्रजोत्पादनाने पृथ्वीची लोकसंख्या वाढवावी. आदाम आणि हव्वा देवाच्या विरोधात गेल्यामुळे त्याचा मूळचा उद्देश निष्फळ ठरला नाही; पण मनुष्याच्या आणि पृथ्वीच्या संबंधाने असलेला त्याचा उद्देश पूर्ण होण्यासाठी काही गोष्टींमध्ये फेरबदल करणे मात्र आवश्यक बनले.
जवळजवळ ६,००० वर्षे देवाने मानवजातीला थेटपणे कोणतेही मार्गदर्शन न करता, स्वतःहून पृथ्वीचा कारभार चालवू दिला आहे. मानवजातीच्या पहिल्या आईवडिलांनी आपल्या इच्छा स्वातंत्र्याच्या बळावर स्वतःहून हा मार्ग निवडला. (उत्पत्ति ३:१७-१९; अनुवाद ३२:४, ५) देवाच्या मार्गदर्शनापासून स्वातंत्र्य मिळाल्यावर, देवाऐवजी मनुष्य राज्य करू लागला. मनुष्याला स्वतःसाठी योग्य मार्ग निवडणे आणि सहमानवांवर यशस्वीरित्या शासन चालवणे अशक्य कोटीतले आहे हे यातून पुढेमागे कधीतरी उघडकीस येणारच होते.
अर्थात, परिणाम हाच होणार आहे हे यहोवाला आधीच माहीत होते. आणि त्याने हे बायबलच्या लेखकांकडून लिहूनही घेतले. उदाहरणार्थ, भविष्यवक्ता यिर्मया याने लिहिले: “हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्मया १०:२३.
बुद्धिमान शलमोनाने देखील सांगितले होते की शतकानुशतके चालत आल्याप्रमाणे, माणूस माणसावर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा परिणाम हे नेहमी अनर्थकारीच असतात. “हे सर्व मी पाहिले आहे; भूतलावर चालू असलेल्या सर्व कृत्यांकडे मी आपले चित्त लाविले आहे; एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.”—उपदेशक ८:९.
पण “मनुष्य हा सगळा गुंता सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असताना [देव] फक्त बसून तमाशा पाहतोय,” हे मुळीच खरे नाही. उलट अधिकांश मानवांच्या जीवनात कोणताही थेट हस्तक्षेप न करता ही हजारो वर्षे जाऊ देण्यामागे सर्वशक्तिमान देवाजवळ निश्चितच एक खास कारण आहे.
एक सुउद्देश साध्य झाला
आपल्या जास्तीतजास्त १०० वर्षांच्या आयुष्याच्या मानाने मनुष्याच्या इतिहासाची गेली ६,००० वर्षे अतिशय मोठा कालावधी वाटतो. पण देवाच्या वेळापत्रकानुसार आणि समय, काळ यांविषयी त्याच्या दृष्टिकोनानुसार ही हजार वर्षे निव्वळ सहा दिवसांइतकी आहेत—एक पूर्ण आठवडाही नाही! प्रेषित पेत्राने यासंबंधी खुलासा केला: “प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत.”—२ पेत्र ३:८.
देवावर बेपर्वाईचा किंवा दिरंगाईचा दोष लावणाऱ्यांचे म्हणणे खोडून काढताना पेत्र पुढे म्हणतो: “कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.”—२ पेत्र ३:९.
त्याअर्थी, ठराविक वर्षे पूर्ण झाल्यानंतर सृष्टिकर्ता देव या सर्वांगसुंदर पृथ्वीग्रहावर मनुष्याने माजवलेली अंधाधुंदी संपुष्टात आणेल. तोपर्यंत, शासन चालवणे किंवा लढाया, हिंसाचार, गरिबी, रोगराई आणि इतर विपत्ती काढून टाकणे मनुष्याला पूर्णपणे अशक्य आहे हे सिद्ध होण्यासाठी पर्याप्त कालावधी गेलेला असेल. आणि देवाने मनुष्याला सुरवातीलाच जे सांगितले होते ते अगदी प्रत्ययानिशी सिद्ध झालेले असेल—की मनुष्याला यश मिळवायचे असेल तर देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करणे अनिवार्य आहे.—उत्पत्ति २:१५-१७.
बायबलच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेकडे बघता, आपण सध्या या अधार्मिक जगाच्या ‘शेवटल्या काळाच्या’ अंतिम चरणात आहोत. (२ तीमथ्य ३:१-५, १३; मत्तय २४:३-१४) देवाने आजवर चालू दिलेल्या मनुष्याच्या स्वतंत्र शासनाचा, तसेच अनीती आणि दुःख यांचाही अंत आता जवळ आला आहे. (दानीएल २:४४) लवकरच, या जगाने कधीही पाहिले नसेल असे मोठे संकट आपल्यावर कोसळेल; ‘देवाच्या मोठ्या दिवसाची लढाई,’ अर्थात हर्मगिदोन यात त्याचा शेवट होईल. (प्रकटीकरण १६:१४, १६) देवाच्या निर्देशनाखाली लढल्या जाणाऱ्या या लढाईत देवाने स्वतः निर्माण केलेली ही पृथ्वी नष्ट होणार नाही, पण “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश” होईल.—प्रकटीकरण ११:१८.
हजार वर्षांचे देवाचे राज्य
हर्मगिदोन होऊन गेल्यानंतर पृथ्वीवर लाखो लोक जिवंत असतील. (प्रकटीकरण ७:९-१४) तेव्हा नीतिसूत्रे २:२१, २२ येथे करण्यात आलेली भविष्यवाणी पूर्ण झालेली असेल: “सरळ जनच देशांत वस्ती करितील; सात्विक जन त्यांत राहतील. दुर्जनांचा देशांतून उच्छेद होईल, अनाचाऱ्यांचे त्यांतून निर्मूलन होईल.”
देवाच्या उद्देशानुसार हर्मगिदोनाच्या नीतिमान युद्धानंतर हजार वर्षांचा एक खास काळ सुरू होईल. (प्रकटीकरण २०:१-३) या हजार वर्षांदरम्यान देवाचा पुत्र, ख्रिस्त येशू हा देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा या नात्याने राज्य करील. (मत्तय ६:१०) पृथ्वीवर या आनंदी राज्याच्या काळात कोट्यवधी मृतजन आपल्या मृतावस्थेतून जणू झोपेतून जागे झाल्यासारखे पुनरुत्थित होतील आणि हर्मगिदोनातून बचावलेल्या लाखो लोकांसोबत राहू लागतील. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) त्या सर्वांना परिपूर्णावस्थेत आणले जाईल आणि मग—ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राज्याच्या शेवटी—ही पृथ्वी परिपूर्ण स्त्रीपुरुषांनी व्यापून जाईल, जे सर्व आदाम आणि हव्वेचेच वंशज असतील. देवाच्या उद्देशाची अद्भुत आणि यशस्वी पूर्णता झालेली असेल.
“[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला: ‘पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो.’” (प्रकटीकरण २१:४, ५) हाच देवाचा उद्देश आहे. आणि अतिशय निकटच्या भविष्यात हा त्याचा उद्देश खात्रीने पूर्ण होणार आहे.—यशया १४:२४, २७.
[५ पानांवरील चित्र]
देवाच्या नव्या जगात, लोक सर्वकाळ सुखाने नांदतील