तरुण लोक विचारतात . . .
आईबाबांशिवाय माझं कसं होणार?
“आईबाबांचा घटस्फोट झाला तेव्हा मी केवळ तीन वर्षांचा होतो आणि माझी बहीण चार वर्षांची. आम्हा मुलांचा ताबा मिळावा म्हणून दोघांनी कोर्टात दावा केला; शेवटी, आम्हाला आईकडे जावं लागलं. पण, मी सात वर्षांचा झालो तेव्हा मी आणि माझी बहीण बाबांकडे राहायला गेलो.”—ओरास्यो.
काही वर्षांनंतर मात्र ओरास्योचे वडील आणि त्यांच्यासोबत राहणारी त्यांची गर्लफ्रेंड ओरास्योला आणि त्याच्या बहिणीला टाकून चक्क निघून गेले. ओरास्यो म्हणतो: “अशाप्रकारे वयाच्या केवळ १८ व्या वर्षी माझ्या खांद्यावर एका कुटुंबाची जबाबदारी आली; या कुटुंबात माझ्याखेरीज होती माझी १९ वर्षांची बहीण आणि १२ वर्षांची सावत्र बहीण जिने आमच्यासोबतच राहायचं ठरवलं होतं.”
आधीच्या एका लेखात सांगितल्याप्रमाणे जगभरात असे लाखो युवक आहेत ज्यांच्यावर आईवडिलांची सावली नाही.a ओरास्योप्रमाणे काही युवकांना त्यांच्याच पालकांनी वाऱ्यावर सोडले आहे, काहींच्या आईबाबांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे तर इतर काहींची युद्धांमुळे किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे आपल्या आईबाबांपासून ताटातूट झाली आहे. कारण कोणतेही असो, आईवडिलांशिवाय जीवन अतिशय खडतर बनते; पावलोपावली धक्के खावे लागतात. याशिवाय असंख्य जबाबदाऱ्या एकसाथ तुमच्यावर येतात.
‘आता आपल्याला कोण सांभाळणार?’
आईबाबांशिवाय तुम्ही आपल्या जीवनात कितपत यशस्वी व्हाल हे बरेचसे तुमच्या वयावर आणि तुमच्या परिस्थितींवर अवलंबून असते. कारण, तुम्ही वयाने लहान असल्यास किंवा नुकते कुमार वयात आले असल्यास साहजिकच तुम्हाला फार कठीण जाईल. अर्थात, या जगात आता तुमचे कोणीच नाही असेही नाही. कदाचित तुमचे काका, काकू, किंवा थोरली भावंडे तुम्हाला सांभाळण्यासाठी पुढे येतील.
अनाथांची आणि विधवांची काळजी घेणे हा आपल्या उपासनेचाच एक भाग आहे असे यहोवाचे साक्षीदार मानतात. (याकोब १:२७; २:१५-१७) त्यामुळे पुष्कळदा, मंडळीतले लोक तुम्हाला मदत करतील. या ठिकाणी पुन्हा ओरास्यो आणि त्याच्या बहिणींचेच उदाहरण देता येईल; त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांकडून बायबलचा अभ्यास केला होता आणि आता ते ख्रिस्ती सभांनाही जात होते. तिथेच एका ख्रिस्ती कुटुंबाशी त्यांची ओळख झाली आणि हे कुटुंब या दोघांना मदत करू लागले. ओरास्यो म्हणतो: “यहोवा दररोज आमच्या पाठीशी असतो आणि प्रेमळपणे आमची काळजी वाहतो याबद्दल मी अत्यंत आभारी आहे! आम्हाला मदत करणारे हे कुटुंब अतिशय आध्यात्मिक वृत्तीचे होते; शिवाय, त्यांनाही आमच्याच वयाची मुलं होती. या जोडप्यानं जणू आम्हाला दत्तकच घेऊन टाकलं होतं; त्यामुळे आधारासाठी, मदतीसाठी आपण ज्यांच्यावर अवलंबून राहू शकतो असं आपलंही एक कुटुंब आहे असं आयुष्यात पहिल्यांदाच आम्हाला वाटू लागलं.”
पण, सगळ्याच युवकांना इतका चांगला अनुभव येईलच असे नाही. संयुक्त राष्ट्रे बाल निधिचा एक अहवाल म्हणतो: “काही वेळा निराधार झालेली मुलं अशा कुटुंबात पडतात जिथं त्यांना मारहाण केली जाते. त्यांच्याकडून फुकटात काम करून घेतलं जातं, त्यांना प्रगती करण्याची संधी दिली जात नाही; वाईट, अनैतिक मार्गाला लावलं जातं.” म्हणूनच, कोणी तुमची काळजी घेत असेल, निदान तुमच्या आवश्यक गरजा पूर्ण करत असेल तर त्यांचे उपकार माना.
आईबाबा नसले की खूप हाल होतात हे मान्य. आणि तुमचा सांभाळ करण्यासाठी ते नाहीत या गोष्टीमुळे तुम्हाला कदाचित रागही येत असेल. त्यातच असं करू नकोस, तसं करू नकोस असे एखाद्या नातेवाईकाने किंवा मोठ्या भावंडाने सांगणं तर मुळीच पचत नाही आणि मग आणखीनच राग येऊ शकतो. पण तुमचा हा राग तुमचा सांभाळ करण्याची धडपड करणाऱ्यांवर काढू नका. कारण बायबल म्हणते: “आपल्या क्रोधाने मोहात पडून तू अपमान करण्यास प्रवृत्त होऊ नको; . . . सांभाळ, दुष्टतेकडे वळू नको.” (ईयोब ३६:१८, २१) बायबलमधील एस्तेर नावाच्या तरुणीची आठवण करा. अनाथ असल्यामुळे तिच्या थोरल्या चुलत भावानेच म्हणजे मर्दखयानेच तिला सांभाळले होते. तो तिचा जन्मदाता वडील नसला तरी मर्दखयाने ‘तिला ज्या आज्ञा दिल्या होत्या’ त्या तिने मानल्या; लहानपणीच नव्हे तर मोठेपणी देखील! (एस्तेर २:७, १५, २०) तसेच, तुम्ही देखील आज्ञाधारक राहा आणि सहकार्य करा. त्यामुळे तणावपूर्ण प्रसंग टळतील आणि केवळ तुमचेच नाही तर इतर सर्वांचेच जीवन सुखकर बनेल.
कुटुंबाच्या जबाबदाऱ्या
तुम्हाला मोठा भाऊ किंवा बहीण असल्यास, किंवा स्वतंत्र राहण्याइतके तुमचे वय झाले असल्यास आपल्या भावंडांसोबत तुम्ही राहू शकता. याचा अर्थ, तुम्हाला कदाचित घरचा कर्तापुरुष बनावे लागेल आणि ही नक्कीच एक साधीसोपी गोष्ट नाही. पण, अशा परिस्थितींमध्ये देखील बऱ्याच युवकांनी आपल्या भावंडांना सांभाळण्याची उत्तम कामगिरी बजावली आहे.
पण, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना काही वेळेस तुम्हाला खूपच राग येईल हे समजण्याजोगे आहे. अशा वेळी, तुमचे तुमच्या भावडांवर प्रेम आहे, तुम्हाला त्यांची काळजी वाटते याचा तुम्ही शांत बसून विचार केला तर जीवनाबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास तुम्हाला मदत होईल. शिवाय, त्यांचा सांभाळ करणे ही देवाकडून आपल्याला मिळालेली एक जबाबदारी आहे असे जर तुम्ही मानले तर त्यामुळे देखील पुष्कळशी मदत होऊ शकते. कारण शेवटी बायबल देखील हेच सांगते, की ख्रिश्चनांनी आपल्या घरच्यांचा सांभाळ करावा. (१ तीमथ्य ५:८) एक गोष्ट मात्र खरी आणि ती म्हणजे तुम्ही तुमच्या भावंडांसाठी कितीही काहीही केले तरी आईबाबांची जागा तुम्ही कधीच भरून काढू शकणार नाही.
त्यामुळे तुमच्या आईबाबांशी तुमची भावंडे जशी वागली असती तसे आता त्यांनी तुमच्याशी वागावे अशी अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. खरे तर, आईबाबांच्या जागी आता तुम्ही त्यांचा सांभाळ करणार आणि त्यामुळे तुम्हाला मान दिला पाहिजे ही वस्तुस्थिती स्वीकारण्यासाठी त्यांना बराच अवधी लागेल. पण तोपर्यंत खचून जाऊ नका. “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही,” कटाक्षाने टाळा. याउलट, आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून, ‘एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू होण्यास आणि एकमेकांना क्षमा करण्यास’ आपल्या भावंडांना शिकवा.—इफिसकर ४:३१, ३२.
घर चालवताना आपल्या हातून पुष्कळ चुकाही झाल्या हे मान्य करताना ओरास्यो म्हणतो: “कधीकधी मी माझ्या बहिणींशी खूप कडक वागायचो. पण काही अंशी ते चांगलंच होतं कारण त्यामुळे यहोवासमोर आम्ही शुद्ध आचरण ठेवू शकलो.”
स्वतःच्या पायांवर उभे राहणे
आईवडील नाहीत म्हटल्यावर, आपल्या भौतिक गरजा कशा भागवाव्यात हाच तुमच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असतो. मंडळीतले काही प्रौढ लोक तुम्हाला आणि तुमच्या भावंडांना करावी लागणारी कामे शिकवू शकतील जसे, की स्वयंपाकपाणी, साफसफाई आणि घरातली इतर कामे. पण पैशाचा प्रश्न तुम्ही कसा सोडवाल? यासाठी कदाचित तुम्हाला नोकरी शोधण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल.
पण आजकाल अगदी कमी शिक्षण, अनुभव आणि नोकरीचे हुन्नरही कमी असणाऱ्या युवकांना नोकऱ्या मिळणे जड जाते. अशा वेळी आपले आवश्यक शिक्षण पूर्ण करणे किंवा नोकरीचे काही अतिरिक्त प्रशिक्षण घेणे तुम्हाला शक्य असेल तर जरूर घ्या. ओरास्यो आठवून सांगतो: “माझा आणि माझ्या सावत्र बहिणीचा शाळेचा खर्च भागवण्यासाठी मी आणि माझी थोरली बहीण नोकरी करत होतो.” तुम्ही जर प्रगतीशील देशांत राहात असाल तर नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीचा आणि कौशल्याचा उपयोग करावा लागेल.—ऑक्टोबर २२, १९९४ च्या सावध राहा! (इंग्रजी) अंकातला “प्रगतीशील राष्ट्रांत नोकऱ्या मिळवणे” हा लेख पाहा.
शिवाय, आर्थिकदृष्ट्या अधिक प्रगती केलेल्या देशांत सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळणे देखील कदाचित शक्य असेल. पुष्कळदा, अनाथ किंवा टाकून दिलेल्या मुलांना मदत करण्यासाठी सरकारी किंवा खाजगी एजन्सीस असतात. उदाहरणार्थ, काही एजन्सीस अशा मुलांच्या खाण्यापिण्याच्या किंवा राहण्याच्या सोयी करतात. अर्थात, पैशाच्या रूपात जी काही मदत मिळत असेल त्या पैशाचा अगदी जपून वापर करावा. ‘पैसा आश्रय देणारा आहे’ असे बायबल म्हणते. (उपदेशक ७:१२) आणि खर्चाचा अंदाज बांधण्याविषयी तसेच पैसा खर्च करण्याच्या बाबतीत तुम्ही जर दक्ष नसला तर हातात असलेला पैसा पाहता पाहता ‘पंख लावून उडून जाईल.’—नीतिसूत्रे २३:४, ५.
पण, कोणी प्रौढ व्यक्ती तुमचा सांभाळ करत असली तर स्वतःच्या पायांवर उभे राहणे इतका मोठा प्रश्न बनत नाही. पण, आयुष्यात पुढे अशी एक वेळ येईलच जेव्हा तुम्हाला स्वतःच्या पायांवर उभे राहावे लागेल. त्यातच, चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी आईबाबा नसल्यामुळे आपल्या अभ्यासात लक्ष लावण्यासाठी तुम्हाला स्वतःहूनच फार प्रयत्न करावा लागेल. ख्रिस्ती प्रेषित पौलाने आध्यात्मिक प्रगतीबद्दल तीमथ्याला जो सल्ला दिला तो शालेय अभ्यासाला देखील लागू होऊ शकतो: “तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्यात गढून जा.” (१ तीमथ्य ४:१५) असे केल्यास तुमच्या भावंडांसमोर तुम्ही एक चांगले उदाहरण ठेवाल शिवाय, त्यामुळे तुम्हाला स्वतःला देखील फायदाच होईल.
पण या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःसाठी आध्यात्मिक तरतूद केली पाहिजे. याकरता आध्यात्मिक कार्यात भाग घेण्यासाठी एक संतुलित नित्यक्रम ठरवून घेण्याचा प्रयत्न करा. (फिलिप्पैकर ३:१६) उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांमध्ये दररोज कुटुंब मिळून बायबलच्या वचनाची चर्चा करणे ही जणू एक प्रथाच आहे. तुम्ही देखील नियमितपणे असे का करू नये? त्याशिवाय, नियमितपणे बायबलचा अभ्यास केल्याने आणि नियमित ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिल्याने तुम्हाला आध्यात्मिकरित्या बळकट राहण्यास मदत मिळेल.—इब्री लोकांस १०:२४, २५.
या कठीण परिस्थितीचा सामना करणे
आईबाबांशिवाय जीवन खरेच कठीण बनते हे मान्य; पण त्याचा अर्थ आपले जीवन अगदी निरस, कंटाळवाणे असावे असा होत नाही. उदाहरणार्थ, सध्या वीस वर्षांची पाओला केवळ सहा वर्षांची होती तेव्हा तिची आई वारली. मग दहा वर्षांची असताना तिचे बाबाही वारले. एका स्त्रीने मोठ्या प्रेमाने तिला आणि तिच्या चार बहिणींना सांभाळले. तुम्हाला काय वाटते, पाओलाचे जीवन अगदी दुःखी आहे का? मुळीच नाही. पाओला म्हणते: “कदाचित आमचं कुटुंब हे चारचौघांसारखं नॉर्मल कुटुंब नसेल; पण आमचं जीवन अगदी चारचौघांसारखं आहे. उलट, इतर कुटुंबांपेक्षा आमच्यात खूप प्रेम आहे.”
याला दुजोरा देत पाओलाची बहीण आयरीन म्हणते: “आम्हाला आईबाबा नसले म्हणून काय झालं, आम्ही इतर युवकांपेक्षा वेगळे नाहीत.” अशा परिस्थितीत असलेल्या इतर युवकांना ती हाच सल्ला देते की, “आपण दुर्दैवी आहोत असे मुळीच समजू नका.” त्याचप्रमाणे ओरास्यो म्हणतो: “माझ्या परिस्थितीने मला फार लवकर प्रौढ बनवले.”
खरेच, आईवडिलांना गमावण्यासारखे दुसरे दुःख नसते. पण यहोवाच्या मदतीने तुमचा निभाव लागू शकतो आणि त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळत राहतील याची खात्री बाळगा.
[तळटीपा]
a डिसेंबर ८, १९९८ च्या सावध राहा! अंकातला “तरुण लोक विचारतात . . . मला आईवडील का नाहीत?” हा लेख पाहा.
[२० पानांवरील चित्र]
ख्रिस्ती वडील तुम्हाला आधार देऊ शकतात