“आम्ही सवय मोडली—तुम्हीपण मोडू शकता!”
जपान मधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
असे म्हटले जाते की, पंधराशेच्या दशकात जपानमध्ये येणाऱ्या युरोपियन जहाजांवर धूम्रपान करणारे प्रवासी असत; त्यांच्या “पोटात आग आहे” असेच वाटायचे. आश्चर्यामुळे उत्सुकता वाढली आणि १८८० च्या दशकापर्यंत जपानमध्ये धूम्रपान अगदी सर्वसामान्य बनले होते. आश्चर्याने थक्क झालेल्या त्या जपानी लोकांचे वंशज जगात तंबाखूचा सर्वाधिक उपयोग करणारे होतील हे कोणास ठाऊक होते?
“आम्हाला मोठ्यांसारखं वागायचं होतं, मोठ्यांना कसं वाटतं ते जाणून घ्यायचं होतं.”—आकिओ, ओसामु आणि योको.
“मला वजन कमी करायचं होतं.”—त्सूया.
“उत्सुकतेपोटी.”—टोशिहिरो.
“तंबाखूचा आमच्या प्रकृतीवर काही विपरीत परिणाम होईल असं आम्हाला वाटलंच नाही.”—ऱ्योहे, जूनिची आणि यासुहिको.
“मला दुसऱ्यांदा दिवस गेले तेव्हा मळमळ घालवायला मी धूम्रपान करू लागले.”—चीको.
“बिझनेस मिटिंग्स चालायच्या तेव्हा अस्वस्थपणा घालवण्यासाठी मी धूम्रपान करायचो.”—तात्सुहिको.
सिगारेटी ओढायला का सुरवात केली असा प्रश्न केल्यावर येथील काही लोकांनी ही वरील कारणे दिली. काहीजण जपानला धूम्रपान करणाऱ्यांचे जग म्हणतात हे लक्षात घेता ही कारणे समजण्याजोगी आहेत. पण, उल्लेखनीय गोष्ट अशी की, वरती ज्यांची नावे दिली आहेत त्या सर्वांनी धूम्रपान करण्याचे सोडून दिले आहे. ते ज्या वातावरणात होते त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचा विचार करता हा एक पराक्रमच म्हणावा लागेल. त्यांना हे शक्य झालेच कसे अशा विचारात तुम्ही पडला आहात का? आज जपानमध्ये तंबाखूचा किती वापर होतो हे आधी आपण पाहू या.
तंबाखूचे विश्व
जपानमध्ये ५६ टक्के प्रौढ पुरुष धूम्रपान करतात तर अमेरिकेत १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांमध्ये केवळ २८ टक्के धूम्रपान करतात. जपानमधील ३,४०,००,००० धूम्रपान करणाऱ्यांमध्ये २२ टक्के स्त्रिया आहेत ज्या बहुतेककरून तरुणच आहेत. प्रौढ लोकांचे उदाहरण आणि चित्ताकर्षक जाहिराती यांच्यामुळे धूम्रपान करणाऱ्या तरुण लोकांमध्ये ही जलद वाढ झाली आहे. अमेरिकेत वीसहून अधिक वर्षांआधीच टीव्ही आणि रेडिओवर सिगारेटींच्या जाहिरातींवर बंदी घातली होती ती आता जपानमध्येही घातली गेली आहे.
शिवाय, प्रत्येक चौकात असलेल्या यंत्रांमधून सिगारेटी सहज उपलब्ध आहेत. एकदा सिगारेटीचे पाकीट हातात पडले की, मग त्यावरच्या मेंगळट आणि पोकळ सूचनेकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. सूचना एवढीच असेल: “जास्त धूम्रपान नको; ते हानीकारक आहे.” तंबाखूच्या गंभीर धोक्यांकडे कानाडोळा तर होतोच पण त्याशिवाय मान्यवर लोकांच्याच वाईट उदाहरणामुळे जपानी लोकांना धूम्रपान करण्याचे उत्तेजन मिळाले असून सुरक्षितपणाची एक खोटी भावना दिली जाते.
म्हणूनच तर, जपान आपल्या नागरिकांना तंबाखूचा वापर करण्यात आळा घालण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे धूम्रपानाचा विरोध करणाऱ्यांना याची खंत वाटते. पण, धूम्रपानामुळे स्वास्थ्य आणि जीवन यांना हानी असल्याची सूचना लोकांना देणे महत्त्वाचे आहे हे तज्ज्ञांना आता जाणवू लागले आहे. होय, धूम्रपान करणाऱ्या जपानी लोकांमध्येही तीच लक्षणे दिसून येतात—मळमळ, धाप लागणे, सतावणारा खोकला, पोटदुखी, भूक न लागणे, पटकन सर्दी होणे आणि कदाचित कालांतराने फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयविकार किंवा इतर समस्यांमुळे अकाली मृत्यू होणे.
एप्रिल १, १९८५ मध्ये जपानमधील तंबाखू उद्योगाचे खाजगीकरण करण्यात आल्यावर कित्येक दशकांपासून सरकारची त्यावर असलेली मक्तेदारी संपली. तरीपण, सरकाराशी अजूनही नाते काही तुटलेले नाही आणि म्हणून धूम्रपानासाठी लोकांना प्रोत्साहन न देण्याच्या कामाला जरा अडथळाच होतो. म्हणूनच, धूम्रपानाचा विरोध करणारे गट जपान हे धूम्रपान करणाऱ्यांना चालना देणारे ठिकाण आहे असे आज का म्हणतात याचे स्पष्टीकरण मिळते. त्याचप्रमाणे, जपान “धूम्रपानाला प्रोत्साहन देणारा समाज बनलाय” याचा डॉक्टरांना खेद वाटतो असे द डेली योमिउरी का म्हणाले याचेही स्पष्टीकरण मिळते.
काहीजण ही सवय कशी मोडू शकले ते पाहण्यासाठी “आम्ही सवय कशी मोडली” ही पेटी पाहा.
ही सवय मोडाल कशी?
पूर्वी तंबाखूशिवाय जमत नसलेल्या, पेटीत अनुभव दिलेल्या लोकांचा हाच सल्ला आहे की: सवय मोडण्यामागे तुमच्याकडे स्पष्ट कारण असले पाहिजे. देवाप्रती प्रेम आणि त्याला संतुष्ट करण्याची इच्छा हे सर्वात उत्तम कारण आहे. शिवाय शेजाऱ्याबद्दल प्रेम हे आणखी एक कारण आहे. ध्येय ठेवा आणि त्यानुसार वागा. तुम्ही सवय मोडत आहात हे सर्वांना कळू द्या—मित्रमंडळीला सांगा आणि तुमच्या घरातल्या लोकांची मदत घ्या. शक्य असल्यास, अचानक थांबवा. शिवाय, सिगारेटी ओढणाऱ्या ठिकाणी जाण्याचे टाळा.
तुम्ही बायबलचा अभ्यास करत असल्यास, यहोवाच्या साक्षीदारांसोबत जास्त सहवास ठेवा. त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे सिगारेट ओढायची तुमची इच्छा लवकरच मरेल. आणि तुम्ही कोणा सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीबरोबर बायबल अभ्यास घेणारे यहोवाचे साक्षीदार असल्यास, हार मानू नका. त्याच्या या वाईट सवयीपेक्षा यहोवा देवाबद्दल त्याच्या मनात प्रेम निर्माण करायला त्याची मदत करा.
[१६, १७ पानांवरील चौकट/चित्रं]]
“आम्ही सवय कशी मोडली”
मिको: “मी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागले तेव्हा मी काही सिगारेट ओढायची थांबवू शकणार नाही अशी मला खात्रीच होती. माझ्या मुलांना तरी जीवनाचा मार्ग मिळावा हा माझा अभ्यास करण्यामागचा हेतू होता. पण पालक आदर्श असायला हवेत हे मला लवकरच जाणवले आणि मग मी मदतीसाठी यहोवाकडे विनंती करू लागले. माझ्या प्रार्थनेप्रमाणे वागायचे म्हणजे महामुश्किल होते आणि मला काही काळासाठी त्रास तर फार झाला. पण ही घाणेरडी सवय मी सोडून टाकली तेव्हा मला मनातून केवढं स्वच्छ, शुद्ध वाटलं हे मी कधीच विसरू शकत नाही.”
मासायुकी: “मी दिवसा तीन पाकीटं खल्लास करायचो; सिगारेट सोडायचे माझे खूप प्रयत्न झाले आणि फसलेही. पण मी एकदा शेवटची सिगारेट विझवली आणि बस्स त्यापुढे तंबाखूचं नाव काढलं नाही. ही सवय मोडायला मात्र मला माझ्या कुटुंबाने, साक्षीदार सोबत्यांनी आणि यहोवा देवाने मदत दिली. मी काम करायचो त्या बँकेत माझी सवय मोडली यावर कुणाचा विश्वासच बसेना. मग मी सुचवलं, की ग्राहकांप्रती एक शिष्टाचार म्हणून बँकेच्या सर्वसामान्य ठिकाणी ऑफिसातल्या कुणीही कामाच्या वेळी धूम्रपान करू नये. आमच्या इथं ८० टक्के कामगार सिगारेटी ओढायचे तरीपण मी सुचवलेली गोष्ट लगेचच अंमलात आणली गेली. आमच्या बँकेच्या २६० शाखांमध्ये आता हा नियम पाळला जातो.”
ओसामु: “देवाचं वचन, बायबल यातून मी सत्य शिकू लागलो तेव्हा मला सिगारेट सोडावी लागेल हे मला कळलं. पण त्याला चक्क एक वर्ष लागलं. सवय मोडल्यावरही नंतरचे सहा महिने मला स्वतःवर खूप ताबा ठेवावा लागला. ही सवय मोडायची मला इच्छा असली पाहिजे हे मी जाणून होतो.”
तोशिहिरो: “येशूच्या खंडणी बलिदानाचा माझ्यावर इतका प्रभाव पडला की, मी सिगारेट सोडण्याचं बलिदान तरी केलं पाहिजे असं मला वाटलं.”
यासुहिको: “यहोवा देवाची आज्ञा पाळायचा आणि सिगारेट सोडायचा निर्णय घेतल्यामुळेच माझा प्राण वाचला. एकदा, मी काम करायचो तिथं प्रोपेन गॅसची गळती झाल्यामुळे सगळ्या खोलीत तो गॅस भरला होता. एरवी, मी एखादी सिगारेट पेटवली असती तर मोठा स्फोट झाला असता. पण काही दिवसांआधीच मी सिगारेट सोडून दिल्यामुळे आज मी त्याविषयी सांगू शकत आहे.”
आकिओ: “मला अधूनमधून मळमळ होऊ लागली तेव्हा सिगारेटीचा विपरीत परिणाम होतोय हे माझ्या लक्षात आलं. पण मी काही सिगारेट सोडली नाही. सिगारेट ओढल्याचे काय धोके आहेत याची प्रथम माहिती माझ्या बायकोने मला दिली; ती एक यहोवाची साक्षीदार बनली होती. त्यानंतर मीसुद्धा बायबलचा अभ्यास करू लागलो आणि वॉचटावरच्या प्रकाशनांमधून मला हे कळलं की, सिगारेट ओढणारा फक्त स्वतःलाच नव्हे तर त्याच्या घरातल्यांनासुद्धा हानी पोचवतो. मी त्या क्षणीच सिगारेट सोडली!”
ऱ्योहे: “माझी बायको माझ्यासाठी सिगारेटीची पाकीटं आणायची—एका वेळी २० पाकीटं आणायची. पण साक्षीदारांच्यासोबत ती बायबलचा अभ्यास करू लागली तेव्हा तिनं माझ्यासाठी पाकीटं आणणं बंद केलं. का तर, आरोग्यासाठी ते हानीकारक आहे म्हणून. म्हणून मग मी स्वतःच सिगारेटींचं दुकान काढलं. दिवसा मी साडेतीन पाकीटं संपवायचो. मग मीसुद्धा साक्षीदारांच्यासोबत बायबलचा अभ्यास करू लागलो. आपण बायबलच्या विषयांवर प्रभावीपणे भाषण देणारे व्हावे असं मला वाटू लागलं. म्हणून ईश्वरशासित सेवा प्रशालेत हे प्रशिक्षण मिळवण्यासाठी पात्र ठरायला मी सिगारेट सोडून दिली.”
जूनिची: “माझी धाकटी मुलगी, जी एक साक्षीदार आहे, तिला माझ्याविषयी चिंता होती. मी सिगारेट ओढणार नाही असं वचन तिनं मला घ्यायला लावलं आणि मी ती सवय मोडली.”
त्सूया: “मी पहिल्याच वेळी राज्य सभागृहात गेलो तेव्हा आत गेल्या गेल्या ॲश ट्रे आणि माचिसची पेटी मागितली. इथं कुणीच सिगारेट ओढत नाही असं मला सांगितलं तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. ही सवय मीसुद्धा मोडली पाहिजे हे मला कळलं. आठ दिवस इस्पितळात काढल्यावर, पुन्हा कधीच सिगारेट सोडण्याचा त्रास नको याची मला खात्री झाली.”
योको: “यहोवाच्या साक्षीदारांच्या पत्रिकांमध्ये आणि इतर प्रकाशनांमध्ये मी या विषयाचा अभ्यास केला आणि येशूला यातना स्तंभावर खिळण्याआधी त्याला दिलेलं मादक औषध त्याने कसं नाकारलं याचा विचार केला. मी यहोवा देवाला प्रार्थना करून त्याला सांगितलं की, मला त्याच्या नावाची एक शुद्ध स्तुती करणारी व्हायचंय. त्यानंतर, मी कधीच सिगारेट ओढली नाही. माझ्या आजूबाजूला लोक सिगारेट ओढायचे तेव्हा तो धूर घ्यावा अशी मला फार इच्छा व्हायची पण मी लगेच तिथून निघून जायचे कारण मला ती इच्छा पूर्णपणे मारून टाकायची होती.”
आधी धूम्रपान करत असलेल्या या लोकांनी पुन्हा कधीच धूम्रपान करायचे नाही असा दृढनिश्चय केला आहे. या सवयीतून मुक्त व्हावे असे तुम्हाला पण वाटते का?
मिको
ओसामु
यासुहिको
आकिओ आणि त्याची पत्नी, साचिको
जूनिची आणि मुलगी मिरी
योको