युद्धातला शूरवीर बनतो ख्रिस्ताचा सैनिक
ल्वी लॉल्यॉ यांच्या द्वारे कथित
ऑगस्ट १६, १९४४ साली दुसऱ्या महायुद्धादरम्यान फ्रान्सच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर उतरणाऱ्या मित्र राष्ट्रांच्या सैन्यात मी होतो. भूमध्य किनारपट्टीवर एक आठवडा लढा दिल्यानंतर, माझ्या रणगाड्यांची तुकडी मार्सेल्स बंदरातून प्रवेश करून नॉटर-डाम-दे-ला-गार्ड बॅसिलिकाच्या दिशेने डोंगरावर कूच करत गेले. तेथील जर्मन तटबंदी ताब्यात घेणे हे आमचे ध्येय होते.
लढाई जोरात चालली होती. माझ्या तुकडीतल्या एका रणगाड्यावर मारा झाला आणि त्यातले माझे तीन सोबती ठार झाले. त्यानंतर, सुरुंग उडाल्यामुळे माझ्या रणगाड्याचा एक ट्रॅक निखळला आणि आमचा रणगाडा निकामी झाला. पण माघार घ्यायची नाही असा दृढनिश्चय असल्यामुळे आम्ही कित्येक तासांपर्यंत लढत राहिलो.
एका हातात मशिनगन, दुसऱ्या हातात फ्रेंच झेंडा धरला आणि लढाई काही काळासाठी मंदावताच मी एका स्वतंत्र फ्रेंच लढवय्यासोबत रणगाड्यातून उतरून पायी पुढे जाऊ लागलो. बॅसिलिकाच्या प्रवेशद्वारावर पोचलो तेव्हा दारूगोळ्याने मी पूर्णपणे काळवंडलो होतो आणि माझ्यात त्राण उरले नव्हते; मी तेथे जाऊन फ्रेंच झेंडा रोवला.
मुक्तता
त्यानंतरच्या आठवड्यांमध्ये, माघार घेणाऱ्या जर्मन सैन्यांचा पिच्छा करत आम्ही उत्तर दिशेने आगेकूच करू लागलो. पण अज्ञात ठिकाणांहून होणाऱ्या हल्ल्यांमुळे आणि रस्त्यांवर आडवे-तिडवे अडकवलेल्या केबल्समुळे आम्हाला रणगाड्यांची वरची खिडकी बंद करूनच कूच करावी लागली.
ऑक्टोबरमध्ये, आमची तुकडी रामॉन्शॉन या ईशान्य फ्रान्समधील वोझ पर्वतांमधील एका लहानशा गावात येऊन पोहोंचली. तेथे कोणीच नसल्यासारखे दिसत होते. माझ्या रणगाड्याच्या खिडकीतून उभा राहून आजूबाजूचा परिसर निरखत असताना अचानक एका खिडकीतून सोडलेला एक रॉकेट रणगाड्यात शिरला आणि स्फोट होऊन जागच्या जागी माझे तीन लोक ठार झाले. दुसरा एक सैनिक आणि मी जबर जखमी झालो आणि रणगाडा निकामी झाला. माझ्या पायात बॉम्बचे १७ तुकडे शिरलेले होते; पण तरीही दुसरा एक रणगाडा आमच्या रणगाड्याला ओढून नेत होता तेव्हा मीच सगळे काही चालवत होतो.
या घटनेमुळे, तातडीचा संदेश पाठवून माझी प्रशंसा करण्यात आली. काही दिवसांनंतरच, पहिल्या फ्रेंच सैन्याचे कमांडर जनरल दे लाटर दे टासीन्यी यांच्या हस्ते मला गौरवण्यात येत असताना ते म्हणाले: “आपण लवकरच भेटू.”
त्यानंतर लागलीच मला जनरलचा मदतनीस म्हणून नेमण्यात आले. काही दिवसांनी, मी त्यांच्याबरोबर बर्लिनला गेलो; तेथे मे ८, १९४५ रोजी जर्मनच्या शरणागतीत त्यांनी फ्रान्सचे प्रतिनिधीत्व केले. नंतरच्या चार वर्षांपर्यंत मी त्यांच्या अगदी हाताशी राहिलो.
पण, मी दुसऱ्या महायुद्धातल्या या महत्त्वाच्या घटनांमध्ये गुंतलोच कसा?
धर्म आणि युद्धाचे शिक्षण
मी लहानपणापासून एक फार आवेशी रोमन कॅथोलिक होतो आणि देवाची व राष्ट्राची सेवा करणे हीच माझी इच्छा होती. ऑगस्ट २९, १९३९ रोजी, फ्रान्स दुसऱ्या महायुद्धात उतरण्याच्या काही दिवसांआधीच मी मोटोराईझ्ड कॅव्हल्रीसाठी माझे नाव दिले. त्यावेळी मी फक्त १८ वर्षांचा होतो. पॅरिसमधल्या एकोल मिलीटेर (लष्कर प्रशिक्षण केंद्र) येथे पाच महिने प्रशिक्षण घेतल्यावर मला फ्रान्सच्या पूर्वेकडील बाजूवर नियुक्त न केलेला ऑफिसर म्हणून पाठवण्यात आले.
या काळाला खोटेनाटे युद्ध असे म्हटले जात कारण दुसऱ्या ठिकाणी लढणाऱ्या जर्मन सैन्याची वाट पाहत बसण्याशिवाय आमचे दुसरे काहीच काम नव्हते. मग, जर्मन लोकांनी शेवटी हल्ला चढवला तेव्हा जून १९४० मध्ये मला कैदी बनवून नेण्यात आले. दोन महिन्यांनी मी तेथून पळ काढला आणि उत्तर आफ्रिकेतल्या फ्रेंच सैन्यात भरती होऊ शकलो.
वाळवंटातला कोल्हा असे नाव पडलेल्या जनरल अर्विन रॉमल यांच्या निर्देशनाखाली जर्मन सैन्यांविरुद्ध ट्यूनिझियात लढत असताना, मी जवळजवळ ७० टक्के भाजलो होतो आणि नऊ दिवस कोमामध्ये होतो. फ्रेंच फॉरेन लेजनची मुख्यालये जेथे होती त्या वायव्य अल्जेरियात, सिडी-बेल-अबेस येथील एका इस्पितळात मी तीन महिने होतो. उत्तर आफ्रिकेत असताना मला क्र्वॉ द गेर अर्थात मिलिटरी क्रॉसचे विभूषण देण्यात आले.
कॅथोलिक चॅपलन आम्हाला आमचे “ख्रिस्ती” कर्तव्य पार पाडा असे सांगायचे. त्यांच्या या उत्तेजनावरून मी फ्रान्ससाठी माझा जीवही पणाला लावायला तयार होतो. शक्य असायचे तेव्हा मी लढाईला जाण्याआधी कम्युनियन घेऊनच जायचो. आणि कडी लढाई चालू असताना मी देवाला आणि कुमारी मरियेला प्रार्थना करायचो.
शत्रू सैनिकांचा मला आदर वाटायचा; त्यांच्यापैकी पुष्कळसे माझ्यासारखेच आवेशी रोमन कॅथोलिक होते. काहींच्या कमरपट्ट्याच्या बक्कलवर गॉट्ट मिट उन्स (देव आमच्याबरोबर आहे) असे लिहिलेले असायचे. एकाच धर्माचे असलेल्या दोन्ही बाजूच्या सैनिकांच्या प्रार्थनेचे देव उत्तर देईल ही गोष्ट जरा विचित्र वाटत नाही का?
युद्धानंतर बदल
युद्ध संपल्यावर, एप्रिल १०, १९४७ रोजी, जनरल दे लाटर दे टासीन्यींच्या गावची म्हणजे वान्डेतल्या म्युएरॉन आन पारे येथील रॅन या मुलीशी मी लग्न केले. जनरल माझ्या लग्नाला साक्षी म्हणून उपस्थित राहिले होते. त्यानंतर, जानेवारी १९५२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा राज्यात झालेल्या त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी त्यांचा झेंडा मी उचलून नेला होता.
सन १९५२ च्या उत्तरार्धात, एके रविवारी सकाळी माझी बायको, माझी लहान मुलगी आणि मी मासला जायला निघालोच होतो एवढ्यात दोन साक्षीदारांनी आमच्या दरवाजाची घंटी वाजवली. त्यांनी बायबलबद्दल आम्हाला जे काही सांगितले ते ऐकून आमची उत्सुकता वाढली. माझी बायको आणि मी फार धार्मिक होतो पण तरीसुद्धा आम्हाला बायबलचे मोजकेच ज्ञान होते कारण चर्चमध्ये बायबल वाचायचे नाही असे सांगितले होते. आम्हाला ज्यांनी बायबल अभ्यासाबद्दल सांगितले ते फ्रान्समधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराचे पर्यवेक्षक, लेऑपॉल झॉन्टा हे होते. आमच्या बायबल अभ्यासामुळे अगदी लहानपणापासून ज्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नव्हती त्यांची उत्तरे मला शेवटी मिळाली.
उदाहरणार्थ, मला आमच्या स्वर्गातील पित्या किंवा प्रभुची प्रार्थना याबद्दल नेहमी जिज्ञासा वाटायची. कॅथोलिक असल्यामुळे सगळे चांगले लोक मेल्यावर स्वर्गात जातात असा माझा विश्वास होता. असे असताना “पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो” असे प्रार्थनेत का म्हणतात हे मला काही कळत नव्हते. (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ६:९, १०) मी ज्या पाळकांना हा प्रश्न विचारायचो ते एकतर माझा प्रश्न टाळायचे नाहीतर सगळेजण रोमन कॅथोलिक होतील तेव्हा या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल असे मला सांगायचे. पण त्याने माझे समाधान झाले नव्हते.
पाळक मला त्रैक्याबद्दलच्या प्रश्नांचीसुद्धा समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. एका ख्रिस्ती पंथाच्या शब्दांनुसार, ही कॅथोलिक शिकवण अशी होती की, ‘पिता देव, पुत्र देव आणि पवित्र आत्मा देव आहे आणि तरीसुद्धा ते तीन नसून एक देव आहेत.’ म्हणून, बायबलमधून येशू हा देवाचा पुत्र आहे, स्वतः सर्वशक्तिमान देव नाही ही स्पष्ट शिकवण आम्हाला कळाली तेव्हा माझ्या बायकोला आणि मला फार आनंद झाला.—मार्क १२:३०, ३२; लूक २२:४२; योहान १४:२८; प्रेषितांची कृत्ये २:३२; १ करिंथकर ११:३.
प्रथमच आमचे डोळे उघडलेत आणि आम्हाला एक अत्यंत मोलवान मोती सापडला आहे आणि तो मिळवायला आम्ही काहीही गमवायला तयार आहोत असे आम्हा दोघांनाही वाटले. (मत्तय १३:४६) ही मौल्यवान वस्तू मिळवायची असेल, तर आम्हाला एक निवड करावी लागेल हे आमच्या लक्षात आले. आम्ही प्रेषित पौलाचा दृष्टिकोन स्वीकारला ज्याने म्हटले की, “ख्रिस्त येशू . . . ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानि” असे समजतो. त्यामुळे देवाची सेवा करण्यासाठी आम्ही आमच्या जीवनात बदल केले.—फिलिप्पैकर ३:८.
निर्णय घेणे
एप्रिल १९५३ मध्ये, साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू करून दोनएक महिन्यांतच, खास परदेशी मोहिमांवर पाठवणाऱ्या फ्रेंच सैन्यासोबत इंडोचायनात लढाईला जायला मला आदेश मिळाला. त्यावेळी, पॅरिसच्या कायदेमंडळातल्या कमांडिंग ऑफिसरचा मी मदतनीस होतो. त्या वेळेपर्यंत तटस्थतेबद्दल बायबलचे तत्त्व मला कळून चुकले होते आणि आता मला निर्णय घ्यावा लागणार हे मी जाणले. (योहान १७:१६) माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी सांगितले की, इंडोचायनाच्या लढाईत जाण्याचा आदेश मी पाळू शकत नाही आणि यापुढे मला युद्धात भाग घ्यायची इच्छा नाही.—यशया २:४.
“यामुळे तुझे नाव खराब होईल आणि यापुढे तुला कोणत्याही संधी दिल्या जाणार नाहीत हे तुला ठाऊक आहे का?” असे माझ्या वरिष्ठांनी मला विचारले. त्यानंतर, ते माझ्याकडे दुर्लक्ष करू लागले. हे उलट बरेच झाले कारण मला लष्करी कार्यहालचालींसाठी बोलवले जायचे नाही. माझ्या घरातल्यांना आणि मित्रांना हे कळत नव्हते, की समाजात मिळालेले इतके विशेष स्थान मी कसे लाथाडू शकतो?
माझ्या लष्करातल्या कामगिरीमुळे अधिकारी मला खास वागणूक द्यायचे आणि माझे असे विश्वास असतानाही माझा आदर करायचे. पुढील दोन वर्षांपर्यंत मला मेडिकल लीव्ह देण्यात आली म्हणून मला कोणतेच काम करायची गरज नव्हती. त्यादरम्यान, माझी पत्नी आणि मी तिथल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीत सभांना उपस्थित राहायचो आणि इतरांना आमच्या नवीन विश्वासाबद्दल सांगायचोही.
शेवटी—ख्रिस्ताचा सैनिक!
शेवटी, १९५५ मध्ये मला लष्करातून मुक्ती मिळाली. त्यानंतर पंधरा दिवसांनी, मार्च १२ रोजी माझ्या पत्नीने आणि मी व्हर्सायमधील एका संमेलनात पाण्याच्या बाप्तिस्म्याने यहोवा देवाला केलेले समर्पण चिन्हांकित केले. आता माझी स्थिती बदलली असल्यामुळे, माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी मला दुसरी नोकरी शोधावी लागली. नंतरच्या चार वर्षांपर्यंत मी पॅरिसच्या ऑलमध्ये (मुख्य बाजारपेठेत) हमालाचे काम केले. ही तडजोड करणे माझ्यासाठी मुळीच सोपे नव्हते पण यहोवाने माझ्या परिश्रमावर आशीर्वाद दिला.
या अनेक वर्षांमध्ये माझ्या पत्नीने आणि मी अनेकांना बायबलचा संदेश स्वीकारायला मदत दिली आहे. मला ख्रिस्ती तटस्थतेच्या दृष्टिकोनाबद्दल वेगवेगळ्या लष्करातल्या आणि नागरिक अधिकाऱ्यांनाही समजावून सांगायला संधी मिळाली आहे. मी आधी सैनिक असल्यामुळे अनेकांना यहोवाच्या साक्षीदारांबद्दल जे पूर्वग्रह आहेत ते दूर करण्यात मला मदत मिळाली आहे. त्यामुळे युद्धांसंबंधी ख्रिस्ती लोकांच्या तटस्थ भूमिकेचे स्पष्टीकरण द्यायला आणि ख्रिस्ताच्या आधीच्या अनुयायांची देखील हीच भूमिका होती हे दाखवायला मला संधी मिळाली आहे. उदाहरणासाठी, प्राध्यापक सी. जे. कॉडू यांनी दि अर्ली चर्च ॲण्ड द वर्ल्ड या आपल्या पुस्तकात लिहिले: “मार्कस ऑरीलियसचे राज्य होते तोपर्यंत [१६१-१८० सा.यु.] तरी, कोणताही ख्रिस्ती बाप्तिस्मा घेतल्यावर सैनिक बनत नव्हता.”
सन १९७७ मध्ये माझी पत्नी वारली तेव्हा माझ्यावर सर्वात मोठे संकट कोसळले होते. ती जवळजवळ वर्षभर आजारी होती आणि मरेपर्यंत ती धाडसीपणाने आपला विश्वास व्यक्त करत होती. पुनरुत्थानाच्या अद्भुत आशेमुळेच मी तग धरून राहू शकलो. (योहान ५:२८, २९) मग, नियमित पायनियर—यहोवाच्या साक्षीदारांच्या पूर्णवेळेच्या सेवकांना असे म्हणतात—होण्यासाठी नाव दिल्यावर मला माझ्या दुःखातून सावरायला आणखीनच मदत मिळाली. सन १९८२ मध्ये मी कामावरून निवृत्त झालो तेव्हा हे केले. नंतर, १९८८ मध्ये मला पायनियरांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशालेत शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली तेव्हा मला त्याचा केवढा आनंद झाला!
माझी बायको मरण पावल्यानंतर मी अधूनमधून खिन्न व्हायचो. पण, आध्यात्मिकतेत मजबूत असलेल्या माझ्या मित्रमंडळीने मला पुन्हा सावरायला बरीच मदत केली आहे. अशा संकटांमध्येही मला यहोवाच्या शक्तीचा आणि प्रेमळ कृपेचा प्रत्यय आला आहे; त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांची तो काळजी घेतो. (स्तोत्र १८:२) मला असेही वाटते की, आपल्यावर येणाऱ्या संकटांमुळे आपल्याला आपली आध्यात्मिक लढाई लढत राहायला प्रशिक्षण मिळत असते. (१ पेत्र १:६, ७) मी मंडळीत वडील या नात्याने काम करत असल्यामुळे, खिन्न होणाऱ्या इतरांनाही मी मदत करू शकलो आहे.—१ थेस्सलनीकाकर ५:१४.
लहान असताना, पुढे सैनिक व्हावे हे माझे स्वप्न होते आणि एका अर्थाने मी आतापर्यंत सैनिकच आहे. मी एक सैन्य सोडून दुसऱ्या सैन्यात भरती झालो आणि “खिस्त येशूचा . . . शिपाई” बनलो आहे. (२ तीमथ्य २:३) आज, माझी प्रकृती बरी नसतानाही, ख्रिस्ताचा सैनिक म्हणून ‘सुयुद्धात’ लढत राहण्याचा मी सर्वस्वी प्रयत्न करतो; या सुयुद्धाला शेवटी विजय मिळेल आणि त्यामुळे आपल्या यहोवा देवाचा सन्मान आणि गौरवही होईल.—१ तीमथ्य १:१८.
हा लेख प्रकाशनासाठी तयार केला जात असताना मार्च १, १९९८ रोजी ल्वी लॉल्यॉ मरण पावले.
[१३ पानांवरील चित्र]
आमचे लग्न आणि लग्नाला दे लाटर दे टासीन्यी आलेले असताना
[१५ पानांवरील चित्र]
ल्वी लॉल्यॉ आणि त्यांची पत्नी रॅन, १९७६ मध्ये