रशियन कायदेमंडळाचा यहोवाच्या साक्षीदारांच्या बाजूने निर्णय
यहोवाच्या साक्षीदारांविषयी प्रसार माध्यमे अधिकृत माहिती देतात तेव्हा त्यांना आनंदच होतो. शिवाय, यहोवाचे साक्षीदार स्वतःविषयी, त्यांच्या धार्मिक विश्वासांविषयी आणि कार्यांविषयी खरी माहिती देण्यास नेहमीच इच्छुक असतात. पण कधीकधी, त्यांच्याविषयी छापलेली माहिती सत्याला धरून नसते किंवा त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने ती छापली जाते; अशा वेळी आपल्या धार्मिक आणि नागरी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ते सरकारी अधिकाऱ्यांकडे अपील करतात. अलीकडे घडलेले असेच एक उदाहरण पुढे दिले आहे.
ऑगस्ट १, १९९७ रोजी सेंट पिटर्सबर्गच्या कॉमसॉमॉलस्काया प्रावडा या प्रसिद्ध रशियन वृत्तपत्राने आपल्या एका प्रादेशिक पुरवणीत यहोवाच्या साक्षीदारांचे अगदी खोटे चित्र रेखाटणारा एक लेख छापला. “सेक्ट पिटर्सबर्ग. देअर विल बी ए सिटी-टेंपल हिअर,” अशा शीर्षकाच्या त्या लेखात, लेखक ऑलेग झासॉरीन यांनी असा दावा केला, की यहोवाचे साक्षीदार त्यांच्या विश्वासांद्वारे इतरांना नुकसान पोहंचवतात आणि त्यांच्या कार्यांद्वारे रशियन घटनेचे उल्लंघन करतात. याला आधार देण्यासाठी रक्त संक्रमण तसेच कौटुंबिक जीवन यांसंबंधी असलेले यहोवाच्या साक्षीदारांचे बायबल-आधारित विश्वास मुद्दामहून चुकीच्या दृष्टिकोनांतून मांडले होते. इतकेच नाही तर त्या लेखाने साक्षीदारांना “सेक्ट” [“पंथ”] असे एक लेबल चिकटवून काही लोकांना हा “सगळ्यात खतरनाक सेक्ट” वाटतो असे जाहीर केले.
रशियामध्ये असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रादेशिक धार्मिक संघटनेच्या प्रशासकीय केंद्राने, प्रसार माध्यम संबंधित वादविषय हाताळणाऱ्या रशियन संघराज्य अध्यक्षीय कायदेमंडळाला अपील केले; यामध्ये, यहोवाच्या साक्षीदारांनी सदर लेखात छापलेल्या माहितीवर पुनर्विचार करण्याची विनंती केली कारण त्यांच्या मते या लेखात छापलेली माहिती खोटी होती. फेब्रुवारी १२, १९९८ रोजी कायदेमंडळाच्या बैठकीत यहोवाच्या साक्षीदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि मंडळाच्या सदस्यांनी तसेच पत्रकारांनी आणि वकिलांनी विचारलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. यहोवाच्या साक्षीदारांचा नेमका काय विश्वास आहे आणि ते नेमके काय शिकवतात हे पाहण्यासाठी कायदेमंडळाच्या सदस्यांनी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या साहित्यांचे आणि खासकरून कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकाचे काळजीपूर्वक परीक्षण केले.
रशियन संघराज्याच्या राज्य मंत्रीमंडळाचे प्रतिनिधी व्ही. व्ही. बॉरशीओफ यांनी म्हटले की “सेक्ट्स” ही कल्पनाच मुळात नकारात्मक आहे. श्री. बॉरशीओफ यांनी म्हटले: ‘अशाप्रकारे कायदा हातात घेऊन एखाद्यावर लेबल चिकटवणे अतिशय घातक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही, की कायदेमंडळाने यहोवाच्या साक्षीदारांच्या खटल्याची वेळीच दखल घेतली. अधिकृत धार्मिक संस्थेवर केलेल्या अशा अपमानकारक मतांचा भडिमार थांबलाच पाहिजे.’
सर्व पुष्टीपुरावे ऐकून घेतल्यानंतर कायदेमंडळाने शेवटी म्हटले, की कॉमसॉमॉलस्काया प्रावडा यात छापलेला लेख अवैध असून नीतिमूल्यांना धरून नाही; असेही दिसून येते, की सदर लेखातील माहिती खोटी आणि निराधार आहे. “लेखकाने छापलेल्या कोणत्याही गोष्टींत काहीएक तथ्य नाही . . . लेखकाने अधिकृत माहितीचे रूप देऊन खरे तर अफवा पसरवल्या आणि असे करण्याद्वारे पत्रकारांच्या हक्कांचे उल्लंघन केले आहे,” असे कायदेमंडळाने म्हटले. वृत्तपत्रातील लेखाने जे काही सांगितले होते त्याच्या अगदी विपरीत कायदेमंडळाला दिसून आले, की यहोवाचे साक्षीदार कायद्याचे पालन करणारे आहेत आणि एकसारखा धार्मिक विश्वास नसणाऱ्या कौटुंबिक सदस्यांशी तसेच इतरांशी शांतीने राहायला ते आपल्या लोकांना शिकवतात.
शेवटचा पुरावा ऐकल्यानंतर कायदेमंडळाने आपला निर्णय जाहीर केला:
“१. ‘सेक्ट पिटर्सबर्ग. देअर विल बी ए सिटी-टेंपल हिअर,’ या लेखाचे ‘प्रसार माध्यमातून’ प्रकाशन करून रशियन संघराज्य कायद्यातील कलम ४, ४९ आणि ५१ च्या अटींचे उल्लंघन झाले आहे हे मान्य करावे.
“२. छापलेल्या माहितीसाठी जबाबदार असलेल्या रशियन संघराज्याच्या राज्य समितीने कॉमसॉमॉलस्काया प्रावडा वृत्तपत्राच्या संपादकीय मंडळाला लेखी ताकीद देण्याच्या बाबीवर पुनर्विचार करावा अशी शिफारस करण्यात यावी.
“३. पत्रकार ओ. झासोरीन यांना कडक ताकीद देण्यात यावी.
“४. कॉमसॉमॉलस्काया प्रावडा वृत्तपत्राच्या संपादकीय मंडळाने अशी अविश्वसनीय माहिती छापून यहोवाच्या साक्षीदारांच्या धार्मिक संस्थेची विनाकारण बदनामी केल्याबद्दल लेखी क्षमायाचना करावी.”
कायदेमंडळाने दिलेला हा निर्णय, धार्मिक विद्वान असलेल्या आणि तत्वज्ञानाचे सदस्य असलेल्या सीरजीया ईवानयेन्का यांनी काढलेल्या निष्कर्षांच्या एकमतात आहेत. यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्वासांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर आणि त्यांच्या सहवासात काही काळ राहिल्यानंतर श्री. ईवानयेन्का जे यहोवाचे साक्षीदार नाहीत त्यांनी एक लेख लिहिला; हा लेख मॉस्को न्यूजच्याa फेब्रुवारी २०-२६, १९९७ च्या अंकात आला होता. श्री. ईवानयेन्का यांनी शेवटी असे म्हटले: “यहोवाचे साक्षीदार, बायबलच्या एकमतात जीवन जगण्याच्या आपल्या दृढनिश्चयासाठी प्रसिद्ध आहेत. . . . यहोवाच्या साक्षीदारांसाठी बायबलच एक कायदे-संहिता, आचार-संहिता आणि परमसत्य आहे. . . . बायबल सत्याप्रती असलेल्या त्यांच्या भक्तीभावासाठी तसेच आपल्या विश्वासांच्या बाजूने निःस्वार्थपणे उभे राहण्याच्या त्यांच्या स्वेच्छेसाठी यहोवाचे साक्षीदार इतर नागरिकांसाठी खरंच एक आदर्श आहेत.”
कायदेमंडळाच्या निर्णयावरून आणि श्री. ईवानयेन्का यांच्या मतांवरून पुन्हा एकदा हेच सिद्ध होते की यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिश्चन धर्मापासून समाजाला कोणताही धोका नाही; उलट, तो सर्व प्रामाणिक लोकांना फायदा करून देतो. ‘त्यांच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास यहोवाचे साक्षीदार नेहमी सिद्ध असतात; तरी हे ते सौम्यतेने व भीडस्तपणाने करतात.’—१ पेत्र ३:१५.
[तळटीपा]
a “आपण यहोवाच्या साक्षीदारांना घाबरावे का?” असे शीर्षक असलेल्या श्री. ईवानयेन्का यांच्या लेखाचा अधिकतर भाग परवानगी घेऊन सावध राहा! मासिकाच्या ऑगस्ट २२, १९९७ (इंग्रजी) अंकात पृष्ठे २२-७ वर प्रकाशित करण्यात आला.