वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १२/८ पृ. १६-१८
  • मला आईवडिल का नाहीत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मला आईवडिल का नाहीत?
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तुमचा दोष नाही
  • आघातजन्य अनुभव
  • मदत मिळवणे
  • आपल्या पालकांची अंतःकरणे आनंदित करणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • पालकांनो आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • तरुणांनो, तुमच्या वागण्याचा तुमच्या आईवडिलांच्या मनावर परिणाम होतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • आईवडिलांनो आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 १२/८ पृ. १६-१८

तरुण लोक विचारतात . . .

मला आईवडिल का नाहीत?

“आईवडिल नसल्यामुळे माझं कसं होतं? खूप कठीण होतं असं मी म्हणेन—पुष्कळशा कारणांमुळे. आईवडिलांच्या प्रेमाची, मायेची सावली नसली की फार जड जातं—विशेषतः मोठं होत असताना.” —ह्वाकीन.

“सगळ्या आईवडिलांना रिपोर्ट कार्डावर सही करायला शाळेत बोलवायचे ना, तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. खूप दुःख व्हायचं, एकटं एकटं वाटायचं. आजही कधी कधी मला असंच वाटतं.”—१६ वर्षांची आबलीना.

लाखो लाख तरुणांना आईवडिल नाहीत—ही आपल्या काळाची शोकांतिकाच म्हणावी आणखी काय. पूर्व युरोपमध्ये युद्धामुळे हजारो मुलं अनाथ झाली आहेत. आफ्रिकेतही एड्‌सच्या साथीने असाच धुमाकूळ घातला आहे. काही मुलांना तर पालकांनी चक्क टाकून दिलंय. युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तींमुळं कुटुंबांची ताटातूट झालीय.

बायबलच्या काळातही असले प्रकार सर्रास घडायचे. उदाहरण द्यायचं झालं, तर बायबलमध्ये वारंवार अनाथ मुलांच्या दयनीय स्थितीचा उल्लेख केला आहे. (स्तोत्र ९४:६; मलाखी ३:५) त्या काळी युद्धं आणि इतर विपत्तींमुळेही कुटुंबांची ताटातूट व्हायची. बायबलमध्ये, अशाचप्रकारे आपल्या आईवडिलांपासून विलग झालेल्या एका लहान मुलीविषयी सांगितलं आहे; सिरियन लोकांनी तिला दास बनवून नेलं होतं.—२ राजे ५:२.

कदाचित आईवडिल नसलेल्या लाखो मुलांपैकी तुम्ही एक असाल. तसं असल्यास, ही स्थिती केवढी निराशजनक असू शकते याची तुम्हाला चांगलीच जाणीव असेल. पण हे सगळं तुमच्यावरच का ओढवलं?

तुमचा दोष नाही

देव मला शिक्षा तर देत नाही ना, असं तुम्हाला वाटतं का? किंवा तुमचे आईवडिल वारले म्हणून तुम्हाला खूप राग येतो का—जणू त्यांनी मुद्दामहून असं केलं. सर्वात आधी, तुम्ही निर्धास्त राहा कारण देवाला तुमच्यावर मुळीच राग नाही. तुमचे आईवडिलही तुम्हाला मुद्दामहून सोडून गेलेले नाहीत. मरण हे अपूर्ण मानवजातीच्या वाट्याला येणारी दुःखद गोष्ट आहे आणि काहीवेळा मुलं लहान असतानाच त्यांच्या आईवडिलांवर ही विपत्ती कोसळते. (रोमकर ५:१२; ६:२३) पुराव्यानुसार आपल्याला कळतं की, खुद्द येशू ख्रिस्ताचे पृथ्वीवरील वडील, योसेफ, मरण पावले.a निश्‍चितच, येशूने काही पाप केल्यामुळं हे घडलं नव्हतं.

शिवाय, आपण ‘कठीण दिवसांमध्ये’ जगत आहोत हेसुद्धा लक्षात घ्या. (२ तीमथ्य ३:१-५) या शतकात, हिंसा, युद्ध आणि गुन्हेगारी यांच्यामुळे समाजातल्या सर्व थरांतल्या लाखो लोकांचे प्राण गेले आहेत. बाकीचे “कालवश व दैववश” झाले आहेत; ही स्थिती कोणावरही येऊ शकते. (उपदेशक ९:११) आईवडिलांचा मृत्यू म्हणजे अत्यंत दुःखाची गोष्ट आहे, पण यात तुमचा काहीच दोष नाही. स्वतःवर दोष लावत राहण्याऐवजी किंवा दुःखात बुडून जाण्याऐवजी पुनरुत्थानाविषयी देवाने दिलेल्या वचनातून सांत्वन मिळवा.b येशूने भाकीत केले: “ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८, २९) सुरवातीला उल्लेखलेली आबेलीना म्हणते: “यहोवावर माझं प्रेम आहे आणि पुनरुत्थानाची आशा आहे त्यामुळेच मला खूप दिलासा मिळाला आहे.”

तुमचे आईवडिल जिवंत असले, पण त्यांनी तुम्हाला टाकून दिलंय अशी स्थिती असली तर काय? आईवडिलांनी मुलांना वाढवावं आणि त्यांचं पालनपोषण करावं ही देवाची अपेक्षा आहे. (इफिसकर ६:४; १ तीमथ्य ५:८) दुःखाची आणि धक्केदायक गोष्ट म्हणजे, काही आईवडिल “ममताहीन” बनले आहेत. (२ तीमथ्य ३:३) इतरांच्या बाबतीत पाहिलं तर, दारिद्र्‌य, अंमली पदार्थांचे व्यसन, तुरुंगवास किंवा दारूचं व्यसन यांच्यामुळं मुलांना टाकून देण्यात आलं आहे. काही आईवडिलांनी चक्क स्वार्थापोटीसुद्धा आपल्या मुलांना टाकून दिलं आहे. कारण काहीही असलं, तरी आईवडिलांपासून दूर होणं अतिशय दुःखाची गोष्ट आहे. पण याचा अर्थ तुमच्यात काहीतरी खोट आहे किंवा तुम्ही दोषभावनेनं कुढत राहावं असा होत नाही. उलट, तुमच्या पालनपोषणाविषयी तुमच्या आईवडिलांना देवाला जाब द्यावा लागेल. (रोमकर १४:१२) अर्थात, आईवडिलांच्या हाताबाहेर असलेल्या परिस्थितींमुळे, नैसर्गिक विपत्तीमुळे म्हणा किंवा आजारपणामुळे म्हणा जर तुम्ही त्यांच्यापासून विलग झाला असला, तर दोष कोणाचाही नाही! पुन्हा भेटण्याची शक्यता असते; ही शक्यता काहीवेळा फार कमी असली तरीही.—पडताळा उत्पत्ति ४६:२९-३१.

आघातजन्य अनुभव

दरम्यान, तुमच्यासमोर अनेक गंभीर समस्या येतील. युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंडने चिल्ड्रन इन वॉर नावाच्या अभ्यासात असे स्पष्ट झाले: “पूर्णतः निराधार असलेली मुलेच संकटांना अधिककरून बळी पडत असतात—त्यांनाच . . . रोजीरोटी मिळवणेसुद्धा कठीण असते, नॉर्मल वाढीला आवश्‍यक असणारा आधार मिळत नाही आणि त्यांच्यावर अत्याचारही होतो. आईवडिलांपासून विलग होणे मुलांसाठी सर्वाधिक आघातजन्य असू शकते.” कदाचित तुम्ही सतत दुःखित किंवा निराशित असाल.

आधी उल्लेखिलेल्या ह्वाकीनला आठवा. त्याचे आईवडिल वेगळे झाले आणि मग त्याला व त्याच्या भावंडांना दोघांनीही टाकून दिलं. त्यावेळी तो फक्‍त वर्षाचा होता; त्याच्या बहिणींनी त्याला वाढवलं. तो म्हणतो: “मी विचारायचो, ‘माझ्या मित्रांसारखे आईवडिल मला का नाहीत?’ कुणा लहान मुलासोबत त्याचे पप्पा खेळताहेत असं मी कुठं पाहिलं तर वाटायचं ते माझे पप्पा असते तर!”

मदत मिळवणे

आईवडिलांविना लहानाचं मोठं होणं कठीण असलं, तरी तुम्ही जीवनात अपयशी ठरणार असा त्याचा अर्थ होत नाही. मदत आणि आधार मिळाला, तर जीवनातल्या समस्यांनाच केवळ तोंड देता येणार नाही पण जीवनात यशस्वी देखील होता येईल. तुमच्या वाट्याला सतत दुःख आणि निराशाच येत असेल, तर यावर तुमचा विश्‍वास बसणार नाही. पण, या भावना अगदी नॉर्मल आहेत आणि नेहमीच तुम्हाला असं वाटत राहणार नाही. उपदेशक ७:२, ३ इथं आपल्याला वाचायला मिळतं: “भोजनोत्सवगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे . . . हसण्यापेक्षा खेद करणे बरे; मुद्रा खिन्‍न असल्याने मन सुधारते.” होय, एखादी भयंकर दुर्घटना घडते तेव्हा रडण्यात किंवा शोक करण्यात काही गैर नसतं, उलट ते आरोग्याला चांगलं असतं. एखाद्या समंजस मित्राला अथवा मैत्रिणीला किंवा मंडळीतल्या कोणा प्रौढ व्यक्‍तीला सर्वकाही सांगितल्याने आणि आपल्या दुःखाविषयी बोलल्याने देखील मदत मिळू शकते.

हे खरं की, कोणाच्यात मिळूमिसळू नये, कोणाशी बोलू नये असं तुम्हाला वाटेल. पण नीतिसूत्रे १८:१ मध्ये असा इशारा आहे: “जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो.” त्याउलट, कोणी चांगलं, समंजस असेल तर त्यांची मदत घ्यावी. नीतिसूत्रे १२:२५ म्हणते: “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करितो.” तुम्ही आपल्या ‘चिंतेविषयी’ जोपर्यंत कोणाला सांगणार नाही तोपर्यंत असा “गोड शब्द” तुम्हाला ऐकायला मिळणार नाही.

तुम्ही कोणाशी बोलू शकता? ख्रिस्ती मंडळीचा आधार घ्या. येशू असं वचन देतो की, तिथं तुमच्यावर प्रेम करणारे आणि तुमची चिंता करणारे “भाऊ, बहिणी, आया” तुम्हाला भेटतील. (मार्क १०:३०) ह्वाकीन आठवून सांगतो: “मी ख्रिस्ती भाऊबहिणींच्यात मिळूमिसळू लागलो तेव्हा जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागलो. सभांमध्ये नियमितपणे जाऊ लागल्यामुळे मी यहोवावर आणखी प्रेम करू लागलो आणि मला त्याची सेवा करावीशी वाटू लागलं. प्रौढ बांधवांनी माझ्या भावंडांना आध्यात्मिक मदत आणि सल्ला दिला. आज, माझे काही भावंडं पूर्ण-वेळेचे सेवक आहेत.”

हेसुद्धा लक्षात असू द्या की, यहोवा हा “पितृहीनांचा पिता” आहे. (स्तोत्र ६८:५, ६) बायबलच्या काळात, अनाथांना दया दाखवावी आणि त्यांच्यावर अन्याय करू नये असं देवाने त्याच्या लोकांना शिकवलं होतं. (अनुवाद २४:१९; नीतिसूत्रे २३:१०, ११) त्याचप्रमाणे, आज आईवडिल नसलेल्या मुलांबद्दलही त्याला तितकीच चिंता वाटते. म्हणून, देवाला तुमची काळजी आहे आणि तो निश्‍चित तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल अशी खात्री बाळगून त्याला प्रार्थना करा. राजा दावीदाने लिहिलं: “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्‍वर मला जवळ करील. परमेश्‍वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर.”—स्तोत्र २७:१०, १४.

तरीपण, आईवडिल नसलेल्या मुलांना दररोज कोणत्या ना कोणत्या अडचणींना तोंड द्यावंच लागतं. राहणार कुठं? पैसे कुठून येणार? या काही अडचणींना यशस्वीपणे तोंड कसं देता येईल याविषयी पुढच्या लेखात चर्चा केली जाईल.

[तळटीपा]

a मरणाआधी येशूने शिष्य योहानाला आपल्या आईची काळजी घ्यायला सांगितलं; त्याचे पृथ्वीवरील वडील, योसेफ, जिवंत असते तर त्याने हे केलं नसतं.—योहान १९:२५-२७.

b आईवडिलांचा मृत्यू झाल्यामुळे परिस्थितीला तोंड कसं द्यावं यावरील माहितीसाठी, सावध राहा! (इंग्रजी) नियतकालिकाच्या ऑगस्ट २२ आणि सप्टेंबर ८, १९९४ अंकातील “तरुण लोक विचारतात . . . ” हे लेख पाहा.

[१७ पानांवरील संक्षिप्त आशय]

“यहोवावर माझं प्रेम आहे आणि पुनरुत्थानाची आशा आहे त्यामुळेच मला खूप दिलासा मिळाला आहे.”

[१७ पानांवरील चित्र]

काहीवेळा खूप एकटेपणा जाणवेल

[१८ पानांवरील चित्र]

मंडळीमध्ये मदत आणि उत्तेजन देणारे मित्रमैत्रिणी मिळू शकतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा