व्हिक्टोरिया सरोवर—आफ्रिकेचा विशाल अंतर्देशीय समुद्र
आफ्रिकेतील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
सन १८५८ मध्ये, आफ्रिकेच्या दाट जंगलातून, कोणी कधी पाय ठेवला नसेल अशा वाटेने एक इंग्रज एका अत्यंत खडतर प्रवासाला निघाला होता. सोबतीला मोजून दोनचार आफ्रिकन हमाल होते. आजारपण, थकवा आणि मनात असंख्य शंकाकुशंका होत्या; तो अगदी बेजार झाला होता. पण कसाबसा आपल्या माणसांना पुढे चालत राहण्याचा आग्रह करत राहिला. जॉन हॅनीन स्पिक नावाचा हा इंग्रज एका महाकठीण कामगिरीवर अर्थात नाईल नदीचे उगमस्थान शोधून काढण्याच्या कामगिरीवर निघालेला होता.
आफ्रिकन लोकांना गुलाम करून नेण्यासाठी येणाऱ्या अरेबियन व्यापाऱ्यांनी या विशाल सरोवराविषयी, ज्याला ते युकेरेवे म्हणत, बरेच काही सांगितलेले होते. त्यामुळे स्पिकची उत्सुकता वाढली आणि तो त्या न संपणाऱ्या दाट जंगलातून वाट काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत राहिला. चक्क २५ दिवस पायपीट केल्यानंतर प्रवास करणाऱ्या या लहानशा पथकाला शेवटी आपल्या कष्टाचे फळ मिळालेच; त्यांच्यासमोर, नजर पोहंचेल तिथपर्यंत गोड्या पाण्याचा भला मोठा समुद्र पसरला होता. आपल्या या अनुभवाविषयी लिहिताना स्पिकने म्हटले: “नदीच्या ज्या उगमस्थानाविषयी इतके तर्कवितर्क केले जात होते आणि जे अनेक शोधकांचे एकमेव लक्ष्य बनले होते ते उगमस्थान म्हणजे माझ्यापुढे असणारे ते सरोवरच होते याबद्दल त्याक्षणी मला शंभर टक्के खात्री पटली होती.” त्याने नव्यानेच गवसलेल्या या सरोवराला इंग्लंडमध्ये त्या काळी राज्य करणाऱ्या राणीचे नाव, अर्थात व्हिक्टोरिया हे नाव दिले.
नाईलचे उगमस्थान
आजही हे सरोवर याच नावाने ओळखले जाते; आणि उत्तर अमेरिकेतील लेक सुपिरियरच्या पाठोपाठ, व्हिक्टोरिया एकमेव मोठे सरोवर असून जगात गोड्या पाण्याचे सगळ्यात मोठे सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. विषुववृत्तावरील तळपत्या सुर्यप्रकाशात, एखाद्या मोठ्या आरशाप्रमाणे चकाकणाऱ्या व्हिक्टोरिया सरोवराचे क्षेत्रफळ ६९,४८४ चौरस किलोमीटर आहे. या सरोवराच्या उत्तरेच्या टोकावरून विषुववृत्त गेला असून ग्रेट रिफ्ट खोऱ्याच्या पूर्व-पश्चिमेच्या मधोमध ते येते. सरोवराचा पुष्कळसा भाग टान्झानिया आणि युगांडामध्ये आहे तर किंचित भाग केनियाच्या सीमेवर येतो.
टान्झानियात कागेरा नावाची एक नदी आहे ज्यात बरेचसे पाणी रूआंडाच्या पर्वतांवरून वाहत येते; हीच नदी व्हिक्टोरिया सरोवरात पुष्कळसे पाणी आणते. पण, व्हिक्टोरिया सरोवराला मिळणारे सर्वात जास्त पाणी सभोवतालच्या अवाढव्य पाणलोट क्षेत्रात जमलेले पावसाचे पाणी असून या क्षेत्राचे क्षेत्रफळ २,००,००० चौरस किलोमीटरहून अधिक आहे. सरोवरातले पाणी केवळ एकाच मार्गाने बाहेर पडते. युगांडातील जिंजा या ठिकाणी, सरोवरातले पाणी उत्तरेच्या दिशेने वाहून व्हाईट नाईलला जन्म देते. व्हिक्टोरिया सरोवर हे नाईल नदीचे एकमेव उगमस्थान नसले तरी ते एक मोठे जलाशय असून या सरोवरातून नाईल नदीत सतत गोड्या पाण्याचा प्रवाह सुरूच असतो, शिवाय यातले पाणी ईजिप्तपर्यंत वनजीवनाला आणि प्राणीमात्रांना अत्यंत उपयोगी पडते.
सरोवरावरचे जीवन
एक लहानशी नौका संथपणे सरोवरावर तरंगत असते; नौकेची फुगलेली पांढरी शीड फुलपाखराच्या पंखासारखी दिसते. दररोज सभोवतालच्या प्रदेशातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ही छोटीशी नौका वाहत वाहत सरोवराच्या मध्यभागी येते. मग दुपारी वाऱ्याचा प्रवाह बदलतो तेव्हा नौका पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी परतते. वर्षांनुवर्षे सरोवरावरील कोळी हा खेळ पाहत आले आहेत.
व्हिक्टोरिया सरोवर हे खेड्यापाड्यांनी वेढलेले असून किनाऱ्याजवळ वाळलेल्या गवताचे छप्पर असलेल्या झोपड्या पाहायला मिळतात. नाईल नदीपाशी राहणाऱ्या लोकांच्या जेवणात मासा असलाच पाहिजे आणि त्यासाठी खरे तर हे लोक पूर्णपणे या सरोवरावर अवलंबून असतात. म्हणूनच, आपले काम सुरू करण्यासाठी कोळी सूर्य उगवण्याची वाट पाहत बसत नाही. आपल्या गळक्या नौकांमधले पाणी बाहेर टाकून माणसे पहाटेच्या धुक्यात समुद्र प्रवासाला निघतात. मग एका सुरात गाणी गात गात ते खोल पाण्याच्या दिशेने नौका वल्हवत, आपल्या नौकांच्या जुन्या-फाटक्या शिडा उंचावतात. क्षितिजावर या नौका दृष्टिआड होईपर्यंत किनाऱ्यावरून बायाबापड्या पाहत असतात. पण मग, लगेच त्याही आपापल्या कामाला लागतात.
उथळ पाण्यात पोरेबाळे एकमेकांवर पाणी उडवत, खेळत असतात तोवर बायाबापड्या सरोवरावर कपडे धुण्याचे आणि पिण्याचे पाणी भरण्याचे आपले काम उरकून घेतात. सरोवरावरची पाण्याची कामे उरकल्यानंतर डोक्यावर पाण्याचे मडके घेऊन, पाठीवर तान्हुल्यांना बांधून, दोन्ही हातात धुतलेले कपडे घेऊन त्या हळूहळू घराकडे निघतात. घरी आल्यावर त्या माक्याच्या आणि बीन्सच्या लहान बागेत काम करतात, सरपण गोळा करतात आणि शेणराखेच्या मिश्रणाने आपल्या मातीच्या झोपड्या सारवतात. किनाऱ्यावर आणखीन दूर पाहिले तर स्त्रिया सफाईदारपणे साईसल गवतापासून मजबूत रशा आणि सुरेख टोपल्या विणताना दिसतात. नौका बनवण्याकरता लाकडाचा मोठा ओंडका तोडणाऱ्या माणसांच्या कुऱ्हाडीचा आवाज सर्वत्र घुमतो.
मग मावळतीला, बायाबापड्यांच्या नजरा पुन्हा समुद्राकडे खेचल्या जातात. क्षितिजावर पांढऱ्या शिडांची टोके दिसताच माणसे परतल्याची चाहूल लागते. आपल्या पतींना भेटण्यासाठी आणि त्यांनी आणलेले मासे पाहण्यासाठी स्त्रिया या वेळेची मोठ्या आतुरतेने, आशेने वाट पाहातात.
आज हा कोळी समाज, सरोवराच्या किनाऱ्यांवर आणि बेटांवर शांतीचा संदेश आणणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करत आहे. पायी आणि नौकेतून प्रवास करून हे पाहुणे हरएक खेड्यापाड्यात जातात. तिथले लोक नम्र असून संदेश ऐकण्यास अगदी उत्सुक आहेत. आपल्या स्वतःच्या निलोटिक आणि बान्टू भाषांमध्ये छापलेले बायबल साहित्य वाचण्यात तर त्यांना खूपच आनंद होतो.
पाण्यातले प्राणीजीवन
व्हिक्टोरिया सरोवरामध्ये माशांच्या ४०० हून अधिक जाती असून यांच्यापैकी काही तर जगात कोठेच सापडणार नाहीत. यातली सगळ्यात सर्वसामान्य जात म्हणजे सिखलीड. या लहान, रंगीबेरंगी माशांना त्यांच्या रंगारूपानुसार मजेदार नावे दिलेली आहेत जसे की फ्लेमबॅक, पिंक फ्लश आणि किसूमू फ्रॉगमाउथ. सिखलीड जातीचे काही मासे अतिशय विलक्षण पद्धतीने आपल्या लहानग्यांचे संरक्षण करतात. धोक्याची चाहूल लागताच मोठे मासे आपले आपले तोंड उघडून लहान माशांना आत घेतात. धोका टळल्यावर त्यांना पुन्हा बाहेर सोडून देतात.
याशिवाय, व्हिक्टोरिया सरोवर हे एकाहून एक सुंदर सागरी पक्ष्यांचे नंदनवन देखील आहे. ग्रेब, करढोक आणि ॲन्हिंगास पक्षी पाण्यात सूर मारतात आणि आपल्या टोकदार चोचींनी माशाला टोचून बरोबर पकडतात. बगळे, बक, करकोचे, दर्वीमुख हे पक्षी उथळ पाण्यातून चालताना दिसतात. आपल्या हद्दीत एखादा मासा पोहत आला की लगेच त्याला पकडण्यासाठी ते एका पायावर अगदी स्तब्ध उभे असतात. वर आकाशात संचार करणारे पेलिकन पक्ष्यांचे थवेच्या थवे मोठ्या पोटाच्या विमानांसारखे दिसतात. कळपाने पोहताना ते एकसाथ पोहणाऱ्या एकाच जातीच्या माशांना घेरून आपल्या भल्यामोठ्या पिशवीसारख्या चोचींनी त्यांच्यावर तुटून पडतात. मजबूत पंखांचा फिश ईगल पक्षी जणू आकाशावर साम्राज्यच गाजवतो. झाडाच्या डहाळीवरून, पाण्यापासून खूप उंच उडाल्यानंतर आपल्या ताठ पंखांनी वाऱ्याचा प्रवाह चिरत, जबरदस्त झेप घेत तो खाली येतो आणि एखादा मासा सहज उचलून नेतो. उत्कृष्ट घरटी बांधणारे, झगझगीत रंगांचे डुडा पक्षी सरोवराच्या सभोवताली असलेल्या पपायरस बोरूच्या गर्द झाडींमध्ये आपले घरटे बांधतात तर हॉर्नबिल पक्ष्याचा शोकाकूल आवाज किनाऱ्यावरील बाभळीच्या रानावनापर्यंत ऐकू येतो.
सकाळ-संध्याकाळच्या वेळी सरोवराच्या संथ पाण्यातून दूरपर्यंत पाणघोड्यांचा घोगरा आवाज ऐकू येतो. दुपारच्या वेळी ते किनाऱ्यावर झोप काढतात तेव्हा उथळ पाण्यावर दिसणारे त्यांचे शरीर गुळगुळीत, राखाडी खडकांसारखे वाटतात. सरोवरापाशी राहणारे लोक नाईल मगरींपासून फारच जपून राहतात. पुष्कळशा मनुष्याने मारल्या असल्या तरी काही भयानक मगरी आजही व्हिक्टोरिआ सरोवराच्या दूरदूरच्या कोपऱ्यांत आढळतात.
धोक्यात आलेले सरोवर
जॉन हॅनीन स्पिकला पहिल्यांदा व्हिक्टोरिया सरोवर दिसले तेव्हापासून आफ्रिकेची लोकसंख्या कमालीची वाढली आहे. आज या सरोवराच्या किनारपट्ट्यांवर तीन कोटी लोक राहतात आणि पोटापाण्यासाठी ते या गोड्या पाण्यावरच विसंबून आहेत. पूर्वी तिथले कोळी मासे पकडण्यासाठी जुन्या पद्धतींचा उपयोग करायचे. उदाहरणार्थ, मासे धरण्यासाठी विणलेले सापळे, पपायरसचे जाळे, गळ आणि भालेबरची यांच्या साहाय्याने ते आवश्यक तितके मासे पकडायचे. आज मात्र दूर पल्ल्यापर्यंत वापरता येणाऱ्या आणि खोल पाण्यातून टनच्या टन मासे बाहेर काढण्यासाठी मच्छीमारीच्या बोटी, माशांचे कल्ले अडकून मासे पकडण्याचे नायलॉनचे जाळे उपलब्ध असल्यामुळे सरोवरातले प्राणी जीवन धोक्यात आले आहे.
माशांच्या विदेशी जातींमुळे सरोवराचे नैसर्गिक संतुलन बिघडले आहे आणि लोकांच्या मच्छीमारीच्या कामावर विपरीत परिणाम झाला आहे. या सगळ्यात भर पडते ती वॉटर हायसिंथची; ही पाण्यावर तरंगणारी एक प्रकारची वनस्पती असून तिला जांभळ्या रंगाची सुंदर फुले येतात. दक्षिण अमेरिकेतून आणलेली ही वनस्पती इतक्या झपाट्याने वाढते, की सरोवराच्या किनाऱ्याचा आणि खाडीचा बराचसा भाग या वनस्पतीने दाटला असून मालाची ने आण करणाऱ्या जहाजांना, प्रवाशांची ने-आण करणाऱ्या होड्यांना आणि कोळ्यांच्या नौकांना किनाऱ्याला आणि धक्क्याला लागणे अतिशय कठीण जाते. सरोवराच्या पाणलोट क्षेत्राची जंगलतोड, मल उत्सर्जन आणि औद्योगिकरण या सर्वांमुळे सरोवराचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे.
त्यामुळे व्हिक्टोरिया सरोवर टिकून राहील की नाही असा एक प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नावर बरेच मतभेद असून सरोवराच्या अनेक समस्या कशा काय सुटू शकतील हे कोणीच सांगू शकत नाही. पण, व्हिक्टोरिया सरोवर हे नैसर्गिक सौंदर्य असून देवाचे राज्य “पृथ्वीची नासाडी” करणाऱ्या लोकांचा समूळ नाश केल्यानंतरही कदाचित नैसर्गिक सौंदर्याने नटलेले व्हिक्टोरिया सरोवर पृथ्वीवर टिकून राहील.—प्रकटीकरण ११:१८.
[२४ पानांवरील चौकट/चित्र]
सरोवराला खायला उठलेला मासा
तो तेलकट आहे, आधाशी आहे; त्याची संतती झपाट्याने वाढते आणि तो सहा फूट लांब वाढतो. तो कोण? हा आहे लेटेस निलोटीकस! नाईल मासा म्हणून प्रसिद्ध असलेला आणि १९५० च्या दशकात पहिल्यांदा व्हिक्टोरिया सरोवरात आणलेला हा मोठा, आधाशी मासा सरोवरातील प्राणी जीवनासाठी शाप ठरला आहे. याचे कारण केवळ ४० वर्षांत त्याने सरोवरातल्या जवळजवळ ४०० माशांच्या मूळ जाती फस्त केल्या. मोठ्या प्रमाणात लुप्त झालेल्या या माशांमुळे तिथल्या लाखो लोकांच्या पोटाचे आबाळ झाले आहेत कारण या लोकांची गुजराण तिथल्या टिलापिया, सिखलीड आणि इतर माशांवरच होत असते. शिवाय, हे लहान मासे सरोवराला शुद्ध ठेवण्याचेही काम करतात. यांच्यापैकी काही, बिलहार्जिया नावाच्या प्राणघातक रोगाला जन्म देणाऱ्या गोगलगाई खाऊन जिवंत राहतात. अशाप्रकारे, ते रोगराई आटोक्यात आणतात. इतर मासे भरभराटीने वाढणारे शेवाळ आणि पाण्यातली इतर वनस्पती फस्त करतात. आता मात्र भरभराटीने वाढणाऱ्या या वनस्पतींमुळे युट्रोफिकेशन स्थिती निर्माण झाली आहे; ही अशी एक स्थिती असते ज्यात सडलेल्या वनस्पतींमुळे पाण्यातले ऑक्सिजनचे प्रमाण घटते. या नको असणाऱ्या वनस्पती फस्त करणाऱ्या माशांची संख्या घटल्यामुळे “डेड झोन्स” म्हणजे ऑक्सिजन नसलेली क्षेत्रे वाढून आणखीन मासे मारले गेले आहेत. माशांच्या संख्येत घट झाल्यामुळे सदा भुकेला असलेल्या नाईल माशाच्या पोटाचेही आबाळ होऊन आता त्याने आपला रोख दुसरीकडे म्हणजे आपल्याच जातीच्या लहान माशांकडे वळवला आहे! त्यामुळे सरोवराला खायला उठलेला हा मासा आता स्वतःलाच खाऊन टाकतो की काय अशी एक भीती निर्माण झाली आहे!
[२१ पानांवरील नकाशा]
(For fully formatted text, see publication)
युगांडा
केनिया
टान्झानिया
व्हिक्टोरिया सरोवर
[२१ पानांवरील चित्र]
व्हिक्टोरिया सरोवराच्या किनारपट्टीवर साक्षीकार्य करताना
[२२ पानांवरील चित्र]
विणकर पक्षी
[२२, २३ पानांवरील चित्र]
पेलिकन
[२३ पानांवरील चित्र]
एगरेट
[२३ पानांवरील चित्र]
नाईल मगर
[२३ पानांवरील चित्र]
पाणघोड्यावर बसलेला करकोचा