वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १२/८ पृ. १४-१५
  • वास्को द गामा नावाचा स्मारक पूल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वास्को द गामा नावाचा स्मारक पूल
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उत्सवी सोहळ्याने उद्‌घाटन
  • वाढती गरज
  • पुलावरून प्रवास
  • सुरक्षा उपाय
  • परिस्थितीकीची आव्हानं
  • टॉवर ब्रिज लंडनचे प्रवेशद्वार
    सावध राहा!—२००७
  • पूल—नसते तर?
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—२०००
  • लहान बेटाचे व्यस्त विमानतळात परिवर्तन
    सावध राहा!—१९९८
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 १२/८ पृ. १४-१५

वास्को द गामा नावाचा स्मारक पूल

पोर्तुगालमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

बघावं तिकडं पोर्तुगालच्या वृत्तपत्रांमध्ये एकच बातमी—युरोपमधील सर्वात लांब पुलाचं अलीकडेच फटाके उडवून धूमधडाक्यात उद्‌घाटन करण्यात आलं. मार्च २९, १९९८ रोजी, १७.२ मीटर पल्ल्याच्या वास्को द गामा पुलाचं उद्‌घाटन झालं. १५ व्या शतकात, पश्‍चिम युरोप ते भारतापर्यंत जलमार्ग सुरू केलेल्या पोर्तुगाली नाविकाचं नाव या पुलाला देण्यात आलं आहे. या पुलावरून पोर्तुगालच्या उत्तरेकडील उद्योगक्षेत्रात, आल्गार्व येथील दक्षिणेतल्या पांढऱ्‍या शुभ्र किनाऱ्‍यांकडे आणि स्पेनला जाण्याचे नवीन मार्ग खुले झालेत.

जगात सर्वात लांब असलेल्या पुलांपैकी हा पाचवा पूल असून, पोर्तुगालची राजधानी, लिस्बन ते दक्षिण किनाऱ्‍यावरील मॉन्टीहो शहरापर्यंत हा पूल तेगस नदीच्या खाडीवरून जातो. या पुलाच्या ८२६ मीटर लांबीच्या निलंबित भागामुळे ४५ मीटर खाली असलेल्या मोठाल्या जहाजांची यातायात होऊ शकते.

उत्सवी सोहळ्याने उद्‌घाटन

खरोखरचं उद्‌घाटन होण्याच्या एक आठवड्याआधीच मोठी पार्टी देऊन उद्‌घाटन समारंभाची सुरवात झाली. होय, रविवार, मार्च २२ रोजी सगळेजण सातव्या आस्मानात होते; १५,००० लोकांना फेझुआदु किंवा घेवड्याचं सुप या पारंपरिक भोजनासाठी आमंत्रण दिलं होतं. इतक्या लोकांना बसवणार कुठं? नवीन पुलावर, आणखी कुठे! पुलावर ५ किलोमीटरपर्यंत टेबल मांडल्याचं ते दृश्‍य अगदी पाहण्यालायक होतं! जेवणाचा बेत पूर्णतः सफल झाला आणि लोकांनीही त्याचं तोंडभरून कौतुक केलं.

वाढती गरज

असा हा पूल आवश्‍यक का होता? लिस्बनमध्ये, १९६६ सालापासून २५ एप्रिलचा १,०१३ मीटर पल्ल्याचा पूल वापरण्यात येत होता. दररोज किमान १,३०,००० गाड्यांची वाहतूक होती. घाईगर्दीच्या वेळी आणि शनिवार-रविवारच्या जोडसुटीला केवढी दाटी होत असेल याची कल्पना तुम्हाला येते का? लिस्बन ते पोर्तुगालच्या दक्षिणेपर्यंतच्या प्रवासाला आरामात एक-दोन तास लागायचे. म्हणून त्यांना पर्यायी मार्ग काढावा लागला. आधीच्या पुलापासून १३ किलोमीटर अंतरावर बांधलेल्या या नवीन पुलाच्या सहा मार्गांमुळे वाहतुकीची कोंडी कमी झाली. त्याची रचना अशी करण्यात आली की, एका दिवसाला वाहनांची संख्या ५२,००० इतकी वाढली तर दोन्ही दिशांनी एक-एक जादा मार्ग जोडण्यात येऊ शकतो. प्रती तासाला १०० किलोमीटर वेगमर्यादेने वाहतूक पुढे भरभर जात राहील अशी आशा केली जाते.

पुलावरून प्रवास

दक्षिणेकडून मॉन्टीहोतून आम्ही पुलावर प्रवेश करत आहोत; तुम्हीही आमच्यासोबत या. जमीन आणि दलदलीला मागे टाकून आता आपण तेगस नदीच्या १० किलोमीटरच्या भागात आहोत. भरतीची वेळ असून सगळीकडे पाणीच पाणी आहे. ॲन्टीस्किड पेव्हमेंट आणि पुलाला आधार देणारे १,५०० खांब असल्यामुळे पुलावर सुरक्षित वाटतं.

आता पुलाच्या निलंबित भागावर आपण येऊन पोचलोय. हा भाग ताणलेल्या दोरखंडांनी आधारलेला आहे; हे दोरखंड १५० मीटर उंचीच्या बुरूजांवरून जहाजाच्या प्रचंड मोठ्या शिडांसारखे पसरलेले दिसतात. आधारस्तंभांचा पाया ५० ते ६५ मीटर खोलपर्यंत रोवलेला आहे. आणखी सुरक्षेसाठी, ताशी २२० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्‍या वाऱ्‍याचा प्रतिरोध करता येईल आणि १७५५ साली लिस्बनचा पुष्कळसा भाग ज्या भूकंपाने नष्ट झाला त्या भूकंपापेक्षा साडे चार पटीने अधिक भूकंपाचे हादरे पेलता येतील असा हा पूल बनवला आहे.

वास्को द गामा पुलाच्या शेवटी आपण पोचतो तेव्हा, लिस्बनच्या ईशान्येकडील किनाऱ्‍यावर माडाच्या झाडांची वनराई पाहायला मिळते. आपल्याला हवं असेल, तर आपण प्रशस्त महामार्गावरून पुढे जात राहू शकतो; तो मार्ग पोर्तुगालच्या उत्तरेकडे जातो. या नवीन पुलावरून दक्षिणेतल्या आल्गार्वपासून ते उत्तरेकडील मीन्यू प्रांतापर्यंत जायला एकदम झकास महामार्ग आहे; त्यासाठी लिस्बनमधील दाटलेल्या वाहतुकीतून वाट काढत जायची गरज पडत नाही!

सुरक्षा उपाय

हा पूल बांधत असताना सुरक्षा उपायांकडे खास लक्ष देण्यात आलं होतं. साधी कार बंद पडली तरीसुद्धा फार मोठं ट्रॅफिक जॅम होऊ शकतं. पण, पुलावर आणि पुलाशी जोडणाऱ्‍या मार्गांवर अगदी योजनापूर्वक ८७ व्हिडिओ कॅमेरा बसवलेले असल्यामुळे वाहतुकीत काही गडबड झाल्यास पोलिस ठाण्यात आणि वाहतूक नियंत्रण कक्षेत ते ताबडतोब दिसून येतं. एखादी गाडी बंद पडली, तर लागलीच नियंत्रण कक्षेतील अलार्म वाजू लागतो.

त्याशिवाय, १७ किलोमीटरच्या पल्ल्यावर दर ४४० मीटरनंतर एसओएस (तातडीचे फोन) टेलिफोनच्या एकूण ३६ जोड्या लावण्यात आल्या आहेत. ही तातडीची सेवा चालते कशी? वेळोवेळी उद्‌भवणाऱ्‍या समस्या हाताळण्यासाठी पुलावरून खास गाड्या विशिष्ट वेळी चकरा मारत असतात—आग विझवणे आणि गाडी खेचून नेण्यासारखी कामंही केली जातात.

हवामानात अचानक बदल होतात तेव्हा? दोन वातावरणविज्ञान स्टेशनांद्वारे वाऱ्‍याचा वेग, जोर आणि दिशा यांचा तपास लावला जातो, हवामान व मार्गावरील स्थितीवर लक्ष ठेवलं जातं आणि हवामानातल्या बदलांनुसार वेगमर्यादांमध्ये बदल केले जातात.

रात्रीच्या वेळी, पुलाच्या महामार्गावरचे १,२०० दिवे लागतात तेव्हा पुलाची शोभा आणखीनच वाढते.

परिस्थितीकीची आव्हानं

नवीन पुलाचं ठिकाण ठरवणं काही सोपं नव्हतं. त्यात कोणत्या गोष्टी सामावलेल्या होत्या?

परिस्थितीकीच्या दृष्टीतून त्या ठिकाणी एक मोठी समस्या होती. कारण हा पूल, पश्‍चिम युरोपातील एका सर्वात मोठ्या खाडीत असलेल्या पक्ष्यांच्या नैसर्गिक राखीव क्षेत्रावरून जातो. तिथली वनस्पती, मासे, पक्षी, पुराणवस्तू शोध, पाणी आणि हवेचा दर्जा आणि शेकडो एकर खारी दलदल यांच्या संरक्षणासाठी खोलवर अभ्यास करावा लागला. तेगस खाडीकडे वन्यजीवन आकर्षित का होतं? पोर्तुगाल आणि युरोपमधील सर्वात महत्त्वाच्या दमट प्रदेशांपैकी हा एक आहे आणि त्यामुळे देशोदेशी, ब्लॅक-विंग्ड स्टील्ट, केन्टीश प्लव्हर आणि लिटल टर्नसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्‍या पक्ष्यांच्या जातींसाठी हे प्रजोत्पादन करण्याचे सर्वात उत्तम ठिकाण आहे. शरद ऋतूत आणि हिवाळ्यात हजारो पक्षी भरतीच्या वेळी आसऱ्‍यासाठी या खारी दलदलीकडे वळतात.

खूप वर्षांपासून असलेल्या मत्स्य पालन भागांचाही विचार करावा लागला. म्हणजे, माशांना शक्यतो त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागली. या मत्स्य पालन क्षेत्रांचे निरीक्षण करण्यासाठी विशेषतः सोल आणि सी बासच्या तीन हजार माशांना कड्या अडकवण्यात आल्या.

हा शांत परिसर अचानक शहरात ओढून आणल्यासारखं झालं आहे. नैसर्गिक वातावरणावर केवढा परिणाम होईल? दक्षिण किनाऱ्‍याच्या संरक्षणार्थ केलेल्या उपायांमुळे राखीव क्षेत्रातील नैसर्गिक संपत्तीचं होता होईल तितकं रक्षण होईल अशी आशा केली जाते.

अभियांत्रिकी प्रगती, वास्तुशिल्प सौंदर्य आणि समरूपता यांच्या दृष्टीने वास्को द गामा पूल ही एक मोठीच कामगिरी म्हणावी लागेल. वास्को द गामाचं नाव असलेल्या पुलाबद्दल पोर्तुगालला अभिमान वाटण्यासारखंच आहे!

[१५ पानांवरील नकाशा/चित्र]

(For fully formatted text, see publication)

पोर्तुगाल

स्पेन

[नकाशा]

पोर्तुगाल

लिस्बन

मॉन्टीहो

वास्को द गामा पूल

[चित्राचे श्रेय]

Courtesy of Lusoponte/Sonomage

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा