हात धुवा आणि पुसा!
आपल्याला सर्दीपडसे आणि इतर संसर्ग होतात ते कशामुळे? हातांवरच्या जंतुंमुळे; अमेरिकेतील संसर्ग नियंत्रण रोगपरिस्थितीविज्ञान तज्ज्ञांच्या संघानुसार, असले ८० टक्के रोग हवेतल्या जंतुंमुळे नव्हे तर आपल्या हातांवर असलेल्या जंतुंमुळे होत असतात. म्हणूनच तर, हात धुणे हा रोग प्रसार रोखण्याचा एकमेव मार्ग समजला जातो. पण इतके माहीत असूनसुद्धा कित्येक लोक, शौचास जाऊन आल्यावर किंवा नाक शिंकरल्यावर किंवा मग खाद्यपदार्थांना हात लावण्याआधी हात धूत नाहीत. अर्थात, असेही अनेकजण आहेत जे वर सांगितल्याप्रमाणे हमखास हात धूतात. पण, घाईघाईत, कसेतरी हात धुतल्याने संसर्गाचा धोका काही टळत नसतो.
शिवाय, हात धुणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे आहे नीट हात पुसणे. इंग्लंडच्या वेस्टमिन्सटर विद्यापीठातल्या संशोधकांना दिसून आले, की अनेक लोक हात धुतल्यानंतर ते पूर्णपणे पुसत नाहीत, खासकरून हॉट एअर ड्रायर्स वापरल्यानंतर. कारण कित्येकजण हॉट एअर ड्रायर्स वापरल्यानंतर अर्धवट ओले राहिलेले हात अंगावरच्या कपड्यांना पुसतात. पण यामुळे हातांवर असलेल्या घातक सूक्ष्म जंतूंचा फैलाव होऊ शकतो. संशोधकांच्या मते, शक्यतो एकदा वापरून टाकून द्यायच्या कागदी टॉवेल्सने किंवा एखाद्या स्वच्छ, न वापरलेल्या टॉवेलने हात पूर्णपणे पुसणे सगळ्यात सुरक्षित आहे.
हात धुण्यासंबंधी, अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि निवारक केंद्रे पुढील उपयुक्त सूचना देतात:
• नेहमी नळाखाली, गरम पाण्याने आणि सौम्य साबणाने हात धुवा. नळाच्या पाण्याखाली हात धुण्याऐवजी एखाद्या भांड्यात हात धुवावे लागले तर प्रत्येक वेळी ते भांडे स्वच्छ, निर्जंतुक करावे.
• हातावर साबणाचा फेस होईपर्यंत कमीतकमी १५ सेकंदांपर्यंत तरी हात चांगले चोळत राहा. हातांचा वरचा भाग आणि तळहात तसेच बोटांच्या मध्ये आणि नखांच्या खाली चांगले चोळा.
• मग नळाखाली गरम पाण्याने हात धुवा.
• एकदा वापरून टाकण्याजोग्या किंवा न वापरलेल्या टॉवेलने हात पुसा; हात स्वच्छ केल्यानंतर नळाला किंवा टॉवेलच्या खुंटीला हात लावू नका.
• स्पर्श न करता टॉवेल हातात घेऊन नळ बंद करा.
• मुलांना उभे राहून अगदी सहजासहजी पाण्याखाली हात धूता येतील अशी सोय असावी. तशी सोय नसल्यास मुलाला उचलून, पाण्याखाली हात धुण्यासाठी त्याची मदत करा आणि मग स्वतःही हात धुवा.