वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १२/८ पृ. २६-२७
  • प्राण्यांशी क्रूरतेने वागणे—गैर आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्राण्यांशी क्रूरतेने वागणे—गैर आहे का?
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • क्रूरता गैर का आहे?
  • प्राणी या क्रूरतेपासून मुक्‍त होतील
  • प्राणी मेल्यानंतर स्वर्गात जातात का?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • मांसाहार अयोग्य आहे का?
    सावध राहा!—१९९७
सावध राहा!—१९९८
g98 १२/८ पृ. २६-२७

बायबलचा दृष्टिकोन

प्राण्यांशी क्रूरतेने वागणे—गैर आहे का?

दृश्‍य आहे मध्य अमेरिकेतील एका रिंगणाचे; सगळ्यांच्या नजरा दोन कोंबड्यांवर खिळून आहेत; एक कोंबडा लाल आहे तर दुसऱ्‍या पांढरा. लाल कोंबडा आपल्या पायाला बांधलेल्या धारदार पात्याने पांढऱ्‍या कोंबड्यावर वार करताच प्रेक्षकांची आरडाओरड सुरू होते. मग परीक्षक येऊन या दोन्ही कोंबड्यांना उचलतो. रक्‍तबंबाळ झालेल्या पांढऱ्‍या कोंबड्याने आता मान टाकली आहे. अशाप्रकारे कोंबड्यांची ही झुंज संपते.

दक्षिण फिलिपाईन्समध्ये दोन वळूच्या घोड्यांची झुंज लावली जाते. या घोड्यांच्या कानांचा, गळ्याचा, नाकाचा आणि शरीराच्या इतर भागांचा चावा घेण्याचा भयंकर प्रकार प्रेक्षक श्‍वास रोखून पाहताहेत. या खेळाच्या शेवटी, दोन्ही घोडे जिवंत राहिले तरी या दोघांपैकी निदान एक तरी लुळापांगळा, अंधळा झालेला असेल किंवा त्याला इतक्या दुखापती झालेल्या असतील की शेवटी तो मरेलही.

रशियातील दोन कुत्रे एकमेकांवर हल्ला चढवतात. थोड्याच वेळात डोळे उपटलेले, कान चिरलेले, पाय तुटलेले आणि शरीराला झालेल्या घावातून रक्‍त ओघळत आहे अशी त्यांची दशा होते.

अशाप्रकारे शतकानुशतके मनुष्याने प्राण्यांची प्राण्यांसोबत झुंज लावून दिली आहे आणि हे सगळे पैशाच्या हव्यासापोटी. यांशिवाय, बैलांची झुंज, कोल्ह्यांची शिकार आणि अगदी कोळ्यांचीही झुंज लावली जाते. तसेच, विज्ञानाच्या प्रयोगांच्या नावाखाली देखील अनेक प्राण्यांचे हालहाल होतात. इतकेच काय पण असंख्य प्राण्यांचे, मालकांच्या दुर्लक्षिपणामुळे हालहाल होतात; मग हा दुर्लक्षितपणा जाणूनबुजून केलेला असो किंवा नकळत केलेला असो.

काही देशांमध्ये प्राण्यांशी व्यवहार करण्यासंबंधीचे आणि क्रूर वागणूक निषिद्ध करणारे कायदेकानून आहेत. फार पूर्वी म्हणजे १६४१ साली मॅसॅचूसेट्‌स बे कॉलनीने “द बॉडी ऑफ लिबरटीस” सूत्ररूपात मांडले ज्यात असे म्हटले होते: “मनुष्याला ज्यांचा उपयोग होतो अशा कोणत्याही मुक्या जनावरावर कोणीही कुठल्याही प्रकारचा जुलूम करता कामा नये.” यानंतर क्रूरतेपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कायदेकानून काढले गेले आणि संस्था-संघटना स्थापन करण्यात आल्या.

पण तरीही वर उल्लेखलेल्या झुंजीच्या खेळांचा उदोउदो करणाऱ्‍या अनेकांना, आपण प्राण्यांना क्रूर वागणूक देण्याबद्दल दोषी आहोत असे मुळीच वाटत नाही. प्राण्यांना क्रूरपणे छळणारे किंवा त्यांना आपल्या डोळ्यांदेखत मरू देणारे काहीजण तर या प्राण्यांवर खूप खूप प्रेम करत असल्याचा दावा करतात. कोंबड्यांच्या झुंजीचे प्रेमी तर असे म्हणतात, की ज्या कोंबड्यांचा जेवणात वापर होतो अशांपेक्षा झुंजीतले कोंबडे अधिक काळ जगतात. पण त्यांचे हे म्हणणे खरेच दिलासा देणारे आहे का?

क्रूरता गैर का आहे?

आपण प्राण्यांचा उपयोग करून घ्यावा असे देवाला वाटते. बायबलचे सिद्धान्त आपल्याला अन्‍न आणि वस्त्र यांसाठी किंवा आपल्या संरक्षणासाठी प्राण्यांची कत्तल करण्याची अनुमती देतात. (उत्पत्ति ३:२१; ९:३; निर्गम २१:२८) असे असले तरीही देवाच्या नजरेत जीवन पवित्र आहे. प्राण्यांवर अधिकार गाजवताना आपण जीवनाबद्दल आदर प्रदर्शित केला पाहिजे. ज्याने केवळ स्वतःच्या मजेखातर प्राण्यांची आणि कदाचित मानवांची देखील कत्तल केली त्या निम्रोदला बायबल मुळीच चांगले म्हणत नाही.—उत्पत्ति १०:९.

देवाला प्राण्यांविषयी किती काळजी आहे हे येशूच्या पुढील शब्दांवरून स्पष्ट होते: “पाच चिमण्या दोन दमड्यांस विकतात की नाही? तरी त्यांपैकी एकीचाहि देवाला विसर पडत नाही.” (लूक १२:६) तसेच, दुष्टांनी भरलेल्या एका शहरातल्या लोकांनी पश्‍चात्ताप केला तेव्हा देवाने त्यांचा नाश करण्याचा आपला निर्णय बदलला; त्यावेळी तो म्हणाला: “एक लाख वीस हजाराहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेंढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?” (योना ४:११) यावरून स्पष्टच होते की देव, प्राण्यांना टाकाऊ वस्तू म्हणजे वाटेल तेव्हा टाकून देण्याजोग्या वस्तूंसारखे समजत नाही.

इस्राएल लोकांना निरनिराळे नियम देताना देवाने त्यांना प्राण्यांची योग्य काळजी घेण्याचेही शिक्षण दिले. मोकाट फिरणारे जनावर वळवून त्याच्या मालकाकडे पोचते करावे किंवा संकटात सापडलेल्या जनावरची मदत करावी अशी आज्ञा देवाने त्यांना दिली होती. (निर्गम २३:४, ५) मानवांप्रमाणेच, प्राण्यांना देखील शब्बाथाच्या विसाव्याचा फायदा मिळत होता. (निर्गम २३:१२) शेतात राबणाऱ्‍या जनावरांशी योग्य व्यवहार करण्यासंबंधी देखील नियम घालून दिले होते. (अनुवाद २२:१०; २५:४) या सर्वांवरून एक गोष्ट स्पष्ट होते, की प्राण्यांवर जुलूम, अत्याचार करायचा नव्हता तर त्यांची योग्य काळजी घ्यायची होती, त्यांचे संरक्षण करायचे होते.

या बाबतीत देवाचा दृष्टिकोन काय आहे हे नीतिसूत्रे १२:१० स्पष्टपणे सांगते: “धार्मिक मनुष्य आपल्या पशूच्या जिवाकडे लक्ष देतो, पण दुर्जनांचे अंतर्याम क्रूर असते.” एक बायबल भाष्य याच वचनाचे भाषांतर अशाप्रकारे करते: “धार्मिक मनुष्य अगदी मुक्या जनावरांवर देखील दया करतो; पण दुष्ट मनुष्य, आपण सगळ्यात कोमल हृदयाचे आहोत असा स्वतःबद्दल विचार करत असला तरी तो क्रूर असतो.”—व्हिल्यम मॅकडॉनल्ड यांचे बिलिव्हर्स बायबल भाष्य.

नीतिमान मनुष्य प्राण्यांवर दया करतो आणि त्यांच्या गरजा काय आहेत हे जाणून घेण्यास उत्सुक असतो. दुष्ट मनुष्य मात्र प्राण्यांवर आपले प्रेम आहे असे बोलून दाखवतो पण त्याच्या “दयामाया” खऱ्‍या तर क्रूर असतात. त्याच्या कृत्यांवरून त्याच्या मनातला स्वार्थी हेतू उघड होतो. हीच गोष्ट, पैसा कमावण्यासाठी एका प्राण्याची दुसऱ्‍या प्राण्याविरुद्ध झुंज लावून देणाऱ्‍यांच्या बाबतीत किती खरी आहे!

प्राणी या क्रूरतेपासून मुक्‍त होतील

मनुष्याने, ‘समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवावी’ हा देवाचा मूळ उद्देश होता हे कबूल आहे. (उत्पत्ति १:२८) पण, म्हणून काही तो प्राण्यांना क्रूर वागणूक देण्याची गोष्ट खपवून घेतो असे नाही. प्राण्यांना दिली जाणारी ही अमानुष वागणूक जरूर संपुष्टात येईल. देव अशा सर्व अनावश्‍यक दुःखाचा अंत करेल असा आपण विश्‍वास ठेवू शकतो. पण प्रश्‍न असा आहे, की देव कशाप्रकारे हा अंत करेल?

दुष्ट आणि क्रूर लोकांचा कायमचा नायनाट करण्याद्वारे; कारण असे करण्याचे त्याने स्वतः वचन दिले आहे. (नीतिसूत्रे २:२२) प्राण्यांविषयी होशेय २:१८ म्हणते: “त्या दिवशी इस्राएलांकरिता मी वनपशु, आकाशातील पक्षी व भूमिवर रांगणारे जीव यांबरोबर करार करीन.” खरेच, त्या काळातले जीवन किती सुखकर असेल जेव्हा शांतिमय परिस्थितींचा केवळ चांगल्या लोकांनाच नव्हे तर प्राण्यांना देखील फायदा होईल!

[२६ पानांवरील चित्र]

“एका गावातली बैलांमधील झुंज,” फ्रान्सिस्को गोया यांच्याद्वारे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा