वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ११/८ पृ. १९-२५
  • ‘जगणे पण स्वतःसाठी नव्हे’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘जगणे पण स्वतःसाठी नव्हे’
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अतिशय महत्त्वाचा निर्णय
  • आफ्रिकेतील आमची सेवा
  • राष्ट्रभक्‍तीचा वादविषय
  • आमचे जीवन धोक्यात आले
  • विश्‍वासासाठी कैद
  • नवीन कार्यनियुक्‍तीवर
  • मायदेशी परतणे!
  • मी यहोवाने दाखवलेल्या मार्गाने चालायचं निवडलं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • यहोवा नेहमीच आपली काळजी घेतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • अनुकूल आणि प्रतिकूल काळातही मिळालेले आशीर्वाद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
सावध राहा!—१९९८
g98 ११/८ पृ. १९-२५

‘जगणे पण स्वतःसाठी नव्हे’

जॅक योहानसन यांच्याद्वारे कथित

मलावीतल्या त्या आफ्रिकी सैनिकानं मला नदीकाठी, लँड रोवरच्या (वाहनाच्या) हेडलाईट्‌समध्ये उभं राहण्याचा हुकूम दिला. त्यानं आपली बंदूक माझ्यावर रोखली तेव्हा लॉयड लीकवीडे नदीच्या दिशेनं जोरात धावत आला आणि त्यानं स्वतःला माझ्यापुढं झोकून दिलं. तो पुन्हा पुन्हा एकच विनंती करत होता: “मला ठार मारा, मला! त्या बिचाऱ्‍या परदेशी माणसाचा जीव का घेता? काय बिघडवलंय त्यानं तुमचं?” युरोपियन असलेल्या माझ्यासाठी एक आफ्रिकी माणूस आपला जीव देण्यास का तयार होता? याचं उत्तर देण्याआधी, ४० वर्षांपूर्वी मी आफ्रिकेत एक मिशनरी म्हणून कसा आलो हे तुम्हाला सांगतो.

सन १९४२ चा काळ. मी अवघ्या ९ वर्षांचा असताना आई वारली; आता उरलो होतो आम्हीच, म्हणजे बाबा आणि आम्ही पाच भावंडं. घरातलं शेंडंफळ मीच. मग चार महिन्यांनंतर, फिनलंडमध्ये सगळ्यात पहिले यहोवाचे साक्षीदार असलेल्या माझ्या बाबांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. आता घरची सगळी जबाबदारी मायावर, माझ्या थोरल्या बहिणीवर पडली. निदान आमचा शेतमळा तरी आमच्या हातात राहिला. आध्यात्मिक गोष्टींमध्ये देखील मायानं पुढाकार घेतल्यामुळे बाबांचा मृत्यू होऊन एक वर्षसुद्धा झालं नसेल तोच तिनं आणि माझ्या भावानं यहोवा देवाला केलेलं समर्पण पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन जाहीर केलं. याच्या एका वर्षांनंतर वयाच्या ११ व्या वर्षी मीही हे पाऊल उचललं.

अतिशय महत्त्वाचा निर्णय

सन १९५१ मध्ये एका व्यापारी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला फिनलंडच्या फॉर्ड मोटर कंपनीत नोकरी लागली. याच्या सहा महिन्यांनंतर यहोवाच्या साक्षीदारांच्या एका बुद्धीमान प्रवासी सेवकानं मला आश्‍चर्यचकित करेल असं काहीतरी सांगितलं. त्यांनी मला एका संमेलनात पायनियरींगच्या म्हणजे पूर्ण-वेळ प्रचार कार्य करण्याच्या आशीर्वादांवर भाषण देण्यास सांगितलं. मला जरासं अवघडल्यासारखंच वाटलं कारण पूर्ण-वेळेचा प्रचारक असण्याऐवजी मी तर पूर्ण-वेळेची नोकरी करत होतो; त्यामुळे या विषयावर आपण मनापासून बोलूच शकणार नाही असं मला वाटलं. पण याविषयी मी यहोवाकडे प्रार्थना केली. त्यांनंतर मला याची जाणीव झाली, की ख्रिश्‍चनांनी ‘स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला त्याच्याकरिता जगावे,’ आणि पायनियरींग करूनच आपल्याला हे अधिक करता येईल हे जाणवल्यामुळे मी एक पायनियर बनण्याचा निर्णय घेतला.—२ करिंथकर ५:१५.

मी कंपनीतली माझी नोकरी सोडू नये म्हणून माझ्या सुपरव्हाईसरनं मला डबल पगार देण्याचं आश्‍वासनही दिलं. पण माझा निर्णय पक्का असल्याचं त्यांना दिसून आलं तेव्हा ते म्हणाले: “खरंच, तू योग्यच निर्णय घेतला. माझं उभं आयुष्य मी या ऑफिसमध्ये घालवलं, पण आजपर्यंत समाजाला माझी खरंच मदत झाली आहे का?” मग मे १९५२ साली मी एक पायनियर बनलो. त्याच्या काही आठवड्यांनंतर मी पायनियर सेवेवर आत्मविश्‍वासाने भाषण देऊ शकलो.

काही महिने पायनियरींग केल्यानंतर आपल्या ख्रिस्ती तटस्थतेमुळे मला सहा महिने गजाआड करण्यात आले. त्यानंतर मग, फिनलंडच्या आखातातील हास्टोव्यूसो बेटावर पुन्हा इतर तरुण साक्षीदारांबरोबर मला आठ महिने कैदेत ठेवण्यात आले. आम्ही या बेटाला लहान गिलियड असे नाव दिले कारण या ठिकाणी आम्ही आमच्या आमच्यातच एक जबरदस्त बायबल अभ्यास कार्यक्रम सुरू केला होता. पण, खरोखरच्या गिलियडला म्हणजे न्यूयॉर्कमध्ये साऊथ लॅनसिंग या ठिकाणी असलेल्या वॉचटावर गिलियड प्रशालेत जाण्याची माझी इच्छा होती.

या बेटावर मी कैद असतानाच मला वॉचटावर संस्थेच्या शाखा दफ्तराकडून एक पत्र आलं; त्यात मला यहोवाच्या साक्षीदारांचा एक प्रवासी सेवक म्हणून सेवा करण्याचं आमंत्रण मिळालं होतं. सुटका झाल्यानंतर मला फिनलंडच्या स्वीडिश भाषीय विभागातल्या मंडळ्यांना भेट द्यायची होती. त्यावेळी मी अवघ्या २० वर्षांचा होतो आणि त्यामुळे आपण या कामासाठी योग्य नाही असं मला वाटत होतं; पण मी यहोवावर भरवसा ठेवला. (फिलिप्पैकर ४:१३) मी ज्या मंडळ्यांमध्ये सेवा केली तिथले बंधूभगिनी खूप समजूतदार होते. त्यांच्यासमोर मी जणू “बाळ” होतो म्हणून त्यांनी मला कधीच कमी लेखलं नाही.—यिर्मया १:७.

त्याच्या पुढच्या वर्षी मी एका मंडळीला भेट दिली तेव्हा लिंडाशी माझी गाठ पडली; लिंडा अमेरिकेहून फिनलंडला सुटीसाठी आली होती. ती अमेरिकेला गेली तेव्हा तिनं फार लवकर आध्यात्मिक प्रगती केली. काही काळातच तिचा बाप्तिस्माही झाला. आणि मग जून १९५७ रोजी आम्ही लग्न केलं. पुढे १९५८ च्या सप्टेंबर महिन्यात, आम्हाला गिलियड प्रशालेच्या ३२ व्या क्लाससाठी बोलावणं आलं. त्याच्या पुढच्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात आमचं ग्रॅज्यूएशन झाल्यानंतर दक्षिणपूर्व आफ्रिकेतील नीयासालंडमध्ये म्हणजे आजच्या मलावीमध्ये आम्हाला सेवा करण्यासाठी पाठवलं गेलं.

आफ्रिकेतील आमची सेवा

आफ्रिकेत त्यावेळी १४,००० हून अधिक बांधव होते आणि त्यांच्यासोबत सेवा करणे आम्हाला खूप आवडायचं. कधीकधी आम्हाला लागणाऱ्‍या सर्व वस्तू आम्ही सोबत घेऊन लँड रोवरनं प्रवास करत असू. जिथं एकाही गोऱ्‍या माणसानं अजून पाऊल ठेवलं नसेल त्या गावांमध्ये आम्ही राहात असू आणि तिथले लोकही मोठ्या हिरहिरीनं आमचं स्वागत करत. आम्ही गावात जायचो तेव्हा सगळं गावच आम्हाला पाहण्यासाठी बाहेर यायचं. आम्हाला नमस्कार केल्यानंतर गावकरी अगदी शांतपणे खाली बसून एकटक आम्हाला न्याहाळायचे.

अनेकदा हे गावकरी मोठ्या आपुलकीनं खास आमच्यासाठी एखादी झोपडी बांधत; कधी मातीची तर कधी नेपियर गवताची. अशा प्रकारे बनवलेल्या झोपडीत आम्ही जेमतेम आडवं होऊ शकत होतो. रात्रीच्या वेळी तर तरस आमच्या झोपडीच्या अवतीभोवती फिरत असत आणि नेमकं आमच्या उशालाच इतका भयानक आवाज करत की विचारू नका! पण नीयासालंडमधल्या बांधवांना तर लवकरच अशा हिंस्र पशुंपेक्षा अधिक भयानक अनुभव येणार होते.

राष्ट्रभक्‍तीचा वादविषय

सबंध आफ्रिकेत स्वातंत्र्य चळवळी कार्यरत होत्या. नीयासालंडमधील सगळ्यांना तिथं असलेल्या एकमेव राजकीय पक्षात सामील होणे बंधनकारक होते. अशाप्रकारे, एकाएकी आमची तटस्थता एक ज्वलंत राष्ट्रीय वादविषय बनली. त्यावेळी शाखा पर्यवेक्षक बंधू मालकम व्हीगो नसल्यामुळे ऑफिसचं काम मीच पाहात होतो. त्यामुळे मी, तत्कालिन प्रधान मंत्री डॉ. हेस्टिंग्स कामाझू बान्डा यांना जाऊन भेटण्याचं ठरवलं. मी आणि आणखीन दोन ख्रिस्ती वडिलांनी त्यांना आपली तटस्थ भूमिका स्पष्ट केली आणि आमची ही मिटिंग अगदी मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली. पण एवढं करूनसुद्धा जवळजवळ एका महिन्यानंतर म्हणजे १९६४ च्या फेब्रुवारी महिन्यात एलाटन एमवाचानदी छळाचा पहिला बळी बनला; एका खवळलेल्या जमावानं भाल्याबरचीनं त्याचा खून केला. त्याच्यासोबत असलेल्या इतर साक्षीदारांना तिथून पळ काढणं भाग होतं.

आम्ही डॉ. बान्डा यांना एक टेलिग्रॅम पाठवला; त्यात आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून ही हिंसक कृत्यं थांबवावीत. त्यावर लगेच पंतप्रधानाच्या ऑफिसमधून फोन आला आणि मला त्यांच्यासमोर हजर व्हायला सांगण्यात आलं. हेरल्ड गाय नावाचा आणखीन एक मिशनरी, ॲलेक्झँडर माफामबाना हा स्थानिक साक्षीदार आणि मी, असे आम्ही तिघं डॉ. बान्डाकडे गेलो. त्या ठिकाणी आणखीन दोन सरकारी अधिकारी देखील उपस्थित होते.

आम्ही खाली बसलो ना बसलो तोच डॉ. बान्डा काही एक न बोलता हातातला टेलिग्रॅम हालवून आम्हाला दाखवू लागले. शेवटी, ते म्हणाले: “मिस्टर योहानसन या टेलिग्रॅमचा नेमका उद्देश काय?” आम्ही राजकारणाच्या बाबतीत तटस्थ आहोत हे आम्ही त्यांना स्पष्ट केलं आणि मी असंही म्हटलं: “शिवाय, एलाटन एमवाचानदीचा जो खून झाला तो लक्षात घेता तुमच्याशिवाय दुसरा कोण आमची मदत करू शकतो?” हे ऐकून डॉ. बान्डा आधीपेक्षा मोकळेपणानं बोलू लागले.

पण, तिथं असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्‍यानं असा आरोप लावला, की अमुक एका गावातले लोक तिथल्या स्थानिक अधिकाऱ्‍यांशी सहकार्य करत नाहीत. मग दुसऱ्‍या अधिकाऱ्‍यानं आणखीन एका गावाचा उल्लेख करून सांगितलं, की तिथले साक्षीदार तर एकदा डॉ. बान्डाविषयी चक्क अपमानास्पद गोष्टी बोलले होते. पण असं वागलेल्या कोणत्याही साक्षीदाराचं नाव ते देऊ शकले नाही. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं, की यहोवाच्या साक्षीदारांना सरकारी अधिकाऱ्‍यांचा आदर करण्याचं शिकवलं जातं. पण, दुर्दैवाची गोष्ट अशी की आमच्यावर लावलेले आरोप खोटे ठरवण्यात आमचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले.

आमचे जीवन धोक्यात आले

सन १९६४ मध्ये नीयासालंडला स्वातंत्र्य मिळाले आणि पुढे ते मलावीचे प्रजासत्ताक बनले. आमचं प्रचार कार्य बरंच सुरळीत चाललं असलं तरी दबाव वाढतच होता. याच काळात देशाच्या दक्षिण भागात राजकीय चळवळ सुरू झाल्याची बातमी तिथल्या साक्षीदारांनी आम्हाला फोनवरून कळवली. तिथं असलेल्या साक्षीदारांची स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आणि त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी तिथं कुणाला तरी पाठवलंच पाहिजे असं आम्हाला वाटलं. यापूर्वी कित्येकदा मी एकटाच तिथल्या जंगलांत गेलो होतो आणि त्यावेळी लिंडानंही मन घट्ट करून मला एकटं जाऊ दिलं होतं. यावेळी मात्र, ती लॉयड लीकवीडे नावाच्या एका तरुण साक्षीदारांला देखील सोबत घेऊन जाण्याचा आग्रह करत होती. ‘ही म्हणतेच आहे तर जावं त्याला घेऊन’ असा विचार करून मी त्यालाही सोबत घेतलं.

आम्हाला असं सांगण्यात आलं होतं, की संध्याकाळी संचारबंदी सुरू होण्याआधी म्हणजे सहा वाजायच्या आत अमुक एक नावेद्वारे नदी पार करायची. इतका प्रयत्न करूनसुद्धा, खराब रस्त्यांमुळे आम्हाला वेळेवर पोहंचता आलं नाही. नंतर कुठं आम्हाला समजलं, की संध्याकाळी सहाच्या नंतर आम्ही नदीच्या ज्या बाजूला होतो त्या बाजूला कोणीही आढळला तर दिसता क्षणीच त्यावर गोळीबार करण्याचा हुकूम दिला गेला होता. आम्ही गाडीतून नदीपाशी आलो तेव्हा पाहिलं तर नाव केव्हाच पलीकडच्या किनाऱ्‍याला पोहंचली होती. बंधू लीकवीडेनं जोरात हाक मारून नाव बोलावून घेतली. नाव परत तर आली पण नावेतला सैनिक ओरडला: “मला त्या गोऱ्‍या माणसाला ठार मारायचे आहे!”

सुरवातीला मला वाटलं तो उगीच मला धाक दाखवत आहे पण नाव जवळ आली तसं त्यानं मला गाडीच्या लाईटमध्ये उभं राहण्याचा हुकूम दिला. याच वेळी मग माझा तो आफ्रिकी मित्र माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि मला मारा अशी विनंती करू लागला. हे पाहून त्या सैनिकाचं काळीज पिळवटून आलं असावं असं वाटतं कारण त्यानंतर त्यानं माझ्यावर रोखलेली आपली बंदूक खाली केली. या वेळी मला येशूच्या शब्दांची आठवण झाली: “आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्‍यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही.” (योहान १५:१३) त्या प्रेमळ बांधवाला सोबत घेऊन जाण्याचं लिंडाचं म्हणणं मी ऐकलं याबद्दल मला किती हायसं वाटलं होतं!

याच्या दुसऱ्‍या दिवशी, बंधू लीकवीडेचं पार्टी मेंमबरशीप कार्ड पाहण्यासाठी कित्येक तरुणांनी ब्लॅनटीयरला जाणारा रस्ता आडवला. आमच्यापाशी एकच उपाय होता; होईल तितक्या लवकर गर्दीतून मार्ग काढत बाहेर पडणे! मी एकाएकी गाडीचा गिअर टाकला तेव्हा गाडी अचानक इतक्या जोरात पुढे सरकली की रस्त्यातले ते तरुण घाबरून मागे सरकले आणि तेवढ्या वेळात आम्ही पुढे निघून गेलो. बंधू लीकवीडे या जमावाच्या तावडीत सापडले असते तर कदाचित त्यांचा जीवही गेला असता. आम्ही शाखा दफ्तरात परतलो पण भयानक अनुभवामुळे आम्ही हादरून गेलो होतो. परंतु, यहोवानं आम्हाला वाचवलं याबद्दल आम्ही कृतज्ञ होतो.

विश्‍वासासाठी कैद

ऑक्टोबर १९६७ रोजी मलावीतील आमच्या कार्यावर अधिकृत बंदी घालण्यात आली. त्यावेळी देशभरात सुमारे १८,००० साक्षीदार होते. दोन आठवड्यांनंतर लीलाऐनवा या राजधानी शहरात ३,००० साक्षीदारांना कैद करण्यात आल्याचं आम्हाला समजलं. त्याच दिवशी रात्री ३०० किलोमीटरचा प्रवास करून तिथं जाण्याचं आम्ही ठरवलं; दुसरं काही नाही तर निदान मनोधैर्य उंचावण्यासाठी तरी. आम्ही लँड रोवरमध्ये पुस्तकं, मासिकं वगैरे भरली आणि यहोवाच्या दयेने रस्त्यात कुठेच आमच्या गाडीचा तपास न होता आम्हाला रस्त्यावरचे सर्व अडथळे सुरक्षित पार करता आले. मार्गावर असणाऱ्‍या प्रत्येक मंडळीला आम्ही जणू समयोचित आध्यात्मिक अन्‍नाचे पेटारे देत गेलो.

दुसऱ्‍या दिवशी सकाळी आम्ही तुरुंगाला भेट दिली. काय ते दृश्‍य! रात्रभर पाऊस पडला होता आणि आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींना भर पावसात बाहेर मैदानात उभं केलं होतं. ते चिंब भिजले होते आणि काहीजणं तर कुंपणावर आपली भिजलेली पांघरूणं वाळवत होते. कुंपणातून आम्ही काही जणांशी थोड्या वेळ बोलू शकलो.

दुपारी त्यांच्यावर खटला भरण्यात आला आणि स्वतःला साक्षीदार म्हणवणारे काही लोक कोर्टात साक्षीदारासाठी असलेल्या जागी आले. आम्ही थेट त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण त्या सर्वांचे चेहरे अतिशय भावनाशून्य होते. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांनी आपल्या विश्‍वासाचा त्याग केला! पण मग मला कळालं, की आपल्या विश्‍वास त्यागलेल्या त्या लोकांपैकी एकालाही त्या भागातले साक्षीदार ओळखत नव्हते. हे सगळं खरंतर एक नाटक होतं, खऱ्‍या साक्षीदारांचा विश्‍वास खचवण्यासाठी.

त्याच काळात, आम्हाला तडीपार करण्याचा हुकूमही काढला गेला. ब्लॅनटियरमधले आमचे शाखा दफ्तर ताब्यात घेण्यात आले आणि मिशनऱ्‍यांना २४ तासांच्या आत देशाबाहेर पडायचं होतं. घरी परतल्यावर एक पोलिस अधिकारी आमच्यासाठी गेट उघडतोय हे पाहून आम्ही गोंधळातच पडलो! दुसऱ्‍या दिवशी दुपारी एक पोलिस अधिकारी आला; काहीतरी खंत व्यक्‍त करून त्यानं आम्हाला अटक केलं आणि विमानतळाच्या दिशेनं धाडलं.

नोव्हेंबर ८, १९६७ रोजी आम्ही मलावी सोडले; आम्हाला माहीत होते की मलावीतील आमच्या बांधवांना आता कड्या परीक्षेच्या दिव्यातून जावे लागणार आहे. त्यामुळेच मलावी सोडताना आमचे अंतःकरण त्यांच्यासाठी पिळवटून आले. कित्येकांनी आपले जीव गमावले; शेकडो बांधवांना अगदी क्रूरपणे छळले गेले आणि हजारोंना आपले नोकरीधंदे, आपली घरदारे आणि मालमत्ता गमवावी लागली. पण एवढे होऊनही जवळजवळ सर्वांनीच आपली सचोटी राखली.

नवीन कार्यनियुक्‍तीवर

एवढ्या हालअपेष्टा वाट्याला आल्या तरीही मिशनरी कार्य सोडून देण्याचा विचार एकदाही आमच्या मनात डोकावला नाही. उलट, आम्ही एक नवीन कार्यनियुक्‍ती स्वीकारली आणि ती म्हणजे केनियाला जाऊन सेवा करण्याची; या देशात निसर्ग आणि लोक यांच्यात मोठी विविधता आहे. मसाई लोकांना भेटून तर लिंडा खूप खूष झाली होती. त्यावेळी एकही मसाई यहोवाचा साक्षीदार नव्हता. पण मग लिंडाला दुर्कस नावाची एक मसाई स्त्री भेटली आणि लिंडानं तिच्यासोबत बायबल अभ्यास सुरू केला.

दुर्कसला जाणीव झाली, की देवाला प्रसन्‍न करायचे असल्यास तिला तिचा विवाह कायदेशीर करावा लागेल. तिच्या दोन मुलांच्या पित्यानं मात्र असं करण्यास साफ इन्कार केला तेव्हा दुर्कस एकटीच कसंबसं आपल्या मुलांचं संगोपन करू लागली. तो मनुष्य, साक्षीदारांवर भयंकर रागावला होता पण आपल्या कुटुंबापासून वेगळे होऊनही तो खूष नव्हताच. शेवटी दुर्कसनं आग्रह केल्यानंतर तो यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करू लागला. त्यानं आपला जीवनमार्ग बदलला, साक्षीदार बनला आणि दुर्कसशी कायदेशीर विवाह केला. पुढे दुर्कस एक पायनियर बनली आणि तिचा पती आणि तिचा सगळ्यात थोरला मुलगा आज मंडळीत वडील आहेत.

अचानक १९७३ साली केनियामध्ये देखील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी आली आणि आम्हाला केनिया सोडणं भाग होतं. काही महिन्यांतच ही बंदी उठवली गेली. पण तोपर्यंत आम्हाला काँगो (ब्राझाविले) येथे जाऊन कार्य करण्याची तिसरी कार्यनियुक्‍ती मिळाली. एप्रिल १९७४ रोजी आम्ही या ठिकाणी पोहंचलो. तीन वर्षांनंतर, आम्हा मिशनऱ्‍यांवर हेरगिरी करण्याचा खोटा आरोप लावला गेला आणि पुन्हा एकदा आमच्या कार्यावर बंदी आली. याशिवाय, ब्राझाविलेच्या राष्ट्राध्यक्षाची हत्या झाल्यानंतर तिथं लढाई सुरू झाली. इतर सगळ्या मिशनऱ्‍यांना कार्य करण्यासाठी निरनिराळ्या देशांत पाठवलं गेलं; पण आम्हाला मात्र शक्य तितका वेळ तिथंच राहायला सांगितलं गेलं. उद्याचा दिवस पाहायला मिळेल की नाही हा विचार करून आम्ही झोपायचो; कितीतरी आठवडे असंच चाललं. पण यहोवा आपला सांभाळ करील हा भरवसा असल्यामुळे आम्हाला छान झोप लागायची. शाखा दफ्तरांत काही महिने आम्ही एकटेच होतो; पण आमच्या सबंध मिशनरी सेवेच्या काळात कधी नव्हते इतक्या मोठ्या प्रमाणात या काही महिन्यांत आमच्या विश्‍वासाची परीक्षा झाली आणि आमचा विश्‍वास आणखीन मजबूत झाला.

एप्रिल १९७७ रोजी आम्हाला ब्राझाविले सोडणं भाग होतं. त्यानंतर आम्हाला आश्‍चर्याचा एक सुखद धक्का बसला कारण यावेळी आम्हाला इराणमध्ये एक नवीन शाखा दफ्तर सुरू करण्याची कार्यनियुक्‍ती मिळाली होती. आमच्या पुढे आता आणखीन एक कठीण काम होतं आणि ते म्हणजे पारसी ही पर्शियन भाषा शिकणं. ही नवीन भाषा शिकत असल्यामुळे मंडळीच्या सभांमध्ये आम्ही केवळ एकदोन शब्दांतच म्हणजे लहान मुलांसारखी उत्तरं देत असू. १९७८ साली इराणमध्ये क्रांती सुरू झाली. युद्धाच्या सगळ्यात खडतर काळातूनही आम्ही निभावलो, पण जुलै १९८० रोजी आम्हा सगळ्या मिशनऱ्‍यांना तडीपार केलं गेलं.

पाचव्या कार्यनियुक्‍तीसाठी आम्हाला पुन्हा मध्य-आफ्रिकेतील झाइरे या ठिकाणी पाठवलं गेलं; आज झाइरे हे काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक या नावानं ओळखलं जातं. आम्ही झाइरेमध्ये १५ वर्षं आणि काही काळ बंदी असताना देखील सेवा केली. आम्ही तिथं पोहंचलो तेव्हा सुमारे २२,००० कार्यशील साक्षीदार होते; आज मात्र त्यांची संख्या १,००,००० च्याही पुढे गेली आहे!

मायदेशी परतणे!

ऑगस्ट १२, १९९३ रोजी मलावीतल्या यहोवाच्या साक्षीदारांवरील बंदी उठविली गेली. याच्या दोन वर्षांनंतर मला आणि लिंडाला कार्य करण्यासाठी पुन्हा एकदा मलावीला म्हणजे आम्ही जिथून सुरवात केली होती त्या ठिकाणी पाठवलं गेलं; मलावी हा एक मनमिळावू, जीव लावणाऱ्‍या लोकांचा रम्य देश असून त्याला द वॉर्म हार्ट ऑफ आफ्रिका म्हटलं जातं. जानेवारी १९९६ रोजी आम्हाला मलावीतील आनंदी, शांतीपूर्ण लोकांसोबत कार्य करण्याची संधी मिळाली आहे. तब्बल तीन दशके छळसंकटे सोसलेल्या आपल्या या विश्‍वासू मलावीयन बांधवांमध्ये पुन्हा एकदा सेवा करण्याची जी संधी आम्हाला लाभली आहे ती आम्ही बहूमोल समजतो. आफ्रिकेतील बांधवांकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आहे; म्हणूनच त्यांच्यावर आम्ही मनापासून प्रेम करतो. ते खरोखरच पौलाच्या शब्दांना जागले आहेत: “आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.” (प्रेषितांची कृत्ये १४:२२) आज मलावीत असलेल्या जवळजवळ ४१,००० साक्षीदारांना जाहीरपणे प्रचार करण्याची आणि मोठमोठी अधिवेशने भरवण्याची मोकळीक आहे.

आजपर्यंत मिळालेल्या सर्व कार्यनियुक्‍त्‌यांमध्ये आम्हाला खूप आनंद मिळाला. मी आणि लिंडा एक गोष्ट शिकलो आणि ती म्हणजे कोणताही प्रसंग मग तो कितीही खडतर असला तरी, आपलं व्यक्‍तिमत्त्व सुधारण्यास तो आपली मदत करू शकतो; पण यासाठी ‘यहोवाच्या सेवेतील आनंद’ आपण टिकवून ठेवण्यास हवा. (नहेम्या ८:१०) एक कार्यनियुक्‍ती सोडून दुसरी स्वीकारल्यावर नव्या परिस्थितीशी जुळवून घेणं मला खूप कठीण जायचं. पण लिंडा सहज कुठेही जुळवून घ्यायची, रूळून जायची आणि विशेष म्हणजे यहोवावर तिच्या खूप दृढ विश्‍वास होता त्यामुळे मला खूप मदत झाली; अशी ‘चांगली पत्नी’ मिळाल्याबद्दल मी किती कृतज्ञ आहे म्हणून सांगू!—नीतिसूत्रे १८:२२.

आमचं जीवन खरंच किती आनंदी आणि उत्साहपूर्ण राहिलं आहे! एकदा नव्हे तर कितीतरी वेळा, आमचं संरक्षण केल्याबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानले आहेत. (रोमकर ८:३१) पूर्ण-वेळ सेवेच्या आशीर्वादांवर मी पहिल्यांदा भाषण दिले त्याला आज ४० वर्षे लोटली आहेत. ‘यहोवा किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहिल्याबद्दल’ आम्ही आनंदी आहोत. (स्तोत्र ३४:८; मलाखी ३:१०) आमची खात्री पटली आहे, की “स्वतःसाठी नव्हे” तर यहोवासाठी जगणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे.

[२३ पानांवरील नकाशा/चित्र]

आम्ही या सर्व देशांत सेवा केली

इराण

काँगो प्रजासत्ताक

काँगो लोकशाही प्रजासत्ताक

केनिया

मलावी

[२० पानांवरील चित्र]

केप टाऊन, दक्षिण आफ्रिकेच्या मार्गाने मलावीला जाताना

[२२ पानांवरील चित्र]

आम्हाला अटक करून मलावीतून तडीपार केलं तेव्हा

[२४ पानांवरील चित्र]

दुर्कस, एक मसाई स्त्री आपल्या पतीसह

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा