तो शेवटपर्यंत लढत राहिला
ऑक्टोबर ५, १९९५ रोजी १४ वर्षे वय असलेल्या मॅट टॅपियोच्या मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. तपासून पाहिल्यावर त्याच्या मेंदूवर आलेली गाठ कॅन्सरची आहे असे दिसून आले. हे त्याचे पहिले ऑपरेशन; पण पुढच्या अडीच वर्षांत त्याचे असे कितीतरी ऑपरेशन्स झाले. शिवाय त्यानंतर केमोथेरपी आणि रेडिएशन देखील.
मॅट अमेरिकेतल्या मिशिगन राज्यात राहायचा; तिथल्याच एका सरकारी शाळेत तो शिकत होता. दर आठवडी होणाऱ्या ख्रिस्ती सभांनाही तो जायचा. संधी मिळताच तो शाळेतल्या शिक्षकांशी आणि मुलांशी आपल्या धार्मिक विश्वासांविषयी बोलायचा आणि प्रचार कार्यातही त्याचा सहभाग असायचा. शेवटल्या अडीच वर्षांपैकी जवळजवळ दीड वर्ष त्याने हॉस्पिटलमध्येच काढले असे म्हटले तरी चालेल; पण तिथेही भेटणाऱ्या लोकांना त्याने कितीतरी बायबलची पुस्तके, मासिके दिली.
कित्येकदा मॅटवर मृत्यूने झडप घालण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेला या सगळ्यातून तो बाहेर आला. एकदा तर, हॉस्पिटलला जाताना त्याला अचानक झटके येऊ लागले आणि त्याचा श्वासोच्छ्वासच थांबला. ताबडतोब कृत्रिम श्वासोच्छ्वास दिल्यामुळे तो शुद्धीवर आला. शुद्धीवर येताच तो रडू लागला आणि मोठमोठ्याने म्हणू लागला: “मी लढणार आहे, शेवटपर्यंत लढणार आहे, हार नाही मानणार मी!” मॅटला पाहून लोक म्हणायचे की केवळ देवावरच्या विश्वासामुळेच तो अजून जिवंत आहे.
जानेवारी १३, १९९६ रोजी मॅटचे एक स्वप्न साकार झाले. त्या दिवशी त्याने बाप्तिस्मा घेऊन यहोवा देवाला केलेले आपले समर्पण जाहीर केले. संसर्ग होण्याच्या भीतीमुळे त्याला एका प्रायव्हेट स्विमिंग पूलमध्ये बाप्तिस्मा देण्यात आला. काही दिवसांतच त्याला पुन्हा ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. १९९७ च्या ऑगस्ट महिन्यात त्याला दोन आठवडे सतत उलट्या होत होत्या पण ऑपरेशननंतर तो पुन्हा यातून सावरला.
या सगळ्यातून जात असताना देखील मॅट सगळ्या डॉक्टरांशी आणि नर्सेसशी हसून खेळून वागायचा. त्याचे ते हसणे खेळणे पाहून लोकांना आश्चर्यच वाटायचे. एकदा एक डॉक्टर त्याला म्हणाले, “मॅट, मी जर तुझ्या जागी असतो, तर डोक्यावर पांघरूण घेऊन पडून राहिलो असतो, कुणाला जवळ फिरकूही दिलं नसतं.”
सन १९९८ च्या फेब्रुवारी महिन्यात एकदा मॅट हॉस्पिटलमधून घरी आला. आपण अजून जिवंत आहोत, आणि विशेष म्हणजे आपल्या घरी आलो आहोत याचा त्याला इतका काही आनंद झाला होता, की घरात पाऊल टाकताच तो म्हणाला: “मला आज खूप आनंद झाला आहे, आपण सर्व मिळून प्रार्थना करूया का?” मग त्याने प्रार्थना केली, अगदी भरभरून बोलला, आपला आनंद यहोवाजवळ व्यक्त केला. यानंतर दोन महिन्यांनी, १९ एप्रिल रोजी शेवटी मृत्यूने त्याला गाठले.
याआधी, यहोवाच्या साक्षीदारांच्या एका सभेत मॅटची रेकॉर्ड केलेली मुलाखत ऐकवण्यात आली होती. मुलाखत घेणाऱ्याने त्याला विचारले: “प्रचार कार्य आणि ख्रिस्ती सभा यांविषयी आम्हाला, म्हणजे त्यामानानं बऱ्यापैकी तब्येत असणाऱ्यांना तुला काय सांगावसं वाटतं मॅट?”
मॅटने उत्तर दिले: “मला हेच सांगावसं वाटतं की जे काही करता येईल ते आताच करा. . . . केव्हा काय होईल, सांगता येत नाही. . . . पण काही झालं तरी, यहोवाविषयी इतरांना सांगण्याचे कधीच सोडू नका.”